विज्ञानानंतरचा समाज

[टाइम्स ऑफ इंडियाच्या १२ डिसेंबर १९९३च्या अंकात Brian Appleyard या अमेरिकन लेखकाचा ‘Post-Scientific Society’ या शीर्षकाचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात विज्ञानाचे स्वरूप आणि अधिकार यांविषयी अनेक चुकीचे व अनर्थावह पूर्वग्रह व्यक्त झाले असून त्यामुळे वाचकांची दिशाभूल होण्याचा संभव असल्यामुळे त्याला समर्पक उत्तर देणे अवश्य होते. येथे श्री. नंदा खरे यांनी केलेला या लेखाचा अनुवाद आणि त्यांनीच दिलेले उत्तर छापले आहे. ते वाचकांना उद्बोधक वाटेल.]
विज्ञान ही एखाद्या समाजाला पाश्चिमात्य समाजांच्या भौतिक सामर्थ्यात वाटा मिळवून देणारी निरागस (innocent) गोष्ट नाही. याउलट ते एक अध्यात्मनाशक तेजाब आहे, ते पूर्वापारच्या अधिकार आणि परंपरांना जाळून टाकते. विज्ञान आपण सर्वज्ञ असल्याचे सोंग वठवते, ते इतर श्रद्धा-प्रणालींशी जुळते घेऊन राहूच शकत नाही. एका प्रकारच्या वैश्विक खुलेपणाचा (open-endedness) आग्रह धरून विज्ञान कशावरच ठाम विश्वास ठेवत नाही. ते फक्त सततच्या बदलाची आणि प्रगतीची शक्यता मानते.
विज्ञानाधिष्ठित उदारमतवादी समाजांचा आत्मिक भाव थंड, निस्तेज अशा तटस्थतेचा असतो. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. कोणतीच स्थिर श्रद्धा व सद्गुण न मानण्याने सहिष्णुतेचे पर्यवसान बेपर्वाईत होते.
ही नैतिक शिथिलता, ही सारेच काही सह्य मानण्याची वृत्ती वर्धिष्णु धार्मिक मुसलमानांना समजण्यापलिकडे वाटते, यात आश्चर्य ते कोणते ? आर्थिक आणि राजकीय बाबतीत जिंकताना दिसणारे पाश्चिमात्य समाज स्वतःच्या अधर्माने बुडत आहेत असे त्यांना जर भासले. तर त्यात गैर ते काय?
चारशे वर्षांपूर्वी युरोपात एक पूर्वी कधीही नव्हते इतके परिणामकारक असे ज्ञानाचे रूप व व्यवहाराची पद्धत अचानकपणे निर्माण झाली. या पद्धतीलाच, या रूपालाच, आपण विज्ञान म्हणतो. त्यातून स्फुरलेल्या विश्व, जग, माणूस वगैरेबद्दलच्या दर्शनांचे रूप त्या आधीच्या अशा सर्व चित्रांच्या विरोधात होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, विश्वाच्या तथ्यांमधून मनुष्याच्या अस्तित्वाचा अंतिम अर्थ किंवा अंतिम प्रयोजने शोधण्याची शक्यताच विज्ञानाने नाकारली. अशी प्रयोजने, अर्थ वगैरे असतीलच, तर ती विज्ञानाने वर्णन करता येणाऱ्या विश्वाबाहेर होती.
यामुळे तत्त्वज्ञानात जे संकट उभे राहिले, त्याचे वर्णन प्रथम देकार्तने केले. प्रश्न ज्ञानाचा होता. निर्विकार, निरर्थक विश्वात माणसाला ज्ञान होतेच कसे? यात विज्ञानाचे ज्ञानही आले. याहून तातडीची बाब म्हणजे विज्ञानाच्या यशामुळे धर्माच्या बाबतीतही संकटप्रसंग आला, वैज्ञानिकांच्या एकामागून एक पिढ्या धर्माबाबतचे भौतिक पुरावे नष्ट करू लागल्या. यामुळे श्रद्धेला अंतर्मुख होऊन स्वत्वात आश्रय शोधावा लागला. पण विज्ञानाच्या आक्रमक संशयवादामुळे ही वाटही अपुरी पडली व धर्माची सत्ता घटतच गेली.
चालू शतकात मात्र विज्ञानाबद्दल नव्या शंका उद्भवत आहेत. अणुबाँबसारख्या विज्ञानाच्या दुष्ट उत्पादनांमुळे लोकांना विज्ञानाच्या मूल्यांबद्दल आणि सद्गुणांबद्दल शंका वाटायला लागल्या आहेत. पर्यावरणवादाने तर विज्ञानाने समाजाला दिलेल्या प्रगतीच्या मूल्यालाच नाकारले आहे, व त्याऐवजी निसर्गाशी सहजीवनाची नवी नियमावली घडवली आहे.
खुद्द विज्ञानातच बदल झाले आहेत. पुंज-भौतिकीने जुन्या खात्रीच्या तत्त्वांना उद्ध्वस्त केले आहे. अनेकांनी असा युक्तिवाद केला आहे, की विज्ञानाचे ओसाड, निराश चित्र जाऊन विज्ञान आपल्याला एका नव्या आध्यात्मिकतेकडे (spirituality) नेऊ लागले आहे.
पण विज्ञान सारखे बदलत असते. सततची खळबळ व बदल हा त्याचा धर्मच आहे. एका पिढीची खात्री दुसऱ्या पिढीत उलथवली जाऊ शकते. पुंज-भौतिकी एका खोलवरच्या आध्यात्मिकतेकडे निर्देश करत असेलही, पण हे नवे सत्य विज्ञाननिरपेक्ष, बाहेरून आलेले, असे असायला हवे. नाहीतर ते विज्ञानाच्या चंचल लहरींवर अवलंबून राहील.
पण कठोर विज्ञानाचे उपक्रम सुरूच आहेत. विज्ञानाचा आपल्या संस्कृतीवर प्रभाव आहेच. क्रमाक्रमाने विज्ञान ही सर्व जगाची संस्कृती होत आहे. इतकी, की मानवी आत्म्याच्या जीवन-मरणाची उकल करणे, त्यात बदल करणे, याही कामगिऱ्या विज्ञानाने स्वतःकडे घेतल्या आहेत.
असे होणे चांगले की वाईट हे विज्ञानाच्या क्षेत्रात ठरत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विज्ञान आणि त्यात रुजलेल्या उदारमतवादी समाजांपाशी माणसाचा आत्मा पेलण्याची क्षमताच नाही. त्यासाठी लागतात स्पष्टीकरणे व जीवनाची मार्गदर्शक तत्त्वे, जी विज्ञान आणि त्यावर आधारलेल्या उदारमतवादी समाज यांच्याकडे नाहीत.
वैज्ञानिक प्रगती इतकी मूलग्राही आहे, की ती दर टप्प्यावर आपल्या ऐतिहासिक संचितापैकी जवळपास सारेच टाकून देऊ शकते. याचे विज्ञानाच्या वारसदारांवर अनिष्ट परिणाम होतात. द क्लोजिंग ऑफ द अमेरिकन माइंड या ग्रंथात कै. अॅलन ब्लूम यांनी या दुष्परिणामांचे उत्कृष्ट व प्रत्ययकारी वर्णन केले आहे. ब्लूम यांना वर्षामागून वर्षांचे विद्यार्थी जास्त जास्त अडाणी व निर्जीव होताना दिसले. याहून वाईट म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीत जपण्याजोगे काही आहे असे वाटत नव्हते. एका भयानक सांस्कृतिक सापेक्षतावादाने त्यांच्या मनांना इतके ग्रासले होते, की त्यांना कोणताही दृष्टिकोण इतर कोणत्याही दृष्टिकोणापेक्षा अधिक मोलाचा वाटूच शकत नव्हता.
ब्रूमनी हे ओळखले, की एका कळीच्या उदारमतावादाने विद्यार्थ्यांच्या मनांना भ्रष्ट केले होते. ही कल्पना अशी, की पूर्वी लोकांनी आपले म्हणणे खरे मानून भयंकर गोष्टी केल्या आहेत, म्हणून आपण कधीही आपले म्हणणे बरोबर मानू नये. ज आपण खरोखर कोण आहोत याचे रक्षण करण्याची साधने विज्ञान व उदारमतवाद यांच्याकडून आपल्याला मिळणार नाहीत, कारण आपला दृष्टिकोण कुठे बरोबर असेल याची शक्यताच ते नाकारतात. यामुळे पालक, शिक्षक वा संस्कृती जेव्हा आपले म्हणणे खरे । कसे हे सांगतात तेव्हा ते (विद्यार्थ्यांना) जास्त जास्त पोकळ वाटू लागते. शिकण्या शिकवण्यासारखे काहीच नसते असे दिसते, कारण कोणताही नवा शोध कोणत्याही जुन्या ज्ञान-विशेषाला खोटे पाडू शकतो.
हे निश्चित आहे की संस्कृतीचा कोणताच गाभा, सदगुणांचा कोणताच साठा एका पिढीने दुसऱ्या पिढीला देण्यासारखा नाही. आपले आत्मे क्षीण होतात. अडाणी, विचारहीन अवस्थेत आपल्याला विश्वाचे व्यवहार जत्रेतील विक्षिप्त दृश्यांच्या चित्रपटांसारखे दिसू लागतात. हा संत त्या दाढीवाल्या बाईपेक्षा महत्त्वाचा का? ह्या तत्त्वज्ञाला असे कोणते ज्ञान आहे, जे त्या विदूषकाला नाही ?
ही अस्थिरता, ही कोणताही श्रेयकनीय भाव नसण्याची स्थिती आता पूर्णपणे प्रस्थापित झाली आहे. अमेरिकन विद्यापीठांमध्ये एक राजकीय औचित्याची संकल्पना असते, जिच्यात युरोपीय-अमेरिकन जीवनपद्धती अन्य जीवनपद्धतीहून श्रेष्ठ आहे ही कल्पना समूळ उपटून तिच्यावर बंदी घातली जाते.
यातून अर्थातच उदारमतवादी हुकूमशाहीचा विकृत प्रकार घडतो. उदारमतवादाकडे सांगण्यासारखे इतके कमी असते की, याच नेमक्या कारणामुळे जे सांगण्यासारखे आहे, ते जास्तजास्त आग्रहीपणाने सांगितले जाते.
विज्ञान आजही सत्ताधीश आहे, आणि आपले उदारमतवादी समाज आजही वैज्ञानिक दृष्टीने वागतात. पण ही उघडपणे उतरती कळा आहे. माझ्या मते आपण मरणासन्न आहोत. याचे कारण म्हणजे उदारमतवाद बेचव सहिष्णुता सोडून कोणतेही मूल्य देऊ शकलेला नाही. उदारमतवाद ना स्वतःचे रक्षण करू शकत, ना स्वतःचा गौरव. गुरू आणि शिष्य दोघांचाही काय शिकायचे या विषयावर विश्वास नसल्याने शिक्षणच सतत संकटग्रस्त झाले आहे. किशोरवयीन मुलांना फक्त अनेकांतवाद (pluralism) आणि सहिष्णुता, हीच मूल्ये शिकविली जातात. यामुळे ते कोणत्याच बाबतीत स्वतःचे मत न घडवणेच श्रेयस्कर मानतात. ते प्रवाहासोबत जातात, कारण त्यांना प्रवाहच श्रेयस्कर वाटतो. पथनाट्य हाच धर्मग्रंथ होतो.
या कारणामुळे मूल्ये व सद्गुण यांच्या उदारमतवादी व्याख्या देणे अशक्य झाले आहे. अनेकांतवाद व सहिष्णुता, या पायांवर “न्याय”, “श्रेय” वगैरे कल्पना घडवणारच कशा?
या अडचणींमुळे मूलभूत सद्गुण कोणते हे ठरवण्याचा एक वेगळाच शोध सुरू झाला आहे. येथे सामाजिक संदर्भात एक विशिष्ट गुणवत्ता कमावण्याच्या अॅरिस्टॉटीलियन श्रेय कल्पनेकडे तो चालला आहे.
ही कल्पना अनेकताविरोधी, समताविरोधी, सहिष्णुताविरोधी आहे, कारण हिच्यामुळे चांगुलपणा असलेल्या क्रियांमध्ये निवड करणे आवश्यक ठरते, लोकांच्या वर्तनात फरक करावाच लागतो.
आपल्यापुरते आपल्या जीवनाच्या व्याख्या देण्याचे काम आपण आपल्या नेहमीच्या अवैज्ञानिक तंत्रांनी करू शकतो. आपल्याला नाकारता न येणारे रागलोभ, मूल्ये आणि श्रद्धा असू शकतात; आणि यांपैकी सर्वात जे मूलभूत आहेत त्यांच्या समर्थनाची गरज नसते, कारण ते आपल्या वादातीत सांस्कृतिक नातेसंबंधांचेच प्रकट रूप असते.
विट्गेनस्टाइनने लिहिले आहे, “जर माझी सगळी समर्थने संपली असतील तर मी पायाभूत खडकापर्यंत पोचलो आहे आणि माझी कुदळ चालेनाशी झाली आहे. आता मला एवढेच म्हणावेसे वाटते की मी असे असे करतो !”
प्रबोधन (enlightenment) युगाच्या इतिहासाच्या दुसऱ्या टोकावरून याचा एक पूर्व-प्रतिध्वनी येतो-पास्कलचा. “माणसांच्या सद्गुणांची शक्ती त्यांच्या प्रयत्नातून नव्हे, तर दैनंदिन जीवनातून मोजावी लागते.”
ही भूमिका म्हणजे विज्ञानाच्या सत्तेचा शेवट आहे. कारण सतत बदलायची तयारी किंवा अनंत खुलेपणा या विज्ञानाला आपल्या आत्म्यांवर आक्रमण करत राहण्याकरिता आवश्यक असणाऱ्या गोष्टींना ती नकार देते.
(पल्लेदार, क्लिष्ट वाक्ये सोडवणे, काही अध्याहृत कार्यकारणभाव उघड करणे आणि जुजबी काटकसर वगळता हा शब्दशः अनुवाद आहे. लेखकाची उडतपगड शैली, परिच्छेद विभागणी, शक्यतो जशीच्या तशी ठेवलेली आहे. – नंदा खरे)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.