वैज्ञानिक रीत

आपल्या समजुतींतील सत्याची मात्रा वाढविण्याचे उपाय प्रसिद्ध आहेत. त्यांत कोठल्याही गोष्टीच्या सर्व बाजू लक्षात घेणे, सर्व संबद्ध वास्तवे निश्चित करण्याचा प्रयत्न करणे, आपले पूर्वग्रह विरुद्ध पूर्वग्रह असणार्‍या लोकांशी चर्चा करून दुरुस्त करणे, आणि अपुरा सिद्ध झालेल्या कोणत्याही उपन्यासाचा (hypothesis) त्याग करण्याची तयारी जोपासणे – यांचा त्यांत समावेश होतो. या रीतींचा वापर विज्ञानात केला जातो, आणि त्यांच्या साह्याने विज्ञानाचे भांडार जमविले गेले आहे. कोणत्याही काळी जे विज्ञान म्हणून स्वीकारले जाते. त्याचा नव्या शोधांमुळे त्याग करावा लागणे अटळ आहे ही गोष्ट शुद्ध वैज्ञानिक दृष्टी असलेला कोणताही वैज्ञानिक मान्य करायला तयार असतो. आणि तरीही ते बहुतेक सर्व व्यवहाराकरिता (सर्व नव्हेत) सत्य म्हणून स्वीकारण्याइतपत सत्याच्या जवळ गेलेले असते. अस्सल ज्ञानाच्या जवळपास जाणारे ज्ञान फक्त विज्ञानातच आढळते, आणि तेथे वैज्ञानिकाची वृत्ती सावधआणि संदेहाची असते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.