अमेरिकन शिक्षण : दशा आणि दिशा

सार्वजनिक शाळांचा जनक म्हणून गणला जाणारा होरेस मॅन हा १८३० च्या एका भाषणात म्हणाला होता, ‘शिक्षण हाच सामाजिक समतेचा पाया आहे. १६३५ ते १८०० पर्यंत येथील बहुसंख्य विश्वविद्यालये व प्राथमिक माध्यमिक शाळा खाजगी मालकीच्याहोत्या. शिक्षण हे पैसेवाल्यांच्या हातातील खेळणे होऊन बसले होते. मध्यमवर्ग व तळागाळाची जनता ही शिक्षणापासून जवळजवळ वंचित झाली होती. पण अशी ‘स्फोटक शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती ही उगवत्या लोकशाहीला मारक ठरेल हे लक्षात घेऊन होरेस मॅन, हेन्री बर्नार्ड व चार्ल्स वाइलीसारख्या शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या जिवाचे रान करून धर्म-जात ह्यांच्या मर्यादा उल्लंघून सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रचंड मोहीम अंगीकारली व १८५० च्या सुमारास ‘सार्वजनिक (पब्लिक) शाळांचा पाया घालून अमेरिकन लोकशाहीचा पाया मजबूत केला. थॉमस जेफर्सन, बेंजामिन फ्रेंकलिन, जेम्स मॅडिसन यांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते. मॅडिसनचे एक सुप्रसिद्ध विधान पहाः ’If the nation expects to be free and ignorant, it expectswhat never was and what never is going to be’. त्यामुळेच जेफर्सन व मॅडिसन ह्या दोन प्रमुख अमेरिकन घटनाकारांनी अमेरिकेच्या घटनेत शिक्षण ह्या शब्दांचा प्रत्यक्षपणे जरी उल्लेख कधीच केला नाही तरी शिक्षणाचे लोकशाहीतील स्थान लक्षात घेऊन घटनेत शिक्षणाची भरपूर तरतूद करून ठेवली होती. अमेरिकन राज्यकर्ते व शिक्षणकर्ते ह्या सर्वांनी शिक्षणावर जबरदस्त भर दिल्याने अमेरिकेची आर्थिक व औद्योगिक भरभराट होण्यास खूपच मदत झाली.
पण १८६१ साली सुरू झालेल्या अंतर्गत युद्धाने अमेरिकेच्या नेत्यांना एका नव्या प्रश्नाला तोंड द्यावे लागले. तो प्रश्न म्हणजे ४० लाख गुलामांच्या शिक्षणाचा. १८६४ पर्यंत दक्षिणेत गुलामांना कायद्याने लेखन-वाचनाचा अधिकारच नव्हता! त्यांना साक्षर करून धंदेवाईक शिक्षण देण्याची जबाबदारी बुकर टी. वॉशिंग्टन व डब्लू.ई. सी. डूबाई ह्या दोन काळ्या नेत्यांनी घेऊन आपल्या जनतेस त्यांनी उत्तमपणे मार्गदर्शन केले.
१९५४ साली अमेरिकन सुप्रीम कोर्टाने अमेरिकेच्या ‘दुहेरी’ शिक्षणपद्धतीवर ‘काळ्यांना दिले जाणारे अलग शाळातील शिक्षण हे “समान” असूच शकत नाही’ असा ऐतिहासिक निर्णय एकमताने देऊन अमेरिकेच्या सार्वजनिक शिक्षणाचा पाया खिळखिळा करून टाकला. काळ्या व गोर्‍या मुलामुलींना शाळेत एकत्र शिकण्याची कायद्याने परवानगी जरी मिळाली तरी काळ्यांकडे कनिष्ठ दृष्टिकोणांतून बघणार्‍या गोर्‍यांच्या वृत्तीत मुळीच फरक पडला नाही. त्याशिवाय अमेरिकन पाठ्यपुस्तकांत काळे, येथील मूळ रहिवासी अमेरिकन इंडियन्स व स्त्रिया ह्यांच्या थोर कार्याचा उल्लेख १९६५ पर्यंत कधीच करण्यात आला नव्हता.
१९५४ च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने दक्षिणेतील निग्रोविरोधी प्रजा खवळून उठली व त्यांनी आपल्या मुलांना स्वतंत्र शिक्षण देण्यासाठी खाजगी शाळा चालू केल्या. १९६३ नंतर सर्वसामान्य अमेरिकन जनतेचा द. व्हिएटनाममधील युद्धाला होणारा विरोध वाढत गेला. ह्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ह्या युद्धांत लोकसंख्येच्या मानाने येथील युद्धात भरती झालेले अल्पसंख्य जमातींचे तरुण जास्त प्रमाणांत मरण पावत होते. काळे, इंडियन्स व हिस्पॅनिक हे सारे युद्धासाठी लढण्यासाठी व मरण्यासाठी हवेत, पण घरी परत आल्यावर त्यांना समान शिक्षण नाही व राहण्यास अलग वस्तीत घरे! अमेरिकन समानताही फक्त घटनेतच राहते ह्याचा कटु अनुभव पुन्हा अल्पसंख्यकांना ह्या युद्धापासून आला व त्याचे पडसाद सार्वजनिक शिक्षणांत पाहावयास मिळाले. द. व्हिएटनामच्या युद्धाला विरोध करणार्‍या कॉलेज विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन अमेरिकेच्या राजकीय व सामाजिक मूल्यांना उघडपणे आव्हान दिले. अमेरिकेच्या सामाजिक दांभिक नीतिमत्तेवर वृत्तपत्रे व अल्पसंख्याकांचे नेते उघडउघड टीका करू लागले. त्यात पुन्हा निक्सन सरकारने काही विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करून तीन विद्यार्थ्यांची हत्या केल्याने प्रश्न अधिकच चिघळला. डॉ. मार्टिन ल्यूथर किंगसारख्या नेत्याने आपल्या अमोघ वाणीने द. व्हिएटनामच्या युद्धाला ‘नैतिक’दृष्ट्या विरोध करून अमेरिकन जनतेला ह्या प्रश्नावर आत्मसंशोधन करण्याची विनंती केली. ह्या सार्‍यांचा परिणाम शाळा-कॉलेजेसवर झाल्याशिवाय राहिला नाही. आतापर्यंत शाळा-कॉलेजांत’अनियंत्रितपणे’ सत्ता चालविणार्‍या प्रमुखांची व आचार्यांची आसने हादरली व त्यांची सत्ता कमकुवत झाली. आतापर्यंत दुर्लक्षित केली गेलेली अल्पसंख्यक जनता प्रथमच येथील शैक्षणिक (व सामाजिक) क्षेत्रांत आपल्या मूलभूत हक्कांसाठी सार्वजनिक दरवाजे ठोठावू लागली. ह्याचा परिणाम शैक्षणिक अधिकार्‍यांच्या दृष्टिकोणावर व दूषितपूर्वग्रहाने प्रसिद्ध करण्यातआलेल्या पाठ्यपुस्तकांच्या पुनर्रचनेवरही झाला.
पण युद्धाचा एक दुष्परिणामसुद्धा शालेय संस्थांवर झाला. तेथील मादक द्रव्ये सेवन करणे, मारामार्‍या करणे व जीवघेणी शस्त्रे वापरणे ह्यांचे व हत्यारांचे प्रमाण वाढत गेले. काही उदारमतवादी पंथांनी लैंगिक शिक्षणावर (sex education) भर दिला व विद्यार्थ्यांच्या स्वैर वर्तनाला अप्रत्यक्षपणे मदत केली. सार्वजनिक शाळेत घटनेनुसार ‘धार्मिक’ शिक्षण देण्याची व कोणत्याही धार्मिक कार्यासाठी शाळेचा अथवा शाळेच्या साधनांचा वापर करण्याची बंदी असल्याने येथील धार्मिक नेते व रूढिग्रस्त प्रजा खवळली. त्यांनी आपली मुले सार्वजनिक शाळांतून काढून घेतली. ह्याचा जास्तीत जास्त परिणाम अमेरिकेतील मोठ्या शहरांतील सार्वजनिक शाळांवर झाल्याने तेथे फक्त मोठ्या प्रमाणांत गरीब विद्यार्थीच राहिले. गब्बर व पैसेवाले धनाढ्य पालक ह्यांनी उपनगरांकडे धाव घेतली व तेथील शाळांत आपली मुले दाखल केली. त्याच्याही पुढे जाऊन काही गोर्‍या पालकांनी आपली मुले ‘खाजगी शाळांत दाखल केली व इतरांनी कायद्याचा आधार घेऊन आपल्या मुलांना घरीच (home schooling) शिक्षण देण्याचा उपक्रम चालू केला. मोफत शिक्षण फक्त सार्वजनिक शाळांतच मिळते. तेव्हा गरीब लोक पैसा नसताना खाजगी शाळांत जाणार तरी कसे?
ह्या साध्या परिस्थितीचा परिणाम अमेरिकेच्या सार्वजनिक शाळांवर होऊन तेथील शैक्षणिक गुणवत्ता खालावली. आज अमेरिकेत शाळा पूर्ण करून बाहेर पडण्यापूर्वीच निवृत्त होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण २०% ते २२% आहे. आणि शाळा सुरक्षित संस्था नसल्याने कित्येक विद्यार्थी स्वसंरक्षणासाठी पुष्कळ वेळा पिस्तुले व इतर हत्यारे शाळेत नेत असतात. अशा दहशतवादी वातावरणांत विद्यार्थी शिकणार तरी काय?आज मोठ्या शहरात विद्यार्थ्यांच्या हत्यारांची झडती घेण्यासाठी यंत्रे लावण्यात आल्याने येथील शाळांनाविमानतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ह्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रपतींपासून ते अनेक खाजगी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्यांनी कंबर कसली आहे.
अमेरिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांत येवढी निकृष्ट परिस्थिती असताना जगातील अव्वल दर्जाचे विद्यार्थी येथे उच्च शिक्षणासाठी धाव का घेतात?आर्थिक दृष्ट्या अमेरिकेपेक्षा अधिक श्रीमंत असलेला जपान आपल्या खास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन ‘तांत्रिक व व्यवस्थापनाच्या (management) शिक्षणासाठी अमेरिकेला का पाठवितो?भारतातील brain drain ला हातभार लावून भारतातील बुद्धिमान वर्ग ह्या देशात उच्च शिक्षणासाठी येऊन येथेच स्थायिक का होतो?
ह्याचे पहिले कारण म्हणजे तांत्रिक, वैज्ञानिक व धंदेवाईक शिक्षणात अमेरिकन विश्वविद्यलयांनी केलेली महान प्रगती. गेल्या २०० वर्षांपासून अमेरिकन विश्वविद्यालयांनी व त्यांच्याशी सहकार्य करणाच्या औद्योगिक संस्थानी संशोधनावर (research) अमाप भर दिल्याने ह्या देशाची आर्थिक प्रगती झाली. येथील हार्वर्ड, येल, कोलंबिया, स्टॅनफोर्ड, ड्यूक वगैरे अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विश्वविद्यालयांनी संशोधनाची ही थोर परंपरा अजूनही चालू ठेवली आहे. आज जगांतील जास्तीत जास्त नोबेल पारितोषिके मिळविणार्‍या अमेरिकेचा पहिला नंबर लागतो ह्याचे हे एक कारण आहे. त्यामुळे जागतिक कीर्तीचे नोबेल पारितोषिक विजेते – डॉ. खुराणांचा पूर्वीचा अनुभव लक्षात घेता – हे वैज्ञानिक जर भारतातच राहिले असते तर त्यांची गत अगदी ‘रामानुजम् सारखीच झाली असती असे मला तरी वाटते.
भारतीय, चिनी व इतर गरीब देशांतून येणार्‍या विद्यार्थ्यांना अमेरिकेचे आणखी आकर्षण वाटण्याचे कारण म्हणजे त्यांना मिळणारी आर्थिक मदत, बुद्धिमान विद्यार्थ्यांना येथील सरकार व फोर्ड, रॉकफेलर व कार्नेगी संस्थांकडून मिळणाच्या शिष्यवृत्त्या व अनुदाने ह्यांची यादी पाहिली की मन थक्क होऊन जाते. गेल्या ३३ वर्षात पैशांच्या अभावी उच्च शिक्षण सोडून स्वतःच्या देशाला परत गेलेला एकही तरुण मी तरी पाहिलेला नाही.
अमेरिकेच्या प्राथमिक व माध्यमिक (सार्वजनिक) शाळांची येवढी कीव करण्याजोगी दशा झाली असूनही अमेरिकेच्या उच्च शिक्षणाचा पाया येवढा मजबूत व आकर्षक कसा?
ह्याची काही कारणे मी आधीच दिली आहेत. पण त्याबरोबरच इतर काही महत्त्वांच्या बाजूंचा विचार करणे जरूरीचे आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाप्रमाणे उच्च शिक्षण सक्तीचे नाही. त्याशिवाय येथील बहुसंख्य (नावाजलेली) विश्वविद्यालये/विद्यापीठे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वीच त्यांची संपूर्ण चाचणी करतात. निरनिराळ्या प्रकारच्या कसोट्या (exams.) लावून नंतरच त्यांना प्रवेश दिला जातो. सार्वजनिक शाळा म्हणजे मोफत भोजनालये झाली आहेत. तेथील अन्न पोषक अन् रुचकर असेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. उच्च शिक्षणात दाखल झालेला विद्यार्थीवर्ग व सार्वजनिक शाळांत जाणारे विद्यार्थी ह्यांच्या सामाजिक व आर्थिक पाश्र्वभूमीत जमीन अस्मानाचा फरक वाटतो. त्यामुळे कदाचित फक्त ५०% विद्यार्थीच शाळेतून उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणाची पायरी चढतात.
अत्यंत महत्त्वाचा फरक सार्वजनिक शिक्षकांच्या पगारांत व मर्यादित शक्तीत पाहावयास मिळतो. येथील सार्वजनिक शाळेमधील शिक्षकांना कॉलेजच्या प्राध्यापकाच्या अर्धा पगारसुद्धा मिळत नसतो व त्यांना तिप्पट काम करावे लागते. येथील सार्वजनिक शाळांमधील शिक्षक मेहनती व कार्यक्षम असतात. पण कायद्याने त्यांचे पंख कापल्याने व येथील हिंसक वातावरण लक्षात घेऊन त्यांना विद्यार्थ्यांना शिक्षा करून त्यांच्याकडून अभ्यास करवून घेण्यास भीती वाटते. कोण कसा बोलेल व काय मारेल ह्याची शिक्षकांना खात्री नसते. येथील अनेक सार्वजनिक शाळांतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे शाळेतच मुडदे पाडण्यात आले आहेत. शाळांना ‘रणांगणाचे स्वरूप प्राप्त झाले असताना शिक्षकांनी शिकवायचे तरी कसे?शाळांसाठी शिक्षक व आचार्य तयार करण्याच्या कारखान्यात माझी २५ वर्षे गेली असल्याने मला सार्वजनिक शाळांचा बराच परिचय झाला आहे. एक प्राध्यापक म्हणून मला आता आमच्याच शहरातील सार्वजनिक शाळेत जाताना भीती वाटते.
आज जगाला अमेरिकेच्या उच्च शिक्षणाचे आकर्षण वाटते ते योग्य आहे. पण येथील सार्वजनिक शिक्षणाबाबत सध्या तरी जनतेच्या मनात समुद्रमंथन चालू आहे. ह्यातून विष बाहेर येणार की अमृत ह्याकडे आम्हा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.