गांधींचे ‘सत्य’

सत्य आणि अहिंसा हे गांधींच्या तत्त्वज्ञानाचे प्रमुख आधारस्तंभ होते ही गोष्ट सुपरिचित आहे. त्यांपैकी अहिंसा म्हणजे काय? ‘अहिंसा’ या शब्दाने त्यांना नेमके काय अभिप्रेत होते? या प्रश्नाला बरेच निश्चित उत्तर त्यांच्या लिखाणात सापडते. परंतु ‘सत्य’ म्हणजे काय? हे मात्र मोठ्या प्रमाणात गूढच राहते. त्यांचे लिखाण काळजीपूर्वक वाचूनही त्यांना अभिप्रेत असलेली सत्याची संकल्पना अनाकलनीयच राहते. या लेखात या संकल्पनेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे.
सत्य, सत् आणि साधु
‘सत्य’ या संस्कृत शब्दाचे, आणि तसेच आपल्या इंग्रजी लिखाणात गांधींनी वापरलेल्या ‘Truth’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्या अनेक अर्थाचा क्रमाने विचार करून त्यांच्यापैकी कोणत्या अर्थाने गांधी हे दोन शब्द वापरीत होते ते आपण पाहणार आहोत. प्रथम एक सहज लक्षात येणारी गोष्ट म्हणजे ‘सत्य’ हा शब्द विशेषण आणि नाम दोन्ही आहे. परंतु इंग्रजीत मात्र ‘Truth’ हा शब्द केवळ नामच आहे; ‘सत्य’च्या विशेषण म्हणून अर्थाचा ‘true’ हा शब्द वेगळा आहे. गांधी या संदर्भात नेहमी ‘Truth’ हे नामच वापरतात, आणि त्यातही त्याचे आद्याक्षर सदैव कॅपिटल (capital) लिहितात.
‘सत्य’ या विशेषणाचा प्रधान अर्थ ‘true’ किंवा खरे. या अर्थी ‘सत्य’ हे वाक्यांचे, विधानांचे विशेषण असते. ‘सत्यं ब्रूहि, ‘सत्य बोला’ इत्यादि प्रयोगात हा अर्थ अभिप्रेत आहे. या अर्थी ज्ञान, समजुती, विश्वास, आणि तसेच ह्या सर्व गोष्टी व्यक्त करणारी वाक्येही सत्य किंवा असत्य असतात. कोणतेही ज्ञान किंवा समजूत आपण निवेदक (म्हणजे indicative mood मधील) वाक्यात व्यक्त करतो. अशा वाक्यात एका किंवा अनेक वस्तूंचे वर्णन असते. एखाद्या वस्तूत अमुक एक गुण आहे, किंवा ती वस्तू आणि दुसरी एक वस्तू यांच्यात अमुक संबंध आहे असे ते वर्णन असते. जेव्हा हे वर्णन बरोबर किंवा यथार्थ असते, म्हणजे जशी ती वस्तू आहे तसे असते, तेव्हा ते सत्य (true) आहे असे आपण म्हणतो. उदा. ‘पृथ्वी गोल आहे, किंवा ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही विधाने सत्य आहेत, कारण ती यथार्थ म्हणजे वर्ण्य वस्तू जशी आहे तशी आहेत.
‘सत्य’ शब्दाचा हा अर्थ त्याची ‘सत्’ या दुसर्‍या शब्दाशी तुलना केल्यास अधिक स्पष्ट होईल. ‘सत्’ म्हणजे जे आहे ते, किंवा ज्याला अस्तित्व आहे ते. जे सत् असते ते एखादी वस्तू असते. उदा. पृथ्वी सत् आहे, कारण तिला अस्तित्व आहे. परंतु स्वर्ग सत् नाही, कारण तो काल्पनिक आहे, त्याला अस्तित्व नाही. वस्तू सत् किंवा असत् असतात; परंतु त्या सत्य किंवा असत्य असू शकत नाहीत. वाक्ये, विधाने मात्र सत्य किंवा असत्य असतात, एवढेच नव्हे तर फक्त वाक्ये किंवा विधानेच सत्य किंवा असत्य असू शकतात.
‘सत्य-असत्य’ या अर्थाचे इंग्रजी शब्द म्हणजे true’-‘false’, परंतु ‘सत्‘असत्’ या अर्थाचे इंग्रजी शब्द real – ‘unreal’.
याप्रमाणे ‘सत्य’ आणि ‘सत्’ या दोन्ही शब्दांचे प्रधान अर्थ जरी भिन्न असले तरी त्यांचे प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोग मात्र बरेच शिथिल आहेत. जिथे ‘सत्य’ हा शब्द वापरणे उचित होईल तिथे कित्येकदा ‘सत्’ हा शब्द वापरला जातो, आणि तसेच जिथे ‘सत्’ शब्द वापरणे उचित असते तिथे ‘सत्य’ वापरला जातो. उदा. ‘ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या या प्रसिद्ध वचनात ब्रह्म सत्य आहे असे म्हटले आहे. परंतु वस्तुतः ते सत्य असू शकत नाही, कारण ते वाक्य किंवा विधान नव्हे. वरील वाक्यात ब्रह्म सत् आहे असाच अर्थ अभिप्रेत आहे.
‘सत्य’-‘असत्य’ आणि ‘सत्’-‘असत्’ यांच्या प्रमाणेच तिसरी एक विशेषणांची जोडी आहे. ही जोडी म्हणजे चांगले-वाईट’ किंवा ‘साधु’-‘असाधु’. या शब्दांचे अर्थ वरील दोन्ही जोड्यांच्या अर्थांहून अगदी भिन्न आहेत हे उघड आहे. हे अर्थ नीतिशास्त्रीय अर्थ आहेत. परंतु ‘सत्’ आणि ‘असत्’ हे शब्द या अर्थांनीही वापरले जातात. उदा. ‘सदाचार, ‘सद्वर्तन’, ‘सद्धेतू’, ‘सच्छील’, इ. शब्दांतील ‘सत्’ हा शब्द चांगला किंवा साधु या अर्थाने वापरला आहे. याच्याउलट ‘सत्यमेव जयते’ या वाक्याचा अर्थ न्यायाचा, शुभाचा, साधुत्वाचा विजय होतो असा आहे. म्हणजे इथे ‘सत्य’ हा शब्द ‘साधु’ या अर्थाने वापरला आहे.
वरील विवेचनाचा सारांश असा. इंग्लिशमध्ये तीन भिन्न अर्थाच्या शब्दांच्या जोड्या आहेत : true-false, real-unreal आणि good-evil. यांपैकी true-false ही जोडी ज्ञानशास्त्रीय आहे; real-unreal ही सत्ताशास्त्रीय आणि good-evil ही नीतिशास्त्रीय आहे. हे तीन अर्थ अतिशय भिन्न आहेत. तरीही ‘सत्’ हा शब्द मोठ्या प्रमाणात, आणि ‘सत्य’ त्यापेक्षा काहीशा कमी प्रमाणात, वरील तिन्ही अर्थांनी वापरले जातात. व्यवहारात त्यामुळे फारसे अडत नाही; परंतु तात्त्विक चर्चेत त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. वरील तीन अर्थ अतिशय भिन्न आहेत हे एकदा लक्षात आल्यावर कोणताही शब्द एकाच अर्थाने निदान गंभीर चर्चेत वापरणे इष्टच नव्हे, तर अत्यावश्यकही आहे हे लक्षात येईल.
‘सत्य’, ‘सत्’ आणि ‘साधु’ या तीन शब्दांविषयी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे अवश्य आहे. ‘सत्य’ आणि ‘सत्’ हे शब्द जरी क्वचित् वरील तीन अर्थांपैकी कोणत्याही अर्थाने वापरले जात असले, तरी जेव्हा ते यांपैकी कोणत्याही एका अर्थाने वापरले जातात तेव्हा (त्या वापरात) ते अन्य दोन अर्थांनी अभिप्रेत असू शकत नाहीत. म्हणजे ‘सत्य’ किंवा ‘सत्’ हे शब्द केव्हाही (कोणत्याही एकाच वेळी) एकाच अर्थाने अभिप्रेत असू शकतात. उदा. ‘सत्य’ क्वचित् ‘सत्’ या अर्थाने वापरला जातो; परंतु त्यावेळी त्याचा ज्ञानशास्त्रीय अर्थ लागू पडत नाही. ‘ब्रह्म सत्यम्’ या वाक्यात ‘सत्य’ हा शब्द ‘सत्’ या अर्थी वापरला आहे; पण म्हणूनच त्याचा ‘खरे’ हा अर्थ त्या वाक्यात अनुपपन्न आहे. कारण ‘सत्य’ हा शब्द ‘खरे’ या अर्थी विधेयपदी उपस्थित होण्याकरिता उद्देश्यपदी एखादे वाक्य किंवा विधान उपस्थित असावे लागते, आणि ‘ब्रह्म तसे नाही.
एवढ्या प्रस्तावनेनंतर आपण आता गांधींच्या मतांकडे वळू शकतो.
गांधींचे मत
गांधींना ‘सत्य’ हा शब्द वरील तीन अर्थापैकी कोणत्या अर्थाने अभिप्रेत होता? त्याचा प्रधान अर्थ ‘खरे’ किंवा ‘यथार्थ’ हा त्यांना अभिप्रेत असला पाहिजे असे आपण मानले पाहिजे. कारण तो त्यांना अभिप्रेत नव्हता असे म्हणणे म्हणजे त्यांना ‘सत्य’ या शब्दाचा प्रधान अर्थ माहीत नव्हता, किंवा ते तो शब्द जाणूनबुजून कुठल्यातरी अन्य अर्थाने वापरीत होते असे म्हणण्यासारखे होईल. तेव्हा ‘सत्य’ म्हणजे यथार्थता या अर्थाने तो शब्द त्यांना अमान्य होता असे म्हणणे चूक होईल.
परंतु त्यांना ‘सत्य’ हा शब्द ‘सत्’ या अर्थीही अभिप्रेत होता असे म्हणण्यास जागा आहे. कारण ते आपल्या आत्मचरित्रात एका ठिकाणी म्हणतात : ‘हिंदु तत्त्वज्ञानानुसार फक्त ईश्वरच आहे, आणि त्याखेरीज आणखी काही नाही. खरे म्हणजे ‘Truth’ चा वाचक असलेल्या शब्दाचा, म्हणजे ‘सत्’चा, अर्थ जे आहे ते हा आहे. तेव्हा त्यांना ‘सत्य’ म्हणजे सत् हाही अर्थ अभिप्रेत होता हे उघड आहे. ‘Truth’चा वाचक संस्कृत शब्द ‘सत्’ आहे असे ते स्पष्टच म्हणतात.
त्याच परिच्छेदात थोडे आधी गांधी म्हणतात की कोट्यावधि लोकांनी ईश्वराच्या नावाने अनन्वित अत्याचार केले आहेत. त्यामुळे ‘God is Truth’ असे न म्हणता ’Truth is God’ असे म्हणणे मला सर्वांत समाधानकारक वाटते. या दोन वाक्यांचा विचार पुढे येणार आहे. इथे फक्त एवढे लक्षात घ्यायचे आहे. की सत्य म्हणजे साधुत्व हेही त्यांना अभिप्रेत होते. ईश्वर म्हणजे साधुत्व हे अज्ञानी लोकांच्या लक्षात राहात नाही, म्हणून ते ईश्वराच्या नावाने अनन्वित अत्याचार करतात. याकरिता आपण साधुत्वाला प्राधान्य दिले पाहिजे, आणि ‘साधुत्व म्हणजे ईश्वर असे म्हणायला पाहिजे, असा त्यांचा अभिप्राय आहे. या ठिकाणी Truth’ या शब्दाने गांधींना उघडच ‘साधुत्व’ हा अर्थ अभिप्रेत आहे.
एका ठिकाणी गांधी स्वतःच ‘सत्य म्हणजे काय? हा प्रश्न विचारतात, आणि इथे आपल्या वरील प्रश्नाचा उलगडा होईल असे वाटते. पण त्याचे ते जे उत्तर देतात ते निराशाजनक आहे. ते उत्तर असे आहे : ‘हा कठीण प्रश्न आहे. पण मी माझ्यापुरता तो असा सोडविला आहे जे आपला अंतर्यामीचा आवाज सांगेल ते सत्य’. हे उत्तर निराशाजनक आहे, कारण त्याने सत्याच्या स्वरूपावर काहीच प्रकाश पडत नाही. उलट अंतर्यामीचा आवाज म्हणजे काय?’ हा नवीन प्रश्न त्यातून निर्माण होतो, आणि त्याचे उत्तर देणे कठीण आहे. कोणी म्हणेल की आतला आवाज म्हणजे अंतःकरणाचा किंवा सदसद्विवेक बुद्धीचा आवाज पण अंतःकरण म्हणजे काय? आणि त्याचे निकाल बरोबर असतात काय? हे प्रश्न त्यातून उद्भवतात. खरी गोष्ट अशी आहे की आपण ज्या संस्कृतीत वाढतो तिच्यामुळे आपले अंतःकरण बनते, उदा. मांसाहारी कुटुंबात वाढलेल्या मनुष्याचे अंतःकरण पशुहत्येने विचलित होत नाही; पण शाकाहारी कुटुंबात वाढलेल्या मनुष्याचे अंतःकरण त्याविरुद्ध बंड करते. आणि त्यामुळे दोन अंतःकरणांचे निकाल फार भिन्न असू शकतात.
तेव्हा गांधींच्या अन्य लिखाणात आपल्या प्रश्नाचे उत्तर सापडते काय ते पाहू या.
‘God is Truth’ आणि ‘Truth is God’
वर ज्या परिच्छेदाचा उल्लेख केला आहे त्यात गांधींच्या ‘God is Truth’ आणि ‘Truth is God’ या प्रसिद्ध कथनांचे स्पष्टीकरण आले आहे. ते म्हणतातः ‘ईश्वराचे पूर्ण वर्णन देणे जर मानवी भाषेला शक्य असेल तर “ईश्वर सत्य आहे” (God is Truth) या निष्कर्षाप्रत मी येतो. दोन वर्षांपूर्वी मी एक पाऊल पुढे गेलो आणि म्हणालो की “सत्य ईश्वर आहे” (“Truth is God”). या दोन विधानांतील फरक तुमच्या लक्षात येईल.
येथे गांधींनी आपल्यापुढे दोन कूट विधाने ठेवली आहेत : ‘God is Truth’ आणि Truth is God.’ या वाक्यांचे अर्थ काय आहेत?
निदान सकृद्दर्शनी तरी ही दोन्ही वाक्ये निरर्थक आहेत असे म्हणावे लागते. कारण ती तार्किक विन्यासशास्त्रदृष्ट्या असाधु, ill-constructed आहेत. सामान्यपणे ‘A is B’ या आकाराच्या इंग्रजी वाक्यात A हे पद उद्देश्य आणि B विधेय असते. त्यापैकी A द्रव्य-वाचक नाम असून B एखादे विशेषण असते. परंतु ‘God is Truth.’ आणि ‘Truth is God’ या दोन्ही वाक्यांतील विधेयपद विशेषण नाही. पहिले वाक्य जर ‘God is true असे असते तर ते व्याकरणदृष्ट्या साधु झाले असते. त्याचे उद्देश्य’God’ हे वस्तुवाचक किंवा द्रव्यवाचक नाम आहे आणि विधेय ‘true’ हे विशेषण आहे असे म्हणता आले असते, आणि त्याचा अर्थ (जर ’true’ म्हणजे ‘सत्’ हा गौण का होईना अर्थ घेतला तर) ईश्वर सत आहे, किंवा ईश्वराला अस्तित्व आहे असा झाला असता. पण गांधी त्या वाक्यात ‘true’ हे विशेषण वापरीत नाहीत, ते ‘Truth’ हे भाववाचक नाम वापरतात, आणि म्हणून ‘God is Truth’ हे वाक्य वर स्पष्ट केलेल्या ‘A is B’ या आकाराहून वेगळ्या आकाराचे वाक्य झाले आहे. जेव्हा दोन नामे is’ या क्रियापदाने जोडली जातात तेव्हा ती दोन वाक्ये एकाच वस्तूची दोन नावे असतात, किंवा ती एकाच वस्तूचा निर्देश करतात. उदा. ‘केशवसुत कृष्णाजी केशव दामले आहेत’. अशावेळी मराठीत आपण ‘आहे’च्या ऐवजी ‘म्हणजे हा शब्द वापरतोः ‘केशवसुत म्हणजे कृष्णाजी केशव दामले’. ‘Is’ हे क्रियापद अशा वाक्यात अभेद, अनन्यता किंवा तदेवता (identity) यांचे व्यंजक असते. तसेच दोन द्रव्यवाचक नामांप्रमाणेच दोन भाववाचक नामांनीही अभेद व्यक्त होऊ शकतो. उदा. ‘मोक्ष म्हणजे सुटका. तसे ‘God is truth’ आहे काय? तर तसेही नाही, कारण येथे ‘is’ ने दोन द्रव्यवाचक पदे किंवा दोन भाववाचक जोडलेली नसून एक द्रव्यवाचक पद आणि एक भाववाचक पद ही जोडली आहेत, त्यामुळे येथे तदेवतासंबंध आहे असे म्हणता येत नाही. ‘Is’ ला तिसराही एक अर्थ आहे – अस्तित्ववाचक; पण या अर्थी ते क्रियापद एकाच नामाला जोडून येते. उदा. ‘God is’ म्हणजे ‘ईश्वर आहे. हे वाक्य ‘God is truth’ याप्रकारचे नाही हे उघड आहे. तेव्हा ‘God is truth हे वाक्य असाधु आहे, आणि त्याला कसलाही सुसंगत अर्थ नाही असे म्हणावे लागते.
गांधींच्या दुसर्‍या (म्ह. ‘Truth is God’ या) वाक्यातही अशाच अडचणी आहेत. त्याचे उद्देश्य भाववाचक नाम तर विधेय द्रव्यवाचक नाम आहे, आणि ही रचना निरर्थक आहे, कारण भाववाचक नामाचा अर्थ एक अवकृष्ट४ (abstract) गुण आणि द्रव्यवाचक नामाचा अर्थ एक समवेत५ (concrete) द्रव्य ही एकच आहेत असा होईल; आणि हे शक्य दिसत नाही.
याप्रमाणे ईश्वराचे परिपूर्ण वर्णन म्हणून गांधींनी सुचविलेली दोन्ही वाक्ये असाधु आणि निरर्थक आहेत असे म्हणणे भाग आहे. मग ही चमत्कारिक विधाने त्यांनी का वापरली असावीत हे एक न सुटणारे कोडे आहे. ईश्वरस्वरूपाची ही मुलखावेगळी वर्णने देण्याचे त्यांना वस्तुतः काहीच कारण नव्हते; कारण ईश्वराची सामान्यपणे दिली जाणारी सर्वच वर्णने त्यांना मान्य होती. उदा. ते म्हणतात की ही जी ईश्वर नावाची शक्ती आहे ती शुभंकर (benevolent) आहे की अशुभंकर? ती पूर्णपणे शुभंकर आहे असे मला दिसते६. तो सदैव क्षमाशील आहे७. ‘ईश्वर’ एक जिवंत शक्ती आहे. ती अक्षय असून ती सर्व जगाचे धारण करते. ती ते निर्मिते, त्याचे विसर्जन करते आणि पुन्हा निर्मिते… आणि जे जे इंद्रियगोचर आहे ते न टिकणारे असल्यामुळे तोच फक्त आहे. ही हजारो भक्तांनी, धार्मिकांनी, तत्त्वज्ञांनी दिलेली ईश्वराची वर्णने जर गांधींना मान्य होती, तर त्याचे वर्णन ‘God is Truth’ आणि ‘Truth is God या अनाकलनीय वाक्यात देण्याचे त्यांना काय कारण होते कळत नाही.
शिवाय जर ईश्वर असीम दयाळू, सर्वशक्तिमान, इत्यादि असेल, तर ईश्वर म्हणजे सत्य हे खरे असू शकणार नाही; कारण Truth दयाळू, सर्वशक्तिमान, इ. असू शकत नाही; कारण हे सर्व गुण एखाद्या गुणी पदार्थाच्या ठिकाणीच असू शकतात, Truth सारख्या अवकृष्ट गुणात असू शकत नाहीत. गांधींना प्रिय असणारे आणखी एक विधान म्हणजे ‘God is Love’ हे आहे. हेही वाक्य ‘God is Truth’ या वाक्यासारखेच असाधु आहे. ‘ईश्वर म्हणजे प्रेम’ हे वाक्य गुणीगुणसंबंध व्यक्त करणारे उद्देश्य-विधेयात्मक वाक्य नव्हे हे स्पष्ट आहे; कारण त्यातील ‘प्रेम’ हा शब्द भाववाचक नाम असून तो एका अवकृष्ट (abstract) गुणाचे नाव आहे. आणि तसेच ते वाक्य दोन नामांनी एकाच वस्तूचा निर्देश करणारे, तदेवतावाचक वाक्यही नाही, कारण इथे दोन वस्तू नाहीत, एक वस्तू (द्रव्य) आणि एक अवकृष्ट गुण आहे. हे दोन एकच असू शकत नाहीत.
अशी चिकित्सा करणे गैर आहे इथे माझ्यावर असा आक्षेप घेतला जाईल की मी करतो आहे तशा प्रकारची चिकित्सा गांधींच्या विधानांची करणे योग्य नाही, कारण गांधी तर्ककश भाषा वापरणारे तत्त्वज्ञ नव्हते. त्यांची भाषा अलंकारिक होती, आणि अशी भाषा धार्मिक वाङ्मयात वापरणे ही सामान्य गोष्ट आहे. ‘God is Love’ आणि ‘God is truth’ यांसारखी वाक्ये आपण व्यवहारात वारंवार वापरतो, आणि ती निरर्थक आहेत असे समजत नाही. उदा. ‘God is Love’ हे वाक्य उच्चारणाच्या मनुष्याला असे म्हणायचे असते की परमेश्वर प्रेमाने ओतप्रोत भरलेला आहे, तो प्रेमाची मूर्ति आहे, किंवा मूर्तिमंत प्रेम आहे.
हे म्हणणे सयुक्तिक दिसते, आणि ते तसे असेल तर ‘God is Love’ हे वाक्य . rhetorical, अलंकारिक आहे असे म्हणावे लागेल, आणि त्याअर्थी ते निरर्थक म्हणता येणार नाही. त्याचा अर्थ निदान अंशतः वाच्यार्थाने अभिप्रेत अशा वाक्यात व्यक्त होऊ शकतो. उदा. ‘ईश्वर म्हणजे प्रेम’ या वाक्याचा अर्थ ईश्वर अतिशय प्रेमळ आहे, त्याच्या प्रेमाला सीमा नाही या शब्दांत व्यक्त करता येतो.
अशी दुर्बोध भाषा का वापरतात?
अशी दुर्बोध, अतिशयोक्त, बुचकळ्यात टाकणारी भाषा माणसे का वापरतात? त्याचे एक कारण असे असावे की अशी वाक्ये अतिशय अर्थगंभीर आहेत असे वाटते. वाक्य समजायला जितके कठीण तितके ते अधिक अर्थपूर्ण मानण्याकडे श्रद्धावान माणसाचा कल असतो. उदा. हे जग म्हणजे ‘परमेश्वराची लीला’ आहे असे म्हणणे हे अशा प्रकारच्या भाषेचे एक उदाहरण आहे. एखाद्या गोष्टीला लीला म्हणणे ही त्या गोष्टीचा आपल्याला थांग लागत नाही याची कबुली आहे. परंतु तसे म्हणणे अज्ञानाचे लक्षण होईल. उलट तिला लीला’ म्हणण्याने आपल्याला तिचा उलगडा झाला आहे असा भाव व्यक्त होतो.
याचा अर्थ अशी भाषा वापरणारे लोक अप्रामाणिक असतात असा करण्याचे कारण नाही. आपल्याला काही विलक्षण अर्थ गवसला आहे आणि तो आपण विरोधाभासात्मक भाषेत व्यक्त करतो आहोत, कारण साध्या एकार्थक, वाच्यार्थवादी, अनलंकृत भाषेत तो व्यक्त होऊच शकत नाही अशी त्यांची समजूत असते.
गांधींनी जर साधुत्वाच्या कल्पनेचे ईश्वरकल्पनेशी समीकरण मानले असते तर त्यांनी काहीतरी मुलखावेगळे केले आहे असे म्हणण्याचे कारण नव्हते; कारण तसे केले असते तर त्याचा अर्थ ईश्वर साधु आहे, असीम साधु आहे असा झाला असता आणि असे सर्वच ईश्वरवादी मानतात. पण गांधी ईश्वराचे समीकरण साधुत्वाशी न करता सत्याशी करतात, आणि त्यामुळे वाचक गोंधळात सापडतो. ‘ईश्वर म्हणजे सत्य’ असे म्हणताना त्यांना ईश्वर आहे आणि तो साधु (दयाळू, शुभंकर, इ.) आहे याहून अन्य काय अभिप्रेत असावे याचा अंदाज करता येत नाही. ‘सत्य’ = खरे या अर्थाने ‘ईश्वर सत्य आहे’ या वाक्याचा अर्थ काय असू शकेल? ईश्वर मूर्तिमंत सत्य आहे असा त्याचा अर्थ असू शकेल; पण ईश्वर मूर्तिमंत सत्य आहे म्हणजे काय? ‘सत्य’ म्हणजे सत्यज्ञान असा अभिप्राय गांधींच्या मनात असेल का? तसे असेल तर ईश्वर सर्वज्ञ आहे असे त्यांना कदाचित् म्हणायचे असेल. ईश्वराचे हेही वर्णन अनेकांनी केले आहे. किंवा ‘सत्य’ या शब्दाने गांधींना सत्यवचन हा अर्थ अभिप्रेत असेल का? तसे असेल तर ईश्वर प्रामाणिकपणाची मूर्ति आहे असे त्यांना म्हणायचे असेल. पण हेही सरळ भाषेत त्यांना म्हणता आले असते. पण ती सुबोध वर्णने न करता ‘ईश्वर म्हणजे सत्य आणि ‘सत्य म्हणजे ईश्वर’ अशा दुर्बोध वाक्यांचा उपयोग त्यांनी का करावा हे एक कोडे आहे.
तळटीप
१. All Men are Brothers, (युनेस्को प्रकाशन) प्रकरण २, उतारा ५९.
२. तत्रैव, २.६१
३. तत्रैव, २.५९
४,५. अवकृष्टगुण आणि समवेतद्रव्य. प्रत्यक्ष वास्तवात द्रव्य आणि गुण नेहमी परसस्परांच्या समवेत आढळतात. उदा. पांढरेपणा हा गुण खडू, दूध, बर्फ इत्यादि द्रव्यांमध्येच आढळतो. द्रव्यविरहित कधीही आढळत नाही. पण असे असले तरी आपण गुण कल्पनेने द्रव्यापासून विभक्त कल्पू शकतो आणि त्याची वेगळी कल्पना करू शकतो. द्रव्यापासून गुण कल्पनेने वेगळा करण्याच्या क्रियेला ‘abstraction असे नाव आहे, (त्याला आपण अवकर्षण असा पर्याय वापरू), आणि अशा त-हेने वेगळा कल्पिलेल्या गुणाला (अवकृष्ट) abstract गुण म्हणतात. निसर्गात अवकृष्ट असे काहीही कुठेही आढळत नाही. त्यात सर्व गोष्टी समवेत (concrete) असतात.
६. तत्रैव, २.
७. तत्रैव, २.१०
८. तत्रैव २.५
९. अवकृष्ट पदार्थाना अस्तित्व (म्हणजे स्थलकालातील अस्तित्व) नसते. परंतु काही तत्त्वज्ञांच्या मते त्यांनाही एक प्रकारची सत्ता आहे, तिला ते ‘subsistence’ असे म्हणतात. आपण तिला भाव म्हणू. भाववान पदार्थ दिक्कालातीत असतात. पण त्यामुळेच ते अस्तित्ववान जगात कसलाही परिणाम घडवू शकत नाहीत. म्हणून जर ईश्वर म्हणजे एखादा अवकृष्ट गुण (उदा. सत्य किंवा साधुत्व) असेल तर तो जगाचा निर्माता, क्षमाशील, दयाळू वगैरे असू शकणार नाही.

दि. य. देशपांडे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.