संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ (भाग ३)

मनू हा स्त्रीद्वेष्टा आहे, त्याने स्त्रियांविषयी करू नये ती विधाने केलेली आहेत. पुरुषाने स्वतःच्या स्वार्थासाठी ‘स्त्री’ला बंधनात जखडून ठेवले पाहिजे, असे मनूचे मत आहे, अशी मनुस्मृतीच्या अनेक पुरोगामी अभ्यासकांची समजूत असून याविषयी वेळोवेळी ते सतत लिहून मनूविषयी आपला निंदाव्यंजक अभिप्राय वाचकांच्या गळी उतरविण्याची अविश्रांत खटपट चालू ठेवतात. मनूविषयीचे आपले हे मत मनुस्मृतीच्या सखोल अभ्यासावर आधारलेले आहे असेही ते सुचवितात. या विचारात मनूच्या स्त्रीविषयक विचारावर लिहिताना ‘पिता रक्षति कौमारे’ यानंतर पुढे १०-१५ श्लोक जरी वाचले तरी तेवढ्यावरूनही पुरुषांनी स्त्रियांना बंधनात जखडून ठेवावे, स्त्रिया त्यांच्या स्वभावामुळे केव्हा व्यभिचारिणी होतील, याचा भरवसा नसल्यामुळे त्यांच्यावर जागता पहारा ठेवावा, कोणतीही सवड किंवा सवलत त्यांना देऊ नये, असे मनूचे म्हणणे असल्याचे आपले मत झाल्याचे ते मांडत असतात. तसेच मनूची स्त्रीप्रशंसाविषयक काही वचने पुरुषजातीच्या मतलबीपणाची असल्याचा शेरा देऊन त्यांनी उडवून लावली असतात, अथवा इतर अनुल्लेखाने उपेक्षिली असतात. याच आधारे अलीकडे मनूच्या स्त्री-प्रशंसापर वचनांपैकी ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ या प्रसिद्ध श्लोकाची वासलातही लावली जात आहे. मनुस्मृतीच्या पुरोगामी अभ्यासाची ही दोन उदाहरणे प्रातिनिधिक म्हणून येथे चर्चेसाठी निवडली आहेत. यांपैकी या अभ्यासकांना ‘पिता रक्षति कौमारे…. न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ याचा काही पूर्वसंदर्भ आहे अथवा तो लक्षात घ्यावा लागेल, याची जाणीव ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही. ते पलीकडचा १०-१५ श्लोकांपर्यंतचा विस्तार लक्षात घेऊन मनूचा स्त्रीद्वेष घोषित करतात, तर दुसरे इतर ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ याचा पूर्वसंदर्भ दाखवून मनूचा स्त्रीविषयक दृष्टिकोन अनुदार असल्याचे ठासून मांडतात. परंतु, त्या श्लोकाच्या पलीकडे आलेली वचने वाचून पाहण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत.
रक्षण आणि राखण
यापूर्वी ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ या श्लोकाचा संदर्भ तपासत असताना मनूला अभिप्रेत असणाच्या रक्षणाचा विचार तपासला गेला आहे. त्यानंतर मनू पुरुषाने स्त्रीला संरक्षण कर्तव्यबुद्धीने द्यावयाचे आहे, हे बजावण्यासाठी अर्थवादरूपाने आपल्या पद्धतीने स्त्रीचे महत्त्व सांगत आहे. या संदर्भात मनू हा स्त्रीप्रत पुरुषाची कर्तव्ये कोणती हे पटवून देण्यासाठी स्त्रीचे पुरुषाच्या जीवनातले स्थान समजावून सांगतो. तो म्हणतो, ‘प्रयत्नपूर्वक पत्नीचे रक्षण केल्यामुळे स्वतःची संतती, घरातले एकूण वळण, स्वतःचे व्यक्तित्व, स्वतःचे कुळ, स्वतःचे धर्माचरण हे सर्व सांभाळल्याचे श्रेय मिळते.’
स्वां प्रसूतिं चरित्रं च कुलमात्मानमेव च ।
स्वं च धर्म प्रयत्नेन जायां रक्षन् हि रक्षति ।। (मनु.९-७)

पण स्त्रियांचे रक्षण म्हणजे त्यांना कोंडून त्यांचेवर पहारा ठेवणे हे नव्हे, हेही मनू स्वतःच सांगत आहे. हा मनुस्मृतीच्या नवव्या अध्यायातला बारावा श्लोक आहे. मनू म्हणतो’स्त्रियांना घरात बंद करून आप्त आणि आज्ञापालक अशा पुरुषाकरवी त्यांच्यावर पहारा ठेवला म्हणजे त्यांचे रक्षण होते असे नव्हे. तर कर्तव्याकर्तव्याची (धर्माधर्माची) जाणीव ठेवून जेव्हा या स्वतःच स्वतःला सांभाळतील तेव्हाच त्यांचे खरेखुरे रक्षण होऊ शकेल.’
अरक्षिताः गृहे रुद्धाः पुरुषैराप्तकारिभिः ।
आत्मानमात्मना यास्तु रक्षेयुस्ताः सुरक्षिताः ।। (मनु.९-१२)

एवढेच नव्हे तर, मनू पुढे सांगतो, ‘कोणीही जबरदस्तीने स्त्रियांचा सांभाळ करतो असे म्हणेल तर ते शक्य नाही.’ परंतु, पुढच्या उपायांनी त्यांचा सांभाळ शक्य आहे. एकूण धनाचा संग्रह (बचत), घरात येणार्‍या धनाचा (उत्पन्नाचा) खर्च, घराची एकूण स्वच्छता (रंगरंगोटीसहित), धर्मकार्य, पाकव्यवस्था, घरातील सर्व उपस्कराची (फर्निचर-साजसज्जा) व्यवस्था पाहणे (खरेदी आणि परीक्षण) याची जबाबदारी त्यांचेकडे सोपवावी. (मनु. ९-१० व ११)
धनाची बचत, धनाचा विनियोग, धर्माचरणाचे क्षेत्र, घराची अंतर्गत पूर्ण व्यवस्था इतक्या क्षेत्रावर अधिराज्य असलेली गृहिणी मनूला अभिप्रेत आहे. मनूने कायद्याने नियमित केलेले हे तिचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात तिच्या अनुमतीशिवाय कोणताही व्यवहार होऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो. पतिपत्नी या दोघांनाही सर्व क्षेत्रात समान स्वातंत्र्य हे व्यवहारात कुठेही, कधीही शक्य न झालेले व शक्य न होणारे स्वप्न आहे. ते गाजर पुढे करून संस्कृतिनियंत्रित जीवन श्रेष्ठ मानून तसे जगू इच्छिणाच्या स्त्री-पुरुषांना मुक्तपुरुष आणि मुक्तांगना म्हणून स्वैर जीवनाचा मोह उत्पन्न करणे हे इष्ट नव्हे. विवाहबंधनाचा त्याग, स्त्री-पुरुषांचे स्वैरसंबंध, अविवाहित मातृत्व पाप नव्हे, यांसारखे विचार ज्यांना आवडतात त्यांनी तसे वागून पहावे. परंतु, आज समाजशास्त्र, वैद्यकशास्त्र इत्यादी शास्त्रांची जी प्रगती झाली आहे त्यांच्या कसोट्यावर आपले विचार न तपासता भावनेच्या आहारी जाऊन सर्व समाजाला त्या दिशेला खेचून नेण्याचा प्रयत्न करणे हा अपराध अक्षम्य ठरतो.
स्त्री-पुरुष हे परस्परपूरक आणि परस्परप्रेरक असून ते आपापल्या क्षेत्रात पूर्ण स्वतंत्र आहेत, अशी मनूची भूमिका दिसते.
मनूची संरक्षणाची कल्पना
मनूची संरक्षणाची कल्पना अगदी स्पष्ट आहे. स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत शरीरसामर्थ्याने दुबळी आणि निसर्गाने विशिष्ट जबाबदारी सांभाळण्यासाठी घडविली असल्यामुळे तिच्या असहाय अवस्थेचा जे नराधम लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यापासून वाचविण्यासाठी तिला सामाजिक संरक्षणाचे कवच सदैव हवे आहे. या आधी याच लेखमालेच्या दुसर्‍या भागात (आजचा सुधारक, मे १९९४) या मुद्द्यांचा ऊहापोह केलेला आहे. वाचकांनी तो पाहावा.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते
मनुस्मृतीचे काही पुरोगामी अभ्यासक ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ या वचनाचा पूर्वसंदर्भ देऊन ‘बाईला पोळ्याच्या बैलाप्रमाणे सजवणे हा ‘पूज्यन्ते’चा अर्थ शोधून काढतात, आणि पूर्वसंदर्भ न पाहिल्यामुळे लोकहितवादींपासून तर पं. जवाहरलाल नेहरूंपर्यंतच्या भल्याभल्यांची फसगत झाली, असेही लिहिण्यास चुकत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकवार तो पूर्वसंदर्भ वाचून पाहिला असता या बुद्धिमान पुरुषांचे मत असे का व्हावे, हे प्रस्तुत लेखकाला तरी कळले नाही. ‘मुलीसाठी पैसा घेऊ नये, तो कन्याविक्रय होतो, पिता, पुत्र, पती, दीर प्रभृतींनी त्यांचा नेहमी सन्मान करावा आणि त्यांना वस्त्रालंकार देऊन भूषित करीत असावे’ – यात स्त्रियांचा सत्कार पोळ्याच्या बैलासारखा कसा काय होतो? मनूच्या स्मृतीत अध्याय ३, श्लोक ५५ मध्ये विवाहापूर्वी आणि ‘विवाहोत्तर त्यांची पूजा (सत्कार) करावी आणि वस्त्रालंकारांनी त्यांना (स्त्रियांना) भूषित करावे’, असे संयुक्त विधान आहे. (आजही सत्कार गळ्यात लॉकेट, शाल, मानपत्र आदींनीच होतो. पुरोगाम्यांचाही सत्कार त्याला अपवाद नसतो.) टीकाकारांनी आणि इतरही जिज्ञासूंनी हा आणि यापुढचेही श्लोक एकदा वाचून बघावे. ‘ज्या कुळात स्त्रिया (भगिनी, पत्नी, मुलगी, सुना आणि इतरही संबंधित) मनस्ताप, छळ वगैरेंनी दुःखी होतात ती कुळे शीघ्र नष्ट होतात. आणि ज्या कुळांत या स्त्रियांना अशी दुःखे भोगावी लागत नाहीत त्या कुळांची भरभराट होते.’ (३.५७) स्त्रिया आदराने वागवल्या न गेल्यामुळे (तळतळाट होऊन) ज्या ज्या कुळांना शाप देतात त्या कुळांची जणू चेटूक केल्यासारखी (अभिचारकर्माने उद्ध्वस्त केल्याप्रमाणे) राखरांगोळी होते. (३.५८) म्हणून ज्यांना आपली भरभराट व्हावी, असे वाटते त्या लोकांनी नेहमीचे सणवार किंवा घरात होणारे लग्न-मुंजीसारखे उत्सवसमारंभ यावेळी दागिने, वस्त्रे आणि मिष्टान्ने देऊन त्यांचा नित्य सन्मान करावा. (३.५९) ज्या कुळात पत्नीद्वारा पती आणि पतीद्वारा पत्नी नित्य संतुष्ट असतात त्या कुळांचे सदैव कल्याणच होते. वरील अर्थाचे अगदी लगेच येणारे श्लोक कोणीही वाचून पहावे म्हणजे मनुद्वेषाची विकृती नसल्यास त्यांचेही मत लोकहितवादी आणि पं. नेहरू यांचे मतापेक्षा भिन्न होणार नाही.
हे भूषणावह नाही
वस्तुतः गेली हजाराहून अधिक वर्षे मनूला मानणारी राजसत्ता भारताचा राज्यकारभार सांभाळत नाही. अलीकडे तर कोणीही मनुस्मृतीचा आधार जीवनात घेत नाही, घेऊ शकत नाही. कोणी ती धड वाचीतही नाहीत. अज्ञानाने वाचणेही जमत नाही. महाराष्ट्रातल्या समाजाची ज्ञानलालसा अशी थोर की महाराष्ट्रात असणारे तिचे मराठी भाषांतरही जप्त झाले आहे! अलीकडे तर भारताचे नवे संविधान समाजाला ‘दुष्ट मनूच्या पारतंत्र्यातून मुक्त करून आपले सुशासन चालवीत आहे. परंतु मनूचा संबंध नसलेल्या वातावरणात समाजाच्या दुःस्थितीसाठी सकारण व अकारण मनूला झोडपण्याचे पुरोगामी व्रत सुरू आहे. डोक्यात असणारी मनुद्वेषाची विकृती, स्वतः ग्रंथ सजण्याची अक्षमता, इतर समाजाचे अज्ञान आणि विरळ जाणत्याची उपेक्षावृत्ती इतक्या भांडवलावर हा व्यवहार चालतो. महाराष्ट्रातल्या तरी बुद्धिवादी वा विवेकवादी अशी बिरुदे लावणाच्या व्यक्तींना ही स्थिती भूषणावह नाही.

के. रा. जोशी
२/२ एम्. आय. जी. कॉलनी, वंजारी नगर, नागपूर-४४० ००३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.