तत्त्वज्ञानाची ओळख (भाग १२)

बाक्र्लीचा आयडियलिझम

गेल्या लेखांकात आपण idea’ या शब्दाचे दोन अगदी भिन्न आणि स्वतंत्र अर्थ पाहिले. आधुनिक भाषाशास्त्रज्ञांच्या मताने idea’ हा शब्द एक नसून दोन आहेत. एक, प्लेटोचा ‘आकार’ या अर्थाचा ग्रीक शब्द, आणि दुसरा, अर्वाचीन तत्त्वज्ञानात रूढ असलेला ‘कल्पना या अर्थाचा इंग्लिश शब्द. त्यामुळे idealism’ या शब्दालाही दोन अगदी भिन्न आणि स्वतंत्र अर्थ आहेत. एक, प्लेटोच्या idea’पासून आलेला आदर्शवाद किंवा ध्येयवाद, आणि दुसरा इंग्लिश idea’ पासून आलेला कल्पनावाद. बार्लीला हा दुसरा idealism अभिप्रेत होता. या मतानुसार विश्वात फक्त दोनच प्रकारचे पदार्थ आहेत, आत्मे किंवा मने आणि त्यांच्या कल्पना. आत्मे आणि कल्पना यांचा संबंध ज्ञाता व ज्ञेय, किंवा विषयी व विषय हा संबंध होय.
आता जर सबंध विश्वात आत्मे आणि कल्पना एवढेच पदार्थ असतील, तर मग भौतिक पदार्थांचे काय? या प्रश्नाला बाक्र्लीचे उत्तर आहे- त्या कल्पना आहेत. भौतिक पदार्थ केवळ आपल्या मनातील कल्पना आहेत हे मत अतिशय चमत्कारिक आहे यात संशय नाही. भौतिक पदार्थांना मनोबाह्य, मनोनिरपेक्ष, स्वतंत्र अस्तित्व आहे असे आपण मानतो. त्यामुळे बार्लीचे मत तत्कालीन तत्त्वज्ञांना धक्का देणारे वाटणे स्वाभाविक होते, आणि ते मत तत्कालीन तत्त्वज्ञांच्या गळी उतरविण्याकरिता बार्लीला पुष्कळच कष्ट पडले. परंतु आश्चर्य म्हणजे हे अतिशय विपर्यस्त मत आपल्या समकालीनांना पटवून देण्यात त्याला ताबडतोब जरी नाही, तरी कालांतराने खूपच यश मिळाले. त्याकरिता त्याला अनेक युक्तिवाद वापरावे लागले. त्यांपैकी दोन-तीन महत्त्वाचे युक्तिवाद आपण येथे पाहणार आहोत.
बार्लीचे युक्तिवाद
पहिला युक्तिवाद असा आहे की अस्तित्वात असणे (exist) या शब्दाचा अर्थच मुळी ‘जाणले जाणे’ असा आहे. To exist means to be perceived. बाब म्हणतो की एखादी इंद्रियगोचर (sensible) वस्तू आहे म्हणजे काय याचा जो कोणी विचार करील त्याच्या लक्षात येईल की एखादी इंद्रियगोचर वस्तू आहे याचा अर्थ ती मी पाहतो, किंवा ऐकतो, स्पर्शतो, वासाने किंवा चवीने जाणतो. म्हणजे इंद्रियगोचर वस्तूंचे अस्तित्व ज्ञातृसापेक्षच असते. ते ज्ञातृनिरपेक्ष असू शकत नाही. ज्ञात्याच्या मनातील कल्पना असेच तिचे अस्तित्व असते. ‘To exist is to be perceived’ हे सूत्र ‘Esse est percipi’ या लॅटिन रूपात तत्त्वज्ञानात प्रसिद्ध आहे.
Perception म्हणजे काय ?
येथे ‘perceive’ या क्रियापदाविषयी थोडे स्पष्टीकरण करणे अवश्य आहे. हा शब्द तत्त्वज्ञानात प्रामुख्याने एका पारिभाषिक अर्थाने रूढ आहे. त्या अर्थी ‘to perceive’ म्हणजे पाहणे, ऐकणे, स्पर्शणे, वास घेणे व चव घेणे या पांचपैकी कोणत्याही प्रकाराने एखाद्या भौतिक वस्तूचे ज्ञान होणे. उदा. ‘मी टेबल पाहतो’, ‘मी घंटा ऐकतो’, ‘मी (खिशातील) रुपया स्पर्शाने जाणतो, इ. या पारिभाषिक अर्थी perceive’ या शब्दाला सोयीचा शब्द मराठीत नाही. या संदर्भात रूढ असलेला प्रत्यक्ष हा शब्द गैरसोयीचा आहे, कारण तो स्वतः क्रियापद नाही आणि त्यावरून क्रियापद बनविणेही दुरापास्त आहे. म्हणून मी ‘perceive’ करिता ‘आलोकणे असा शब्द वापरतो. ‘T perceive a table’ म्हणजे ‘मी टेबल आलोकतो.’ या क्रियापदाचा उपयोग करून बार्लीच्या वरील सूत्राचा अनुवाद असा होईलः ‘कोणत्याही इंद्रियगोचर वस्तूचे असणे म्हणजे आलोकिले जाणे.
आलोकनाने (perception), म्हणजे पाहणे, ऐकणे, इत्यादींनी आपल्याला कशाचे ज्ञान होते? आपण असे मानतो की आपल्याला आलोकनाने भौतिक वस्तूंचे ज्ञान होते. परंतु भौतिक वस्तूंच्या ठिकाणी अनेक गुण असतात, आणि ते सर्व कोणत्याही एका ज्ञानेंद्रियाने आपल्याला कळू शकत नाहीत. उदा. फळाचा रंग, आकार, विस्तार डोळ्यांनी कळतो, तर त्याचा गुळगुळीतपणा, मार्दव किंवा कठीणपणा, शीतोष्णता इ. स्पर्शानेच कळू शकतात. ते जमिनीवर आदळले तर त्याचा आवाज फक्त कानालाच कळतो, आणि त्याची चव आणि वास ज्ञानेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय यांनीच ओळखता येते. कोणत्याही इंद्रियाने त्याचा उचित विषय तेवढा ग्रहण करता येतो, आणि हे उचित विषय म्हणजे भौतिक वस्तू नव्हेत. ते आहेत शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे गुण किंवा ही वेदने (sensations). ज्ञानेंद्रियांनी आपल्याला भौतिक वस्तूंच्या वेगवेगळ्या गुणांची वेदने प्राप्त होतात.
बार्लीचे यापुढील युक्तिवाद देण्यापूर्वी त्याने वापरलेल्या परिभाषेविषयी दोन शब्द लिहिणे सोयीचे होईल. त्याचे युक्तिवाद सयुक्तिक वाटतात याचे कारण बऱ्याच प्रमाणात त्याने वापरलेली नवीन परिभाषा आहे. .
त्याने परिभाषेत सुचविलेला पहिला बदल म्हणजे ज्यांना पूर्वीचे लोक ‘sensa tions (वेदने) म्हणत त्याही एक प्रकारच्या कल्पनाच आहेत असे त्याने प्रतिपादले. आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपल्याला पाच प्रकारची वेदने- शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध यांची–प्राप्त होतात हे सर्वज्ञात आहेत. तसेच कोणत्याही वेदनाची प्रतिकृती (image) बनविण्याचे सामर्थ्य आपल्या मनाजवळ आहे हेही सुपरिचित आहे. बाक्लीने sensation आणि images या दोन्ही ideas आहेत असे प्रतिपादले. Sensations या ideas of sensation आहेत आणि images या ideas of imagination आहेत अशी परिभाषा त्याने सुचविली. आता sensation म्हणजे आपल्या कोणत्याही इंद्रियाचे उद्दीपन होऊन त्याला प्राप्त होणारा अनुभव, आणि image म्हणजे त्या अनुभवाची मनोनिर्मित नक्कल. उदा. डोळ्यावर प्रकाश पडला की दृष्टिवेदने प्राप्त होतात, आणि त्यांच्या प्रतिकृती आपण बनवू शकतो. आता यांपैकी image ला idea’ म्हणणे उचित दिसते; परंतु sensation ला idea म्हणणे चमत्कारिक वाटते हे मान्य केले पाहिजे. बाक्र्लीच्या बाजूने हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याच्या आधी होऊन गेलेल्या दोन थोर तत्त्वज्ञांनी आपल्या मनापुढे साक्षात् हजर असणाऱ्या वस्तूंना ‘ideas’ हा शब्द वापरला होता. अर्वाचीन तत्त्वज्ञानाचा जनक तो देकार्त (१५९१ १६५०) त्याने असे मत मांडले होते की जे आपले मन प्रत्यक्ष आलोकते ते idea असते. लॉक (१६३२ ते १७०४) या अनुभववादी तत्त्वज्ञानाच्या संस्थापकानेही हेच मत व्यक्त केले होते. तो म्हणतो की कल्पना म्हणजे जेव्हा आपले मन विचार करते तेव्हा त्याच्या संमुख असणाऱ्या गोष्टी. या प्रत्येक idea चा एकेक आशय असतो. कल्पना ही कशाची तरी असते; ती रूपाची असेल, स्पर्शाची असेल, आवाजाची असेल, इ. तसेच कल्पना ह्या मिश्रअसू शकतात. उदा. सफरचंदाची कल्पना म्हणजे एक रंग, एक आकार, एक वास, एक चव, इत्यादि कल्पनांच्या मिश्रणाने बनलेली मिश्र कल्पना. ह्या पार्श्वभूमीवर बाक्लीने ही परिभाषा उचलली हे स्वाभाविक होते.
‘मानवी ज्ञानाचे साक्षात् विषय कल्पना असतात हे मत बाक्र्लीच्या Principles of Human Knowledge या प्रमुख ग्रंथाच्या पहिल्याच वाक्यात व्यक्त झाले आहे. या कल्पना त्याच्या मते तीन प्रकारच्या आहेत : (१) इंद्रियांवर उमटलेले ठसे (किंवा ज्यांना आपण वेदने म्हणतो ती); (२) आपल्या मनाच्या कृती आणि विकार यांच्या अवलोकनातून प्राप्त होणाऱ्या कल्पना (उदा. विचार, इच्छा, भय, क्रोध इत्यादि); आणि (३) स्मृती किंवा । कल्पनाशक्ती यांनी बनविलेल्या मूळ कल्पनांच्या प्रतिमा, तसेच त्यांच्या संयोग-वियोगाने बनविलेल्या मिश्र कल्पना. दृष्टीने मला प्रकाश आणि रंग यांच्या कल्पना मिळतात; स्पर्शाने मृद आणि कठीण, शीत आणि उष्ण या कल्पना; घ्राणाने वासाच्या कल्पना, इ. आणि यांपैकी अनेक जेव्हा सतत एकत्र अनुभवाला येतात, तेव्हा त्या समूहाला आपण एक नाव देतो, आणि त्याला एक वस्तू म्हणतो. उदा. एक रंग, चव, वास, आकृति आणि दृढता ही सतत एकत्र आढळल्यामुळे त्यांना आपण एक वस्तू म्हणतो आणि तिला ‘सफरचंद हे नाव देतो.
ज्ञानाचे विषय असलेल्या या कल्पनांखेरीज जो त्या जाणतो किंवा अनुभवतो, आणि त्यांवर प्रतिमान, संयोग, वियोग, इ. व्यापार करतो असाही एक पदार्थ आहे. हा ज्ञाता आणि कर्ता पदार्थ म्हणजे मन, चैतन्य, आत्मा किंवा अहम्. हा पदार्थ म्हणजे स्वतः कल्पना नव्हे. तो कल्पनांहून सर्वथा भिन्न आहे. तो कल्पनांना जाणणारा आहे. कल्पना विषय आहेत, तर हा विषयी आहे. कल्पनांचे असणे म्हणजे कोणत्यातरी ज्ञात्याचा विषय असणे..
आपले विचार आणि विकार, तसेच कल्पनाशक्तीने निर्मिलेल्या कल्पनाही, मनाबाहेर असू शकत नाहीत हे कोणीही मान्य करील. पण बाक्ी म्हणतो की, ‘मला हेही तितकेच उघड दिसते की वेदने आणि त्यांचे विविध संयोग (ज्यांना आपण वस्तू म्हणतो) यांनाही मनातच अस्तित्व असते, मनाबाहेर असू शकत नाही.
बाक्र्लीचा युक्तिवाद संक्षेपाने असा देता येईल :–
भौतिक पदार्थ हे आपल्या इंद्रियांनी ज्ञात होणारे पदार्थ आहे त. परंतु आपल्या इंद्रियांनी आपल्याला वेदनांखेरीज अन्य काहीच प्राप्त होत नाही. म्हणून भौतिक पदार्थ आपल्या वेदनांचे समुच्चय होत. वेदनांना मनाबाहेर, मनोनिरपेक्ष अस्तित्व असत नाही.
म्हणून तथाकथित भौतिक पदार्थ केवळ मनोगत पदार्थ आहेत. – इति सिद्धम्.
देकार्त आणि लॉक यांचा प्रतिनिधिवादी वास्तववाद
आपल्या ज्ञानाचे साक्षात् विषय (immediate objects) ideas असतात हे मत प्रथम देकार्तने मांडले आणि लॉकने त्याचा अनुवाद केला हे वर सांगितले आहे. पण त्यावरून बाक्लीने काढलेला निष्कर्ष त्या दोघांनीही काढला नव्हता. ज्यांना भौतिक वस्तू किंवा matter म्हणतात त्यांना ज्ञातृनिरपेक्ष अस्तित्व असते हे सामान्य मत त्यांना मान्यच होते. मात्र या वस्तूंचे आपल्याला साक्षात् ज्ञान होत नाही असे मत त्यांनी मांडले. भूताचे (matter) किंवा भौतिक पदार्थांचे ज्ञान आपल्याला त्यांच्या प्रतिनिधी असलेल्या कल्पनांच्या साह्याने होते. कोणतीही कल्पना कशाची तरीअसते. ज्या गोष्टीची ती कल्पना असेल ती गोष्ट तिच्यात प्रतिनिहित (represented) झालेली असते, किंवा ती गोष्ट त्या कल्पनेचा आशय असते, असे म्हणतात. आपल्या ज्ञानाचे साक्षात् विषय कल्पना असतात; पण या कल्पना भौतिक वस्तूंच्या किंवा त्यांच्या धर्माच्या प्रतिनिधी असतात. भौतिक वस्तू आणि आपले मन यांतील मध्यस्थाचे काम कल्पना करतात. या मध्यस्थांचे ज्ञान आपल्याला साक्षात् होते, आणि त्यांनी प्रतिनिहित वस्तूंचे ज्ञान अप्रत्यक्षपणे होते. ही आलोकनाची उपपत्ती अप्रतिनिधिवादी उपपत्ती (representative theory) म्हणून प्रसिद्ध आहे. हे मत भौतिक वस्तूंचे ज्ञातृनिरपेक्ष अस्तित्व अमान्य करीत नाही. ते वास्तववादी (realist) मत आहे.
भौतिक द्रव्याचे खंडन
कोणत्याही भौतिक वस्तूचे विश्लेषण केले तर आपल्याला तिच्यात अनेक गुण आहेत असे कळते. परंतु केवळ गुणांचा समूह म्हणजे भौतिक वस्तू नव्हे. गुणांना स्वाधीन अस्तित्व नसते, ते कोणत्यातरी गुणीच्या आधाराशिवाय असू शकत नाहीत. या गुणाधाराला तत्त्वज्ञांनी substance हे नाव दिले आहे. आपण त्याला ‘द्रव्य हे नाव देऊ. परंतु या द्रव्याचे स्वरूप काय आहे असा प्रश्न विचारल्यास ते गुणांचा आधार आहे याखेरीज जास्त सांगता येत नाही. लॉकने त्याचे वर्णन ‘something I know not what”मला अज्ञात असलेले काहीतरी’ असे केले आहे.
बाक्र्लीच्या मते जिला तत्त्वज्ञ जड द्रव्याची किंवा भौतिक द्रव्याची कल्पना म्हणतात तशी कोणतीही कल्पना नाही, हे तिचे लॉकने जे वर्णन केले आहे त्यावरूनच स्पष्ट होते. परंतु लॉकला अभिप्रेत असलेल्या कल्पनेत गुणाधाराची कल्पना आहे त्याची वाट काय ? असा प्रश्न येथे सुचतो. त्याला बाक्र्लीचे उत्तर असे आहे की ज्यांना आपण भौतिक पदार्थांचे गुण म्हणतो, (म्हणजे रूप, आकार, मार्दव, आवाज इत्यादि), ती सर्व वेदने आहेत हे आधीच दाखवून झाले आहे, आणि वेदनांना अचेतन द्रव्यात आधार कसा सापडू शकेल? त्यांचा आधार मनाखेरीज किंवा आत्म्याखेरीज आणखी काहीच असू शकत नाही. अशी मने आहेत हे निःसंशय, आणि म्हणून भौतिक गुणाधाराची कल्पना सर्वथा अनावश्यक आहे. शिवाय भौतिक गुणाधारांच्या कल्पनेत व्याघातही आहे, कारण विश्वातील वस्तूंचे गुण म्हणजे वेदना किंवा कल्पना असल्यामुळे ते अचेतन किंवा जड अशा पदार्थात राहू शकत नाहीत हे उघड आहे. म्हणून गुणांचा अचेतन आधार ही कल्पना व्याघातयुक्त आहे.
काही आक्षेपांना उत्तरे
बार्लीचे हे मत प्रथम लोकांसमोर आले तेव्हा पहिली प्रतिक्रिया धक्का बसल्याची झाली. त्यावर आक्षेपांचा चौफेर मारा झाला. परंतु बाक्लीने त्या सर्वांना समर्पक उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी एक दोन महत्त्वाचे आक्षेप आणि त्यांना बाक्लीने दिलेली उत्तरे आता थोडक्यात पाहू.
एक आक्षेप असा होता की बाक्र्लीच्या तत्त्वज्ञानानुसार वास्तव आणि काल्पनिक यांतील भेद नाहीसा होईल; कारण भौतिक जगाचे विलोपन कल्पनांत झाल्यामुळे सर्व जग काल्पनिक झाले आहे. यावर बाक्र्लीचे उत्तर असे आहे की आपण कल्पनांचे दोन प्रकार मानले आहेत, ideas of sensation आणि ideas of imagination. (आजच्या परिभाषेप्रमाणे हा भेद वेदने आणि त्यांच्या प्रतिमा यांतील भेद आहे.) यांपैकी पहिल्या प्रकारच्या कल्पना आपण निर्मीत नाही; त्या आपल्या मनांत स्वतंत्रपणे उद्भवतात. याच्या उलट दुसऱ्या प्रकारच्या कल्पना आपण निर्माण करतो, आणि त्यांवर आपला ताबा चालतो. परंतु वेदनांवर आपला ताबा नसतो. आपण हवी ती वेदने अनुभवू शकत नाही. वास्तव जग हे वेदनांचे बनलेले आहे. ही वेदने ठराविक क्रमाने आपल्या मनात उद्भवतात. त्या क्रमांना आपण निसर्गाचे नियम म्हणतो. म्हणून वास्तव आणि काल्पनिक यांतील भेदाला आषण धक्का लावलेला नाही असे बाब म्हणतो.
बाक्र्लीच्या तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे कारक शक्ती किंवा कर्तृत्व फक्त आत्म्यामध्येच असते. कल्पनांमध्ये कारक शक्ती नसते. (आत्म्याच्या ठिकाणी कारक शक्ती आहे हे उघड आहे; कारण आपण वेदनांपासून प्रतिमा निर्माण करतो, आणि तसेच कल्पनांचे हवे तसे संयोग-वियोग करून मिश्रकल्पना तयार करू शकतो. उदा. सोनेरी पर्वताची कल्पना. मात्र आपल्या आत्म्याची शक्ती परिमित आहे; ती वेदने निर्माण करू शकत नाही की ती नष्टही करू शकत नाही.
परंतु मग वेदने कशी निर्माण होतात ? त्यांना कोण निर्माण करतो? या प्रश्नाला बाक्र्लीचे उत्तर असे आहेः कारक शक्ती ही फक्त आत्म्यातच असू शकते. परंतु वेदने निर्माण करण्याची शक्ती आपल्या आत्म्यात नाही. तेव्हा आपल्या आत्म्यांहून अधिक शक्तिमान आत्मा असला पाहिजे. हा आत्मा म्हणजे ईश्वर. ह्याचे ज्ञान आणि शक्ती दोन्ही अपरिमित आहेत.
आणखी एक आक्षेप असा आहे. एखाद्या वस्तूकडे आपण पाहात असताना मध्येच आपण दुसरीकडे पाहिले, किंवा एखाद्या वस्तूला स्पर्शीत असताना मध्येच आपण हात उचलला, तर त्याक्षणी ती वेदने नाहीशी होतात. पण भौतिक वस्तू म्हणजे जर केवळ वेदने असतील, तर त्या आपल्या आलोकनाचे विषय असतील तोपर्यंतच अस्तित्वात असणार. म्हणजे भौतिक वस्तू क्षणात निर्माण होतात आणि क्षणात नाहीशा होतात असे मानावे लागेल. पण हे चमत्कारिक वाटते, असा हा आक्षेप आहे.
यावर बार्लीचे उत्तर असे आहे की जरी आपले वस्तूंचे आलोकन अल्पकाळ टिकणारे असले तरी वेदने निर्माण करणाऱ्या ईश्वराचे ज्ञान सार्वकालिक आहे, आणि त्यामुळे जगातील वस्तू ईश्वराच्या ज्ञानाचे सदैव विषय असतात. त्यामुळे वस्तूंना आपण सामान्यपणे मानतो तसे स्थायी अस्तित्व असते असे आपण म्हणू शकतो.
बार्लीच्या सिद्धांतावर घेतल्या गेलेल्या अनेक आक्षेपांना त्याने जी उत्तरे दिली त्यांपैकी अनेक सयुक्तिक असली तरी त्याने केलेला ईश्वरकल्पनेचा उपयोग मात्र असमर्थनीय आहे असे तत्त्वज्ञांचे सामान्य मत आहे. ईश्वराचे अस्तित्व, आणि तसेच माझ्याहून अन्य परिमित आत्म्यांचे अस्तित्व मानायला सयुक्तिक कारणे बाक्ी देऊ शकला नाही. मला माझे स्वतःचे साक्षात् ज्ञान आहे. परंतु तसे अन्य आत्म्यांचे नाही. अन्य आत्म्यांचे मला साक्षात् ज्ञान नाही. शरीरांच्या हालचालीवरून त्यांच्याशी संबद्ध आत्मे आहेत असे आपण अनुमान करतो. परंतु हे अनुमान करण्यास आपल्याजवळ पुरेसा पुरावा नाही. त्यामुळे बार्लीच्या तत्त्वज्ञानाचे पर्यवसान आत्मनिष्ठ कल्पनावाद (subjective idealism) हे आहे, म्हणजे असे मत की विश्वात फक्त मी आणि माझ्या कल्पनाच तेवढ्या आहेत. या मताला अहमेववाद (solipsism) असेही नाव आहे. ह्या वादाचे खंडन करणे अशक्य असले तरी तो कोणीही स्वीकारीत नाही हे लक्षणीय आहे.

आम्ही श्रद्धेची चिलखते काढून फेकून दिली आहेत
आजचा सुधारकच्या डिसेंबर १९९३ च्या अंकामधील मुखपृष्ठावरील कविता आणि आमचे मित्र श्री. केशवराव जोशी ह्यांचे पत्र वाचून एक निनावी पत्र श्री. केशवराव जोशी यांजकडे व आमच्याकडे आले आहे.
आमच्याकडे आलेल्या पत्रासोबत आम्ही ते प्रकाशित करावे असे आवाहन आहे. परंतु गलिच्छ भाषेमधली व ज्यांना आपले नाव प्रकाशात येण्याचे भय वाटते अशांची पत्रे प्रकाशित करावयाची नाहीत असे आमचे धोरण आम्ही पूर्वीच जाहीर केले आहे. निनावी पत्रे लिहिणारे मुद्द्यांवर लढत नसतात. ते गुद्दे मारून किंवा गुद्दे मारण्याचा धाक दाखवून प्रतिपक्षाचे तोंड बंद करण्यात भूषण मानतात असे दिसते.
गुद्द्यांच्या लढाईत न्याय्य पक्षाचा जय होत नसला तरी मुद्द्यांच्या बाबतीत होतो. किंबहुना प्रतिपक्षी गुद्द्यांवर आले की न्याय्य पक्ष जिंकला असे समजता येते.
थोडक्यात काय तर आपला मुद्दा बिनतोड असेल तर गुद्द्यांवर येण्याची कोणालाही गरज नाही.
न्याय्य पक्षाला दडपून टाकण्याचे प्रयत्न पूर्वीच्या काळापासून झालेले आहेत. कोपर्निकस, गॅलिलिओ, ब्रूनो अशा मंडळींनी आपापल्या मताला चिकटून राहिल्याबद्दल शारीरिक छळ सोसला आहे; काहींनी प्राण देखील गमाविले आहेत. आणि त्यांनी सोसलेल्या छळामुळे त्यांचा न्याय्य पक्ष प्रत्येक वेळी उजळून निघाला आहे.
तेव्हा आमच्या मित्रांना किंवा मासिकाला निनावी किंवा धमकीची पत्रे पाठवून आमचे काम बंद पडेल असे कोणी मानू नये. विचारांशी लढाई विचारांनी करावी. मुद्देसूद पत्रांचे स्वागतच आहे. आमचे मासिक प्रचारासाठी नाही, चर्चेसाठी आहे. दोन्ही पक्षांची बाजू शांतपणे सर्वांसमोर मांडण्यासाठी आहे. एक उदाहरण देतोः फलज्योतिषावर आमचा विश्वास नाही. तसे लेख आम्ही प्रकाशित केले. पण दुसरी बाजू समजल्यावर वा ती पटल्यावर आमचे मत बदलणार नाही असे मुळीच नाही. म्हणून त्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आपली बाजू मांडावी अशी काही ज्योतिष्यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली; पण ते लिहीत नाहीत. ते अशा वेळी मुद्दयांनी सज्ज होऊन मैदानात येत नाहीत. फक्त श्रद्धेच्या भक्कम तटबंदीमागे आश्रय घेतात. तेथे त्यांना कसे सुरक्षित वाटते !
ह्या उलट आम्ही श्रद्धेची चिलखते काढून फेकून दिली आहेत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.