गांधींचे ‘सत्य – एक प्रतिक्रिया

आजचा सुधारक या मासिकाच्या एप्रिल १९९४ च्या अंकात प्रा. दि. य. देशपांडे यांचा गांधीचे ‘सत्य’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या संबंधात मला खालील प्रतिक्रिया नोंदवायची आहे.
सुरवातीलाच प्रा. देशपांडे यांनी सत्य, सत् व साधु या तीन पदांना अनुक्रमे ज्ञानशास्त्रीय, सत्ताशास्त्रीय आणि नीतिशास्त्रीय अर्थ कसा आहे हे स्पष्ट करून म्हटले आहे की व्यवहारात जरी कित्येकदा हे शब्द आपण लवचीकपणे वापरताना आढळत असलो तरी तात्त्विक चर्चेत या शब्दांचे अर्थ काटेकोरपणेच घेतले पाहिजेत.
चर्चेच्या ओघात subsistence आणि existence या पदांचे अर्थ स्पष्ट करताना अनुक्रमे ‘भाववान’ पदार्थ आणि अस्तित्ववान’ पदार्थ असे त्यांचे भाषांतर करण्यात आलेले आहे. ‘ब्रह्म सत्य आहे हे विधान असाधु आहे, परंतु ‘ब्रह्म सत् आहे हे मात्र एका अर्थाने साधु विधान आहे असे म्हटले आहे. परंतु ब्रह्म हा जर ‘भाव पदार्थ असेल व भाव पदार्थाना स्थलकालात अस्तित्व नसेल तर ‘ब्रह्म सत् आहे हेही विधान असाधुच ठरवावे लागेल. भाव पदार्थांना आत्मसात् करणारे जे मन आहे त्यावर या भाव पदार्थांना ज्या विविध अर्थच्छटा प्राप्त झालेल्या असतात त्यांचा विलक्षण परिणाम होतो. व्यक्तीची जीवनदृष्टी आमूलाग्र बदलून जाऊ शकते व त्याचे प्रतिबिंब त्यांच्या जीवनव्यवहारात पडल्याशिवाय रहात नाही. भाववान वस्तूंच्या अनुभूतिजन्य स्वीकृतीतून व्यक्तीच्या जाणिवेचा स्तर पूर्णतः बदलल्याचे अनेक व्यक्तींबाबत आढळून येते. ज्यास shift of consciousness म्हणतात अशी विलक्षण घटना या व्यक्तींमध्ये घडते. या जाणीवेच्या स्तरावर गेल्यानंतर अलिकडच्या पातळीवर भाषाविन्यासशास्त्राच्या दृष्टीने शब्दा-शब्दांमध्ये केलेले भेद वितळून जातात. सत्ताशास्त्रीय, ज्ञानशास्त्रीय, नीतिशास्त्रीय, अशा विचाराच्या चौकटी गळून पडतात. जे सत् आहे तेच चित्, तेच आनंद, तेच सत्य व तेच प्रेम होऊन जाते. व्यावहारिक पातळीवर विचाराची देवाणघेवाण करताना एक सर्वसामान्य नियमावली अनुसरावी लागते. तेच नियम एखाद्या कवीच्या कथनाला आपण लावू शकत नाही. त्याचप्रमाणे तेच नियम एखाद्या द्रष्ट्याच्या कथनालाही लावणे गैर आहे. God is Truth किंवा God is Love ही वाक्ये एका चिंतनशील व्यक्तीने अगदी वेगळ्या संदर्भातून उच्चारलेली आहेत. त्यामुळे त्यांचा विचार संदर्भ सोडून केल्यास त्याची परिणती भाषिक गोंधळात झाल्याशिवाय राहणार नाही. व्यवहारात वावरणारा मनुष्यही शब्दांच्या मागे दडलेला भाव समजून घेतो. केवळ व्याकरणशास्त्र किंवा भाषाविन्यास शास्त्राच्यादृष्टीने तो शब्दांकडे किंवा विधानांकडे पाहत नाही.
रोजच्या व्यवहारात सत्य हे नेहमी सापेक्ष, आंशिक वा परिवर्तनशील असते. गांधींनी ‘Truth’ ची T capital घेतली आहे कारण जेथे सत्ताशास्त्रीय, ज्ञानशास्त्रीय नीतिशास्त्रीय हे भेद गळून पडतात अशा एका निरपेक्ष अंतिम अवस्थेला त्यांनी Truth म्हटले आहे. सर्वे सर्वार्थवाचक; अशी ती अवस्था आहे. दुसर्‍या एका दृष्टिकोणानुसार ब्रह्म किंवा ईश्वर हे ज्ञेय पदार्थ नाहीत तर सर्व ज्ञानाचा, अस्तित्वाचा तो प्रमाता आहे. त्यामुळे ईश्वर ब्रह्म किंवा सत्य हे समवेत किंवा भाववान (concrete किंवा subsistent) पदार्थ नाहीत. या कारणासाठीही Truth ची T capital घेतलेली आहे.
लाइबनिझ या तत्त्ववेत्त्याने विधानांचे संश्लेषक/विश्लेषक असे वर्गीकरण केले आहे. जे विधान मनाच्या अप्रगल्भ अवस्थेत संश्लेषक आहे असे वाटते तेच विधान मनाच्या प्रगल्भ अवस्थेत विश्लेषक होऊन जाते. उदा. लहान मुलासाठी ‘मिठाई गोड असते हे विधान संश्लेषक आहे. परंतु प्रौढ माणसासाठी ते विश्लेषक विधान आहे. सापेक्ष सत्याकडून निरपेक्ष सत्याकडे अग्रेसर होत जाणार्‍या श्रेणीच्या सर्वोच्च स्थानावर ब्रह्म, ईश्वर, प्रेम, सत्य हे विराजमान असल्यामुळे त्यात मनाच्या अप्रगल्भ अवस्थेपासून तो प्रगल्भावस्थेपर्यंतचा प्रवासाचा आशय साठविलेला आहे. या दृष्टिकोनातून विचार केल्यास God is Truth आणि Truth is God ही असाधु विधाने नसून उलट ती सर्वांत साधु विधाने आहेत असे म्हणावे लागेल.
पाश्चात्य तत्त्वज्ञानात विट्गेस्टाईन हा अलिकडील काळातील भाषा-शुद्धीच्या चळवळीचा किंवा भाषिक विश्लेषणाचा खंदा पुरस्कर्ता होता हे सर्वविदितच आहे. विट्गेस्टाईन तरुण असताना त्याने कृत्रिम भाषा निर्माण केल्याशिवाय अचूक कथन होणार नाही असा पवित्रा घेतला होता. विट्गेस्टाईन प्रौढ झाल्यावर त्याने ही भूमिका बदलली हे त्याच्या Tructatus आणि Philosophical Investigations या पुस्तकांवरून लक्षात येते. Tructatus मध्ये अचूक कथनाच्या अतिरेकी हव्यासापायी भाषा अतिशय synabolic आणि mathematical झाली. आणि त्यायोगे बाह्य विश्वाचे एका अर्थाने वर्जनच झाले (deontolization or elimination). ही गोष्ट लक्षात येताच त्याने कृत्रिम भाषेचा त्याग करून सामान्य भाषेचा अंगीकार केला. भाषेच्या विविध धाटणींच्याद्वारा कितीतरी व्यामिश्र अर्थ भाषा व्यक्त करू शकते हेही त्याच्या लक्षात आले. ज्यास आपण धार्मिक वा गूढ अनुभव म्हणतो तो व्यक्त करण्यासाठीसुद्धा भाषा हे एक प्रभावी साधन ठरू शकते. तार्किक भाषेचा मापदंड या प्रकारच्या विधानांना लावून ती निरर्थक किंवा केवळ आलंकारिक ठरविण्याच्या खटाटोपामुळे केवढा तरी जीवनाशय आपण स्वतःच स्वतःच्या हाताने वगळून टाकून आपला जीवनानुभव निष्कारण संकुचित व पर्यायाने दरिद्री तर करीत नाही ना? अशी शंकाही विट्गेस्टाईन ने कर्केगार्डच्या एका धार्मिक अनुभूतीचे कथन वाचून व्यक्त केली होती. याच क्रमाने गेल्यास शेवटी ‘भाषा मूक होणे म्हणजे काय याची प्रतीती देणारे अनुभव जेव्हा व्यक्तीला येतात तेव्हा सामान्य, विवेकी, बौद्धिक जीवनाची चौकट ओलांडून त्याला पलीकडे जावेच लागते. कांटच्या भाषेत असे transcend झाल्याशिवाय या अनुभवांचा अन्वय लावताच येत नाही. ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे अमरत्व, संकल्पस्वातंत्र्य यांची सिद्धता देणे आपल्या बौद्धिक कुवतीच्या बाहेरचे असले तरी आपल्या व्यावहारिक जीवनाचे मूलभूत आधार म्हणून त्यांना स्वीकृती द्यावीच लागते. एका अर्थाने स्थलकालातीत असे हे आधार असूनही स्थलकालाने बद्ध असलेल्या मानवी व्यवहाराचे ते नियमन करतात, त्यात परिवर्तन करतात किंवा त्यावर परिणामही करतात. भाषाविन्यासशास्त्राने मानवी मनाचीच हकालपट्टी केल्यामुळे भाववान आणि अस्तित्ववान पदार्थांमध्ये त्यांना कोणताच सांधा जुळवता येत नाही.
अलिकडे वैज्ञानिकांनाही त्यांच्या संशोधनाचे फलित सांगताना व्यावहारिक, तार्किक भाषेची चौकट अपुरी किंवा inadequate वाटते. एखादा द्रष्टा किंवा कवी प्रातिभ ज्ञानाने पूर्वी जे शोधून काढीत असे ते वैज्ञानिकांना त्यांच्या संशोधनप्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभवावयाला मिळते. उदा. What do you see? Wave or particle? याचे एकतर wave किंवा particle असे सरळसोट उत्तर राहूच शकत नाही. कारण वैज्ञानिक जे पाहतो आहे ते wave ही आहे व particle ही आहे, किंवा wave ही नाही व particle ही नाही. पूर्वी पारंपारिक तत्त्ववेत्ते ज्या अंतर्विरोधी भाषेत बोलत असत तीच भाषा वैज्ञानिकांनाही अंगीकारावी लागत आहे. एखाद्या प्रतिभावंतापुढे मग तो साहित्यक्षेत्रातला असो, विज्ञानाच्या क्षेत्रातला असो वा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला असो-जेव्हा ज्ञानाची नवनवी दालने उघडली जातात तेव्हा प्रचलित भाषा, तिचे वळण अपुरे वाटू लागते. त्याला जे गवसले ते व्यक्त करण्यासाठी नवीन शब्दांना रूढ करावे लागते. विज्ञानाच्या क्षेत्रात अलिकडे सूक्ष्मतम परमाणूचे वागणे स्पष्ट करण्यासाठी ‘क्वार्क’ हा नवीन शब्द रूढ होऊ पहात आहे. नवीन शब्द चलनात आणताना जी व्यक्ती तो शब्द शोधून काढते तिची ‘intentionality’ काय आहे ते पाहावे लागते. God is Truth किंवा God is Love ही विधाने करण्यामागे गांधींची intentionality काय होती याचा मागोवा घेतल्यास Truth ची T capital का हा प्रश्न उपस्थित होत नाही. किंवा Truth हे व्यावहारिक भाषेत भाववाचक नाम आहे हे सुद्धा गैरलागू होऊन जाते. ‘मुले ती मुलेच हे विधान तर्कशास्त्रीय कसोटीवर घासून पाहिले तर ते एक पुनरुक्तिपूर्ण (tautologus) विधान आहे व म्हणून नवीन माहिती न देणारे विधान आहे असे वाटू शकेल. परंतु व्यवहारात मात्र मुले ही शेवटी अज्ञानी असतात, भाबडी असतात, निरागस असतात, फारसा विचार करणारी नसतात, उतावळी असतात अशा कितीतरी गोष्टी या विधानातून व्यक्त होतात.
God is Truth आणि Truth is God यासारखी विधाने गांधीसाठी फार मोठ्या आशयाने भरलेली व भारलेली होती. तो आशय ते सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे संप्रेषित करू शकले. त्या आधारावरच स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकांना लाखोंच्या संख्येने सहभागी करून घेऊ शकले. भाषाविन्यासाचा मापदंड लावून त्याच एकमेव चष्म्यातून पाहण्याचे ठरविल्यास हे विधान दुर्बोध व अनाकलनीय वाटू शकेल. सामान्य लोकांसाठी मात्र ते विधान आशयाने संपन्न आहे यात शंका नाही.

डॉ. सौ. उषा गडकरी
२५७, शंकर नगर, नागपूर-४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.