अतीतवाद, विवेकवाद व विज्ञान

मे १९९४ च्या आजचा सुधारक च्या अंकात प्रा. मे. पुं. रेगे यांनी सातारा येथील संमेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणाच्या संदर्भात प्रा. दि. य. देशपांडे यांचा “अतीत व विवेकवाद” हा व प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांचा “प्रा. रेग्यांची अतीतवादी मीमांसा’ हे दोन विचारप्रवर्तक लेख आले आहेत. यात प्रा. कुळकर्णी यांनी विज्ञानाविषयी बरीच स्पष्ट विधाने केली आहेत. प्रा. देशपांडे यांचा लेख वाचताना शीघ्र संदर्भ म्हणून उपयोगी पडावा हा प्रा. कुळकर्णी यांच्या लेखाचा उद्देश आहे. प्रा. रेग्यांचे संपूर्ण भाषण व वरील दोन लेख वाचल्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आलेले काही विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
(१) विज्ञान हे निसर्गाचे व विश्वाचे सूक्ष्म निरीक्षण आणि वैज्ञानिक सिद्धांतांचे व त्यांवर केलेल्या प्रयोगांचे चिकित्सक दृष्टीने केलेले विश्लेषण (experimental method) यांवर आधारित आहे. तेव्हा प्रा. कुळकर्णी म्हणतात त्याप्रमाणे विज्ञान हे विवेकवादाचेच अपत्य आहे. विवेकवादी आग्रह असा की जे जे काही आहे ते समग्र अस्तित्व विवेकाला गम्य आहे. तेव्हा सर्वसाधारण वैज्ञानिकांना ज्ञानसाधनेसाठी वैज्ञानिक पद्धतीहून (scientific method) दुसर्याच कोणत्याही ज्ञानसाधनेची आवश्यकता भासत नाही. Descartes, Newton, Francis Bacon यांची विज्ञानाविषयीची ही भूमिका २० व्या शतकाच्या पहिल्या दोन शतकापर्यंत सर्वमान्य होती. गेल्या काही दशकात काही वैज्ञानिकांनी (विशेषतः theoretical physicists) आतापर्यंत प्रमाण मानलेला वैज्ञानिक दृष्टिकोन व गूढवाद (mysticism) यांत विसंवाद नसून, हे दोन समांतर रेषांवर एकाच दिशेने पुढे जाणारे ज्ञानमार्ग असू शकतात असे मत पुढे येऊ लागले. या संबंधात Fritjof Capra यांच्या Tao of Physics व Turning Point या ग्रंथांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. असे मत पुढे येण्याची मुख्य कारणे अशीः १) अणुरेणूंच्या सूक्ष्म जगतात, आतापर्यंत उपयोगी पडणारे Newtonian Mechanics वर आधारित शास्त्रीय सिद्धांत चालू शकत नाहीत, Quantum Theory वर आधारित Quantum Mechanics चा उपयोग करावा लागतो. इलेक्ट्रॉनसारखा सूक्ष्म कण कधी कण(particle) तर कधी तरंग(wave) या रूपांत असू शकतो. हे सूक्ष्म कणांचे दुहेरी रूप (Particle-Wave Duality) मान्य करावे लागते. प्रयोग करणाराने प्रयोगाची मांडणी ज्या पद्धतीने केली असेल त्यावर इलेक्ट्रॉन हा कण किंवा तरंग या रूपांत दिसून येईल. हेच ऊर्जेच्या कणांबद्दलही (photon) खरे आहे असे सिद्ध झाले. विज्ञानाच्या क्षेत्रात ही क्रांतिकारक घटना होती. या घटनेतील दोन निष्कर्ष महत्त्वाचेआहेत. (अ) Quantum Mechanics चे संख्याशास्त्रीय (stastical) स्वरूप, व दुसरे म्हणजे (ब) प्रयोग करताना, तो मांडताना प्रयोग करणान्याची मानसिक प्रेरणा (subjectivity). Quantum Theory च्या पूर्वीच्या विज्ञानात संपूर्ण वस्तुनिष्ठता (objectivity) होती. ज्ञेय वस्तू, तिच्यावर केलेले निरीक्षण व प्रयोगांतील निष्कर्ष हे त्यात पुरेसे होते. प्रयोग करणारा वैज्ञानिक ज्ञाता हा केवळ observer या नात्याने बाजूस राहून वावरत असे. आता ज्ञेय वस्तू (objective) इतकेचज्ञात्याच्या मनाला (mind) संज्ञेला (consciousness) महत्त्व आहे हे मत वैज्ञानिकांना मान्य करावे लागले.
(२) दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे Heisenberg यांचा इलेक्ट्रॉनसारख्या सूक्ष्म कणांबद्दल अनिश्चिततेचा (Indeterminacy) सिद्धांत. इलेक्ट्रॉनचे अवकाशातील स्थान (spatial position) आणि त्याची गति या दोन गुणांबद्दल असणार्यास अनिश्चिततेचे समीकरणही त्यांनी मांडले. हे प्रमाण इतके अल्प आहे की अणुरेणूंच्या सूक्ष्म जगांतच त्याला महत्त्व आहे. आपल्या रोजच्या व्यवहारांतील स्थूल वस्तूंबाबत त्याला काही महत्त्व राहात नाही.
(३) तिसरे कारण म्हणजे Einstein चा सापेक्षतावाद (Relativity). वस्तु (matter) आणि ऊर्जा (energy) या अंतिम स्वरूपांत एकच आहेत. एकाचे दुसर्या त रूपांतर होऊ शकते. हा सापेक्षतावादाचा एक महत्त्वाचा निष्कर्ष अणुशक्तीच्या रूपातआपल्या पूर्ण परिचयाचा झाला आहे.
भौतिक विज्ञानाविषयी हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण हे की तत्त्वचिंतकांनी आता हे ठरवायचे आहे की वरील सर्व सिद्धांतांचा आणि प्रमेयांचा समावेश पूर्णपणे विवेकवादात होऊ शकतो की नाही, की वरील सर्व प्रस्थापित भौतिक विज्ञानासाठी अतीतवादाकडे धाव घेण्याची गरज आहे. Quantum Theory व Relativity यांचा वापर विज्ञानाच्या क्षेत्रांत इतका परिणामकारक ठरला आहे की त्यांविषयी संशय घेण्याचे कारण वैज्ञानिकांना नाही. पण स्वतः Einstein यांना शेवटपर्यंत Quantum Mechanics मधील संख्याशास्त्रीय (statistical) स्वरूप व अनिश्चिततेचा (Indetevminacy) नियम यांविषयी खात्री पटली नव्हती. विज्ञान अधिक प्रगत झाल्यावर यांची जरूर लागणार नाही, आपल्या सध्याच्या अज्ञानाचे हे फलित आहे अशी त्यांची धारणा होती. या बाबतीत Niels Bohr आणि Einstein यांच्यात तीव्र मतभेद होता. या दोन श्रेष्ठ वैज्ञानिकांमधील चर्चा ही आधुनिक विज्ञानांती एक ऐतिहासिक महत्त्वा घटना ठरावी. अजूनही अनेक वैज्ञानिक व तत्त्वचिंतक यांच्या मते हा वाद संपलेला नाही. Niels Bohr हे Quantum Theory चे प्रणेते आणि विज्ञानक्षेत्रांतील त्यांचे स्थान Einstein च्या बरोबरीचे मानले जाते. इलेक्ट्रॉनसारखा कण कधी कण तर कधी तरंग या दोन्ही रूपांत असू शकतो यावर विचार करून त्यांनी परस्परपूरक तत्त्व (Principle of Complementarity) ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते एकच वस्तू दोन रूपांत असू शकते. यांत काही विलक्षण विसंगती नसून वस्तूचे (reality) संपूर्ण व खरे ज्ञान होण्यासाठी या दोन परस्परविरोधी भासणाच्या रूपांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या निबंधाच्या संदर्भात Quantum Theory व कण-तरंग हे सूक्ष्म कणाचे दुहेरी रूप आणि प्रयोग करणार्या वैज्ञानिकाचे मन (subjectivity) यांचा विज्ञानक्षेत्रांत झालेला शिरकाव यामुळे विज्ञानामागील तात्त्विक स्वरूपात काही मूलभूत फरक करणे आवश्यक आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नावर विज्ञानाच्या तत्त्वचिंतकांत (philosophers of science) अजून एकमत नाही. पण हे मात्र खरे की विज्ञानाच्या या नवीन स्वरूपामुळे मानवाचे मन (mind) आणि संज्ञा (consciousness) यांना आवश्यक स्थान प्राप्त झाले. पण असे जरी असले तरी मन व संज्ञा यांचा संबंध मनुष्याच्या अत्यंत प्रगत अशा शारीरिक भागाशी- मेंदूशी (brain) आहे. मेंदूतील भौतिक, रासायनिक व मज्जातंतुविषयक (neurological) क्रिया-प्रक्रियांमुळे सर्व शारीरिक व्यवहार चालतात. मन व संज्ञा यांची उत्पत्ति मेंदूतच आहे. यावर आणि मन-शरीर (body-mind) यांमधील संबंधावर बरेच संशोधन झाले आहे, चालू आहे आणि होत राहील. माणसाची तर्कशक्ति, विश्लेषक वे गणिती पात्रता, स्मरणशक्ति इ., इतकेच नव्हे तर भावना (emotions), इच्छा-आकांक्षा, सौंदर्यदृष्टि ही सुद्धा त्याच्या मेंदूतील प्रक्रियांवर अवलंबून आहेत असे सिद्ध होत आहे. हे विचारात घेतले तर Quantum Mechanics, Relativity, अनिश्चिततेचे तत्त्व (Indeterminacy) या नवीन भौतिक प्रमेयांमुळे विज्ञानामागील तत्त्वज्ञानात काही महत्त्वाचा फरक घडून आला आहे असे मानण्याचे कारण नाही. सबंध विज्ञान हे विवेकवादांतच अंतर्भूत आहे असे जे मानतात त्यांना अतीत किंवा गूढवादाकडे (mysticism) वळण्याची गरज दिसत नाही असे मला तरी वाटते.
आतापर्यंतचे विवेचन विश्वांतील निर्जीव जगताबद्दल झाले. पण सजीव प्राण्यांबद्दलचे विज्ञान त्याहूनही महत्त्वाचे आहे. प्राणिशास्त्र (Biology), Neuroscience आणि मेंदूविषयक संशोधन (Brain Research) यांत आज वेगवान प्रगती होत आहे व त्या आधारावर आतापर्यंत न समजणारे कूट प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या क्षेत्रांतील एक मूलभूत व महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे उत्क्रांतिवाद (Theory of Evolution). याचे मुख्य प्रवर्तक Charles Darwin. Origin of the Species a Survival of the Fittest ही त्यांची मुख्य प्रमेये. ती मूळ स्वरूपात सर्वमान्य झाली. त्यांत काही फरक पडून Neo – Darwinism चा उदय झाला. पण आज या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण असे नवे पर्व सुरू होत आहे. त्यात Self-Organizing Universe, स्वयंनिर्मित, स्वयंचलित विश्व हा मुख्य विचार आहे. रेणूंच्या (molecules) समूहाचा शास्त्रीय विचार झाला तेव्हा Thermodynamics या नवीन विज्ञानक्षेत्राची निर्मिती झाली. त्यात तपमान(temperature) व Entropy अशा गुणधर्माचा समावेश होतो. यांचा रासायनिक क्रियांशी असलेल्या संबंधांवर मौलिक संशोधन करणारे Ilya Prigogine हे नोबेल पारितोषक विजेते आहेत. जीवशास्त्रांतील क्रियांशी या संशोधनाचा घनिष्ठ संबंध आहे. Prigogine यांचे संशोधन व त्यातील निष्कर्ष हे नवीन उत्क्रांतिवादातील प्रेरणा होत.
ErichJantschयांचा Self-Organizing Universe हा नवीन उत्क्रांतिवादावर लिहिलेला ग्रंथ फार उद्बोधक आहे.Jantschयांनी या ग्रंथाला “Scientific and Human Implications of Emerging Paradigm of Evolution” असे उपनाव दिले आहे. आतापर्यंतच्या उत्क्रांतिप्रक्रियेतील मुख्य संकल्पना म्हणजे मानव हा सध्या उत्क्रांतीचा शेवटचा टप्पा असून त्याचा सर्वात प्रगल्भ शारीरिक भाग म्हणजे मेंदू. नवीन वादांत प्रमुख संकल्पना ही की पुढील उत्क्रांतीची दिशा व प्रवाह ही मानवाच्या मेंदूच्या शक्तीवर अवलंबून राहतील. मानव आणि निसर्ग व विश्व यांच्या परस्पर संबंधांतून उत्क्रांतीची नवी दिशा ठरते. मानव स्वतःच्या शक्तीमुळे उत्क्रांतीची पुढील दिशा बदलू शकतो. याला Jantschयांनी Evolution of Evolutionary Process असे नाव दिले आहे. अतीत व गूढवादांत (mysticism) ईश्वर ही संकल्पना महत्त्वाची. ईश्वराने हे विश्व निर्माण केले व तोच ते चालवितो असे मानले जाते. पण नवीन उत्क्रांतिवादात Jantschयांच्या शब्दांत “God is not the Creator of the Universe but the Mind of the Universe”, TEUTU ईश्वर विश्वाचा निर्माता नसून त्याचे मन आहे.”
मानसिक गुणधर्म व व्यवहार हे मेंदू व त्यांतील प्रक्रिया यांवर अवलंबून आहेत हे वर लिहिलेलेच आहे. मन व पदार्थ (mind and matter) यांविषयी Jantschयांचे मत असे :
“Mind and Matter are complementary aspects in the same selforganizing dynamics …. But mind transcends its own matter systems and is capable of the symbolic recreation of the entire outer world in the matter system of the brain. Mind underlies self – transcendence and may evolve itself.”
या नव्या उत्क्रांतिवादाच्या तत्त्वचिंतकांना मनाविषयी खालील संकल्पना मांडाव्या लागतात.(a) Neural Mind, (b) Reflexive Mind, विवेकशील मन, (c) Self – Reflexive Mind, स्वसंवेद्य मन. ही सर्व मानवाच्या मेंदूतील प्रक्रियांची फलिते आहेत असे मानले जाते.
विश्वमन (Universal Mind) व वैश्विक संज्ञा (Cosmic Consciousness) या संकल्पना काही नवीन नाहीत. प्रा. रेग्यांनी आपल्या भाषणात श्री. अरविंदांचा एक श्रेष्ठ तत्वचिंतक म्हणून उल्लेख केला आहे, ते योग्यच आहे. अरविंदांच्या साहित्यांत “supra-mental state” व “super-conscious level” यांचा वारंवार उल्लेख येतो. उत्क्रांतीचा शेवटचा टप्पा म्हणजे “super-human race’ ची निर्मिती अशी त्यांची श्रद्धा होती.
प्रा. रेग्यांच्या भाषणाचा मुख्य विषय धर्म हा होता. त्याचा या लेखांतील विवेचनाशी संबंध नाही. येथे फक्त विज्ञानाचा, अतीत व विवेकवादाशी काय संबंध असू शकेल याचा विचार केला आहे.
सध्या तरी असे म्हणण्यास हरकत नसावी की विश्वातील निर्जीवसृष्टिविषयक विज्ञान हे पूर्णपणे विवेकवादात सामावले जाते. सजीवसृष्टिविषयक विज्ञान सुद्धा नव्या विकसित होणार्याव उत्क्रांतितत्त्वामुळे अतीताकडून विवेकवादाकडे वाटचाल करीत आहे.
C-2, Terrace View Society JeevanBima Nagar Borioli, (W). Bombay 400 103
संदर्भ ग्रंथ –
1) Eric Jantsch : Self – Organizing Universe, Pergamon Press, New York (1989)
2) FritjofCapra : The Turning Point, Bantam Press, New York (1988).

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.