चर्चा- साक्षात्कार आणि विवेकवाद

जून १९९४ च्या अंकातील डॉ. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख वाचला. रामकृष्णांच्या उपलब्ध माहितीवरून साक्षात्काराचे अस्तित्व सिद्ध होते काय, हा या लेखाचा विषय आहे. ते तसे सिद्ध होत नाही या निष्कर्षाप्रत लेखक आलेला आहे. या निष्कर्षाप्रत येण्यासाठी लेखकाने, नाटकातील शिवाची भूमिका करतानाचा रामकृष्णांचा भावावेश, वेषांतर करून एका घरंदाज कुटुंबातील अंतःपुरात त्यांचे जाणे, विवेकानंदांची व त्यांची भेट, रामकृष्णांना होणारी कालीची दर्शने, रामकृष्णांची इस्लामची व येशूची उपासना, मंदिरात प्रापंचिक गोष्टींचा विचार मनात आणल्याबद्दल राणी रासमणीला मारलेली थप्पड ह्या घटनांचा आधार घेतला आहे.
शिवाचा अभिनय करताना, काळ्या मेघावरील बलाकापंक्ती पाहताना, राणी रासमणीला थप्पड़ मारताना रामकृष्णांना मिर्गी ह्या रोगाचा झटका आलेला होता. दिव्य भावावेशाशी ह्या गोष्टींचा संबंध नाही असे लेखकाचे म्हणणे आहे.
(यांतील पहिल्या दोन घटना ह्या रामकृष्णांच्या बालपणीच्या, म्हणजे साधनाकालाच्या पूर्वीच्या, आहेत. त्यामुळे साक्षात्काराच्या किंवा भावसमाधीच्या दृष्टीने त्यांचे विशेष महत्त्व नाही असे मला वाटते.)
रामकृष्णांना कालीमातेचे दर्शन होणे हा एक स्वयंसूचनेचा प्रकार आहे. एका विशिष्ट मनोवस्थेतील व्यक्तींना असे दर्शन होऊ शकते. हा साक्षात्कार नाही असे लेखकाचे म्हणणे आहे.
खरे तर या लेखात श्रीरामकृष्णांच्या भावसमाधीचे अधिक सखोल व शास्त्रीय विवेचन अपेक्षित होते. परंतु तसे झालेले नाही.
विवेकवाद साक्षात्काराचे अस्तित्व मानत नाही याचे कारण प्रत्यक्ष आणि अनुमान ही दोनच ज्ञानसाधने विवेकवादाने आपल्या हाती ठेवली आहेत. ही दोन ज्ञानसाधने भौतिक आणि आध्यात्मिक पातळीवरही निश्चितच उपयुक्त आहेत. परंतु यापलीकडील ज्ञानसाधने म्हणजे मनाचे सम्यक आधान, ध्यान, धारणा, समाधी या साधनांचे विवेकवादाला का म्हणून वावडे असावे? विवेकवादाला आपली ज्ञानकक्षा वाढवावयाची असेल तर त्याने ह्याही साधनांचा अवलंब करणे उचित ठरणार नाही काय? तसा तो केला, म्हणजे रामकृष्णांच्या साक्षात्काराचा (भावसमाधीचा) साकल्याने विचार करता येईल. रूढ ज्ञानसाधने, म्हणजे प्रत्यक्ष आणि अनुमान, ही नेहमीच्या दृश्य व्यवहारात उपयुक्त ठरत असली तरी पलीकडील नित्य वस्तूच्या ज्ञानासाठी मनाची एकाग्रता, ध्यान, धारणा अशी थोडीशी वेगळी वाटणारीज्ञानसाधने वापरावयास हवीत.
‘साक्षात्कार’ या ज्ञानसाधनाच्या पडताळणीसाठी साक्षात्कारी पुरुषांची अत्यंत विश्वसनीय माहिती नितांत आवश्यक आहे हे सर्वांनाच मान्य होईल. सुदैवाने अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासकांनी (भारतातील आणि भारताबाहेरील) अशी बरीच माहिती संकलित केली आहे. बर्यााच वर्षांपूर्वी ‘व्हरायटीज् आफ रिलिजिअस एक्स्पीरिअन्स’ हे पुस्तक माझ्या वाचनात आले होते. त्यातील माहिती संशोधनावर आधारित आणि पुरेशी विश्वसनीय होती असे मला स्मरते. साक्षात्काराचे अस्तित्व त्या लेखकाला मान्य असावे. अलीकडे मुंबई विद्यापीठाला सादर झालेला एक प्रबंध माझ्या वाचनात आला. त्यातही साक्षात्काराच्या अंगानेच गूढवादी साधकांचा (मिस्टिक्स) अभ्यास केलेला आहे. सार्वकालिक आणि सार्वदेशिक असा हा विषय, तसा तर्कशास्त्रापासून थोडासा दूर असला, तरीही त्यात एक विलक्षण तर्कसंगती आहे आणि साक्षात्कार हे एक शक्तिमान असे ज्ञानसाधन आहे असे या प्रबंधाच्या वाचनानंतर माझे मत बनले. एरव्ही ह्या सर्व गूढवाद्यांच्या अनुभवविश्वातील सुसंवाद आपल्याला जाणवला नसता.
डॉ. व-हाडपांडे यांनी आधाराला घेतलेला श्रीरामकृष्णलीलाप्रसंग हा ग्रंथ शंभर वर्षांपूर्वी स्वामी सारदानंदांनी लिहिला. स्वामी विवेकानंदांनीही एक विश्वसनीय ग्रंथ म्हणून याची प्रशंसा केली. श्रीरामकृष्णांच्या उत्तरकालीन जीवनाचे स्वामी सारदानंद साक्षीदार होते. त्या काळच्या चरित्रलेखनशैलीनुसार या ग्रंथातील काही भाग काहीसा अतिशयोक्त व सामान्य वाचकांसाठी रंजक करण्याचा प्रयास झाला असला तरीही अत्यंत विश्वसनीय असा हा चरित्रग्रंथ आहे. त्यात ठिकठिकाणी श्रीरामकृष्णांच्या भावसमाधीची वर्णने आली आहेत. ही सर्व वर्णने कपोलकल्पित वा अतिरंजित नाहीत. श्रीरामकृष्णांच्या ह्या जीवनचरित्राचा अनेक भारतीय व पाश्चात्य तत्त्वज्ञांनी सखोल अभ्यास केला आहे. याअभ्यासाचा बराच भाग ग्रंथरूपातही उपलब्ध आहे. या सर्व ग्रंथसंपदेचा उपयोग साक्षात्काराचे अस्तित्व किंवा नास्तित्व सिद्ध करण्यासाठी करता आला असता. नव्या दमाच्यासंशोधकांनी पुढे येऊन डॉ. व-हाडपांडे यांचा निष्कर्ष तर्कसंगत आहे किंवा नाही हे पडताळून पाहिले पाहिजे.
श्रीरामकृष्ण किंवा स्वामी विवेकानंद यांनी तर्काला कधीच क़मी लेखले नाही.अतीन्द्रिय अनुभवाच्या बाबतीत सात वस्तूंच्या मापनाची फूटपट्टी बाजूला ठेवा, त्या असीम जाणिवेशी एकरूप व्हा असा त्यांचा उपदेश असे. विषयवस्तूच जिथे वेगळ्या आहेत तिथे एकाच मापाने त्यांचे मापन कसे करता येईल?तर्काच्या फूटपट्टीने अनंताचे मोजमाप करणे म्हणजे मिठाच्या बाहुलीने समुद्राचे मोजमाप करणे होय.
श्रीरामकृष्णांच्या जीवनातील एक घटना मोठी लक्षणीय आहे. भावसमाधीत मग्न झाल्यावर त्यांना विविध उपायांनी नेहमीच्या व्यावहारिक पातळीवर आणावे लागत असे. एकदा भावसमाधीतील आपला ब्रह्मानुभव जमलेल्या सर्वांना सांगण्यास ते उत्सुक होते. परंतु पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही त्यांना काहीही सांगता आले नाही. ‘अवाङ्मनसगोचर तत्त्व शब्दांनी कसे सांगणार?अशा वेळी त्यांना ‘भावमुखे थाक म्हणजे भावमुखी रहा’ असा त्यांच्या आईचा म्हणजे काली मातेचा (जी तुमच्या आमच्या सारख्या विवेकवादी लोकांच्या दृष्टीने केवळ एक काळ्या दगडाची ताशीव मूर्ती आहे) आदेश झाला. ‘भावमुखी रहा’ म्हणजे सान्ताच्या सीमारेषेवर राहून तू आपले कार्य कर. श्रीरामकृष्णांनी हा आदेश शेवटपर्यंत पाळला आणि आपल्या खडतर साधनेच्या परिणामी मिळालेल्या भावसमाधिगत ज्ञानाचा । मुक्तपणे सर्वांवर वर्षाव केला. ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सुबोध उपदेशांचे परिशीलन केले त्यासर्वांना त्यात कोठेही खोटेपणा वा ढोंगीपणा आढळला नाही. उलट या सर्वांना असीमाची, अनंताची ओढ लागत गेली. श्रीरामकृष्णांच्या वचनांचा सर्वांवरच असा परिणाम होईल असे नाही. हा अतीन्द्रिय अनुभूतीचा अधिकार सर्वांनाच मिळत नाही. ज्यांचे अंतःकरणं ‘नितान्त निर्मल स्वान्तः’ असे झालेले आहे अशांनाच ही दिव्य अनुभूती होते आणि याततार्किकदृष्ट्या कोणतीही विसंगती नाही.
माणसाचे मन त्याच्या शरीराचे नियंत्रण करते. मनाने राधेचा भक्तिभाव स्वीकारला असेल तर त्याचा परिणाम शरीरावर होणे यात कोणतीही विसंगती नाही. श्रीरामकृष्णांच्या जीवनात साधनेनुरूप शारीरिक बदल होत असत, यातही शंका घेण्यास अवसर नाही.
श्रीरामकृष्णांना झालेले येशूचे दर्शन किंवा त्यांनी प्रयत्नपूर्वक केलेली इस्लामी साधना ह्याही गोष्टी डॉ. वहाडपांडे यांना अर्थहीन वाटतात. परंतु सर्व धर्माविषयी आदर (केवळ सहिष्णुता नाही) ही मानवतेची गरज आहे याचे भान होणे आणि विविध धर्माच्या साधना आपल्या जीवनानुभवाचा एक भाग बनवणे हे अर्थपूर्ण नाही काय? शिकागो परिषदेतही (१८९३) स्वामी विवेकानंदांनी ‘नॉट मिअरली टॉलरन्स बट अॅक्सेप्टन्स. वुई अॅक्सेप्ट एव्हरी रिलिजन अँज टू’ अशा शब्दांत श्रीरामकृष्णांचा धर्मसमन्वयाचा संदेश जगाला दिला. या घटनेलाही विवेकवादाच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही काय?
विवेकानंदांनी किंवा रामकृष्णांनी कालीमातेला सांकडे घालून पडताळा येईल अशा गोष्टी मागितल्या नाहीत, असाही आक्षेप डॉ. व-हाडपांड्यांनी घेतला आहे. विवेकानंदांनी पोटासाठी एखादी नोकरी मागितली असती आणि दुसर्या दिवशी ती मिळाली असती किंवा गलरोग बरा व्हावा म्हणून रामकृष्णांनी देवीला सांगितले असते आणि दुसर्या दिवसापासून ते रोगमुक्त झाले असते, तर देवीच्या अस्तित्वाबद्दलचा निःसंशय पुरावा विवेकवाद्यांनी मानला असता, असे डॉक्टरसाहेबांचे म्हणणे दिसते. खरे तर, विवेकानंदांनी जे मागावेअसे रामकृष्णांना वाटत होते तेच त्यांनी मागितले आणि तेच त्यांना भरभरून मिळाले या घटनेतही विलक्षण तर्कसंगती आहे आणि दैवी शक्तीच्या अस्तित्वाचाही हा सज्जड पुरावा आहे. आयुष्याच्या अखेरीस रामकृष्णांची देहभावना इतकी विस्तारली की असंख्य मुखांनी आपण आपला आहार घेत आहोत असे ज्ञान त्यांना झाले. आत्यंतिक क्लेश होत असतानाही ते आपले मन देवीपासून हटवून आपल्या दुखण्यावर केंद्रित करू शकले नाहीत. १ जानेवारी १८८६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एखाद्या कल्पतरूप्रमाणे ‘जो जे वांछील तो ते लाहो’ म्हणून ब्रह्मानंदाचा त्यांनी सुकाळ करविला.
‘साक्षात्कारामुळे नैतिक उन्नयन व्हावे अशी अपेक्षा आहे. पण रामकृष्णांना साक्षात्काराचा असा काहीच उपयोग झाल्याचे दिसत नाही. त्यांच्या जातींच्या उच्चनीचतेबद्दलच्या भावना कायम होत्या.’ ह्या डॉ. व-हाडपांडे यांच्या विधानाला पुरेसा आधार नाही. त्यांच्या लेखात किंवा त्यांनी आधाराला घेतलेल्या सामग्रीतही. कोळ्याचे अन्न खाण्याबद्दलची खंत, जातिभेदाची बंधने पाळणे हे सर्व विचार साधना-पूर्व काळातील आहेत. त्यांच्या आध्यात्मिक उन्नयनाबरोबरच हे सारे विचार नष्ट होत गेले आणि एक अत्यंत उदार भाव त्यांच्या जीवनात साकार होत गेला. अंतकाळी जातिनिरपेक्षपणे त्यांनी आपल्या अंतरंग भक्तांना संन्यासदीक्षा दिली. आपल्या साधनेद्वारे पराकोटीचे असे नैतिक उन्नयन करून घेतल्याचे उदाहरण अन्यत्र क्वचितच सापडते.
श्रीरामकृष्ण-शारदा देवी यांच्या वैवाहिक जीवनातील मांगल्य आणि आनंद आणि शारदा देवीच्या अपत्यरहित मातृत्वातील उदात्तता ह्या गोष्टीही डॉक्टरसाहेबांच्या तर्कपूत नजरेतून सुटून गेल्या आहेत. कुणाच्या भावना दुखवणे हा माझा उद्देश नसून सत्यावर प्रकाश टाकणे हा उद्देश आहे’ असे डॉक्टरसाहेबांनी लिहिले आहे. परंतु त्यांच्या लेखाच्या वाचनानंतर त्यांचा हा उद्देश सफल झाला नाही असे वाटते. आध्यात्मिक अनुभूती आणि मिगींचा रोग त्यांनी एकाच फूटपट्टीने मोजल्यामुळे हे असे झाले.
माझे म्हणणे असे आहे की विवेकवाद्यांनी जनसामान्यांचा बुद्धिभेद करू नये. अध्यात्मज्ञान ही एक स्वतंत्र ज्ञानकक्षा आहे. हिची शास्त्रसंमत ज्ञानसाधने वेगळी आहेत. त्यांच्या आधाराने हे ज्ञान आत्मगत करता येते. नव्हे, अनेकांनी ते केले आहे. त्यांचा ज्ञानानुभव विविध ग्रंथांतून उपलब्ध आहे. विवेकवाद्यांनी कठोरपणे या सामग्रीचे अनुशीलन करावे. त्यातील हीण असेल ते टाकावे आणि उत्तम असेल ते घ्यावे. त्याला शास्त्रीय बैठक देता येत असेल तर द्यावी. असे करणे समाजाच्या हिताचे होईल.
या विषयाचे (रामकृष्णचरित्राचा आधार वगळूनही) सविस्तर विवेचन आजचा सुधारकच्या वाचकांना निश्चितच उद्बोधक ठरेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.