बालमजुरांची ससेहालपट

एका ‘आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना’, या म्हणीप्रमाणे देशातील सुमारे एक कोटी ८० लाख बालमजुरांची स्थिती सरकारने कशी करून टाकली आहे, याचे उदाहरण म्हणून रमेश कुमारच्या कर्मकहाणीकडे बोट दाखविता येईल. रमेश कुमारचे अपहरण करण्यात आले तेव्हा त्याचे वय होते सात वर्षांचे. आज रमेश कुमार १४ वर्षांचा आहे. गेली सात वर्षे त्याने उत्तर प्रदेशातील एका गालिचे बनविण्याच्या कारखान्यात वेठबिगार बालमजूर म्हणून काढली आहेत. दिवसाचे १३ ते १५ तास काम, अपुरे जेवण, कारखान्यातच राहण्याची सक्ती यामुळे रमेश कुमार १४ वर्षांचा असूनही तेवढ्या वयाचा वाटत नाहीं. पण १४ वर्षांच्या इतर मुलांपेक्षा रमेश कुमारने किती तरी पट अधिक आयुष्य बघितले आहे. बालमजुरांच्या वेठबिगारीविरुद्ध लढा देणाऱ्या एका स्वयंसेवी संघटनेने रमेश कुमारची सुटका केली. आपल्या मुलाला परत बघून रमेश कुमारच्या वडिलांना आकाश ठेंगणे झाले. पण गालिचा कारखानदाराचे गुंड त्याचा मार्ग काढत आले आणि त्यांनी रमेश कुमारला पकडून नेले. अगदी पोलिसांच्या डोळ्यांदेखत, मारहाणीने शरीर सुजलेल्या रमेश कुमारने पुन्हा एकदा स्वतःची सुटका करून घेतली. पण आता एका जागी दोन दिवस राहायला तो घाबरतो आणि सतत भीतीच्या सावटाखाली वावरतो. असे बालमजूर एकत्र आले, तर संघटनशक्तीच्या जोरावर ते एकमेकांचे आधार बनू शकतील, ही कल्पना एका स्वयंसेवी संघटनेने मांडली आणि बाल मजदूर संघ स्थापन करण्यात आला. पण या संघटनेला मान्यता द्यायला सरकारने नकार दिला. बालमजुरीला बंदी आहे, तेव्हा त्यांची संघटना कशी असू शकते, असे सरकारचे म्हणणे. याचवेळी केंद्रीय कामगार मंत्री संसदेत कबुली देत होते की, कायद्याने बंदी असली, तरी बालमजुरीची प्रथा थांबविणे सध्या शक्य नाही. मग प्रकरण उच्च न्यायालयात नेण्यात आले. तेथेही नन्नाचा पाढा वाचण्यात आला. केवळ २५ मिनिटांत हा प्रश्न न्यायाधीशांनी निकालात काढला. आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. या न्यायालयाने मात्र ते दाखल करून घेऊन सरकारला नोटिस काढली आहे. या प्रकरणाचा निकाल लागेल तेव्हा लागेल; पण नेहरूंपासून नरसिंहराव यांच्यापर्यंत सर्व नेत्यांना मुलांची किती आवड आहे, असा प्रचार ज्या देशात चालू असतो, तेथील सरकार बालमजुरांची ससेहोलपट नुसती बघत बसते, ही गोष्ट धक्कादायकच आहे.
म. टा. १४ जाने. ९४ (महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने)

‘आजचा सुधारक’साठी टिपणे हवीत
आजचा सुधारकला अधिक विविधता आणि व्यापकता देण्याच्या दृष्टीने त्यांत निरनिराळ्या महत्त्वाच्या विषयांवरची टिपणे प्रसिद्ध करण्याचे आम्ही ठरविले आहे. यासाठी पुढील विषयांवरची अभ्यासपूर्ण टिपणे वाचकांनी/लेखकांनी पाठविल्यास त्यांना यथावकाश प्रसिद्धी देण्यांत येईल. टिपणे ५०० ते ७५० शब्दांपर्यंत असावीत.
१. डंकेल प्रस्तावाची स्वीकार्यता
२. स्त्रीमुक्ती चळवळ आणि भारतीय स्त्री
३. इतिहासाकडे कसे पाहावे?
४. राखीव जागांमागील तत्त्वज्ञानाची तपासणी
५. उच्चशिक्षणाच्या पुनर्रचनेची आवश्यकता
६. नव्या आर्थिक धोरणांच्या संदर्भात मजूर/कर्मचारी संघटनाकडे दृष्टिक्षेप
७. निवडणुकांमधील भ्रष्टाचाराची कारणे व त्यावरील उपाय
८. सिनेमा, नाटक, ललित वाङ्मय आणि सामाजिक बंधने (censorship)
९. दलित चळवळ : पुनर्मूल्यांकन
१०. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात कसा रुजविता येईल?
११. महाराष्ट्रातील वाचनसंस्कृतीचा ऱ्हास – कारणे व उपाय
१२. दूरदर्शनवरील क्रीडाजगताचे स्थान : पुनर्मूल्यांकन
१३. ग्रामीण विकासाच्या नव्या दिशा
१४. सध्याचे प्राथमिक शिक्षण : एक तपासणी
१५. वंश, धर्म आणि जात यांच्या राजकारणाचा अन्वयार्थ
१६. नाटके, TV वरील कार्यक्रम, चित्रपट यांतील विचाराला चालना देणाऱ्या विषयांवर भाष्य
१७. वृत्त आणि विवेक – वर्तमान घडामोडींवर विवेकवादी दृष्टिक्षेप
१८. नवी नियतकालिके, अनियतकालिके यांचा अल्प परिचय
१९. मध्यमवर्गीयांचे राजकारणवैराग्य
२०. दिवाळी अंकांमधील मनोवेधक विशेष
२१. राजकीय घडामोडी, उदा. निवडणुकांचे निकाल, त्यांवर भाष्य.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.