तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ११)

आयडियलिझम (Idealism) म्हणजे काय ?

रशियामध्ये १९१७ साली क्रांती झाली आणि तेथे मार्क्सप्रणीत कम्युनिस्ट राजवट स्थापन झाली. एवढे मोठे राजकीय यश मिळाल्यामुळे मार्क्सवादाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त झाली. जगभर वेगवेगळ्या देशात कम्युनिस्ट पक्षांची स्थापना झाली आणि कम्युनिस्ट चळवळी सुरू झाल्या. अनेक ठिकाणी त्यांची सरकारेही स्थापन झाली. भारतातही हे लोण लगेच येऊन पोचले आणि नव्या युगाचे तत्त्वज्ञान म्हणून मार्क्सवादाचा पुरस्कार ‘पुरोगामी’ मंडळींकडून करण्यात आला. मार्क्सच्या ग्रंथांचा अभ्यास होऊ लागला.

परंतु मार्क्सच्या तत्त्वज्ञानाला हेगेलच्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी होती, आणि हेगेलच्या तत्त्वज्ञानाला दोन हजार वर्षांची दीर्घ परंपरा, आणि विशेषतः दोनशे वर्षांची परंपरा, यांची पार्श्वभूमी होती. ही सबंध पार्श्वभूमी थोडीबहुत अवगत असल्याशिवाय हेगेलच्या तत्त्वज्ञानाचे किंवा मार्क्सच्याही तत्त्वज्ञानाचे आकलन होणे अशक्य होते. परंतु मार्क्सवादाने भारलेल्या बहुतेक लोकांना तत्त्वज्ञानाचे फारच जुजबी ज्ञान होते, आणि त्यामुळे त्यांचे मार्क्सचे आकलन अपुरे, उथळ, गोंधळाचे होते. उदा. हेगेलचे तत्त्वज्ञान Idealism म्हणून ओळखले जाते, आणि त्याविरुद्ध मार्क्सने Materialism चा पुरस्कार केला होता, हे सर्वांना माहीत होते; पण Idealism म्हणजे नेमके काय, आणि त्याचे साधक युक्तिवाद काय आहेत हे फारच थोड्यांना ज्ञात होते. तसेच मार्क्सने Dialectic नांवाची एक गोष्ट हेगेलजवळून घेतली होती हे सर्वज्ञात होते; पण हेगेलची उपपत्ती काय आहे, किंवा त्याचे त्याने काय उपपादन केले होते, आणि मार्क्सने त्यात काय भर घातली ह्याचे ज्ञान असणे कठीण होते.

हा Idealism नावाचा वाद काय आहे हे सांगता आले तर तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला एक मोठा वाद विशद केल्यासारखे होईल. म्हणून या आणि पुढील काही लेखात हे करण्याचे योजिले आहे. Idealism ची कल्पना निदान तीनशे वर्षे जुनी आहे. तिचे पहिले प्रतिपादन वाल या ब्रिटिश तत्त्वज्ञाने १७१० साली लिहिलेल्या Principles of Human Knowledge या ग्रंथात केले. पण या उपपत्तीविषयी जास्त सांगण्याआधी ‘Idealism’ या शब्दाविषयी थोडी प्रस्तावना करणे अवश्य आहे.

‘Idealism’ हा शब्द ‘idea’ पासून बनलेल्या ‘ideal’ या शब्दापासून बनलेला आहे. ‘idea’ म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करणे कठीण आहे; पण मराठीतील ‘कल्पना’ हा शब्द त्याचा पर्याय म्हणून मानायला हरकत नाही. ‘Ideal’ म्हणजे कल्पनेच्या स्वरूपाचे, कल्पनामय, किंवा कल्पनारूप. ‘Ideal’ च्या विरुद्ध शब्द ‘real’ (वास्तव). हिमालय पर्वत हा प्रत्यक्ष अस्तित्वात असणारा पदार्थ आहे, त्याला वास्तव अस्तित्व आहे. परंतु मेरू पर्वत काल्पनिक आहे, imaginary आहे. त्याची आपल्याला कल्पना आहे, पण तो वास्तवात नाही. ही गोष्ट मेरू पर्वताला ideal existence, काल्पनिक अस्तित्व किंवा कल्पनामय सत्ता आहे अशा शब्दांत व्यक्त केली जाते. आता ‘Idealism’ म्हणजे काय ते सांगता येईल. Idealism म्हणजे असे मत की विश्वात फक्त दोन प्रकारचे पदार्थ आहेत, आत्मे आणि त्यांच्या कल्पना. ज्यांना आपण भौतिक वस्तू म्हणतो त्याही वस्तुतः कल्पनांच्याच बनलेल्या वस्तू असतात.

‘Ideal’ या शब्दाविषयी विनाकारण पाल्हाळ झाला असे वाटण्याचा संभव आहे. परंतु त्या पाल्हाळाला प्रयोजन आहे. हां शब्द दुसऱ्या एका भिन्न अर्थी आपल्या भाषेत रूढ आहे. तो अर्थ म्हणजे ध्येय, आदर्श. ‘Ideal’ चा हा उपयोग प्लेटोच्या तत्त्वज्ञानातील ग्रीक ‘idea’ या शब्दाशी संबद्ध आहे. ग्रीक ‘idea’ या शब्दाचा अर्थ आहे form किंवा आकार. हा अर्थ इंग्लिश ‘idea’ च्या अर्थाहून अगदी भिन्न आहे. ज्याला तत्त्वज्ञानात ‘universal’ किंवा ‘सामान्य’ म्हणतात त्या अर्थाचा हा शब्द आहे. आपल्या भोवताली असलेल्या वस्तू अनेक वर्गात मोडणाऱ्या असतात. या प्रत्येक वर्गाचे नाव सामान्य नाम असते. उदा. घोडा, कुत्रा, मनुष्य, झाड, इ. प्रत्येक वस्तुप्रकाराची अनेक, खरे म्हणजे अगणित, उदाहरणे असतात. ही उदाहरणे अवकाशात आणि काळात आढळणाऱ्या व्यक्ती असतात. उदा. मनुष्य या प्रकारची सॉक्रेटीस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, शिवाजी, गांधी इ. असंख्य उदाहरणे आहेत. कोणत्याही प्रकारची स्थलकालांत आढळणारी उदाहरणे म्हणजे व्यक्ती. म्हणजे व्यक्ती केवळ मानवीच असतात असे नव्हे, तर त्या पशूही असू शकतील, एवढेच नव्हे तर निर्जीव पदार्थही (उदा. हिमालय, गंगा, इ.) व्यक्ती असतात असे म्हटले जाते. अनेक उदाहरणे एकाच प्रकारची असतात असे आपण म्हणतो याचे कारण त्या सर्वांत काही तरी समान असते. उदा. प्रत्येक मनुष्य अन्य सर्व मनुष्यांहून भिन्न असतो, पण तो अन्य सर्व मनुष्यांसारखाही असतो. सर्व मनुष्यांत आढळणारे हे साम्य आपण मनाने वेगळे कल्पू शकतो. या क्रियेला ‘abstraction’ म्हणतात; आपण तिला ‘अवकर्षण’ म्हणू या. हे जे अवकर्षणाने वेगळे कल्पिलेले साम्य त्याला ‘सामान्य’ किंवा ‘universal’ ही नावे आहेत. यालाच प्लेटो ‘Idea’ किंवा ‘आकार’ म्हणतो. आता कोणतीही Idea किंवा सामान्य आणि त्याप्रकारची उदाहरणे यांचा संबंध प्लेटोने असा सांगितला आहे की व्यक्ती (उदाहरणे) या ideas ची प्रतिबिंबे असतात, आणि ही प्रतिबिंबे Idea च्या तुलनेत कमीअधिक प्रमाणात अपूर्ण, सदोष असतात. त्यांच्या तुलनेत Idea ही perfect, पूर्ण असते. एका उदाहरणाने ही कल्पना स्पष्ट करू या. समजा आपण वेगवेगळ्या आकारमानाचे गोल (spheres) घेतले, तर त्यांत खेळातल्या गोट्या, चेंडू, फुटबॉल, चंद्र, पृथ्वी इत्यादींचा समावेश होईल. या सर्वांत गोल हा आकार आहे हे स्पष्ट आहे. त्याची जर आपण अवकर्षणाने वेगळी कल्पना केली तर ती शुद्ध गोलाकाराची कल्पना असेल. शुद्ध गोलाकार, कारण तो रबर, काच, चामडे, मृत्तिका इत्यादि ज्या द्रव्यांत साकार होतो त्या सर्वांहून स्वतंत्र आहे. गोलाकाराच्या उदाहरणांपैकी काहींत गोलाई कमी असेल आणि अन्य काहीत जास्त असेल. पण त्यात प्रतिबिंबित झालेला शुद्ध गोलाकार स्वतः निर्दोष, पूर्ण गोलाकार असेल. हा शुद्ध गोलाकार म्हणजे प्लेटोची Idea of a sphere. हा गोलाकार विविध द्रव्यांत, उदा. काच, रबर, मृत्तिका इ. मध्ये मूर्त होतो; परंतु तो स्वतः अमूर्त आहे, अवकृष्ट (abstract) आहे. म्हणून तो अवकाश आणि काल यांच्या बंधनांतून मुक्त आहे. ते अवकाशातीत, कालातीत असे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याची स्वतंत्रता द्विविध आहे. एक, ते गोलाकाराचे अवकर्षण करणाऱ्या मनावर अवलंबून नाही, आणि दोन, ते स्थलकालांत आढळणाऱ्या गोल व्यक्तींवर अवलंबून नाही. अवकर्षण करणारी मने आणि गोल व्यक्ती जरी नाहीशा झाल्या तरी गोलाकार हा मात्र अबाधित राहील असे प्लेटोचे मत आहे.

प्लेटोच्या मतानुसार कोणतेही सामान्य हे पूर्ण निर्दोष, आदर्श (ideal) असते. Ideal शब्दाचा ‘आदर्श’ हा अर्थ याप्रमाणे प्लेटोच्या आकारांच्या उपपत्तीतून निघालेला आहे. ‘आकार’ हा शब्द वाच्यार्थाने जरी केवळ आवकाशिक आकार या अर्थाचा असला, तरी प्लेटोच्या मतानुसार जी गोष्ट गोलाकाराची ती सर्व सामान्यांची. उदा. मनुष्यत्व, किंवा गोत्व. प्रत्येक सामान्य, स्वतंत्र, पूर्ण आणि आदर्श असते. ‘Idea’ ह्या प्लेटोनीय शब्दाचे ‘idea’ या इंग्लिश शब्दापासून भिन्नत्व दाखविण्याकरिता त्या (प्लेटोनीय) शब्दातील आरंभीचा ” capital लिहिण्याचा प्रघात आहे, असा- ‘Idea’. ‘Idea’ म्हणजे प्लेटोचे सामान्य.

प्लेटोची सामान्ये वर लिहिलेल्या दोन प्रकारे स्वतंत्र असणाऱ्या वस्तू आहेत या मताला Realism असे नाव आहे. Real हा शब्द ‘res’ = thing, या लॅटिन शब्दापासून बनला आहे; जसा ‘वस्तू’ पासून ‘वास्तव’ हा शब्द. सामान्ये ही स्वतंत्र वस्तू आहेत; त्या अन्य कशावर, मनावर किंवा उदाहरणांवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी नाहीत. म्हणून त्याला वास्तववाद म्हणतात. प्लेटोच्या मताला ‘Theory of Ideas’ म्हणतात, तो ‘Idealism’ नाही, ‘Realism’ आहे.

जसा ‘Idealism’ हा शब्द दोन अर्थांनी रूढ आहे, एक, बाक्लचा भौतिक वस्तू वस्तुतः आपल्या कल्पनाच आहेत असे प्रतिपादणारा, आणि दुसरा, ध्येयवाद, आदर्शवाद, तसा ‘Realism’ हा शब्दही दोन अर्थांनी रूढ आहे. त्याचा एक अर्थ म्हणजे सामान्ये ह्या वस्तू (real) आहेत, त्यांना स्वतंत्र वास्तव अस्तित्व आहे हे प्रतिपादणारे प्लेटोचे मत, आणि दुसरा भौतिक वस्तूंना स्वतंत्र, मनोबाह्य, मनोनिरपेक्ष अस्तित्व आहे हे बार्लीच्या मताच्या विरोधी मत. एवढ्या प्रस्तावनेनंतर आता आपण बाक्लींच्या मताकडे वळू शकतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.