आपल्या परिचयाच्या गोष्टी आहेत. परंतु यांत नवीन काही नाही. कन्फ्यूशिअसपूर्वी इ. पू. सहाव्या शतकात होऊन गेलेल्या लाओत्सेनेही आधुनिक यंत्रांनी केलेल्या प्राचीन सौंदर्याच्या नाशाबद्दल रस्किनइतक्याच तळमळीने तक्रारी केल्या आहेत. रस्ते, पूल आणि बोटी या अनैसर्गिक असल्यामुळे त्याला भयावह वाटत. आजचे उच्चभ्रू लोक ज्या भाषेत सिनेमाविषयी बोलतात त्या भाषेत तो संगीताविषयी बोले. आधुनिक जीवनातील घाई चिंतनशील वृत्तीला मारक आहे असे त्याला वाटे. मनुष्याने निसर्गानुसार जगावे असे त्यांचे मत होते. हे मत सर्व युगांत वारंवार व्यक्त झाले आहे; मात्र त्याचा आशय दरवेळी वेगळा असे. रूसोलाही आपण निसर्गाकडे परत जावे असे वाटे, पण रस्ते पूल आणि बोटी यांना त्याचा आक्षेप नव्हता. त्याचा आक्षेप दरबार, रात्री उशीरापर्यंत चालणारी नाचगाणी आणि श्रीमंतांची ख्यालीखुशाली यांना होता. ज्याला रूसो निसर्गाचे निरागस अपत्य मानी तो मनुष्य लाओत्सेला अपेक्षित पुरातन अदूषित मानवाहून अत्यंत वेगळा भासला असता……‘निसर्गाकडे परत जाणे यांचा व्यवहारातील अर्थ म्हणजे लेखकाच्या तरुणपणी अस्तित्वात असलेल्या स्थितीकडे परत जाणे हाच असतो. परंतु निसर्गाकडे परत जायचे गंभीरपणे ठरविले तर नागरित (civilized) देशांतील लोकसंख्येपैकी ९०% लोकांचा उपासमारीने मृत्यू अटळ आहे.