स्वायंभुव मनूची ‘निष्कारण निन्दा?

मनु हा वस्तुतः स्त्रीद्वेष्टा नाही, त्याने स्त्रियांविषयी करू नये ती विधाने केलेली नाहीत, पुरुषाने स्वतःच्या स्वार्थासाठी स्त्रीला बंधनात जखडून ठेवले पाहिजे असे मनूचे मत नाही, तरीदेखील त्याच्या वचनांचा विपर्यास करून पुरोगामी अभ्यासक मनूची निंदाकरतात आणि मनुस्मृतीचे सखोल अध्ययन न करताच आपला अभिप्राय वाचकांच्या गळी, वेळोवेळी उतरवितात असे मत डॉ. के. रा. जोशी ह्यांनी ‘संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ ह्याविषयी दोन लेख लिहून प्रतिपादन केले आहे. डॉ. जोशी ह्यांनी ज्या मनुस्मृतीचा कैवार घेतला आहे तिचे वास्तविक स्वरूप आपण आधी पाहू या.
त्रिकालज्ञ आणि ह्या विश्वाचा जणू स्रष्टाच अशा अचिन्त्यसामर्थ्यवान् मनूने प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून अवगत करून घेतलेले हे शास्त्र भृगुऋषींना सांगितले आहे. ह्या शास्त्राला स्मृति असे नाव आहे. परंतु ज्याअर्थी ह्या स्मृतीमध्ये सृष्ट्युत्पत्तिविषयीच्या मिथ्या कथा आहेत, पाठभेद आहेत, पुनरुक्ति आहेत, इतकेच नव्हे तर परस्परविरोधी वचनेआहेत, आणि हे सारे पाणिनिकालोत्तर संस्कृत भाषेत लिहिलेले आहे, त्याअर्थी हा ग्रन्थ अर्वाचीन काळामध्ये मनूच्या नावाने स्खलनशील ब्राह्मणांनी (आणि तो देखील भृगुकुलोत्पन्नब्राह्मणांनी – ज्यांनी महाभारताची रचना केली त्याच आपले कुलमाहात्म्य वाढविण्यासाठी श्रीवत्सलांछनासारख्या भाकडकथा लिहिणार्‍या ब्राह्मणकुलांनी) रचिला आहे असे अनुमान करण्याला विपुल जागा आहे. मनुस्मृति कधी कोणत्या काळी पूर्णपणे अमलात होती त्याविपयी मी अत्यन्त साशंक आहे. ब्राह्मणांनी आपल्या सोयीसाठी तिच्यामधले श्लोक वेळोवेळी रचले आहेत असे वाटण्याचे आणखी एक कारण असे की अनेक मुद्रितामुद्रित ‘धर्मग्रन्थांमध्ये मनूच्या नावाने अशी शेकडो वचने आहेत की त्यांचा आढळ मनुस्मृति ह्या नावाच्या प्रचलित ग्रन्थात होत नाही. आपल्याला अनुकूल असे मत मांडणारे वचन कोणीही रचावे व ते मनूच्या नावाने खपवावे असा प्रकार मला दिसतो.
ही वचने प्रायः स्मृतिचन्द्रिका, स्मृतिरत्नाकर, निर्णयसिन्धु, शूद्रकमलाकर, संस्कारकौस्तुभ, प्रयोगरत्न, संस्कारमयूख, श्राद्धमयूख, व्यवहारमयूख, प्रायश्चित्तमयूख, विवादभङ्गार्णव, व्रतहेमाद्रि, श्राद्धहेमाद्रि, मिताक्षरा, धर्मसिन्धु, वगैरे अनेक मान्य ग्रन्थांतून आलेली आहेत; आणि इतके असूनसुद्धा मनुस्मृति हा मान्य आणि विश्वासार्ह ग्रन्थ आहे असा दावा केला जातो.
मनुवचनांच्या अर्थाविषयी तरी एकवाक्यता असावयाला हवी होती. पण तीही नाही. श्री. विष्णुशास्त्री बापट म्हणतात : मनुस्मृतीवर मुद्रितामुद्रित अनेक टीका आहेत, भाष्येआहेत. मेधातिथि, गोविन्दराज, सर्वज्ञनारायण, राघवानन्दसरस्वती, नन्दन, रामचन्द्र, धरणीधर, श्रीमाधवाचार्य, श्रीधरस्वामी, रुचीदत्त, विश्वरूप, भोजदेव, भारुचि आणि कुल्लूकभट्ट अशा एकंदर चवदा महापण्डितांनी निरनिराळ्या काळी रचिलेल्या सर्वमान्य टीका उपलब्ध आहेत. त्यांमध्ये काही ठिकाणी परस्परविरोध आहे. (टीकांमध्ये परस्परविरोध आहे आणि त्याचवेळी त्या सर्वमान्य आहेत असे बापटशास्त्री म्हणतात. हेदोनही एकावेळी कसे घडू शकते ते बापटशास्त्रीच जाणोत.)
तर अशी ही मनुस्मृति. आमचा पौराणिक सृष्ट्युत्पत्तीवर विश्वास नसल्यामुळे आम्हाला ती अठरा धान्यांच्या कडबोळ्यासारखी दिसते आणि मनुप्रणीत आचारशास्त्रामध्ये आम्हाला ठिकठिकाणी पुरुषांचा आणि ब्राह्मणांचा पक्षपात व त्याचबरोबर स्त्रीशूद्रांवर घोर अन्याय केलेला दिसतो. आणखी एक गोष्ट अशी की मनुवचनांच्या अर्थाविषयी मेधातिथिगोविन्दराज व त्यांच्यासारखे ज्ञाताज्ञात टीकाकार जर मतभिन्नता बाळगू शकतात, तर डॉ. के. रा. जोशी ज्या कुल्लूकभट्टाचा दाखला देतात त्याने केलेलाच ‘न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ह्या वचनाचा अर्थ आम्ही का मानावा असा आम्हाला प्रश्न पडतो. आम्हा अर्वाचीन अभ्यासकांना मनुवचनांचा जो अर्थ योग्य वाटतो तो आम्ही करू.
संपूर्ण मनुस्मृतीचे आलोडन केल्यानंतर मनूने केलेला स्त्रीशूद्रांविषयीचा अनादर,परिभव, किंवा त्यांच्याविपयी मनूला वाटणारी तुच्छताही वर येते आणि तीच आमच्यासारख्यांच्या मनावर ठसते. आपण मनूचे काही मोजके श्लोकच पाहू या. पाचव्या अध्यायामध्ये १४६ व्या श्लोकापासून १६६ व्या श्लोकापर्यंत मनूने स्त्रियांचा धर्म सविस्तर सांगितला आहे. तो भाग समग्र मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यामध्ये स्त्रीला पुरुषाच्या तुलनेत हीन लेखले आहे. त्या वीसबावीस श्लोकांपैकी फक्त दोन श्लोक – १४७ व १४८ मी उद्धृत करितो. हे श्लोक स्त्रीच्या स्वतन्त्रतेविषयीचेच आहेत.
बालया वा युवत्या वा वृद्धया वापि योषिता ।।
न स्वातन्त्र्येण कर्तव्यं किंचित्कार्यं गृहेष्वपि ।। ५-१४७ ।।
[बाल्ये यौवने वार्धके च वर्तमानया किंचित्सूक्ष्ममपिकार्यं भर्त्राद्यननुमतं न स्वातन्त्र्येण कर्तव्यमिति]
बाल्ये पितुर्वशे तिष्ठेत्पाणिग्राहस्य यौवने ।
पुत्राणां भर्तरि प्रेते न भजेत्स्त्री स्वतन्त्रताम् ।। ५-१४८ ।।।
[किंतु बाल्ये पितुर्वशे तिष्ठेत्‍, यौवने भर्तुः, भर्तरि मृते पुत्राणाम्,तद्भावे ‘तत्सपिण्डेषु चासत्सु पितृपक्षः प्रभुः स्त्रियः। पक्षद्वयावसाने तु राजा भर्ता स्त्रियो मतः ।।’ इति नारदवचनात् ज्ञातिराजादीनामयत्ता स्यात, कदाचिन्न स्वतन्त्रा भवेत् ।।-इति कुल्लूकभट्टः।]
स्त्रीला बाळपणापासून वार्धक्यापर्यंत कोणत्याही वयात पुरुषांच्या अनुज्ञेशिवाय कोणतेही – घरातले सूक्ष्मतमसुद्धा कार्य करण्याचे स्वातन्त्र्य नाही. आजन्म तिने कोणत्या ना कोणत्या पुरुषाच्या अधीनच राहावे. जनककुळामधले वा भर्तृकुळामधले लहानथोर पुरुषच विद्यमान नसतील तर तश्या परिस्थितीत तिने आपले आचरण कोणत्या पुरुषाच्या आज्ञेने करावे याबद्दल सांगताना कुल्लूकभट्टांनी नारदस्मृतीचा आधार घेतलाआहे. तो वाचून मनूला पुरुषवर्चस्व नको आहे असे आम्हाला तरी म्हणवत नाही.
स्त्रीच्या स्वातन्त्र्याचा इतका स्पष्ट निषेध करणारे वचन मला थोडासा संदर्भ शोधल्याबरोबर सापडले. ते डॉ. के. रा. जोशी ह्यांना का बरे आढळू नये?की त्यांना केवळआपल्याला अनुकूल तेवढाच संदर्भ आमच्या नजरेला आणावयाचा होता? आपल्या तिसर्‍या लेखांकात डॉ. जोशी ह्यांना मनुस्मृतीमधले काही श्लोक आपल्या विरोधात जातील अशी जाणीव झालेली दिसते. त्यांनी त्यांचा ओझरता उल्लेख केला आहे. पण इतरांना संदर्भ पाहावयाला सांगून आपण स्वतः मात्र काही भाग झाकावयाचा असे त्यांनी केले नसते तर बरे झाले असते. असो.
केवळ पाचव्या अध्यायामध्येच नव्हे तर आठव्या अध्यायातही मनू स्त्रियांविषयी बरेच काही बोलतो. आठव्या अध्यायाच्या ३५८ व ३५९ व्या श्लोकांमध्ये तो काय म्हणतो ते डॉ. जोशी ह्यांच्या नजरेला आणून देणे आता आवश्यक झाले आहे.
स्त्रियं स्पृशेददेशे यः स्पृष्टो वा मर्षयेत्तया ।
परस्परस्यानुमते सर्व संग्रहणं स्मृतम् ।। ८.३५८ ।।
अब्राह्मणः संग्रहणे प्राणान्तं दण्डमर्हति । ।
चतुर्णामपि वर्णानां दारा रक्ष्यतमाः सदा ।। ८.३५९ ।।
ह्यावरची कुल्लूकभट्टी टीका आम्ही देत नाही. ती जिज्ञासूंनी पाहावी. पण ह्या दोन श्लोकांचा संदर्भासहित अर्थ पाहिल्यास तो स्त्रीला परपुरुषापासून संरक्षण द्यावे असा होत नाही. ३५८ व्या श्लोकात पुरुषाचे (पर)स्त्रीसंबंधी आचरण कसे असावे ते मनु सांगत आहे. ते सांगताना पुरुषाने स्वतः काय करू नये, (पुरुषाचे कोणते आचरण दण्डार्ह आहे) हे जसे त्याने सांगितले आहे तसेच स्त्रीने काय केले असता ते सहन करू नये अथवा परस्परांच्या अनुमतीने काय करू नये तेही त्याने सांगितले आहे. स्त्रियांना मोकळे सोडल्यास त्यांचे पाऊल घसरेल ह्यास्तव त्यांच्या आचरणाला आवर घालावा असा मनूचा अभिप्राय येथे स्पष्ट दिसतो. कुल्लूकभट्ट आपल्या टीकेमध्ये ‘धनपुत्रादीनामतिशयेन दारा सर्वदा। रक्षणीयाः’ असे म्हणतात त्यावेळी ते धन आणि भार्या एकाच वर्गात घालतात, आणि धनपुत्रांपेक्षाही स्त्रीची अधिक काळजी घ्यावी असे सांगतात, तेव्हा धनाचे स्वातन्त्र्य त्यांना जसे अभिप्रेत असू शकत नाही तसे भार्येचेही नाही असेच म्हणावे लागते. ही स्त्रीची राखणच होय.
‘न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति’ ह्या वचनाचा अर्थ स्त्रियांना कधीही रक्षणाशिवाय राहू देऊ नये असा जर केला आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी जर नेहमीच त्यांच्या आप्त वा स्वकीय पुरुषांवर आहे असे डॉ. के. रा. जोशी यांच्या म्हणण्याप्रमाणे मानले तर आम्हाला ८.३७४, ८.३७५, ८.३७६ ह्या श्लोकांमध्ये व वर उल्लेखिलेल्या ९.३ ह्या श्लोकामध्ये फार विसंगति दिसते.
स्त्रीच्या रक्षणाविषयी कोणा पुरुषाची कर्तव्यच्युति (act of omission) घडल्यास ती अशा पुरुषाविरुद्ध दाद मागू शकते व संबंधित व्यक्ति दोषी ठरल्यास ती शिक्षेस पात्र ठरते असे डॉ. के. रा. जोशी म्हणतात. आता ३७४ वा श्लोक पाहा.
शूद्रो गुप्तमगुप्तं वा द्वैजातं वर्णमावसन् ।
अगुप्तमङ्गसर्वस्वैर्गुप्तं सर्वेण हीयते ।।८.३७४।।
[भत्रादिभी रक्षितामरक्षितां वा द्विजातिस्त्रियं यदि शूद्रो गच्छेत्तदाऽरक्षितां रक्षारहितां गच्छल्लिङ्गसर्वस्वाभ्यां वियोजनीयः। अत्राङ्गविशेषाश्रवणेप्यार्यस्त्र्यभिगमने लिङ्गोद्धारः। ‘सर्वस्वहरणं गुप्तां चेद्वधोधिकः’ (गौतमस्मृतिः १२/२–३) इति गौतमवचनाल्लिङ्गच्छेदः । रक्षितां तु गच्छञ्छरीरधनहीनः कर्तव्यः]
ह्याचा अर्थ असा झाला की पिता पुत्रभर्त्रादींनी अगुप्त (न रक्षिलेल्या – न झाकलेल्या) अश्या ब्राह्मणीही तत्कालीन समाजामध्ये होत्या व त्यांच्याशी समागम करणार्‍या (बलात् भोगणार्‍या नव्हे) शूद्राला गुप्त म्हणजे ज्यांना संरक्षण प्रदान केलेले आहे अशा स्त्रियांशी केलेल्या समागमासाठी होणार्‍या शिक्षेपेक्षा कमी दण्ड होत होता. म्हणजे रक्षणाची जबाबदारी असलेल्याला आपले काम न केल्याबद्दल दण्ड नाहीच. उलट त्याने स्त्रीला रक्षण दिले नसले तर आपराधिक कृति करणार्‍याला (act of commission) सौम्य शासन! (ह्यावरून सुसंगत अर्थ गुप्त म्हणजे राखलेली- मालकीची- असा करावा लागतो.) हा मनूचा न्याय फक्त ह्याच श्लोकापुरता नाही तर पुढे ३८५ श्लोकापर्यन्त हाच न्याय त्याने लागू केला आहे.
आठव्या अध्यायाच्या ४१६ व्या श्लोकात :
भार्या पुत्रश्च दासश्च त्रय एवाधनाः स्मृताः ।।
यत्ते समधिगच्छन्ति यस्य ते तस्य तद्धनम् ।।४.४१६।।
भार्येला धन बाळगता येत नाही असे म्हणण्याचा हेतु भार्यादीनां पारतन्त्र्यप्रदर्शनार्थ आहे असेही कुल्लूकभट स्पष्टपणे सांगतात. हा सर्व संदर्भ पाहता नवव्या अध्यायाच्या प्रारंभीच्या ‘न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति’ ह्या वचनाचा अर्थ स्त्रियांना अनुकूल असा लावण्यासाठी आमचे मन तरी धजत नाही.
मनुस्मृतीमधला काही भाग डॉ. जोशी ह्यांना स्वीकार्य वाटत असेल, परंतु आम्हाला मात्र मनुस्मृतीला अर्धजरतीयन्याय लागू करून ती पूर्णतया त्याज्य ठरवावी असेच मनःपूर्वक वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.