चर्चा

त्या अनाठायी औदार्याने काय साधले?
श्री संपादक, आजचा सुधारक यांसी स. न. वि.
त्या घटनेला आता ४५ वर्षे होऊन गेली आहेत. तिचा विचार आज अलिप्तपणे करता येतो का, हे पहावे अशा उद्देशाने हे लिहीत आहे. सुरुवातीलाच हे अगदी स्पष्टपणे सांगितले पाहिजे की गांधी-हत्येशी या चर्चेचा संबंध जोडायचा नाही ही या चर्चेची पूर्व अट आहे.
सर्वानाच माहीत असलेली पाश्वभूमी मी माझ्या पद्धतीने थोडक्यात सांगतो. काश्मीर नरेशांनी पाकिस्तानी आक्रमणामुळे हतबल होऊन भारताशी सामीलनामा केला, आणि काश्मीर हा भारताचा भूभाग बनला. भारतीय फौजा श्रीनगर वाचवण्यासाठी धावल्या, आणि एका अघोषित युद्धास तोंड लागले.
हे अघोषित युद्ध पाकिस्तानने भारतावर लादले होते; त्यामुळे ते युद्ध असेपर्यंत भारताने पाकिस्तानला एक पैही दिली नसती तरी ते भारताचे कृत्य समर्थनीयच ठरले असते. भारताच्य मंत्रिमंडळाने पूर्ण विचार करून असा निर्णय घेतला की तूर्त तरी पाकिस्तानला त्याचे देणे द्यायचे नाही. त्याने आक्रमण मागे घेतल्यावरच त्याची रक्कम त्याला द्यायची गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी शासनाचा हा निर्णय तारीख ३ जानेवारी १९९४ रोजी कलकत्ता येथे एका जाहीर सभेत बोलून दाखवला. ‘आमच्यावर झाडण्यासाठी बुलेट्स् खरेदी करायला आम्ही पाकिस्तानला एक पैही देणार नाही असे त्यानी अगदी खणखणीत बजावले.
पण दोन आठवड्यांच्या आतच भारत सरकारने हा निर्णय बदलून पाकिस्तानचे देणे’ त्याला देऊन टाकले. तिकडे काश्मीर-आघाडीवर आपले जवान प्राणांची बाजी लावून झुंजत होते, आणि इकडे आपल्याच सरकारने शत्रू देशाला घसघशीत रोख रक्कम दिली. आजच्या मानाने ती रकम ३५ ते ४० अब्ज रुपये एवढी होती. “ही रकम हाती आल्याबरोबर त्यातून पाकिस्तानने नवी शस्त्रास्त्रे खरेदी करून युद्ध आघाडीवर वापरली, व त्यामुळे आपल्या जवानांचे रक्त विनाकारण जास्त प्रमाणांत सांडले,” असा युक्तिवाद इथे करायचा नाही, परंतु युद्ध चालवायला जो खर्च येत असतो, त्याची तरतूद काही प्रमाणांत या पैशामुळे झाली इतके तरी नक्कीच म्हणता येईल. याचा सरळ अर्थ हाच होतो की भारत सरकारने आपल्याच जवानांच्या अडचणीत भर घातली. कोणता उद्देष मनांत धरून?
पाकिस्तानला ही रकम ताबडतोब देणे न्यायनीतीच्या दृष्टीने आवश्यक नसतांनाही जगाला भारताचा थोरपणा कळावा या उद्देशाने ही रकम देण्यात आली असे बरेच लोक म्हणतात. कुणी सांगावे, पण इतर देश भारताच्या या भोळसटपणाला हसलेही असतील, आपल्याच शत्रूला मदत करणारा देश असा आपला नावलौकिक जगात झाला नसेल कशावरून?
भारताची शान या प्रकरणांत उंचावली असे म्हणणारे जे लोक आहेत. त्यांनी काश्मीर प्रश्नाची यूनोमध्ये कशी कुत्तरओढ झाली ते आठवावे. भारताला आणि घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानला तिथे एकच न्याय लावण्यात आला. तिथे आपली ती ‘शान थोडीसुद्धा उपयोगी पडली नाही. उलट, पुढे जाऊन, ‘सार्वमताचे अभिवचन देऊन ते वचन पाळण्याची टाळाटाळी करणारा देश’, अशीच आपली प्रतिमा आज जगांत झालेली आहे.
आपण हवा तेवढा आत्मगौरव गात राहावे; पण जगाच्या बाजारांत पाकिस्तानच्या तुलनेत भारताला काही जास्त प्रतिष्ठा आहे असे मानायला बिलकूल जागा नाही.
तर मग प्रश्न असा उभाराहातो की त्यावेळच्या भारतीय राज्यकर्त्यांनी हा मुलखावेगळा उदारपणा कोणच्या उद्दिष्टासाठी केला? आपल्या सैन्याच्या पाठीत खंजीर का खुपसला?
कोणी यावर भारताच्या कृतीचे समर्थन करणारे विचार मांडल्यास ते जाणून घेण्याची मला जिज्ञासा आहे.
२, वासवी, २१०१ मा. श्री. रिसबूड
सदाशिव, पुणे ३०

श्री रिसबुडांना उत्तर
रा. कृ. पाटील
श्री. रिसबुडांचे पत्र माझ्याकडे श्री. दिवाकर मोहनींनी ते छापण्यापूर्वी पाठविले. कारण माझ्याही दृष्टीने भारत सरकारचा निर्णय की तूर्त तरी पाकिस्तानला त्याचे देणे द्यायचे नाही हा चूक होता. कारण ते देणे पूर्वीच निर्माण झाले होते. ज्या अटीवर विभाजन झाले त्या अटीचा तो एक भाग होता. म्हणजे १५-८-४७ लाच ते रुपये द्यायला हवे होते. इतके दिवस ते का रोकले गेले हे मला सांगता येणार नाही; परंतु पाकिस्तानाने मागणी केल्याबरोबर ते रुपये द्यायला हवे होते. पाकिस्तानाने तशी मागणी केल्यावर सध्या आम्ही हे रुपये देत नाही कारण तुमची आमची आता लढाई आहे असे म्हणणे म्हणजे देणे नाकारल्यासारखे झाले असते हे अनाठायी औदार्य नव्हते ती कर्तव्यपूर्ती होती हे अगदी स्पष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे चिंतामणराव देशमुख यांचेसुद्धा मत तसेच होते. आणि बऱ्याच लोकांचे मत तसे होते कारण वाटणीचे ते देणे होते. आणि म्हणूनच गांधीजीनी सुद्धा हे रुपये ताबडतोब द्यावे असे मत दिले होते. त्याचा काय व कसा उपयोग करावयाचा हे पाकिस्तान ठरवील. ‘आमच्यावर झाडण्यासाठी बुलेट्स खरेदी करावयाला त्याचा उपयोग होईल,’ म्हणून हे देणे देऊ नये. हा विचार चूक होता. आम्ही कोण ठरविणार की पाकिस्तान या पैशाचा कसा उपयोग करणार? युद्धाच्या परिस्थितीत जुने देणे नाकारणे ही भूमिका बरोबर नव्हती. देणे अगोदर निर्माण झाले. तेव्हा युद्ध नव्हते. ते देणे पैसे मागितल्याबरोबर घ्यायला हवे होते. याशिवाय ‘युद्ध पाकिस्तानने लादले हे रिसबुडांचे म्हणणे इतिहासाला धरून नाही. जेव्हा पाकिस्तानाने काश्मीरवर चढाई केली तेव्हा काश्मीर स्वतंत्र राष्ट्र होते. भारताशी सामीलनामा तेव्हा झाला नव्हता. सामीलनाम्यातून काश्मीर भारताचा भाग झाला आणि भारताने आपले सैन्य त्याचे मदतीला पाठविले. त्यामुळे हे अघोषित युद्ध पाकिस्तानाने भारतावर लादले,’ असे रिसबूड म्हणतात. पण पाकिस्तान म्हणू शकेल की आम्ही लढाई अगोदर सुरू केली व भारताने ती आपल्या अंगावर ओढून घेतली, काश्मीरनरेशाला आपल्यात सामील करून घेऊन.’ म्हणूनच भारताचे तेव्हाचे गव्हर्नर जनरल Lord Mountbatten यांनी काश्मीर नरेशांनी जेव्हा मदत मागितली तेव्हा सामीलनामा अगोदर करा, तरच मदत करू अशी अट घातली होती. रिसबूड पुढे म्हणतात, ‘पाकिस्तानाला ही रक्कम देणे न्यायनीतीच्या दृष्टीने आवश्यक नसतानाही ‘जगाला भारताचा थोरपणा कळावा या उद्देशाने ही रक्कम देण्यात आली असे बरेच (?) लोक म्हणतात. मला मात्र असे वाटत नाही. ही रकम द्यावी, व न देणेही चूक होईल याच भावनेतूनच हा व्यवहार झाला. आणि युद्धाच्या रोजच्या खर्चाच्या तुलनेत ५५ कोटींचा काय हिशोब ? युद्धात दररोज १०० कोटींच्या वर खर्च होतो.
‘जगाच्या बाजारात पाकिस्तानच्या तुलनेत भारताला काही जास्त प्रतिष्ठा आहे असे मानायला बिलकूल जागा नाही हे विधान श्री. रिसबुडापावेतोच सीमित राहील. कारण भारताचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ज्यांनी पाहिला व वाचला आहे त्यांना हे बिलकूल मान्य होणार नाही. आज पाकिस्तान हे अमेरिकन संयुक्त संस्थानाच्या ताटाखालचे मांजर आहे हे सर्व जगओळखून आहे, इतकेच काय, स्वातंत्र्यानंतर भारताची जागतिक छाप इतकी उजळली होती व पाकिस्तानची इतकी डागळलेली होती की परदेशातील पाकिस्तानी मिशन्स आपली जरूरीची कामे भारतीय मिशनद्वारे करवून घेत असत. कमी जास्त प्रमाणात ही परिस्थिती चीनच्या लढाईपर्यंत, म्हणजे १९६१ पावेतो होती. १९७१ साली तर संयुक्त संस्थानांचे ७ वे आरमार पूर्व पाकिस्तानाला मदत करण्याकरता म्हणून आले व बंगालच्या उपसागरातून परत गेले; व आज तर क्लिटन साहेब काश्मीरबद्दल येवढा बोलबाला करतात, व पाकिस्तानाच्या हिंसक कारवायावर पांघरूण टाकतात तरी इंग्लंड व फ्रान्सने भारताचीच बाजू योग्य म्हणून ठरविली आहे. म्हणून रिसबुडांचे विधान त्यांच्याचपुरते सीमित राहील असे वाटते. तरी याचा अर्थ असा नाही की आज भारताची जागतिक प्रतिष्ठा त्याचा आकार व लोकसंख्या यांच्या बरोबर आहे. तसे म्हणावयाचे नाही. चीनपेक्षा तर. खासच कमी आहे. परंतु पाकिस्तानच्या तुलनेत खासच जास्त आहे. हे सर्व लिहिल्यानंतर माझे लक्ष नोव्हेंबर ९३ च्या अंकांतील श्री. रिसबुडांच्या पत्राकडे गेले. त्याला उत्तर म्हणून नव्हे, तर भारतातील हिंदू-मुसलमानांच्या प्रश्नाबाबत मला असे म्हणावयाचे आहे की आज सर्व जग भारत व पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांना म्हणत आहे की तुम्ही आपले प्रश्न आपसांत बोलणी करून मिटवा यावरून या प्रश्नाच्या जागतिक महत्त्वाची कल्पना यावी. हे मान्य आहे की स्वातंत्र्यापूर्वी कॅबिनेट मिशननेही असाच प्रयत्न करून पाहिला. त्यांनी जवाहरलालजी व जिन्नांना बोलावले व सुचविले की तुम्ही आपले प्रश्न लवादामार्फत सोडवा. दोघांनीहि कबूल केले. परंतु काही दिवसांनी आमचे लवादाबाबत एकमत होऊ शकत नाही असे दोघांनीही कॅबिनेट मिशनला सांगितले. यावरून हा प्रश्न किती कठिण आहे याची कल्पना येईल. परंतु तो सोडवण्याची जबाबदारी आपण टाळू शकतो काय? जितका प्रश्न जास्त कठीण तितकीच जबाबदारी जास्त. तेव्हा यादृष्टीने आणखी विचार यायला पाहिजे. पाकिस्तानाच्या निर्मितीनंतर तर भारताच्या भवितव्याच्या दृष्टीनेही हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे. गांधीजीना अपयश आले हे जरी खरे असले तरी त्यामुळे आपण किंकर्तव्यमूढ होण्याचे काहीच कारण नाही. श्री. रिसबूड यांची ग्यानबची मेख १८५७ सालीही होती. पण तेव्हा हिंदूमुसलमानांची खरी एकी कशी झाली होती ? शेवटी पाकिस्तानातील मुसलमान हीही माणसेच आहेत. त्यांनाही हे कळलेच पाहिजे की त्यांच्या व भारताच्या भांडणांत दोघांचेही नुकसान आहे व केवळ औद्योगिक दृष्ट्या संपन्न राष्ट्रांचा फायदा आहे. कारण त्यांच्याकडूनच दोन्ही राष्ट्रे शस्त्रास्त्रे विकत घेतात. म्हणून मला असे वाटते की भारतातून एक प्रातिनिधिक मंडळ पाकिस्तानात जाऊन त्याने तेथील जनतेशी बोलणी करावी. पाकिस्तान जर या सूचनेला विरोध करील तर त्याचीच चुकी सर्वांच्या लक्षात येईल.
सिव्हिल लाइन्स नागपूर ४४० ००१

प्रा. श्याम कुळकर्णी यांना उत्तर
दि. य. देशपांडे
औरंगाबादचे प्रा. श्याम कुळकर्णी यांनी माझ्यावर फिरून एक जोरदार हल्ला चढविला आहे (आजचा सुधारक, डिसेंबर ९३). त्यात आक्रमकता आहे, आव्हान आहे, उपरोध आहे आणि उपहासही आहे. त्यांच्या यापूर्वीच्या शेवटच्या पत्रानंतर बराच दीर्घ कालावधी लोटला आहे, आणि त्यामुळे कित्येक महिन्यांचा साचून राहिलेला रोष त्यांच्या या पत्रात सरळ सरळ प्रगट झाला आहे. या सर्वांसंबंधाने माझी कसलीही तक्रार नाही. उलट आपले मत आणि आक्षेप त्यांनी या पत्रात सरळपणे आणि स्वच्छपणे व्यक्त केले हे चांगले झाले असे मी समजतो, आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विवेकवाद आणि वैज्ञानिक पद्धती यांचा संबंध फिरून स्पष्ट करण्याची संधी मला मिळाली याचे मी स्वागतच करतो.
पत्राच्या प्रारंभीच प्रा. कुळकर्णी यांनी माझ्या नोव्हेंबर९० च्या आजचा सुधारकमधील लेखातील पुढील वाक्य उद्धत केले आहे. ‘विश्वाचे ज्ञान मिळविण्याचे वैज्ञानिक पद्धतीहून अन्य साधन मानवाजवळ नाही असा विज्ञानाचा दावा आहे (पृ. ४), आणि हा दावा कुणा वैज्ञानिकाने केला आहे असा त्यांचा सवाल आहे.
आता वैज्ञानिकांचे ग्रंथ ज्या विषयाचे ते विज्ञान असते त्याच्या चर्चेला वाहिलेले असतात. त्यांत ते वैज्ञानिक पद्धतीवर लिहीत नाहीत. वैज्ञानिक पद्धतीवर लिहिणारे लोक म्हणजे तत्त्वज्ञ, आणि विशेषतः विज्ञानाचे तत्त्वज्ञ (philosophers of science). त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीविषयी मी केलेला दावा जरी मी एखाद्या वैज्ञानिकाच्या ग्रंथातून उद्धृत करू शकलो नाही तरी काही थोर तत्त्वज्ञांच्या ग्रंथातून उद्धृत करू शकतो. उदा. बर–ड रसेलच्या Religion and Science (१९५८ ची आवृत्ती) या ग्रंथातील पुढील दोन उतारे पाहावेत:
‘I cannot admit any method of arriving at truths except that of science, but in the realm of emotions I do not deny the value of the experiences which have given rise to religion.’ (p. 189)
“Whatever knowledge is attainable must be attained by scientific methods; and what science cannot discover mankind cannot know.’ (p. 243).
याहून अधिक सुस्पष्ट आणि निःसंदिग्ध वचन असू शकेल काय?
खरी गोष्ट अशी आहे की हा दावा विज्ञानाच्या संपूर्ण कार्यपद्धतीत व्यक्त होतो. निसर्गाचे निरीक्षण, उपन्यासरचना (formation of a hypothesis) आणि त्याचे सत्यापन (verification) या पद्धतीव्यतिरिक्त ज्ञानाचा अन्य कोणताही मार्ग विज्ञान संमत मानीत नाही. एखाद्याला एखादा उपन्यास प्रतिभानाने (intuition ने) सुचला असेल; पण तेवढ्यामुळे त्याचा स्वीकार केला जात नाही. त्या उपन्यासाला वैज्ञानिक मार्गांनी परीक्षेस सामोरे जावेच लागते, आणि तिच्यात तो उत्तीर्ण झाला तरच त्याचा विज्ञानात स्वीकार केला जातो. म्हणजे प्रतिभान हे ज्ञानसाधन मानले जात नाही. अनेक उपन्यास, किंबहुना बहुतेक उपन्यास प्रतिभानसदृश मानसिक प्रक्रियेने सुचतात हे खरे आहे; पण त्यापैकी बहुतेक सर्व परीक्षेत नापासही होतात. एखादाच परीक्षेत उतरतो…
प्रा. कुळकर्णी म्हणतात : ‘माझ्या अनुभवानुसार विज्ञान कुठल्याही पद्धतीने मिळालेले ज्ञान त्याज्य मानीत नाही, परंतु ते ज्ञान प्रयोग करून पारखून घेतल्याशिवाय विज्ञानाच्या पुस्तकात येत नाही.’ या दोन वाक्यांपैकी पहिल्यात केलेला दावा दुसऱ्यात नाकारला आहे हे स्पष्ट आहे. वैज्ञानिक परीक्षणात उतरल्याशिवाय कशालाही सत्य ज्ञान ही पदवी विज्ञान देत नाही हे खरे असेल तर कोणत्याही मार्गाने मिळालेले ज्ञान विज्ञान त्याज्य मानीत नाही हे म्हणणे उघडच खोटे आहे हे सिद्ध होते.
प्रा. कुळकर्णी कोणत्याही पद्धतीने मिळालेले ज्ञान’ असा शब्दप्रयोग करतात. ज्ञान मिळविण्याच्या इंद्रियानुभव आणि त्यावर आधारलेला तर्क किंवा अनुमान याखेरीज आणखी कोणत्या पद्धती आहेत हे प्रा. कुळकर्णी स्पष्ट करीत नाहीत. कदाचित् त्यांना शब्दप्रमाण अभिप्रेत असेल, म्हणजे एखाद्या ग्रंथातील किंवा एखाद्या गुरूच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द. किंवा त्यांना साक्षात्कार अभिप्रेत असेल. पण एखादे विधान कुठल्यातरी ग्रंथात लिहिलेले आहे, किंवा ते कोणत्या तरी समाधीत कळले याला विज्ञान काडीचेही महत्त्व देत नाही. तीच गोष्ट telepathy, clairvoyance इत्यादि परासामान्य (paranormal) घटितांचीही आहे. पण त्यांच्याविषयी मी थोड्या वेळाने बोलणार आहे.
कोणत्याही मार्गाने मिळालेले ज्ञान विज्ञान त्याज्य मानीत नाही या आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ प्रा. कुळकर्णी यांनी Science Fiction नावाच्या एका पुस्तकाच्या लेखकद्वयाचा एक उतारा उद्धृत केला आहे. त्यात उल्लेखलेले ‘ज्ञानाचे अन्य प्रकार’ (other kinds of knowledge) कोणते ते त्यांनी स्पष्ट केले असते तर बरे झाले असते. त्या उताऱ्यातील शेवटचे वाक्य असे आहे : ‘One must recognise that science is itself a system of beliefs’. यातील ‘beliefs’ हा शब्द कुळकर्त्यांनी अधोरेखित केला आहे, त्यावरून belief’ हा शब्द येथे कुळकर्त्यांना/लेखकांना श्रद्धा किंवा अपरीक्षित विश्वास या अर्थाने वापरला असावा असे वाटते. आता believe’ म्हणजे एखादे विधान सत्य आहे अशी समजूत किंवा विश्वास असणे. पण विश्वास साधार असू शकेल, तसेच तो परीक्षेत उतरलेला विश्वास असू शकेल. मला वाटते ‘belief हा शब्द अधोरेखित करून लेखकद्वयांनी knowledge’ आणि ‘belief यांतील भेदाकडे लक्ष वेधले असावे. तसे असेल तर तर्ककठोर अर्थाने वैज्ञानिक ज्ञान ही विश्वासांची व्यवस्था आहे हे खरेच आहे. वैज्ञानिक ज्ञान हे उद्गमनाने मिळालेले ज्ञान असते, आणि उद्गमनाचे निष्कर्ष सदैव संभाव्यच असतात, ते कदापि निश्चित (certain) नसतात ही गोष्ट प्रसिद्ध आहे. या अर्थाने विज्ञान ही ‘विश्वासांची व्यवस्था’ आहे, पण त्याचा अर्थ असा नव्हे की हे विश्वास निराधार आहेत. उलट त्यांची अतिशय कठोर तपासणी झाली असून तीत उतरलेले ते विश्वास आहेत. अशा विधानांवरील विश्वास आणि अज्ञ लोकांचे भुतेखेने इ.वरील विश्वास एकच नाहीत.
या संबंधात प्रा. कुळकर्णी यांनी बरदँड रसेलचा एक परिच्छेद उद्धृत केला आहे. तो उतारा ज्या पुस्तकातून घेतला आहे त्याचे नाव त्यांनी दिलेले नाही. (पण ते पुस्तक कोणते आहे ते मला माहीत आहे. ते आहे Religion and Science.’) गेल्या खेपेप्रमाणे याही वेळी त्यांनी उद्धृत केलेला उतारा रसेलच्या मूळ पुस्तकातील नसून त्याच्या भाषांतरातील आहे. ‘यावेळी तरी अनुवाद मला तोंडघशी पाडणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. परंतु दुर्दैवाने पहिल्याच वाक्यात अनुवाद चुकला आहे. मूळ इंग्रजी वाक्य असे आहे : ‘The search for causal laws is the essence of science, and therefore in a purely practical sense the man of science must always assume determinism as a working hypothesis’. या वाक्यातील a working hypothesis’ या शब्दबंधाचा अनुवाद अनुवादकाने ‘कामचलाऊ गृहीततत्त्व असा केला आहे. पण त्या दोहोंत फार अंतर आहे. ‘Working hypothesis’ म्हणजे a hypothesis used as a basis for action’ (Concise Oxford Dictionary), परंतु ‘कामचलाऊ म्हणजे ‘तात्पुरता उपयोगी पडणारा, वेळ मारून नेता येण्यासारखा, खपण्यासारखा, साधारण (दाते, महाराष्ट्र शब्दकोश). ‘Working hypothesis म्हणजे एखादे कार्य करायचे असेल तर गृहीत धरायचे तत्त्व; म्हणजे असे तत्त्व की ज्यावाचून आपले कार्य पुढे जाऊ शकत नाही. हा अर्थ कामचलाऊं या अर्थाहून अतिशय भिन्न आहे हे उघड आहे.
अनुवाद हे खरोखर अतिशय कठीण आणि जबाबदारीचे काम आहे, त्यामुळे बहुतेक अनुवाद स्थूलमानाने बरोबर असले, तरी त्यांत अनेक अनर्थकारी चुका आढळतात. म्हणून प्रा. कुळकर्त्यांना माझा असा सल्ला आहे की त्यांनी यापुढे इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद वाचू नयेत. निदान जिथे कोणाला आव्हान वगैरे द्यायचे असेल तिथे तरी केवळ अनुवादावर विसंबू नये.
रसेलचा जो उतारा कुळकर्यांनी उद्धृत केला आहे त्यातील प्रतिपादन माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध आहे असे मला दिसत नाही. रसेलचे म्हणणे असे आहे की जेथे शोध केल्यानंतरही एखाद्या घटनेचे कारण सापडत नाही तेथे तिला कारण आहेच असे ठाम मत त्याने व्यक्त करू नये; परंतु तेथे कारण नाहीच असेही म्हणणे चूक होईल. या दोन्ही गोष्टी मला मान्य आहेत, आणि त्याविरुद्ध काहीही मी कोठे म्हटलेले नाही असे मला वाटते. तसे कोठे असेल तर प्रा. कुळकर्त्यांनी मला दाखवून द्यावे.
‘विश्वाचे ज्ञान मिळविण्याचा वैज्ञानिक पद्धतीहून अन्य उपाय मानवाला उपलब्ध नाही असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा विश्वाचे ज्ञान हा शब्दबंध मी एका काटेकोर अर्थाने वापरतो हे स्पष्ट करणे जरूर आहे. विश्वाचे ज्ञान म्हणजे विश्वात काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे. त्याची रचना कशी आहे इत्यादि गोष्टींची माहिती. परंतु ‘ज्ञान हा शब्द आपण सामान्यपणे एवढ्या संकुचित अर्थाने वापरीत नाही. उदा. गणिताचे ज्ञान हे ज्ञान आहे की नाही? पण त्यात विश्वात काय आहे यासंबंधी कसलीही माहिती मिळत नाही. ‘२+२=४’ हे विधान सत्य आहे; पण ते ज्ञात झाल्याने विश्वात चार वस्तू आहेत की नाहीत ह्याचे ज्ञान आपल्याला होत नाही. त्या विधानाचे प्रतिपादन एवढेच आहे की जर विश्वात कोठे दोन. वस्तू आणि आणखी दोन वस्तू असतील, तर तिथे एकूण चार वस्तू असतील. पण विश्वात किती वस्तू आहेत या प्रश्नाविषयी ते मूक आहे. तीच गोष्ट तर्कशास्त्रीय विधानांची. परस्परव्याघातक विधाने दोन्ही खरी असू शकत नाहीत हे तर्कशास्त्रीय ज्ञान आपल्याला असले तरी त्यावरून त्यांपैकी कोणते विधान सत्य आहे आणि कोणते नाही हे समजत नाही. ‘सूर्य उष्ण आहे आणि ‘सूर्य उष्ण नाही ही विधाने दोन्ही सत्य असू शकत नाहीत आणि असत्यही असू शकत नाहीत हे तर्कशास्त्र सांगते; पण त्यांपैकी कोणते विधान सत्य आहे आणि कोणते असत्य आहे हे सांगायचे काम ज्योतिःशास्त्र या अनुभवानुसारी विज्ञानाचे आहे. परंतु असे असले तरी गणितीय ज्ञान आणि तर्कशास्त्रीय ज्ञान ज्ञान नाही असे आपण म्हणत नाही.
या दोन ज्ञानांपैकी एक विश्वविषयक आहे, तर दुसरे पहिल्या ज्ञानाविषयी आहे. त्या दोहोंत स्तरांचा फरक आहे. विश्वाविषयीची विधाने प्रथमस्तरीय ज्ञाने आहेत, तर या विधानांविषयीची विधाने द्वितीयस्तरीय आहेत. यांपैकी पहिले ज्ञान, म्हणजे प्रथमस्तरीय ज्ञान, ‘विश्वाचे ज्ञान’ या शब्दबंधाने मला अभिप्रेत आहे. द्वितीयस्तरीय ज्ञानाविषयी ते म्हणणे लागू होणर नाही. या ज्ञानात इंद्रियानुभवाचा संबंध येत नाही, आणि म्हणून वैज्ञानिक पद्धती’ या शब्दबंधाच्या काटेकोर अर्थाने द्वितीयस्तरीय संशोधनात विज्ञानाचा संबंध येत नाही. (प्रथमस्तरीय ज्ञान आणि द्वितीयस्तरीय ज्ञान यांतील भेद या मासिकातील ‘तत्त्वज्ञानाची ओळख या लेखमालेतील ‘वाक्यांविषयीची वाक्ये (फेब्रु. ९३) आणि ‘तार्किकीय ज्ञान (एप्रिल-मे ९३) या लेखांकात विस्ताराने चर्चिला आहे.)
लेखाच्या शेवटी प्रा. कुळकर्त्यांनी Dr. J. B. Rhine या परामानसशास्त्रज्ञाची (parapsychologist) साक्ष काढली आहे. डॉ. व्हाइन परासामान्य (paranormal) घटितांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टिकोणातून करणारे गृहस्थ असून त्यांनी ESP (म्हणजे extra-sensory perception – अतींद्रिय प्रत्यक्ष), clairvoyance (म्हणजे इंद्रियांच्या टप्प्यापलीकडे असणाऱ्या गोष्टींचे दर्शन), telepatihy (किंवा एका मनातील विचार इंद्रियांच्या मदतीवाचून दुसऱ्या मनात प्रविष्ट होणे), PK (Psycho-Kinesis – म्हणजे मानस शक्तीने भौतिक वस्तूंची हालचाल घडविणे), Precognition (भविष्यदर्शन), इत्यादि प्रकारच्या तथाकथित परासामान्य (paranormal) घटितांचे संशोधन अनेक वर्षे केले आहे. अमक्याला दूरदृष्टी किंवा अंतर्दृष्टी आहे, अमक्याला भविष्य दिसते, इत्यादि सामान्यपणे केवळ ऐकीव माहितीवर आधारलेल्या दाव्यांचे वैज्ञानिक पद्धतीने प्रयोगांच्या साह्याने परीक्षण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ESP च्या प्रकारचे ज्ञानात्मक अनुभव खरोखरच घडून येतात असे वैज्ञानिक परीक्षणांती सिद्ध झाले आहे असा त्यांचा दावा आहे. परंतु हे संशोधन अजून मानसशास्त्रज्ञांमध्येही मान्यता पावलेले नाही; भौतिक वैज्ञानिकांमध्ये तर त्याच्याविषयी अधिकच साशंकता आहे. अतज्ज्ञांच्या दृष्टीने या संशोधनाचे महत्त्व असे आहे की हा विषय आता सांगोपांगी चर्चेचा राहिलेला नसून त्याचे वैज्ञानिक संशोधन सुरू झाले आहे. ही अर्थातच स्वागतार्ह गोष्ट आहे. आज हे संशोधन बाल्यावस्थेत आहे, आणि वैज्ञानिकांमध्ये त्यासंबंधाने एकमत तर राहोच, बहुमतही झालेले नाही. पण केव्हातरी ते होईलच, आणि मग त्यासंबंधी आपण अतज्ञांनी काय भूमिका घ्यावयाची ते ठरेल. तोपर्यंत काही निश्चित भूमिका घेणे अनधिकाराचे होईल.
माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉ. व्हाइन यांचे संशोधन विश्वाचे ज्ञान मिळविण्याच्या एकमेव उपायासंबंधी मी केलेल्या विधानाच्या विरुद्ध तर नाहीच, उलट ते त्याची पुष्टी करणारे आहे. सामान्य(normal) प्रकारांहून अन्य प्रकारांनीही ज्ञान होऊ शकते या मताची शहानिशा वैज्ञानिक पद्धतीने ते करीत आहेत. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचा अंतिम अधिकार त्यांनी मान्य केला आहे. ESP वैज्ञानिक कसोटीस उतरते म्हणून ते मान्य केले पाहिजे असा त्यांचा निष्कर्ष आहे. वैज्ञानिक पद्धतीहून अन्य रीत ज्ञानाची कसोटी म्हणून त्यांनाही मान्य नाही. मी तरी याहून वेगळे काय म्हणालो आहे ? ESP काही अल्प प्रमाणात खरोखर घडते हे मान्य केले म्हणून ESP विश्वसनीय ज्ञानसाधन आहे हेही मान्य केले असे होत नाही. ते केव्हा विश्वसनीय आहे आणि केव्हा नाही हे शेवटी इंद्रियानुभवाच्या कसोटीनेच ठरवावे लागते, आणि अशा त-हेने विश्वसनीय ठरल्यानंतरच ते स्वीकरणीय ठरते.
शेवटी एका महत्त्वाच्या मुद्याविषयी. ESP चे काही प्रकार क्वचित ज्ञानदायक असतात हे प्रा. हाइन यांच्या संशोधनाने सिद्ध झाले आहे असे म्हणता येईल. पण हे म्हटल्याबरोबर सर्व प्रकारचे para-normal ज्ञानप्रकार सिद्ध झाले अशी प्रा. कुळकर्त्यांची समजूत दिसते. ‘सुदैवाने भारतीय तत्त्वज्ञांनी फार पूर्वी याचे चिंतन केले होते असे ते म्हणतात. चिंतन केले असेल; पण त्यापैकी किती भ्रामक होते आणि किती ज्ञान या पदवीस पात्र होते याची शहानिशा कोणी केली आहे काय? प्रा. व्हाइन यांनी चिकाटीने वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून ESP चा शोध केला तसा शोध भारतीयांच्या ‘चिंतनांचा करावा लागेल. तोपर्यंत ते सर्व ‘चिंतन’ ज्ञान या सदरात पडणारे आहे असे मानणे शुद्ध भाबडेपणा होईल.

दोन पत्रांना उत्तरे
प्रा. बा. के. सावंगीकर यांस उत्तर
दिवाकर मोहनी
प्रा. बी. के. सावंगीकर यांनी आपल्या पत्रात (आजचा सुधारक, नोव्हेंबर९३) माझ्या ‘समाजातील मुलींची घटती संख्या’ (ऑगस्ट ९३) या लेखावर अनेक आक्षेप घेतले आहेत. त्यांना उत्तर देण्याचा हा प्रयत्न.
श्री. सावंगीकर म्हणतात की (१) मोहनींनी मूळ प्रश्नाचा विचार करणे व त्यावर उपाय कोणते करावेत ह्याचा शोध घेणे सोडून दिले व ते स्त्रियांच्या छेडखानीकडे वळले. (२) समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक झाली तर स्त्रिया पुरुषांची छेडखानी करावयाला लागतील असा निष्कर्ष मोहनींना संमत असलेल्या तर्कावरून काढता येतो.
यावर मला असे म्हणावयाचे आहे की (१) श्री. मुथ्था ह्यांनी त्यांच्या परीने जे काही उपाय सुचविले आहेत, ते माझ्या बुद्धीला पटणारे नाहीत असे नाही. मला ते हवेच आहेत. पण तेवढे उपाय पुरेसे नाहीत. स्त्रियांच्या संख्येमध्ये पडत चाललेली घट त्या उपायांनी (अर्थात् ते अमलात आणले गेल्यास) कालांतराने कमी होईल. आजच्या स्थितीत त्यायोगे कोणताही फरक पडणार नाही. आज २२% महाराष्ट्रीय जैन मुलांना लग्न करण्याची त्यांची तीव्र इच्छा असूनसुद्धा सक्तीचे ब्रह्मचर्य पाळावे लागणार ! त्या फक्त जैनांच्याच नव्हे तर सर्वच भारतीय समाजातल्या, स्त्रियांपेक्षा संख्येने अधिक असलेल्या मुलांची वैध सोय कशी करावयाची असा माझ्यापुढे प्रश्न आहे. तो प्रश्न श्री. मुथ्था ह्यांनी सोडविला नाही. स्त्रीपुरुषांच्या विषम गुणोत्तराची परिस्थिती नेहमीच कायम राहील असे मला कधी वाटले नाही व मी तसे म्हटलेही नाही. पण आज संख्येने अधिक असलेल्या पुरुषांची स्त्रीसहवासाची जी गरंज आहे ती श्री. मुथ्थांच्या उपायांनी कशी पूर्ण होणार ते श्री. सावंगीकरांनी सांगावे. आजची समस्या साकल्याने सोडविण्यासाठी त्यांनी सौम्य उपाय अवश्य सुचवावेत. त्यांचे स्वागतच आहे.
(२) आज बुभुक्षित स्त्रिया पुरुषांची छेडखानी करीत नाहीत हा श्री. सावंगीकरांचा असलेला समज पुन्हा तपासून पाहण्याजोगा आहे. ‘क्षुधातुराणां न रुचिर्न वेला, कामातुराणां न भयं न लज्जा’ हे एका संस्कृत कवीने केलेले निरीक्षण स्त्रियांच्या बाबतीत अजिबाद लागू होत नाही असे मला वाटत नाही. आजच्या पुरुषप्रधान समाजाच्या चौकटीत ते दृष्टोत्पत्तीला कमी येते, कारण आपल्या इच्छा, आपले विकार (दुःखाचा अपवाद) उघडपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य स्त्रियांना आमच्या आजच्या संस्कृतीने प्रदान केलेले नाही. तरीसुद्धा तरुण, निराश्रित स्त्रियांसाठी चालविलेल्या संस्थांच्या चालकांना त्या संस्थांच्या आसपास घुटमळणाऱ्या पुरुषांवरच नव्हे तर तेथल्या मुलींवरही कशी निगराणी ठेवावी लागते ह्याविषयीचे अनुभव श्री. सावंगीकरांनी त्यांना विचारावे एवढीच माझी त्यांना नम्र विनंती आहे. हे अनुभव जाणून घेतल्यानंतर श्री. सावंगीकर माझ्याच निष्कर्षाला येतील असा मला विश्वास वाटतो.
(३) स्त्रियांच्या छेडखानीचा प्रश्न दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतामध्ये अधिक तीव्र आहे. सर्वेक्षणांचे तसे निष्कर्ष आहेत. (पाहाः Savvy Oct. 93) तेथले शीत हवामान शरीर आवृत ठेवण्याला अधिक अनुकूल आहे. अनेकविध कारणांमुळे तेथे पडदापद्धती प्रचलित झाली. जेथे आवरण अधिक तेथे जिज्ञासा अधिक; जे सहजसुलभ आहे तेथे हाव नाही हा सामान्य नियम आहे. त्यांची उदाहरणे देण्याची मला गरज वाटत नाही. दक्षिण भारतात उष्ण हवामान व एकूण पडदापद्धतीचा अभाव त्यामुळे पुरुषांना स्त्रियांच्या शरीराबद्दल फाजील जिज्ञासा वाटत नसावी; व छेडखानीचे प्रमाण कमी असावे. बुरखा हा प्रकार केव्हाही निषेधार्हच आहे, परंतु प्रत्येक वेळी सगळ्या निषेधार्ह गोष्टींचा पाढा वाचलाच पाहिजे अशी गरज मला वाटत नाही.
(४) आता स्त्रियांची राखण हा शब्दप्रयोग मी केला हे त्याबद्दल. आज बहुसंख्य स्त्रियांना सुरक्षित जीवन हवे आहे. परपुरुषाला दूर ठेवून आपल्या पुरुषाने आपल्याला सुरक्षा प्रदान करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. ही सुरक्षा देण्यासाठी पुरुषांना कराव्या लागणाऱ्या कार्याची गणना राखणीतच करावी लागेल.
(५) श्री. मुथ्थ्यांनी सुचविलेले उपाय पाणी कमी पडू लागल्यावर विहीर खोल करण्यासारखे आहेत. विहीर आपणाला हवी, ती आधीच खोल करावयाला हवी होती हे सारे मान्यच आहे. विहिरीला विपुल पाणी लागेल तेव्हा लागेल. पण ताबडतोब काय करावयाचे? तोवर विहीर खोदण्याचे काम चालू ठेवून आहे ते पाणी वाटून घेणे भाग आहे. हा अवांच्छित द्राविडी प्राणायाम होणार नाही.

(२) श्री. श्रीनिवास दीक्षित ह्यांना उत्तर
श्री. दीक्षित ह्यांनी जो मुद्दा काढला आहे तो बरोबर आहे. जननसमयीचे स्त्रीपुंप्रमाण पाहिलेच पाहिजे. मला अजून हे सारे अधिकृत आकडे उपलब्ध झाले नाहीत. एक अनधिकृतआकडा मिळाला तो असाः- १००६ पुः १००० स्त्री. त्यावरून पुंबालके अधिक जन्मतात असे निदर्शनास येते. पण येथे त्यांचे प्रमाण फारच थोड्या संख्येने अधिक आहे. जनगणनेचे आकडे मी शोधत आहे. ही माहिती कोणाला असल्यास त्यांनी ती अवश्य कळवावी. शहरांत जन्मलेली यच्चयावत् पुंबालके जगत असती व खेड्यांत व अनुसूचित जाती व वनवासी समाजातल्या स्त्रीपुंबालमृत्यूंचे प्रमाण अगदी समसमान असते तर श्री. दीक्षितांचा युक्तिवाद मला सहज मान्य झाला असता. पण वंशाचा दिवा पाहिजे म्हणून, किंवा आणखी काही कारणाने पुंबालकांना अधिक काळजीपूर्वक औषधोपचार केला जात असावा व त्यामानाने स्त्रीशिशृंकडे दुर्लक्ष होत असावे असा माझा तर्क आहे. जेथे स्त्रीपुंभेदभाव कमी तेथे त्यांच्या बालमृत्यूचे प्रमाण समान असण्याची शक्यता आहे. अधिक अध्ययनाची त्यासाठी गरज आहे. पण तरी सुद्धा श्री. दीक्षितांनी स्त्री उवाच १९९२ मधील श्री. रवीन्द्र रुक्मिणीबाई पंढरीनाथ ह्यांचा ‘स्त्रियांचा जगण्याचा हक्क हा लेख वाचावा अशी त्यांस विनंती आहे. .
श्री. दीक्षित ह्यांनी वरील संदर्भात सर्वच सस्तन प्राण्यांचा उल्लेख केला आहे. ती माहितीही मिळविण्याच्या प्रयत्नात मी आहे. परंतु मानव व मानवेतर सस्तन प्राणी यांत मुख्य फरक असा की अन्य प्राण्यांत विवाहसंस्था व तज्जन्य एकपतिपत्नीकत्व नाही. त्यामुळे तेथे ह्या विषम गुणोत्तराचे दुष्परिणाम आढळत नाहीत. विवाहसंस्था ही मानवनिर्मिती आहे. ‘ह्या जन्मजन्मान्तरीच्या गाठी’ हा आपला समज चुकीचा आहे. विवाहसंस्थेने सोयीबरोबरच दुःखही फार निर्माण केले. हे दुःख अटळ नाही असा माझा मुद्दा आहे. तो जानेवारी ९३ च्या अंकात मांडून झाला आहे. बहुतेक श्री. दीक्षित त्याच्याशी सहमत असावे.

संपादक, आजचा सुधारक यांस,
आजचा सुधारकमध्ये प्रकाशित होणाऱ्या इतर लेखांतील मतांशी संपादक सहमत असतीलच असे नसले तरी नियतकालिकाच्या मूलभूत धोरणाशी विसंगत विचार मांडणारे लेख त्यात प्रकाशित होणे अयोग्य वाटते. हा योग्यायोग्यतेचा विचार क्षणभर दूर ठेवला तरीही ऑगस्ट १९९३ च्या अंकांतील शांतिलाल मुत्था यांच्या लेखावर श्री. दिवाकर मोहनी यांनी लिहिलेल्या टिप्पणीतील काही मते तपासून पाहणे आवश्यक आहे. स्त्रियांची छेडछाड हा त्यांची संख्या पुरुषांपेक्षा कमी झाल्यामुळे होते हा त्यांचा (दि.मो.) तर्क चुकीचा तर आहेच, परंतु त्यावर त्यांनी सुचवलेला उपाय त्याहून भयंकर व तर्कदुष्ट आहे.
प्रथमतः स्त्रीपुरुषांच्या विषम (स्त्रिया कमी, पुरुष जास्त) गुणोत्तरामुळे स्त्रियांची बेअब्रू होण्याची शक्यता वाढते हा मुद्दा विचारात घेऊ. महाभारतकाळी स्त्रियांची संख्या कमी नसावी. (कारण श्रीकृष्णास सोळा हजार बायका होत्या.) पांडवांस द्रौपदीव्यतिरिक्त बायका होत्याच, कौरवांनाही प्रत्येकी कमीतकमी एक (असल्यास जास्तच पण कमी नाही) बायको होती. तरी द्रौपदीचे भर सभेत वस्त्रहरण झाले. मध्यंतरी ‘झी (Zee)TV वर स्त्रियांची छेडछाड (sexual harassment) या विषयावर प्रातिनिधिक स्त्रियांचा परिसंवाद दाखवण्यात आला. त्यात सर्व स्त्रियांनी छेडछाड करणारे ८० ते ९० टक्के पुरुष मध्यमवयस्क (४०-५० वर्षे) असतात व ते विवाहित असतात असे सांगितले. थोडक्यात पुरुष लग्नाशिवाय रहाणे व त्याला कारणीभूत असणारे स्त्रीपुरुष विषम गुणोत्तर हे स्त्रियांच्या छेडछाडीचे कारण हा दि. मो. यांचा निष्कर्ष चुकीचा आहे हे सिद्ध होते. एकूण स्त्रियांची छेडछाड हा संख्याशास्त्राचा विषय नसून मानसशास्त्राचा आहे. हे गुणोत्तर सम करण्यासाठी दि.मो. यांनी सुचवलेले उपाय केवळ अशास्त्रीयच नव्हे तर अविवेकी पण आहेत. अनेकपतिकत्व व अनेकपत्नीकत्व (स्त्रिया कमी असताना हे कसे शक्य आहे ?) व मुलींना जन्म देण्याचा सपाटा (उपक्रम हा चांगला शब्द) चालू ठेवणे असल्या हास्यास्पद उपायांनी स्त्रीपुरुष गुणोत्तर सुधारेल की नाही कुणास ठाऊक; पण आधीच भयावह असलेला लोकसंख्यावाढीचा प्रश्न मात्र अधिकच भेसूर होईल.
अशाप्रकारचे अशास्त्रीय विचार सुप्रजाजनन या गोंडस नावाखाली श्री. नी.र. व-हाडपांडे यांनी नोव्हेंबर १९९१ च्या अंकात विवाहयोग्य वयाविषयी लिहिताना व्यक्त केले आहेत. पुरुष व स्त्रीचे लग्न जितक्या कमी वयात कराल तेवढा लोकसंख्या वाढीचा वेग वाढतो हे सिद्ध करावयास कुणा माल्थसची जरुरी नाही. येवढे असून मुले ३०-३२ वयापर्यंत लग्न करू इच्छीत नाहीत ते केवळ सरकारी प्रचारामुळे नाही.
आजचे अधिकतर प्रश्न निदान भारतात तरी प्रचंड असलेल्या व अजूनही तशाच प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्यावाढीमुळे आहेत. तेव्हा मुलगा किंवा मुलगी फक्त एकच अपत्य होऊ देणे व लग्न करूनही अपत्ये होऊ न देणाऱ्या दांपत्यास अधिकतर सवलती देणे असे उपाय आवश्यक असताना, त्याबाबतीत संख्याशास्त्र काय म्हणते हे न पाहता बुद्धिवाद्यांनी असे विचित्र उपाय सुचवावेत ही आश्चर्याची गोष्ट अहे व ते आजचा सुधारकने प्रकाशित करावे ही तर त्याहून आश्चर्याची गोष्ट !
आपला विश्वासू
यमाई तंत्रनगर, औरंगाबाद – ४३१००५ श्या. ग. कुलकर्णी

श्री. श्याम कुळकर्णी ह्यांस उत्तर
महाभारतकाळी झालेली द्रौपदीची विटंबना ही छेडछाड होय असे श्री. कुळकर्णी ह्यांना वाटते. माझ्या मते त्या घटनेला केवळ राजकीय संदर्भ आहे. कौरवांना त्या पांडवपत्नीचे वस्त्रहरण करून आपली विकृत कामतृप्ती करण्यापेक्षा तिच्या पतींना अपमानित करावयाचा हेतू निःसंशय अधिक होता. पुरुषांचा अपमान करण्यासाठी त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करण्याचा तो अधम प्रकार होता, आणि हा प्रकार केवळ महाभारतकाळीच नव्हता. तो कोठेकोठे अजूनही चालू असेल. दानपत्रे म्हणून लिहिलेल्या अनेक शिलालेखांमध्ये दानपत्राचा अनादर करणाऱ्याला उद्देशून जी भयंकर शापवाणी लिहिलेली आढळते तोही हाच प्रकार आहे. Zee T.V. वर जो परिसंवाद झाला तो मी पाहिला नाही.पण ४० ते ५० वर्षांच्या वयांमध्ये पुरुषांमधली कामभावना ओसरत असताना पुष्कळांमध्ये ही विकृती निर्माण होते असे एक निरीक्षण मी कोठेतरी वाचले होते; ते बरोबर असले पाहिजे. पण बुभुक्षित पुरुष स्त्रियांच्या अंगचटीला जातात, तशी संधी शोधत असतात, हे सिद्ध करण्याची गरज असू नये. गेल्या शतकामध्ये उसाची लागवड करण्यासाठी किंवा मजुरी करण्यासाठी पुष्कळ भारतीयांना परदेशी नेण्यात आले. त्यावेळी तेथे जेवढे पुरुष गेले तेवढ्या स्त्रिया गेल्या नाहीत. परिणामी स्त्रियांची पळवापळवी व त्यांच्यावर अत्याचार ह्यांचे प्रमाण तेथे भलतेच वाढले. त्याचा वृत्तान्त मी बहुधा मानुषी ह्या द्वैमासिकाच्या कोणत्यातरी अंकामध्ये वाचल्याचे आठवते. नक्की अंक आज लक्षात नसल्यामुळे संदर्भ देता येत नाही.
आणखी एकदोन गोष्टी.
समूहविवाहामध्ये स्त्री-पुरुषांची संख्या समान असण्याची गरज नाही. तेथे स्त्रीपुरुषांचे अनेकपतिपत्नीकत्व असते. अशा विवाहामध्ये कमीअधिक वयाचे स्त्रीपुरुष असल्यास स्त्रियांना वैधव्य व पुरुषांना विधुरत्व व तज्जन्य दुःख भोगण्याचे प्रसंग कमी.
मी अनेक जोडपी अशी पाहिली की ‘हम दो हमारे दो’ ऐवजी पहिला मुलगा झाल्याबरोबर ती थांबतात. पहिली मुलगी झाल्याबरोबर थांबणारे विरळा. त्यांना उद्देशून माझे ते वाक्य होते. मुलींनाच जन्म देण्याचा सपाटा चालू ठेवणे शक्य व इष्ट होणार नाही हे लक्षात आणून दिल्याबद्दल श्री. कुळकर्णी यांस धन्यवाद.
श्री. कुळकर्णी ह्यांचा शेवटचा मुद्दा श्री. नी.र. व-हाडपांडे ह्यांना लागू आहे म्हणून मी त्याच्याविषयी काही लिहीत नाही.
धरमपेठ, नागपूर ४४००१० दिवाकर मोहनी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.