गांधींचे सत्य

श्री. देशपांडे (दि. य.) यांनी गांधीजींच्या तत्त्वज्ञानांतील सत्याच्या संकल्पनेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे. या त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. प्रयत्नांती परमेश्वर’ गूढ आणि अनाकलनीयच राहिला, त्या ऐवजी तो स्पष्ट व आकलनीय व्हायला हवा होता.
गांधींचा स्वतःचा ‘सत्याचा शोध त्यांच्या आत्मचरित्रांतील अवतरण देऊन, दि.यं.नी त्यावर निराशाजनक असा अभिप्राय दिला आहे.
God is Truth व Truth is God ही दोन वाक्ये ‘ईश्वराचे परिपूर्ण वर्णन’ म्हणून गांधींनी सुचवल्याचे सांगून, दि.य. ती वाक्ये असाधु व निरर्थक ठरवितात. अशी दुर्बोध भाषा वापरणारे लोक अप्रामाणिक असतात असे जरी दि.यं.ना सुचवायचे नाही तरी तसे सुचवायचे नाहीच असेही वाटत नाही.
ईश्वराची सामान्यपणे दिली जाणारी वर्णने गांधींना मान्य होती, म्हणूनच God is Truth व Truth is God ही दोन विधाने चमत्कारिक ठरतात. गांधीजी स्वतःच्या in consistency चे समर्थन नव्हे, पण स्पष्टीकरण करताना, ‘अखेरचें तें सत्य विधान माना असे म्हणत. तदनुसार, अखेरची दोन विधाने मान्य करून, तत्पूर्वीची विधाने रद्दबातल समजायला दि. य. तयार झाले, तर ती दुर्बोधता निघून जाईल, असे मी म्हणतो.
गांधींवर सेमेटिक धर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. बायबल व येशू ख्रिस्त गांधींना सुपरिचित होते. गांधींचा ‘आतला आवाज केवळ भारतीय संस्कृतीने तयार झालेला नव्हता. तो, ख्रिस्त येशूच्या भाषेतील Comforter (कैवारी) असण्याचीही शक्यता आहे. (योहान १६:१३).
सत्य काय आहे?असा प्रश्न न्यायाधीश पिलाताने, येशूला केल्याचे बायबलात म्हटले आहे. पण हा प्रश्न विचारणारा पिलात ‘सत्याचा जिज्ञासू दिसत नाही. प्रश्न विचारल्यावर उत्तराची वाट न पाहता तो निघून गेला. आणि त्या प्रश्नाचे येशूचे उत्तर होते
“मौन.”
हा छोटासा संवाद हेच दाखवितो की सत्य अनाकलनीय नाही, पण ते अवर्णनीय आहे. आणि वर्णनाचा प्रयत्न केलाच तर ते वर्णन दुर्बोध ठरते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.