संपादकीय

आमच्याकडे गेल्या महिन्यामध्ये दोन महत्त्वाची पत्रे आली. दोन्ही आमच्या चांगल्या मित्रांची आहेत. त्यांपैकी एक श्री. ग. य. धारप ह्यांचे; ते जुलै अंकात प्रकाशित झाले आहे. त्यानंतर आमच्याकडे पोचलेले, पण त्याहून महत्त्वाचे पत्र आहे श्री. वसंतराव पळशीकरांचे.
ह्या दोन पत्रांच्या निमित्ताने आमच्या संपादकीय धोरणाचा आम्हाला पुनरुच्चार करावा लागणार आहे. श्री. धारप ह्यांच्या पत्राचा परामर्श घेण्याच्या अगोदर श्री. पळशीकरांच्या पत्राचा विचार करू. श्री. पळशीकर ह्यांचे पत्र खाली देत आहोत :

संपादक, आजचा सुधारक
स.न.
जून १९९४ च्या अंकाच्या आरंभी बट्रँड रसेल ह्यांचे वचन छापले आहे. ज्याअर्थी ह्या वचनाची निवड केली गेली त्याअर्थी त्यातील रसेल ह्यांचे म्हणणे आजच्याही आजचा सुधारकाच्या वाचकांनी ध्यानात घ्यावे असे आपले मत असणार.
‘निसर्गाकडे परत चला’ असे कोणी म्हणतो तेव्हा त्याला काय अभिप्रेत आहे हे त्या व्यक्तीच्या अन्य लेखनावरून वा संभाषणावरून जाणून घेता येते. लाओत्सेने जे काही म्हटले असेल ते त्याच्याकाळी अर्थपूर्ण नव्हते, विचारात घेण्याजोगे नव्हते काय?ह्याच स्वरूपाचा प्रश्न रूसो, रस्किन ह्यांच्या संदर्भातही विचारता येईल. आणि अगदी कालपरवाचे उदाहरण म्हणून गांधींचेही नाव घेता येईल.
हत्ती आपल्या ऐटबाज गतीने जात असतो. त्याच्यापुढे ज्यांचा काय पाड अशी कुत्री वाटेत भुंकतात. त्यांचे दात विचकलेले दिसतात, घसे कोरडे पडतात इतकेच. मानवी तंत्रवैज्ञानिक-औद्योगिक प्रगतीचा हत्ती (आता शर्यतीचा घोडा म्हणावयास हवे, कारण गती तशी आहे) आणि लाओत्से, रूसो, रस्किन व गांधी ही वाटेत भुंकत असलेली कुत्री जणू!
ह्या प्रकारची मांडणी रसेल ह्यांनी करावी ह्यात रसेल ह्यांचे अडाणीपण, औद्धत्य ह्यांचेच प्रदर्शन होते असे मला वाटते.
शेवटचे वाक्य तर रसेल ह्यांना पार उघडे पाडते. रसेल ह्यांना चिंता civilized देशातील लोकसंख्येची आहे. आता ते civilized हा शब्द वापरतात तेव्हा भारतीय, चिनी वगैरे गौरेतर लोक त्यांच्या डोळ्यांसमोर नसणार, अपवाद असलाच तर जपानी लोकांचा. ज्यांचा उपासमारीने मृत्यू होईल अशी रसेल ह्यांना काळजी आहे त्या civilized लोकांच्या खातर किती लोकसमुदायांना उपासमार, कत्तल ह्यांचे शिकार व्हावे लागले आहे.
१९९४ साली जेव्हा पाश्चात्य व पौर्वात्य देशांमधील सधन, सुखाला चटावलेले लोक स्वतःचे जीवनमान कमी करावयास तयार होत नाहीत तेव्हा तेही ‘मग काय प्राचीन काळातले रानटी जीवन जगायचे का?’ असाच प्रश्न मोठ्या आक्रमक आवाजात विचारतात. आता तर काय रसेल ह्यांचा आधार ते घेतील. परिणामी अनेक लोकसमुदायांना निसर्गाशी एकरूप होऊन जगणे अशक्य होईल; ते नामशेषच होतील.
पर्यावरणीय असमतोलाची समस्या स्थानिक, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर उगंभीर बनलेली आहे अशा काळात आजचा सुधारक ने आवर्जून रसेल ह्यांचे हे वचनअंकाच्या शिरोभागी कौतुकाने छापावे ह्याचा खेद वाटला.
१५०, गंगापुरी, वाई ४१२८०३
वसंत पळशीकर
हे वर दिलेले पत्र वाचून आम्हाला साहजिकच फार खेद झाला. ह्या निमित्ताने आम्हाला आमच्या वाचकांना व त्यातल्या त्यात वसंतराव पळशीकरांना असे आश्वासन द्यावेसे वाटले की आमच्या मासिकामध्ये आम्ही जेव्हा काही मते मांडतो तेव्हा आम्हाला कोणत्याही लहान-थोर व्यक्तीला हिणवावयाचे नसते; कोणाचाही अधिक्षेप करावयाचा नसतो. प्रत्येक तत्त्व, विचार किंवा सिद्धांत कोणा थोरामोठ्याचा आहे म्हणून न तपासला जाता स्वीकारला जाऊ नये, त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी आणि तदनंतर वाचकांनी स्वतः आपापले मत ठरवावे इतकेच आम्हाला सांगावयाचे असते.
संपादकमंडळाचे आपले स्वतःचे धोरण नाही, स्वमताविषयी त्यांचा आग्रह नाही असा त्याचा अर्थ नाही. पण आमचीच मते योग्य, तीच आमच्या वाचकांनी स्वीकारली पाहिजेत असा मात्र आमचा आग्रह नाही. त्यामुळे आम्ही सुधारणेचा प्रचार करीत नाही; दुसरी बाजू कधीही झाकत नाही. उलट आमचे प्रतिपादन एकांगी होऊ नये ह्यासाठी प्रयत्नशील असतो. थोडक्यात काय तर ‘विवेक’ वाढीला लागावा असा यत्न आम्ही करीत असतो. एवढ्याच कारणासाठी आमच्या मासिकामध्ये अग्रलेख नसतो. त्याचप्रमाणे समाजामधले व्यक्तिमाहात्म्य कमी व्हावे अशीही आमची इच्छा असल्यामुळे आम्ही कोणाच्या जयंत्यापुण्यतिथ्यांची दखल सहसा घेत नाही.
श्री. वसंत पळशीकर ह्यांना आमचे हे संपादकीय धोरण बरेचसे माहीत आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे ते आमच्या हेतूविषयी शंका घेणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे. पण ज्याप्रमाणे ते आमच्यावर हेत्वारोप करणार नाहीत त्याचप्रमाणे आम्ही ज्यांचे वचन आमच्या मासिकाच्या शिरोभागी छापतो त्यांवरही त्यांनी हेत्वारोप करू नये अशी त्यांना आमची विनंती आहे.
आजचा सुधारक मधून पर्यावरणविषयक समस्या समजावून द्याव्या, पर्यावरणाचा समतोल कशात आहे, त्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात यावी ह्याविषयी जर आमच्या वाचकांच्या मनात काही संदेह असतील तर ते निघून जावे, काही कल्पना अस्पष्ट असतील तर त्या स्पष्ट व्हाव्या, त्यासाठी काही लेख प्रकाशित करावे, त्या लेखांच्या अनुषंगाने त्यावर चर्चा व्हाव्या अशी आमची कधीची इच्छा आहे. जून अंकामध्ये बट्रँड रसेल ह्यांचे वचन पुरोभागी प्रकाशित करण्यामागचा आमचा हेतु ती चर्चा सुरू करण्याचाच होता. कोणाला दुखावण्याचा नव्हता. तेव्हा ती चर्चा ह्यानिमित्ताने सुरू व्हावी अशी इच्छा आम्ही येथे व्यक्तकरतो.
पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. संस्कृतीचा व पर्यावरणाचा विनाश करणारी घोडदौड थांबली पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही, पण त्या समस्येच्या नेमक्या स्वरूपाबद्दल मतांतरे असू शकतात. त्यांचे प्रतिपादन विस्ताराने करावे अशीही वसंतरावांसह सर्ववाचकांना नम्र विनंती आहे.
आजचा सुधारक ह्या मासिकाविषयी आमच्या वाचकांना आपलेपणा वाटतो हाचा प्रत्यय आला की आम्हाला फार आनंद होतो. तो आपलेपणा जसा श्री वसंतराव पळशीकरांच्या पत्रात ओतप्रोत भरला आहे तसाच श्री. ग. य. धारप ह्यांच्याही पत्रातून ओथंबत आहे त्यांच्या पुष्कळशा सूचना ग्राह्य आहेत. पण त्या अंमलात आणणे कठीण आहे. कारणे पुढे देतो.
पहिली अडचण अशी आहे की मासिकाचे नाव सुधारक असले तरी ते सुधारणेचा प्रचार किंवा सदाचाराचा उपदेश करण्यासाठी नाही. त्याने प्रबोधनाचे किंवा तत्त्वबोधनाचे साधन म्हणून चर्चेचाच अंगीकार केलेला आहे. कोणाही एका व्यक्तीला सर्व समस्या सुटल्या आहेत व तिने आपले मत इतरांना समजावून द्यावयाचे आहे असे कोठल्याही लेखाचे स्वरूप नसावे, तर आपल्या समोरच्या समस्या सर्वांनी मिळून सोडवावयाच्या आहेत अशी वृत्ति असावी असे एकूण धोरण आहे. पण होते काय, वादविवादाची सवय असलेली लेखकमंडळी परिसंवादातही एकमेकांची उणीदुणी क्वचित्प्र संगी काढतात. बरे लिहिणारे लोक मातबर असल्यामुळे संपादक त्यांच्या लिखाणाला नेहमी कात्री लावू शकत नाहीत. त्यातून संपादकांचा स्वभावही श्री धारप म्हणतात तसा भिडस्त आहेच. त्यामुळे अधूनमधून कोणाच्या अहंकाराचे दर्शन झाले वर वाचकांनी आम्हाला उदार मनाने क्षमा करावी येवढेच आम्ही तूर्त सांगतो.
आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी आमचे कोणी लेखक लिहीत असतील असेही आम्हाला वाटत नाही. काही वेळेला त्यांना आपला विषय सुबोध भाषेत मांडावयाला जमले नसेल असे आम्ही समजतो. मूळ लेखकाचे मनोगत समजून घेऊन ते सुबोध भाषेत पुन्हा लिहून काढावयाला संपादकांना वेळ नसतो. संपादकांना कोणीही सवेतन साहाय्यक नाही. जी साहाय्यक मंडळी आहेत ती आपापले उद्योग सांभाळून संपादकांना मदत करतात. पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे किंवा कधी आणखी कोणत्या निमित्तामुळे काही टाचणे-टिपणे प्रकाशित होऊ शकत नाहीत. कधी त्यांच्या प्रकाशनाला फार विलंब होतो. असे करण्यामध्ये आमच्या लेखकांचा हिरमोड करण्याचा हेतु नसतो, किंवा ती टिपणे प्रकाशित करण्याच्या लायकीचीच नसतात असेही नसते. तरी हे सर्व जाणून गैरसमज करून घेऊ नये, आमच्या लेखकांनी थोडी कळ सोसावी व आमच्या मासिकावरील कृपालोभ कायम ठेवावा अशीआमची सर्वांना प्रार्थना आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.