मनुस्मृती व विवेक

आपल्या चालीरीतींवरील मनुस्मृतींचा पगडा किंवा नामवंतांनी केलेला तिचा पुरस्कार पाहिल्यावर आपण मनुस्मृती वाचण्यास उद्युक्त होतो. वे.शा.सं. विष्णुशास्त्री बापट यांचे मनुस्मृतीचे संपूर्ण मराठी भाषांतर (प्रकाशक: रघुवंशी प्रकाशन, मुंबई) आपल्या तत्संबंधीच्या बहुतांश गरजा पूर्ण करते. चालीरीतींवर जसा परंपरागत संस्कारांचा प्रभाव असतो, तसाच तो त्याविषयी साकल्याने विचार करणाऱ्या सामाजिक नेतृत्वाचाही असतो. हे नेतृत्व जेव्हा, “हे सर्व समाजाच्या व व्यक्तींच्या हितासाठी आहे,” अशी भूमिका घेते, तेव्हा त्यातील तथ्य जाणून घेणे महत्त्वाचे ठरते, व हाच या लेखामागील हेतू आहे. केवळ धर्मवाक्य म्हणून ज्यांची श्रद्धा मनुस्मृतीत गुंतली आहे, त्यांच्यासाठी प्रस्तुत भाषांतर हे निश्चितच उपयोगी आहे.

‘मनुस्मृती’ हा ग्रंथ नीटनेटका, विषय विभाग पाडून लिहिलेला, थेट मुद्द्याला भिडणाऱ्या वचनांनी युक्त असा आहे. त्यापूर्वीच्या श्रुतींमध्ये हे गुण अभावानेच दिसतात. त्यामुळे ही स्मृती एकाच लेखकाची कृती आहे असे वाटते. यातील वचने ही बहुधा आज्ञाकारी व उपदेशकारी आहेत. त्यातून एकप्रकारचा अधिकार प्रतीत होतो. ग्रंथ आटोपशीर आहे व न कंटाळता, सलगपणे वाचता येतो. ग्रंथाचे विवेचन प्रामुख्याने वर्णाश्रम धर्माविषयी आहे. मात्र त्यासोबत राज्यव्यवस्था, कर्मकांडे, जगाच्या उत्पत्तिविषयक माहिती, वगैरे विषयही आले आहेत. एखादे तत्त्व, किंवा गूढवादी भूमिका किंवा भक्ति असे काही या ग्रंथात जवळपास सापडतच नाही. क्वचित काही आधुनिक मूल्यांचा पुरस्कार आढळलाच तर, त्याच्या विरोधी भूमिकाही पुरस्कारिलेली सापडते. उदा. हे वचन पाहा – “रागावून दुसऱ्यास मारण्याकरिता दंड उचलू नये, व पुत्र, शिष्य, भार्या व दास यांवाचून दुसऱ्या कुणास त्याचा प्रहार करू नये.” (अध्याय ४/६३) “यज्ञाची दोन किंवा तीन अंगे असंपूर्ण असल्यास व ती वैश्यापासून न मिळाल्यास शूद्राच्या गृहातून बलात्काराने वा चोरी करून निःशंकपणे आणावीत.” (११/११)

वर्ण व लिंगभेद : चतुर्वर्णादि भेद पुरस्कारिणारी हे मनुस्मृतीचे स्वरूप बहुतांशरीत्या आज माहीत आहे. मात्र हा भेदाभेद किती टोकाचा आहे, हे हा ग्रंथ वाचूनच कळते. वर्णसंकर वा शूद्रांवर टाकलेली सेवेची जबाबदारी किंवा स्त्री-शूद्रांवर असलेली शिक्षणबंदी हे सर्वांना माहीत असणारच. मात्र, सतत कनिष्ठ वर्णावर आघात, हे मनुस्मृतीचे वैशिष्ट्य अभ्यासूंनी नजरेखालून घालणे महत्त्वाचे आहे.

“ज्याची जाति ब्राह्मणाची आहे व कर्म ब्राह्मणाचे नाही, असा केवळ जातीवर उपजीविका करणारा व आपणास ब्राह्मण म्हणविणारा पुरुष पूर्वोक्त योग्य न्यायाधीशाच्या अभावी राजाचा धर्मप्रवक्ता झाला तरी चालेल, पण धार्मिक व व्यवहारज्ञ असाही शूद्र धर्मप्रवक्ता कधीही असू नये.” (८/१९)

यासारखे वचन पाहिल्यावर, पूर्वीच्या काळी जातिभेद हे गुणकर्माधिष्ठित होते, यासारख्या बचावाची धूळधाण उडते व प्राचीन संस्कृतीचे समर्थन करणारा अडचणीत सापडतो. ही वचने “मनुस्मृती जाळून टाका” असे म्हणण्यासही प्रवृत्त करतात.

मनुस्मृतीचे आधुनिक समर्थक : मनुस्मृतीने रुजविलेल्या जाति-लिंगभेदाचे खंडन तसे नवीन नाही. पण अलीकडे एक नवीनच युक्तिवाद बरेचदा कानी पडतो किंवा वाचनात येतो. “तत्कालीन गरजांनुसार मनुस्मृतीने भेदाधारित समाजरचना केली. समकालीन इतर समाजात त्याच प्रकारची, किंबहुना त्याहूनही भयानक असे भेद व शोषण होते. तेव्हा केवळ त्या कारणाने मनुस्मृतीला वाळीत टाकणे योग्य होणार नाही. या गोष्टी वगळून जर मनुस्मृती वाचली, तर अनेक चांगली तत्त्वे आपल्याला सापडतील, जी आजच्या काळातही उपयुक्त ठरावीत.” अशा तऱ्हेच्या युक्तिवादाला उत्तर देणे हाच खरे तर या लेखाचा मुख्य हेतू आहे. या युक्तिवादात मनुप्रणीत आदर्श राज्यव्यवस्था, आश्रम धर्म, वा “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः” अशी वचने अंतर्भूत होतात. मग मूळ संहितेच्या ज्ञानाअभावी त्यात तथ्य वाटू लागते. तेव्हा वर्णलिंगभेदात्मक अपप्रवृत्ती सोडल्यास मनुस्मृतीत काय आहे हे प्रामुख्याने सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.

विकल्पानुष्ठान विधान : धर्माची जडणघडण ही शब्दप्रामाण्यावर आधारित असते. जेव्हा अशा विश्वसनीय आणि श्रद्धेय शब्दांमध्ये विरोध आढळतो, तेव्हा सश्रद्ध लोक विवेकी होण्याची, थोडीशी का होईना, शक्यता निर्माण होते. विवेकापोटी जन्माला येणारा अविश्वास टाळण्यासाठी या सश्रद्ध विचारवंतांची जी ओढाताण होते, तिची आपल्याला सहज कल्पना करता येते. धर्मप्रचारकास मात्र अशा विकल्पांना लपवून ठेवणेच भाग पडते. अशा प्रकारच्या अंतर्विरोधास धर्माच्या चौकटीत डांबून विवेकास तेथे आसपासही फिरकू न देणे हे धर्मरक्षकांचे आद्य कर्तव्य ठरते. कुठलेही इतर प्रश्न सोडविण्यापूर्वीच मनुस्मृतीने हा विषय हाती घेऊन चलाखीने सोडविला आहे, याचे म्हणूनच तसे नवल वाटायला नको.

“ज्यावेळेस परस्परविरुद्ध अर्थ सांगणाऱ्या श्रुती आढळतात त्यावेळी ते दोन्ही धर्म सारखेच आहेत असे मनूचे सांगणे.” (२/१८). यामुळेही समाधान न झाल्यास पुढील अवतरण वाचावे “जो द्विज त्या दोन मूळ ग्रंथसमूहांचा प्रतिकूल तर्काचा आश्रय करून अवमान करेल त्यास शिष्ट धार्मिकांनी अध्ययनादि कर्मांपासून दूर ठेवावे.” (२/१०) यामुळे एकच गोष्ट ठरते की, तर्क व विवेक बाजूला ठेवून धर्मविचारांचा अभ्यास करावा. ते न जमल्यास बहिष्कृत व्हावे. अशामुळे विचारांची प्रगती खुंटेल, पण धर्म तर शाबूत राहील! धर्म शाबूत राहिल्यास पारतंत्र्य वगैरे सोसता येईल; पण अधर्मी स्वतंत्रता मात्र मुळीच नको!

आश्रमधर्म : जसे मानवजातीचे चार भाग करून मनुस्मृतीने वर्णव्यवस्थेस आकार देण्याचे काम केले आहे, तसेच मनुष्याच्या जीवनाचे (‘मनुष्य’ म्हणजे अर्थात्, ‘सवर्ण पुरुष) चार भाग करून आश्रमधर्म उभारणीचेही काम केलेले दिसते. आश्रमव्यवस्था म्हणजे शिक्षण, प्रजनन, त्यागरूपी प्रस्थान व वैराग्य हे मानवी जीवनाचे चार भाग होत. प्रामुख्याने पहिल्या दोन अवस्था, म्हणजे ब्रह्मचर्य व गृहस्थाश्रम, याविषयी मनुस्मृतीत बरेच काही लिहिलेले आढळते. शेवटच्या दोन अवस्था म्हणजे वानप्रस्थाश्रम व वैराग्य यासंबंधी त्यामानाने फारच कमी सांगितलेले आहे. एक वेळ वैराग्याविषयी कमी सांगितलेले आपण समजू शकतो; कारण ती बहुतकरून मनाची अवस्था आहे. वानप्रस्थाश्रमाबाबतही कमी वचने असावीत, यावरून तो आश्रम ही बहुधा काल्पनिक परिस्थिती असावी किंवा एक प्रकारची ‘युटोपियन’ परिस्थिति असावी, असे वाटते. आश्रमधर्मविषयक बहुतेक सर्व वचने बारीकसारीक आचरणाविषयी आहेत. जसे, “गुरूचे पाय उलट्या हाताने गुरू ‘भोः’ म्हणेस्तोवर धरावेत”, “गुरुपत्नी तरुण असेल तर तिचे पाय धरू नयेत”, इ.

अधूनमधून नीतिनियमांचाही उल्लेख होतो. जसे, अतिथिधर्म, अहिंसा, सत्य, याविषयीच्या गोष्टी. मात्र असे नियम संदर्भविरहित न पाहाता पूर्ण ग्रंथाच्या अनुषंगाने पाहिल्यास, तेथे नीतितत्त्वे सांगण्याचा हेतु नसून धार्मिक कृत्यांविषयी केवळ सांगितले आहे, असे वाटते. जसे, “अतिथीस चांगले वागवावे”, पण “अतिथि केवळ उच्चवर्णीयच असू शकतो”; “गुरूकडून विद्या शिकावी, पण ती वेदविद्या असावी”; “स्त्रियांची पूजा करावी, पण वाटल्यास ताडन करावे”; “गृहस्थाश्रमात अगदी उखळीतही हिंसा होते”, म्हणून त्यास प्रायश्चित्त सांगावे, पण “यज्ञादिक कर्मांमध्ये असे बळी युक्त ठरतात; असेही शिवाय म्हणावे!

कर्मकांडे : आश्रमधर्मात प्रामुख्याने ज्यांचा समावेश होतो, त्या गोष्टी म्हणजे कर्मकांडे. ती तर प्रत्येक धर्माचा अविभाज्य भागच असतात. किंबहुना तात्त्विक फरकापेक्षा कर्मकांडातील फरकामुळेच विविध धर्मांमधील भेद जास्त स्पष्ट होतो. तसेच, विशिष्ट धर्मांची व्याख्या करताना, (म्हणजे, हिंदू कोण, मुसलमान कोण, इ. ठरविताना), कर्मकांडात्मक व्याख्या अधिक उपयुक्त ठरतात. जसे, श्राद्ध करतो तो हिंदू, नमाज पढणारा मुसलमान व ‘मास’ ला जाणारा ख्रिस्ती, इ. पुनरुज्जीवनवादी विचारवंतांचा कल मात्र अशा कर्मकांडातील भौतिक फायदे दाखवून देण्याकडे असतो. ह्याच्यापुढे जाऊन असेही म्हटले जाते की, एरव्ही निरर्थक वाटणाऱ्या कर्मकांडांच्या मागे काही हेतू असावा, जो समजून घेण्याएवढी आपली अजून प्रगती झाली नाही. जसे, यज्ञाच्या धुराने निर्जंतुकीकरण होते, हे आपल्याला आज कळले; तेव्हा “यज्ञात् भवति पर्जन्यः” हेही खरे नसेल कशावरून? खालील उदाहरणांवरून वाचकांनी स्वतःच काय ते ठरवावे : “पाऊस पडत असता धावू नये”. (४/३७) “भार्येला भोजन करताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये. (४/४२) “नाचू नये अथवा गाऊ नये व वाद्ये वाजवू नयेत”. (४/६३) ” गाय, घोडा, इ. पशु, बेडूक, मांजर, कोंबडे, सर्प, मुंगूस व उंदीर यापैकी कोणी शिष्य व उपाध्याय यांच्यामधून गेल्यास अहोरात्र अनध्याय करावा”. (४/१२५) “वैद्याचे अन पुवासारिखे आहे.” (४/२२०)

राज्यव्यवस्था : मनूच्या काळची राज्यव्यवस्था वर्णाधिष्ठित असल्याने ती आदर्श तर नक्कीच नव्हती. पण काळाच्या मानाने पुढारलेली, वा अनेक बाबतींत आजच्यापेक्षाही पुढे होती का, याचा शोध उद्बोधक होईल. प्रजेचे रक्षण करणे (चोर वा परचक्र यांच्यापासून) हे राजाचे प्रमुख कर्तव्य आहे. त्या बदल्यात त्याला कर घेण्याचा मर्यादित अधिकार व दंड करण्याचा अमर्याद अधिकार आहे. याव्यतिरिक्त वर्णधर्म टिकवणे (अर्थात्, वर्णसंकर टाळणे), ब्राह्मणांना दान देणे, व धार्मिक कृत्ये करणे (यज्ञयाग), ही देखील राजाची कर्तव्ये आहेत. प्रजेने राजाला देव मानावे व त्यास सहकार्य द्यावे, ही अपेक्षा आहे. कायद्याचे राज्य, कल्याणकारी राज्य, समानता, नागरिकांचे हक्क, यांपैकी कशाचाही त्यात समावेश नाही. समाजव्यवस्थेत समतेस स्थान नाही. शूद्राकडून ४८% तरअंत्यजाकडून ६० % व्याज घेण्यास सांगितले जाते. (८/१४१) धनकोस कायदा हाती घेण्यास प्रत्यवाय नाही. (८/४९) साक्ष घेताना दिव्य करावयास सांगणे, (८/११२), अतिशय कडक शिक्षा (उदा. हात कापावे, ओठ कापावे, गुदा कापावी,) (८/२८१) देणारे कायदेही मनूने सांगितले आहेत.

मनुस्मृतीचे आधुनिक महत्त्व : मनुस्मृतीचा त्याग करणे हे आज जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच तिचा विसर न पडणे हेही आहे. तिच्या संबंधीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पुनरुज्जीवनवादी शक्ति तिचा प्रचार व समर्थन करण्यास पुढे येतात. याच कारणासाठी प्रस्तुतचे भाषांतर स्वागतार्ह आहे. ज्यांना वाचन व विचार करून कमीअधिक ठरवायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हे भाषांतर बरेच फायदेशीर ठरेल. मात्र जे श्रद्धावान आहेत व ज्यांना आपल्या श्रद्धेला तडा जाऊ नये असे वाटते, त्यांनी या ग्रंथाचे वाचन करू नये. धर्माचे स्वरूप काय, याविषयी बऱ्याचदा शंका येतात, त्यांच्यादृष्टीने पुढील उतारे महत्त्वाचे ठरावेत : “केवळ ब्राह्मणाच्या शरीराची उत्पत्ति, हेच धर्माचे अविनाशी शरीर होय” (१/९७). “जो द्विज वेदांचे अध्ययन न करिता दुसऱ्या शास्त्रामध्ये श्रम करितो, तो जिवंतपणीच शूद्रत्वास प्राप्त होतो” (२/१६७). तेव्हा आपल्यापैकी किती जण शूद्रत्वास प्राप्त झाले आहेत, व धर्माचे शरीर केवढे राहिले आहे, याची कल्पना करता येते.

४ बी/४ परेरा नगर, एस्.टी. वर्कशॉपच्या मागे, खोपट, ठाणे (पश्चिम) ४००६०१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.