संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ – (भाग १, भाग २)

– १ –

‘धारणाद्धर्म इत्याहुः’ हे प्रसिद्ध वचन अनेकवार वापरले जाते. त्याचा संदर्भ पाहिल्यावर ‘धर्म’ शब्द वापरणार्‍यांच्या मनात काय अर्थ होता; तसेच धर्म वापरणारे भारतीय तो मुख्य कोणत्या अर्थाने वापरतात हे स्पष्ट व्हायला काही आडकाठी नाही. पण हे काहीही न करता या ना त्या रूपाने धर्मकल्पनेवर उठविली जाणारी झोड न्याय्य दिसत नाही. प्रस्तुत वचन हे महाभारतात दोन ठिकाणी आले आहे. शांतिपर्वात भीष्म युधिष्ठिराला धर्माचे स्वरूप समजावून सांगताना म्हणतात
धारणाद्धर्म इत्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः ।।
यः स्याद्धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ।।
(अध्याय १०.११)
दुसरे स्थळ कर्णपर्वात आहे. हा आहे अर्जुन-श्रीकृष्णांचा संवाद. महाभारतातील गीतेत आपला ‘संभव धर्मसंस्थापनार्थाय आहे, असे म्हणणारा श्रीकृष्ण स्वतःच धर्माचे स्वरूप सांगत आहे. श्रीकृष्ण म्हणतो,
धारणाद्धर्म इत्याहुर्धमधारयते प्रजाः ।।
यः स्याद्धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ।।
(कर्णपर्व, अ. ६९.५८)
दोहोंची शब्दरचना प्रायः सारखी असली तरी पितामह भीष्मांच्या वचनात धर्माने प्रजा टिकवून धरली असते (धर्मेण विधृताः प्रजाः) असा उल्लेख आहे, तर धर्म प्रजेचे धारण करतअसतो, असा वर्तमानकालीन निर्देश श्रीकृष्णाच्या वचनात सापडतो.

धारणेचे स्वरूप
धारण करण्याची क्रिया करीत असल्यामुळे धर्म हा ‘धर्म’ शब्दाने उल्लेखिला जातो. जे आचरण समाजधारणेची क्रिया करीत असेल तेच धर्म होय, असे विधान दोन्ही श्लोकात समान आहे. धारण करणे म्हणजे समाजाची सुस्थिती कशी तपासावयाची? तर ती समाजाच्या अर्थ-काम जीवनावरून. याचा अर्थ असा होतो की समाजाचे आर्थिक जीवन (अर्थ) आणि आवश्यकतापूर्तीचे समाधान (काम) समाजघटकांच्या जीवनात एकमेकांचा अडथळा न येता उत्तम रीतीने चालणे म्हणजे समाजाची सुस्थिती. ही कोणालाही सर्वसंमत अशा प्रत्यक्ष आणि अनुमान या प्रमाणांनी तपासता येते.

महाभारतातील धर्मचर्चा
समाजाची सुस्थिती म्हणजे समाजधारणा हे एकदा लक्षात घेतले की, ही धर्मव्याख्या प्राधान्याने ऐहिक जीवनाचा विचार करते हे स्पष्ट होते. एकीकडे अनुभवी पितामह भीष्म युधिष्ठिराला धर्मविचार समजावून सांगत आहेत, तर दुसरीकडे स्वयं धर्मसंस्थापक श्रीकृष्ण कोणती गोष्ट धर्म आणि कोणती गोष्ट अधर्म याचा निकप समजावून सांगत आहे. दोन्ही संदर्भ धर्मविचारावर फार मोठा प्रकाश टाकून जात आहेत. श्रीकृष्णविषयक दुसरा संदर्भ कर्णपर्वातला. कर्ण सेनापती झाला होता. अर्जुनाला संशप्तकगणाशी युद्धात गुंतवून इतर पांडवांचा फडशा पाडण्याची योजना शिजली. युद्ध सुरू झाले. अर्जुन मारू किंवा मरू या निर्धाराने लढणार्‍या संशप्तकवीरांशी झुंजू लागला, तर दुसरीकडे नकुल-सहदेवांबरोबर प्रत्यक्ष युधिष्ठिराचाही पाडाव कर्णाने केला. युधिष्ठिर जखमी होऊन शिबिरात गेला. ही वार्ता ऐकून अर्जुनाने प्रथम संशप्तकांना पिटाळून लावले आणि नंतर बंधुप्रेमाचे भरते आलेलाअर्जुन श्रीकृष्णासह युधिष्ठिराच्या कुशल समाचारासाठी शिबिरात गेला. जखमांनी तडफडणार्‍या युधिष्ठिराने अर्जुनाला पाहताच ‘तू कर्णाला जिंकलेस काय?’ असा पहिलाच प्रश्न विचारला. अर्जुनाने उत्तर दिले की, ‘कर्ण अजून जिंकला गेला नाही. आपला भीम त्याच्याशी अटीतटीची लढाई लढत आहे.’ पण कर्णाने आपला पाडाव केला याची खंत वाटून तडफडणारा युधिष्ठिर एकदम गरजला की, ‘अर्जुना, धिक्कार असो तुझा व तुझ्या गांडीवाचा! देऊन टाक हे गांडीव दुसर्‍याला!’ हे शब्द ऐकताच अर्जुन प्रथम स्तब्ध झाला, लगेच त्याच्या चेहर्‍यावर लाल छटा दिसू लागली व त्याचा हात तलवारीकडे वळला. ‘चित्तज्ञ श्रीकृष्णाचे लक्ष त्याच्याकडे होते. श्रीकृष्णाने विचारले, ‘अर्जुना, अरे असा बदल तुझ्यात एकदम का झाला?’ अर्जुन उत्तरला, ‘श्रीकृष्णा, हे गांडीव दुसर्‍याला देऊन टाक असे म्हणत जो माझ्या गांडीवाचा अपमान करील त्याचे शिर धडावेगळे केले जाईल अशी मी गुप्त प्रतिज्ञा केली आहे. तेव्हा युधिष्ठिराला ठार करून मी प्रतिज्ञेचे पालन करीन’ (प्रतिज्ञा पालयिष्यामि हत्वेमंनरसत्तमम्).
श्रीकृष्ण म्हणतो, ‘अर्जुना, आता कळले की तू आतापर्यंत कधीही अनुभवी वडील माणसाच्या सहवासात राहिला नाहीस (इदानीं पार्थ जानामि न वृद्धा: सेवितास्त्वया). ‘अरे, ज्याला समोर करून तुम्ही युद्ध मांडले, त्यालाच तू स्वहस्ते ठार मारणार?’ शेवटी अनेक उदाहरणे सांगून श्रीकृष्ण प्रतिज्ञापालन अर्थात् सत्यधर्माचे पालन अशा प्रसंगी कसे करावयाचे याविषयीची तोड सुचवितो. तो सांगतो की, ‘अर्जुना, वडील माणसांना नुसते अरे -तुरे म्हणून जरी अपमान केला तरी पर्यायाने तो त्यांचा वध होत असतो. तेव्हा तू हा उपाय अंमलात आण.’ तदनुसार अर्जुन, युधिष्ठिराविषयी कठोर शब्द उच्चारतो. त्याचा आवेग शांत होतो. पण पुन्हा त्याचा हात तलवारीकडे वळू लागतो. श्रीकृष्ण पुन्हा विचारतो की, “अरे अर्जुना, आता काय बिघडलं? तुझी प्रतिज्ञा पूर्ण झाली ना?’ अर्जुन उत्तरतो की, ‘श्रीकृष्णा मी आत्महत्या करीत आहे. कारण माझी दुसरी प्रतिज्ञा आहे की, जो माझ्या वडीलभावाचा म्हणजे युधिष्ठिराचा अपमान करील त्याचा मी शिरच्छेद करीन.’ श्रीकृष्ण पुन्हा त्याला समजावतो की, ‘अर्जुना, सत्यपालन हा धर्म असला तरी समाजाची स्थिती त्यामुळे बिघडत असेल, तर तो धर्म न होता अधर्म होतो. तेव्हा प्रतिज्ञापालन वेगळ्या पर्यायाने कर, तो पर्याय म्हणजे आत्मस्तुती. आत्मस्तुती करणे म्हणजे आत्मवधच करणे होय. शेवटी अर्जुनाने आत्मस्तुती करून आपली आत्मवधाची प्रतिज्ञा पाळली. याप्रमाणे बिकट प्रसंगातून वाट काढून श्रीकृष्णार्जुन पुढील कार्यासाठी निघून गेले.

धारणेत ऐहिकाचा विचार
सत्यपालन हे तेव्हाच धर्मांतर्गत सत्यपालन होईल की ज्यामुळे समाजाची धारणासुस्थिती टिकणे शक्य होत असेल. कर्णपर्वातला वरील वृत्तांत व तेथेच येणारी ‘धारणाद्धर्म इत्याहुः’ ही धर्मसंस्थापक श्रीकृष्णांनी दिलेली व्याख्या लक्षात घेतली की, धर्मचर्चा-सर्व समाजाला व्यापून असणार्‍या’ धर्मासंबंधीची चर्चा – ही प्राधान्याने ऐहिक सुस्थितीविषयी विचार करते हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट जाणवते.
या धर्मचर्चेतील धर्मात समाजाची धारणा करणार्‍या गोष्टी या नात्याने संपूर्णसमाजाने पालन करावयाचे धर्मनियम समाविष्ट आहेत. धर्म शब्दाचे अनेक अर्थ विचारात घेताना समाजधारणेचे नियम या मुख्य अर्थाने धर्म शब्द काय सांगतो, हे विचारात घेतले जात नाही, हे अत्यंत अयोग्य आहे.
अहिंसा, सत्य, अस्तेय, शौच (आन्तर-बाह्य-स्वच्छता) आणि इंद्रियनिग्रह (जीवननियामक-शास्त्राज्ञापालन) या पाच गोष्टी म्हणजे संक्षेपाने सांगितलेला सार्ववार्णिकसमाजव्यापी धर्म होय, या अर्थाचे मनूचे वचन सर्वधर्मशास्त्रकारांच्या अविरोधी व सर्वमान्य आहे.
अहिंसा सत्यमस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः ।।
एवं सामासिक धर्म चातुर्वण्र्येऽब्रवीन्मनुः ।।
स्मृतीत जेव्हा केव्हा नुसता धर्म शब्द वापरला जातो तेव्हा तो सार्ववार्णिक धर्म हा अर्थ वरील प्रमाणे प्राधान्याने व्यक्त करत असतो, असे दिसून येते. परंतु या पाचही बाबी धर्म कसोटीला केव्हा उतरतात ती कसोटी ‘धारणाद्धर्म इत्याहुः’ हे वचन सांगत असते.
चर्चा योग्य रीतीने व्हावी
धर्म म्हणजे Religion असे ज्यांना अट्टाहासाने म्हणावयाचे आहे, त्यांची भारतीयांची धर्मकल्पना प्राधान्याने ऐहिकाचा विचार करणारी आहे यासंबंधीचा संदर्भ सांगणारे वचन शीर्षक म्हणून वापरायचे, पण चर्चा मात्र त्याचा संदर्भ न पाहता त्याच्या विरुद्ध करावयाची हे अशोभन वाटते.

– २ –

न स्त्री स्वातंत्र्यमर्हति
मनूची निंदा करण्यासाठी ज्या वचनाचा भरमसाट आधार घेतला जातो असे हे वचन. त्याचा संदर्भ अवघ्या महाराष्ट्रात आतापर्यंत यासंबंधी ज्यांनी ज्यांनी लिहिले त्यांनी लक्षात घेतला आहे हे जाणवत नाही.

मनुस्मृतीतील मागोवा
मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायात मनू राजधर्म (राजाची कर्तव्ये) सांगतो. न्यायदानाची चोख व्यवस्था करणे हे राजाचे प्रमुख कर्तव्य. ही व्यवस्था व्यवहार या शब्दाने स्मृतीत सांगितली जाते. ही न्यायदानाची प्रकरणे मनुस्मृतीत एकूण अठरा विभागांत विभागली आहेत. त्यापैकी पंधरावा विभाग आहे. स्त्रीपुंधर्मप्रकरण.’ त्याचा अर्थ होतो स्त्रीपुरुषविषयक विवादांचे प्रकरण. या प्रकरणाचा क्रम मनुस्मृतीच्या नवव्या अध्यायात येतो. पहिल्याच श्लोकात मनू म्हणतो की, ‘पुरुष आणि स्त्री हे दोघेही जेव्हा धर्मसंमत (धर्मनियमाशी जुळणारे) जीवन जगत असतात तेव्हा त्यांचा संयोग असताना किंवा विरह घडला असताना त्यांनी नेहमी कसे वागावे हे मी सांगतो.’ (मनु. ९-१) स्त्रीपुंधर्मप्रकरण व्यवहाराच्या अंतर्गत का येते हे स्पष्ट करताना याच श्लोकावरील टीकेत मनुस्मृतीचा मान्य.टीकाकार कुल्लूकभट्ट लिहितो – ‘पतिपत्नीच्या हातून एकमेकाच्या बाबतीतील कर्तव्य पालनात चूक झाली तर त्याविषयी पति-पत्नींपैकी एखाद्याची तक्रार आल्यास राजाने राजदंडाद्वारे ती व्यवस्था पुन्हा निर्माण करणे आवश्यक कर्तव्य होय म्हणून व्यवहाराच्या अंतर्गत हे (स्त्रीपुंधर्मप्रकरण) सांगण्यात आले आहे. लगेच दुसर्‍या श्लोकात मनू म्हणतो, संबंधित आप्तपुरुषांनी (पति-पुत्र-पिता वगैरेंनी) स्वतःचे संरक्षणासाठी स्त्रियांना स्वतःवरच निर्भर करून ठेवू नये. (स्वतः त्यांच्या संरक्षणाचे दायित्व सांभाळावे.) (एवढेच नव्हे तर) विविध आनंदोत्सवात (भोजन-नृत्य-गायन-विबाहादी समारंभात) त्या गुंग झालेल्या असल्या तरी त्यांना स्वतःचे संरक्षण पुरवावे.
यानंतर तिसरा श्लोक येतो तो असा
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ।।
मनुस्मृतीचा टीकाकार कुल्लूकभट्ट या श्लोकाचा अर्थ लिहितो–
‘पित्याने विवाहापूर्वी स्त्रीचे रक्षण करावे, पतीने विवाहोत्तर रक्षण करावे, पतीच्या अभावी मुलांनी संरक्षण करावे, स्त्रियेला कुठल्याही अवस्थेत संरक्षणासाठी स्वातंत्र्याची (स्वतःवर निर्भर राहण्याची) पाळी येऊ नये. टीकाकार आणखी पुढे लिहितो की, भर्ता रक्षति यौवने वगैरे वचने ही प्रायिक-सामान्य स्वरूपाची आहेत. पतिपुत्र नसलेल्या पण जवळ असणार्‍या (कुटुंबस्थ) स्त्रियेचा सांभाळ पितृप्रभृती इतर कुटुंबीयांनी करणे त्यांचे कर्तव्य आहे. याचा अर्थ असा की पतिपुत्ररहित अवस्थेत तिचे लग्न झालेले होते म्हणून इतःपर ती आमची जबाबदारी नव्हे, असे इतर कुटुंबीयांना म्हणता येणार नाही.

सामाजिक सुरक्षेचे कवच
वरील संदर्भावरून काही गोष्टी स्पष्ट होतात. प्रथम गोप्ट ही की स्त्री-पुरुषविषयक कर्तव्यासंबंधीचे हे विधिनियम (कायदे) आहेत. पहिला विषय आहे स्त्रीप्रत पुरुषाची कर्तव्ये. मनु हा पुरुष आणि स्त्री यामध्ये स्त्रीचा विचार अगोदर करतो. त्याच्या दृष्टीने स्त्री हा सर्व समाजाच्या जीवनाचा आधार आहे. तिला संरक्षण पुरवणे हे राजसत्तेचे कर्तव्य आहे. म्हणून स्त्रीचा उल्लेख तो मुलगी, पत्नी, आई या अवस्थादर्शक शब्दांनी करीत नाही, तर तो आरंभापासून स्त्री या शब्दानेच करतो. पण तो समाजाने स्त्रियांचे संरक्षण करावे असे मोघम विधान करीत नाही. तो विधिनिर्माता म्हणून स्त्रीला सामाजिक संरक्षणाचे भक्कम कवच अर्पण करीत आहे. घरी तर सोडाच, पण बाहेर कुठेही त्या असल्या- अगदी नाटक, सिनेमा, सर्कस, संगीत, नृत्य यामध्ये जरी रमलेल्या (विषयेषु च सज्जन्त्यः) असल्या तरी त्यांच्या संरक्षणाकडे संबंधितांना दुर्लक्ष करता येत नाही. अर्थात हे विधिमान्य (कायदेशीर) संरक्षण मोघम विधान करून देता येत नाही. यासाठी संरक्षणाची जबाबदारी विधिनियमानुसार मनूने निश्चित केली आहे. म्हणून अविवाहित अवस्थेत पिता, विवाहित अवस्थेत पती, पतिविरहित अवस्थेत पुत्र आणि पतिपुत्ररहित अवस्थेत पिता आणि इतर कुटुंबीय हे त्याने जबाबदार ठरवले आहेत. याचा अर्थ असा होतो की एखाद्या स्त्रीवर कोणतीही आपत्तीकोसळली तर त्या स्थितीत संरक्षणाची जबाबदारी असणार्‍या व्यक्तीच्या विरुद्ध ती राजसत्तेकडे न्यायालयात दाद मागू शकते आणि संबंधित व्यक्ती दोषी सिद्ध झाल्यास ती शिक्षेस पात्र ठरते.
आमच्या पुरोगामी बुद्धिवादी आणि स्त्रीमुक्तिवादी मंडळीच्या दृष्टीने मनूच्या बुरसटलेल्या कायद्याच्या दृष्टीने अत्यंत प्रगत अवस्थेत आपण आहोत. पण अशाही स्थितीत स्त्रीसंरक्षणासाठी जो आक्रोश ऐकू येतो, सुरक्षा समित्या, राष्ट्रीय महिला आयोग यासारखे उपाय प्रभावी करावे म्हणून आंदोलने, मोर्चे सुरू आहेत. त्यात मनुच्या उपाययोजनेची दखल घेण्यासारखी नाही काय हे प्रत्येकाने निर्मळ मनाने स्वतःशीच विचार करून ठरवावे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.