समान नागरी कायदा आणि शरीयत

न्यायमूर्ती हरिनाथ तिलहरी यांनी दि. १२ एप्रिल ९४ रोजी तलाकबाबत जो निकाल दिला त्याचे उलट सुलट पडसाद संपूर्ण मुस्लिम समाजात उमटत असून पूर्वीच्या शहाबानो प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरणही गाजणार अशी चिन्हे दिसत आहेत. पुरोगामी विचारवंत श्री. असगरअली इंजीनीअर यांनी निकालाचे स्वागत केले असून सय्यद
शहाबुद्दीन व अन्य मुस्लिम विचारवंतांनी टीका केली आहे.
न्यायालयासमोर मूळ प्रश्न तलाकचा नसून जमिनीचा होता. जो प्रश्न मुळातच न्यायालयासमोर नाही त्यावर निकाल देण्याचा न्यायमूर्ती तिलहरी यांना अधिकार नाही; हा निकाल म्हणजे इस्लामी शरीयतला आव्हान आहे; मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात हस्तक्षेपआहे, इत्यादि मते मुस्लिम विचारवंतांनी व्यक्त केली आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या पुढील बैठकीत या निकालपत्रावर चर्चा होणार असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष जनाब सादिक यांनी जाहीर केले आहे. या निकालाविरुद्ध जनाब सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा मनोदयही अनेक कायदेतज्ज्ञांनी बोलून दाखविला आहे. खरे म्हणजे न्यायमूर्ती तिलहरी यांच्या निकालावर आज सर्वत्र चर्चा होत असली तरी हा मूळ खटला जेव्हा गोंडा जिल्हा न्यायालयात चालला तेव्हा जिल्हा न्यायाधीशांनीही तलाक मान्य नसल्याचाच निकाल दिलाहोता.
या खटल्याचा मूळ वृत्तांत संक्षेपाने असा की गोंडा जिल्ह्यातील रहिवासी रहमतुल्ला यांच्या नावे कमाल जमीन धारणेपेक्षा अधिक जमीन होती. ही अधिक जमीन ताब्यात घेण्याबाबत गोंडा जिल्ह्याच्या मालखात्याकडून त्यांना नोटीस आली. रहमतुल्लाने त्या नोटिसीवर न्यायालयाकडून स्थगिती मिळविली. त्यानंतर हा खटला गोंडा जिल्हा न्यायालयात चालला. जिल्हा न्यायालयात रहमतुल्लाने असे सांगितले की ती अधिक जमीन त्याची पत्नी खातुन्निसा हिची असून त्याने यापूर्वीच तिला तलाक दिलेला आहे. गावच्या पटवार्यानने खोडसाळपणाने तिच्या जमिनीचा समावेश माझ्या जमिनीत केल्यामुळे मला अतिरिक्त जमिनीबाबत नोटीस आली.
नंतर हा खटला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाकडे सुपूर्द करण्यात आला व त्याचा निकाल न्यायमूर्ती तिलहरी यांनी दि. १२ एप्रिल रोजी दिला. निकालपत्राचा सारांश असा.
एकाच बैठकीत तलाक हा शब्द तीन वेळा उच्चारूनपत्नीला सोडचिठ्ठी देणे हे पवित्र कुराणाच्या व शरीयतच्याही विरुद्ध आहे. परंपरेनुसार चालत आलेली कोणतीही प्रथा जर त्या समाजातील स्त्रियांवर अन्याय करणारी असेल, राज्यघटनेप्रमाणे नागरिकांना प्राप्त झालेल्या अधिकारांची पायमल्ली करीत असेल, तर ती त्याज्यच ठरविण्यात येईल व अशा प्रथेपेक्षा घटनेतील अधिकारांनाच प्राधान्य देण्यात येईल. तलाकची सध्या प्रचलित असलेली प्रथा ही १९३७ च्या शरीयत अॅप्लिकेशन अॅक्टचे कलम २६(१) आणि भारतीय राज्यघटना कलम ३७२ च्या विरोधी आहे.
केवळ मुस्लिम प्रथेनुसार चालत आलेल्या शरीयत कायद्यालाच नव्हे, तर हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे चालत आलेल्या कायद्यालाही, जर तो स्त्रियांवर अन्याय करीत असेल, किंवा राज्यघटनेप्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकाराला प्रतिबंध करीत असेल तर त्यालाही, हाच निकष लावण्यात येईल.
न्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांनी “मुस्लिम स्त्री या पुस्तकात तलाकबाबत तीन निकष दिले आहेत.
(१) तलाक देताना प्रथम लहान मुलांच्या संगोपनाला प्राधान्य देण्यात यावे.
(२) पतिपत्नींचे एकत्र राहणे केवळ अशक्य झाले तर अशा अपरिहार्य परिस्थितीतच तलाक मान्य करावा.
(३) पती किंवा पत्नी या दोघांनाही तलाकपासून पूर्ण समाधान लाभत असेल तरच तलाक मान्य करावा. दोघांपैकी कोणा एकाचाच स्वार्थ साधत असेल तर तलाक मान्य करूनये.
वरील न्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांचे निकष आणि न्यायमूर्ती तिलहरी यांचा निकाल हा सद्य परिस्थिती, व्यवहार्यता आणि मानवता या मूल्यांवर आधारलेला आहे हे कोणीही सुज्ञ मनुष्य मान्य करील. कुराणात तलाकवर एक स्वतंत्र अध्यायच आहे. कुराणाने अत्यंत अपरिहार्य परिस्थितीतच तलाकला मान्यता दिलेली आहे. शरीयत काय किंवा मनुर्याकज्ञवल्क्य यांच्या स्मृति काय, ही सर्व शास्त्रे तत्कालीन समाजाच्या धारणेसाठीच निर्माण झाली होती, व ती अपरिवर्तनीय आहेत असा प्राचीन धर्मपंडितांचा आग्रह होता. मनुस्मृतीविषयी बृहस्पति-स्मृतीत खालीलप्रमाणे उल्लेख आहे.
वेदार्थोऽपनिद्धत्वात् प्राधान्यं हि मनोः स्मृतम्
मन्वर्थविपरीता तु या स्मृतिः सा न शस्यते
तावच्छास्त्राणि शोभन्ते तर्को व्याकरणानिच
धर्मार्थमोक्षोपदेष्टा मनुर्यावन्न दृश्यते
(मनूची रचना वेदानुकूल असल्यामुळे सर्व स्मृतींमध्ये मनुस्मृति श्रेष्ठ होय. जे मनुस्मृतीच्या विरोधी आहे, ते मान्य नाही. मनूच्या धर्म, अर्थ, काम, मोक्ष इत्यादींच्या उपदेशाच्या तुलनेने तर्क, व्याकरण इत्यादी शास्त्रे गौण ठरतात.)
पण तरीही कालांतराने मनुस्मृतीचे प्रामाण्य लोपले. हिंदु धर्मशास्त्र परिवर्तनशील बनले.
कृते श्रुत्युक्तमाचारस्त्रेतायां स्मृतिसंभवः
द्वापरे तु पुराणोक्तं कलौ आगम संमतः
(सत्ययुगात वेद, त्रेता युगात स्मृति, द्वापर युगात पुराण आणि कलियुगात तंत्रग्रंथ प्रमाण होत.)
म्हणजे कलियुगात स्मृतिप्रामाण्याचा लोप झाला, तो तसा होणे अपरिहार्यही होते. स्वामी विवेकानंद म्हणतात –
“स्मृतीमध्ये बहुधा विशिष्ट स्थानी व विशिष्ट परिस्थितीत आचरावयाची कर्तव्ये सांगितलेली असतात, आणि म्हणून कालमानानुसार ती बदलत असतात. एखादी क्षुद्र सामाजिक रूढी बदलली म्हणजे धर्म बुडत नाही. याच भारतात असा एक काळ होता की गोमांस खाल्ल्यावाचून ब्राह्मण राहू शकत नसे. नंतर पुढे लोकांच्या लक्षात आले की आपला कृषिप्रधान देश आहे, म्हणून गोमांस खाण्याची रूढी बंद पडली व गोहत्या निषिद्ध मानली गेली.” (भारतीय व्याख्याने पृ. ८४)
कालपरत्वे बदल न स्वीकारणारा समाज हा डबक्यात साचलेल्या पाण्याप्रमाणेअसतो. साचलेले पाणी सडून जाते. त्याप्रमाणे समाजही अधोगतीला जातो.
हिंदु समाजात समाजसुधारकांची परंपरा फार मोठी आहे. अगदी गौतम बुद्धापासून ही परंपरा सुरू झाली असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कबीर, रामानंद, नानक अशी जुनी समाजसुधारकांची नावे सांगता येतील. मुस्लिम समाजात जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध कवि अल्ताफ हुसैन हाली हे स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते होते. हमीद दलवाई हे आधुनिक काळातील सर्वपरिचित समाजसुधारक होऊन गेले. सध्या मौलाना वहिदुद्दीन खान हे एक पुरोगामी विचारवंत आहेत. जे हिंदु समाजसुधारक झाले त्यांच्यासमोर हिंदु समाजाच्या सुधारणेचा प्रश्न होता. मुस्लिम समाजात त्यांनी प्रयत्न केले नाहीत. आणि मुस्लिम समाजात समाजसुधारकांचे प्रमाण अल्प असल्यामुळे समाजसुधारणेचे यथायोग्य प्रयत्न झाले नाहीत. म्हणून मुस्लिम समाज स्थितिप्रिय राहिला.
शरीयत हे मुस्लिमांचे व्यवहारधर्मशास्त्र आहे. व्यवहार बदलतो तसे धर्मशास्त्रालाही बदलावेच लागते. मग ते धर्मशास्त्र हिंदूचे, मुस्लिमांचे अथवा अन्य कोणत्याही धर्माचे असो. सुमारे चार वर्षांपूर्वी जैन साध्वी मधुस्मिताजी आणि जयस्मिताजी यांनी धर्मप्रसारासाठी परदेशप्रवास केला. त्या प्रवासात त्यांना विमान आणि मोटार या वाहनांचा वापर करावा लागला. ही आधुनिक वाहने धर्मप्रसारासाठी निषिद्ध मानली गेली असल्यामुळे त्या दोन साध्वींवर बहिष्कार घालण्यात आला होता. अनेक जैन बुद्धिवाद्यांनी त्या बहिष्काराचा निषेध केला.
त्यानंतरही काही साध्वी जापानला आणि अमेरिकेला विमानाने धर्मप्रसारासाठी जाऊन आल्या. त्यानंतर त्यांनी मराठवाड्यात दौरा करून आपले परदेशप्रवासाचे अनुभव आणि परदेशात जैनधर्माला मिळालेला प्रतिसाद यांवर व्याख्याने दिली. त्यांच्यावर नंतर कोणी बहिष्कार घातल्याचे ऐकण्यात नाही. मुस्लिम समाजातही यापूर्वी काही बदल झालेले आहेत. जैन धर्मात बदल होण्याचे काही संकेत उत्तराध्यायन सूत्र आणि सकलकीर्तिकृत । पार्श्वनाथचरित्रात सापडतात; त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मातही बदलाचे संकेत कुराण आणि हदीसमध्येच सापडतात.
“तुम्ही तुमच्या पत्नीला भरपूर मालमत्ता दिली असेल व नंतर दुसरी पत्नी केली असेल तर त्या पहिल्या पत्नीची मालमत्ता परत घेऊ नका.” (सूरे न्निसा १९)
“तलाक दिलेल्या पत्नीला घराबाहेर घालवू नका. त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार राहण्यासाठी प्रशस्त घर द्या.” (सूरे तलाक ५)
“अल्लातालाच्या समोर सर्वांत घृणास्पद गोष्ट म्हणजे तलाक होय.” (हदीस अबू दाऊद)
अशा प्रकारची अनेक वचने कुराण आणि हदीस यांमध्ये आहेत. त्यांना अनुसरून बदल करता येणे सहज शक्य आहे. १९५६ साली पाकिस्तानमध्ये विवाह आणि घटस्फोट यांबाबत काही राजकीय नेत्यांची व धार्मिक विचारवंतांची मते आजमावण्यात आली होती. त्यांनीही बहुमताने “The pronouncement of triple divorce at one sitting amounts to a single pronouncement. Such divorce is revocable.” असाच कौल दिला असल्याची नोंद पाकिस्तानच्या ५६ सालच्या गॅझेटमध्ये आहे.
हज्रत उमर फारुक हे खलीफा असताना तलाकचे एक प्रकरण त्यांच्यासमोर आले होते. एका गृहस्थाने आपल्या पत्नीला तलाक दिला. पत्नी तरुण व सुंदर होती तोपर्यंत त्याची मर्जी तिच्यावर बहाल होती. तो गृहस्थ श्रीमंत होता. त्याला खूप जमीन होती. त्यापैकी काही जमीन त्याने तिच्या नावे करून दिली. पुढे तारुण्याचा भर ओसरल्यावर त्याने तिला तलाक दिला व शरीयतच्या नियमाप्रमाणे मेहरची रक्कम परत केली. तिच्या नावे केलेली जमीन परत त्याच्या नावे व्हायला हवी होती, पण तिने त्याला हरकत घेतली. शेवटी हे प्रकरण खलीफा उमर फारूक यांच्याकडे गेले. फारूक त्या गृहस्थाला म्हणाले की जिच्या तारुण्याचा बहर तू लुटून घेतलास त्याच्या मोबदल्यात तू ती जमीन तिला दिली आहेस म्हणून ती तिच्याकडेच राहू दे. अर्थात तलाक दिल्यानंतरही ती जमीन तिच्याकडेच राहिली. या संदर्भात बेगम अंजुम यांचा एक उर्दू शेर न्यायमूर्ति तिलहरी यांनी निकालपत्रात दिला आहे.
तलाक दे तो रहे हो बडे फक्रो गुरूर के साथ
मेरा शबाब भी लौटा दो मेरे मेहर के साथ
(मोठ्या गर्वाने मला तलाक देऊन मेहर परत करीत आहेस. त्याचबरोबर माझे तारुण्यही परत कर.)
स्त्रियांसाठी आयोजित केलेल्या एका संमेलनात श्रीमती तल्लवी या लिबियाच्या प्रतिनिधी म्हणाल्या होत्या की, शरीयतची समाजोपयोगी व्याख्या करण्यात जर आम्ही यशस्वी झालो तर महिलांचे पुरुषांबरोबरचे स्थान प्रस्थापित होऊ शकेल. कालपरिस्थितीनुसार धर्माचरण परिवर्तनवादी असावे. शेकडो वर्षांपूर्वी बनविण्यात आलेले मापदंड आता कालबाह्य झाले आहेत.
याच संमेलनात लिबियाचे प्रतिनिधी जनाब इब्राहीम अब्दुल अजीज यांनी सांगितले की “आमच्या देशात महिलांना पुरुषांबरोबरचे अधिकार देण्यात आले आहेत.”
उर्दूचे विद्यमान सुप्रसिद्ध कवी जनाब अली सरदार जाफरी यांची एक प्रदीर्घ मुलाखत दि. १९ एप्रिल १९८५ च्या साप्ताहिक ‘अखबारे नौ’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यात ते म्हणाले होते की “रोजा, नमाज, हजची यात्रा इत्यादि इस्लामच्या मूलभूत तत्त्वांस पर्याय नाही. परंतु मुस्लिम व्यक्तिगत कायद्याचा समावेश या मूलतत्त्वांत नसल्यामुळे परिस्थितिपरत्वे कायद्यात बदल घडू शकतो असे माझे स्पष्ट मत आहे. काही देशात असे बदल झालेही आहेत. आम्ही पाकिस्तान आणि अरबस्तानमध्ये कोणता कायदा प्रचलित आहे तेवढेच का पाहावे?तुर्कस्तान, मिश्र इत्यादि अन्य देशांत मुस्लिमांसाठी कोणते कायदे अस्तित्वात आहेत याचाही आम्ही अभ्यास केला पाहिजे.”
मौलाना वहिदुद्दीन खान हे उदारमतवादी विचारवंत आणि पत्रकार आहेत. त्यांनी अनेक देशांचा दौरा केलेला आहे.”अलरिसाला” हे त्यांचे उर्दू मासिक “आजचा सुधारक प्रमाणेच नव्या विचारांना वाहिलेले आहे. डिसेंबर १९९२ च्या अंकात त्यांनी परिवर्तनाविषयी एक उद्बोधक उदाहरण दिले आहे. ते असे की अरब देशात वाहने व पथिक यांनी आपल्या उजव्या बाजूने चालावे असा नियम आहे, तर हिंदुस्थानात डाव्याबाजूने चालण्याचा नियम आहे. यावरून हिंदुस्थानातील मुसलमान जर असे म्हणू लागले की उजव्या बाजूने चालणे हा इस्लामी नियम आहे व आम्ही त्याच नियमाप्रमाणे चालणार; हिंदुस्थानातील नियम आमच्यावर अन्याय करणारा असल्यामुळे आम्ही संघटित होऊन त्याविरुद्ध लढा देणार, तर ते वेडेपणाचे ठरेल.
हज्रत महंमद साहेबांनी जे नियम तत्कालीन समाजाला घालून दिले त्यांना हदीस असे म्हणतात. हदीसच्या आदेशांवर अनेक विचारवंतांनी भाष्ये लिहिली असून त्याला फिकाह” म्हणतात. प्रामुख्याने चार फिकाह प्रचलित असून त्यांच्या अनुयायांची संख्या मोठी आहे. त्या चार फिकाह अशाः
(१) हज्रत अबू हनीफा यांची फिकाहे हनीफी
(२) हज्रत मलिक यांची फिकाहे मलिकी
(३) हज्रत मुहंमद अल शाफई यांची फिकाहे शाफई
(४) हज्रत इमाम अहमद हम्बल यांची फिकाहे हम्बली.
या संपूर्ण भाष्यांवर येथे विस्तारभयास्तव अधिक लिहिता येत नाही, पण एवढे सांगितले तरी पुरेसे आहे की या भिन्न भाष्यांत एकवाक्यता नाही. तरीही ती प्रचलित आहेत. देशकालपरिस्थितिपरत्वे धर्मशास्त्रात परिवर्तन होऊ शकते हेच या भाष्यांच्या भिन्नतेवरून सिद्ध होते.
समाजसुधारक आगरकर म्हणतात की “ अनेक कारणांनी समाजाच्या स्थितीत एकसारखा फेरफार होत असतो, म्हणून त्याच्या बंधनातही फेरफार होत गेला पाहिजे. कलह न होता ज्या समाजात सुधारणा होत असते त्या समाजाचे घटक निरुपयोगी झालेली जुनी। बंधने टाकीत जातात आणि नवी लावून घेतात. कालमान झपाट्याने बदलत चालले आहे असे पाहून जुन्या लोकांनी नव्या लोकांसाठी आपली पुराणप्रियता किंचित ढिली केली पाहिजे, व नव्या लोकांनी जुन्या लोकांसाठी आपली नवप्रियताही थोडीशी कमी केली पाहिजे.” (आगरकर दर्शन, संपादक – इरावती कर्वे पृ. १०९)
कुटुंबसंस्थेविषयीही आगरकरांनी आपले निःसंदिग्ध विचार मांडले आहेत. ते म्हणतात, “समाजाचे मुख्य घटक कुटुंबे होत व कुटुंबाचे मुख्य घटक स्त्रीपुरुष. तेव्हा कुटुंबाचा विचार करताना प्रथम स्त्रीपुरुषसंबंधांचा विचार केला पाहिजे. ज्याप्रमाणे अन्न सेवन केल्याने व्यक्तीचे पोषण होऊन ती जिवंत राहते त्याप्रमाणे स्त्रीपुरुषांच्या समागमाने जातीचे पोषण होऊन ती अस्तित्वात राहते व्यक्तीच्या अस्तित्वास ज्याप्रमाणे अन्न त्याप्रमाणे समाजाच्या अस्तित्वास कशातरी प्रकारचे लग्न आवश्यक आहे. (आगरकर लेखसंग्रह, संपादक-ग. प्र. प्रधान)
“आज स्त्री व पुरुष या दोघांनाही स्वातंत्र्य असावे या मागणीमुळे विवाहाचा जुना प्रकार आता चालणे शक्य नाही. पण मानवाच्या सहजप्रवृत्तीचे समाधान करणारा आणि आत्मिक उन्नतीला पोषक या दोन्ही दृष्टींनी चांगला ठरणारा नवा प्रकार मात्र अद्यापि उत्क्रांत झाला नाही.” (बट्रँड रसेल, सामाजिक पुनर्रचनेची मूलतत्त्वे पृ. १३८ संपादक – सुमन दाभोलकर, ल. म. भिंगारे, पृ. १३८)
“पूर्वीच्या विवाहप्रकारावर जसा धर्माचा पगडा होता, तसा नवीन विवाहप्रकारावरही असावयास हवा. पण हा धर्मही नवीन हवा. अधिकारप्रामाण्य, कायदा आणि नरकाची खाई यांवर तो अधिष्ठित न राहता स्वातंत्र्य, न्याय आणि प्रेम यांवर तो आधारलेला असला पाहिजे.” (तत्रैव, पृ. १३९)
म्हणून विवाह, घटस्फोट, कुटुंब यांचा विचार करताना नेहमी परिस्थितिनुसारच करायला हवा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.