पर्यावरणवादाचा अन्वयार्थ

(१)
मानव-निसर्ग संबंधाच्या अभ्यासाचा इतिहास जुना असला तरी पर्यावरणवादाचा विकास ही अलीकडच्या काळातील घटना आहे. निसर्गातील काही घटकांचे माहात्म्य मानवाने बर्यावच आधीपासून जाणले होते. निसर्गातील विविध घटकांची त्याच्या सुखकर जीवनासाठी आवश्यकता त्याला समाजजीवनाच्या सुरुवातीपासूनच प्राथमिक स्वरूपात का होईना ज्ञात होती. असे असले तरी या संबंधाच्या आणि या अभ्यासाच्या मुळाशी एकीकडे मानव व दुसरीकडे उरलेला निसर्ग असा मानवसापेक्ष दृष्टिकोन होता. सुरुवातीला निसर्गातील उर्वरित घटकांच्या तुलनेत माणसाचे अस्तित्व नगण्यच होते. मानवासकट सर्वघटकांची एक व्यवस्था म्हणजे पर्यावरण ही मानवनिरपेक्ष संकल्पना अलीकडली आहे.
ह्या संकल्पनेचा विकास अपरिहार्यपणे आधुनिक वैज्ञानिक प्रगतीशी निगडित आहे. एकीकडे विज्ञानाने माणसाचे स्वयंघोषित श्रेष्ठत्व संपवून तोही विश्वातील एक सामान्य घटक असल्याची जाणीव करून दिली, तर दुसरीकडे त्याच विज्ञानाने इतर कोणीही करू शकणार नाही अशा प्रकारची निसर्गव्यवस्थेत ढवळाढवळ करण्याची शक्यता माणसाला उपलब्ध करून दिली. अशा त-हेने आधुनिक युगात मानवप्राण्याला एकीकडे क्षुद्रत्व प्राप्त झाले आहे तर दुसरीकडे तो बलाढ्य होत गेला आहे. या विरोधाभासातूनच पर्यावरणवाद निर्माण झाला आणि या वादाचे स्वरूपही असेच द्वंद्वात्मक आहे.
पर्यावरणवादाची अनेक रूपे असली तरी ढोबळमानाने हा पृथ्वीवरील सजीवनिर्जीव विश्वाच्या अस्तित्वासंबंधीचा सिद्धांत आहे असे म्हणता येईल. हा सिद्धांत उदयास येण्यासाठी आजची विशिष्ट परिस्थिती कारणीभूत आहे. पृथ्वीच्या सुरुवातीपासून तर अलीकडच्या काळापर्यंत पृथ्वीवरील सजीव-निर्जीव विश्व निसर्गनियमानुसार चालत होते. पृथ्वीवर बदल होत नव्हते असे नव्हे. विकासाचे व विनाशाचे चक्र नियमित सुरू होते. परंतु हे बदल नैसर्गिक गतीने होत होते. या बदलांतूनही निसर्गाच्या घटकांचे परस्पराशी विभिन्न पातळ्यांवरील संतुलन टिकून राहिले. मूळ व्यवस्था न कोलमडता संतुलनाच्या जुन्या समीकरणांच्या जागी नवनवी समीकरणे येत राहिली. या संपूर्ण काळाच्या ओघात प्राण्यांच्या व वनस्पतींच्या कितीतरी जाती नष्ट झाल्या, नवीन निर्माण झाल्या, मोठमोठी भौगोलिक स्थित्यंतरे झाली, पर्वत, नद्या, तलाव, दर्यार यांत बदल झाले. पृथ्वीवरच्या कोणत्याही भागाचे नकाशे काही दशलक्ष वर्षांच्या अंतरांनी पाहिले तर त्यांत मोठे बदल दिसून येतील. परंतु हे सर्वच बदल धिम्या नैसर्गिक गतीने घडत गेल्यामुळे सर्व संबंधित घटक परस्परांशी जुळवून घेत घेत बदलत गेले.
ही परिस्थिती गेल्या तीन-चार शतकांपासून पूर्णपणे बदलली आहे. पृथ्वीवरील एका प्राण्याच्या मानवाच्या बदललेल्या जीवनपद्धतीमुळे हे घडले. एकीकडे केवळ या प्राण्याच्या बेसुमार वाढलेल्या महाप्रचंड संख्येमुळेच इतर घटकांवर जीवघेणे अतिक्रमण होत आहे. तर दुसरीकडे या प्राण्याच्या विकसित बुद्धिमत्तेमुळे त्याने नैसर्गिक प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करण्याचा व इतर घटकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या दोनपैकी कोणतेही एकच कारण निसर्गाचे आजवरचे संतुलन ढासळविण्यास पुरेसे आहे. दोन्ही कारणे एकत्र आल्यामुळे स्थिती अधिकच गंभीर झाली आहे. परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना पुढील आकडेवारीवरून येईल. सस्तन प्राणी व पक्षी यांच्या जाती नामशेष होण्याचा दर इ.स. १६०० पर्यंत दर हजार वर्षांत एक जात असा होता, तर सन १९०० ते १९७५ या कालावधीत तो दर वर्षाला एक जात एवढा म्हणजे हजार पटींनी वाढला. सर्व प्राणीजातींचा विचार केला तर नामशेष होण्याचा दर १९७५ साली दरवर्षी १०० जाती होता, तो १९९० मध्ये (केवळ १५ वर्षांत) दरवर्षी १०,००० जाती झाला. याप्रमाणे सन २००० मध्ये हा दर किमान २०,००० जाती प्रतिवर्ष एवढा होईल, म्हणजे दर अर्ध्या तासाला एक जात नामशेष होत असेल.
एवढे मात्र खरे की ह्या गंभीर परिस्थितीचे चटके बसू लागल्यावर मानवाची जाणीव जागृत होत आहे. आपल्या विकसित बुद्धिमत्तेचा उपयोग या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तो करू लागला आहे. मानव-निसर्ग संबंधातली पहिली प्रदीर्घ अवस्था ‘निसर्गात मानव अशी होती. सध्या दुसरी अवस्था ‘निसर्ग-विरुद्ध-मानव आहे. यापुढे तिसरी अवस्था ‘निसर्ग-विरुद्ध-मानव की ‘निसर्ग-आणि-मानव राहील हा प्रश्न तीव्रतेने उपस्थित होत आहे. आपण ज्या विश्वाचे घटक आहोत ते संपूर्णपणे टिकले तरच आपले अस्तित्व सलामत राहील हे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर हेही स्पष्ट होत आहे की या विश्वव्यवस्थेत क्षुद्र-सूक्ष्म सजीवांपासून तर महाकाय निर्जीव पर्वतांपर्यंत सर्व घटकांना महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि त्यांच्या एकात एक गुंतलेल्या परस्परावलंबी अनेक साखळ्या आहेत. कोणत्याही एका कडीला धक्का लावणे म्हणजे एकाचवेळी अनेक साखळ्यांना धोका पोहोचवणे आहे ही वस्तुस्थिती आहे.
पर्यावरणवादाच्या विकासाची पार्श्वभूमि ही अशी आहे. सिद्धांत व प्रात्यक्षिक (थिअरी व प्रेक्टिस) अशा दोन्ही अंगानी आणि शास्त्रीय आधारावर पर्यावरणाचा अभ्यास आता कुठे सुरू झाला आहे. म्हणूनच पर्यावरणवादाचा विकास ही अगदी अलीकडच्या काळातील घटना आहे असे वर म्हटले आहे.
(२)
पर्यावरणातील कित्येक घटक इतर घटकांसाठी घातक असतात. मोठा मासा लहान माशाला गिळतो, वाघ हरिणाला मारतो, ऊन पावसामुळे खडक झिजतात. परंतु या परस्पर विनाशाला आवश्यकतेची मर्यादा असते. जेव्हा पर्यावरणातील घटक प्रत्येकाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपलीकडे एकमेकांसाठी विनाशकारी नसतात, त्यांचे प्रमाण व जीवनपद्धती परस्परांसाठी पूरक असते, तेव्हा पर्यावरण संतुलित आहे असे आपण मानतो. जेव्हा हे प्रमाण बिघडते तेव्हा संतुलन ढासळले असे म्हणतो. एक उदाहरण भारताचे घेता येईल. हजार वर्षांपूर्वी भारतात ८०% जमिनीवर जंगले, सुमारे पन्नास हजार वाघ आणि तीन ते पाच लक्ष मानव असावेत असा अंदाज आहे. (भारतासारख्या प्रदेशात जंगले, वाघ आणि मानव हे पर्यावरणाचे सर्वात महत्त्वाचे निदर्शक मानले जातात.) त्यावेळी हे तीनही घटक संतुलित प्रमाणात होते. आज हेच प्रमाण केवळ १८% जमिनीवर जंगले, सुमारे दोन हजार वाघ आणि नव्वद ते पंचाण्णव कोटी मानव आहे. असेच गंभीरअसंतुलन कृषी-गैरकृषी जमिनीचे प्रमाण, हवा-पाणी-जमीन यांतील उपयुक्त व घातक घटकांचे प्रमाण, कीटक-पक्षी-जलचर-भूचर यांचे प्रमाण यांतही दिसून येत आहे.
मानवाचे निसर्गावर अतिक्रमण अनेक अंगांनी व मार्गानी होत आहे. संपूर्ण पृथ्वीवर विविध निसर्गव्यवस्था (ecosystems) वेगवेगळ्या भूभागावर पसरलेल्या होत्या. वाढत्या लोकसंख्येसोबत या जमिनी मानवाने उपयोगात आणायला सुरुवात केली. पूर्वीची जंगले कापून तेथे आता शेती होत आहे आणि शेतीची जमीन वसाहत आणि कारखान्यांसाठी वापरात येत आहे. प्रचंड लोकसंख्येच्या प्रचंड गरजांसाठी विश्वास बसणार नाही इतक्या वेगाने व प्रमाणात जमिनी साफ होत आहेत. आणि तरीही स्थिती पूर्वीपेक्षा जास्तच गंभीर होत आहे. त्यामुळे एकीकडे जास्तीत जास्त जमीन निसर्गाकडून हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे आहे त्या जमिनीतून जास्तीत जास्त लुटण्याचा, उपभोगण्याचा प्रयत्नही सुरू आहे. टोलेजंग इमारती, अधिक उत्पन्न देणारी पिके, रासायनिक खते व कीटकनाशकांचा बेसुमार वापरही यांचीच परिणती आहे.
आधुनिक समाजाचे अविभाज्य अंग असणारे उद्योगधंदे व दळणवळण यांचे अतिक्रमणही आहेच. एकीकडे वाहनां-कारखान्यांमुळे जमीन-हवा-पाणी यांचे प्रदूषण, दुसरीकडे कच्चा माल म्हणून नैसर्गिक साधनसंपत्तीची अनियंत्रित लुट, तर तिसरीकडे निसर्गातील मर्यादित इंधनाचा असंतुलित वापर असे हे अतिक्रमण आहेच. परंतु या सर्वांवर ताण आणि अतिशय घातक असे नवनवीन धोके निर्माण होत आहेत. उदाहरणार्थ, अनेक नैसर्गिक घटकांसाठी कृत्रिम पर्याय शोधून काढण्यात येत आहेत. परंतु त्यांच्या विल्हेवाटीची प्रचंड मोठी समस्या आता निर्माण झाली आहे कारण नैसर्गिक घटकांसारखा त्यांचा नैसर्गिक विनाश होत नाही. जीवनाच्या प्रत्येक कोपर्या त पोहोचलेल्या प्लास्टिकच्या लाखो कचर्याटचे काय करायचे हा भयंकर प्रश्न आहे, कारण प्लास्टिक नैसर्गिकरीत्या सडून-कुजून पर्यावरणात सामावून जाणारा – bio-degradable – घटक नाही.
मानवाचा नैसर्गिक प्रक्रियांमधील हस्तक्षेप अशा प्रकारे वाढत चालला आहे की भविष्याच्या कल्पनेने मन हादरून जावे. ज्ञानाची अत्युच्च शिखरे पादाक्रांत करणारे आधुनिक तंत्रज्ञान माणसाचा कडेलोट तर करणार नाही ना हा गंभीर प्रश्न आहे. जेनेटिक इंजिनियरिंग या एका शाखेतील प्रगती’ या धोक्यांचे उदाहरण म्हणून पुरेशी आहे. या शाखेत प्राणि-वनस्पतींची वैशिष्ट्ये व गुणधर्म ज्यांवरून ठरतात त्या गुणसूत्रांमधे हस्तक्षेप करून हव्या त्या गुणधर्माचे प्राणि-वनस्पती निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे. अफाट लोकसंख्येने उभ्या केलेल्या अनेक अवाढव्य मागण्यांमुळे कमी श्रमात, कमी वेळात जास्त उत्पादन देणार्यास, उत्तम रोगप्रतिकारक प्राणी-वनस्पतींच्या जाती हव्याच आहेत. परंतु एकतर त्यामुळे निसर्गातील जैविक विविधता नष्ट होत आहे. (शिवाजीच्या काळात तांदळाच्या चौतीस हजार जाती माहीत असणार्यानमहाराष्ट्रात या शतकाअखेर केवळ दहा ते पंधराच जाती लागवडीत असतील असा एक अंदाज आहे.) आणि दुसरे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे यातून अतिशय गंभीर (विशेषतः नैतिक) प्रश्न उभे होत आहेत. या शास्त्राच्या व्याप्तीत मानवही समाविष्ट असून आता ‘ग्राहकांना हव्या त्या गुणधर्माचे (केस-डोळ्यांचा रंग, चेहर्यापचे स्वरूप, कातडीचा वर्ण, इ.) मूल – डिझाईनर बेबी – देऊ शकण्याचा दावा करण्यात येत आहे. थोड्या विचारांती हे सहज लक्षात येईल की या अशा प्रकारच्या संशोधनात भयंकर अनर्थाची बीजे दडली आहेत. पन्नास वर्षांपूर्वी आण्विक शास्त्रांनी उभे केलेले प्रश्न पुन्हा नव्या धोक्यांसह उभे होत आहेत. जेनेटिक इंजिनियरिंगसारख्या शास्त्रांची उपयुक्तता निर्विवाद आहे. पण त्यातल्या प्रगतीवर विवेकाचे नियंत्रण नसल्यास अनर्थ निश्चितच होईल.
(३)
पर्यावरणाला असणारा धोका आणि त्यानुषंगाने येणार्या् समस्या यांवर उत्तर शोधणे सोपे नाही. मुळात ह्या सर्व समस्यांचे स्वरूप आणि संभाव्य व्याप्ती अजून पूर्णपणे कळलेली नाही. शिवाय त्या सर्व गुंतागुंतीच्या व परस्परावलंबी आहेत. भारताचा विचार केल्यास यात विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीची जास्तीची अडचण आहेच. पर्यावरण संतुलन कसे राखावे या प्रश्नाला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पैलूंसोबत धार्मिक-सांस्कृतिक पैलूही येथे आहेत.
या प्रकरणातील गुंतागुंत दाखवण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. संपूर्ण सजीवमात्रांना ऑक्सिजन पुरवणारे नैसर्गिक कारखाने म्हणजे जंगले, आणि पर्यावरण संतुलन ढासळण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलांच्या प्रमाणात होत असलेली धोकादायक घट. यावर एक तातडीचा उपाय म्हणजे निदान आहेत ती जंगले वाचवणे. पण वाढत्या लोकसंख्येच्या अन्न-निवार्यातसाठी, देशाचा विकास करणारे उद्योगधंदे व धरणे यांसाठी, रस्त्यांसाठी, जमीन हवी. त्यामुळे पर्यावरण की देशाचा सामाजिक-आर्थिक विकास हा प्रश्न निर्माण होतो. याशिवाय जंगलांच्या विनाशासोबत पूर्वापार त्यांच्या आधाराने जगत असलेली आदिवासी संस्कृती नष्ट होण्याचा प्रश्न आहेच, एका आदिवासी संस्कृतीला जबरदस्तीने अपरिचित असह्य आधुनिक संस्कृतीत आणण्याचा आपल्याला अधिकार आहे का हा नैतिक प्रश्न देखील आहे. दुसरीकडे जंगले वाचवण्यासाठी संरक्षित क्षेत्रे घोषित केली तर परंपरेने त्यावर अवलंबून असणार्या. जनतेच्या सरपणाचा, चराई हक्काचा, निस्तार हक्काचा, जंगली उत्पादने वापरण्याच्या हक्काचा प्रश्न उभा राहतोआणि अशी जनसंख्या भारतात तरी बरीच मोठी आहे.
या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-नैतिक प्रश्नांपलीकडे, त्यांवर कुरघोडीकरणारे व त्या प्रश्नांना बर्यानचदा पटावरील मोहन्याप्रमाणे वापरणारे राजकीय प्रश्न आहेतच. अमुक एका नेत्याच्या मतदारसंघात होऊ घातलेले धरण त्याच्यासाठी अस्मितेचा प्रश्न होतो, आणि ‘धरण म्हणजेच विकास’ या टोकाने तो बालू लागतो. दुसर्या‍ टोकाने ‘धरण म्हणजेच विनाश’ अशा भूमिकेचे विरोधी गट तयार होतात. परिस्थितीचा फायदा घेऊन आदिवासींचे, विस्थापितांचे, धरणग्रस्तांचे नेते तयार होतात.‘धरण झालेच पाहिजे’ व ‘धरण मुळीच नको असा गदारोळ सुरू होतो. जणू काही हे दोनच पर्याय आहेत असा देखावा निर्माण होतो. दोन्ही बाजूंनी काही ठोस व तथ्यपूर्ण मुद्दे असल्यामुळे काहीतरी मधला मार्ग काढला पाहिजे याचा विसर पडतो. वस्तुनिष्ठ अभ्यासावर आधारित, शास्त्रशुद्ध पर्यावरणवादी भूमिकेला कुठेच स्थान नसते. अर्थात् ही शोकांतिका भारताप्रमाणे सर्वत्रच आहे.
भारतात प्राचीन कालबाह्य परंपरांचा अनिष्ट पगडा आणि धार्मिक व इतर अंधश्रद्धांचा प्रभाव ही आणखी एक महत्त्वाची अडचण आहे. याचाच परिणाम म्हणजे जनतेत जाणिवेचा व विवेकाचा धोकादायक अभाव! पर्यावरणाच्या मुळाशी येणारी समस्या म्हणजे लोकसंख्यावाढ. परंतु ह्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यात परंपरागत समजुती व श्रद्धा यांचा मोठा अडसर आहे. भारतात करोडोंच्या संख्येत अनुत्पादक किंवा अल्प उत्पादक गाई-बैल आहेत. त्यांच्या चायाच्या व निवार्यााच्या निमित्ताने पर्यावरणावर फार मोठा ताण पडत आहे. पण ह्या प्राण्याला देवतास्वरूप मानल्यामुळे त्यांच्या विल्हेवाटीचा कोणताही प्रश्न संवेदनशील बनत आहे. अशा प्रसंगात आपल्या श्रद्धा बाजूला ठेवून वस्तुनिष्ठपणे विचार करणे अत्यावश्यक आहे.
भारतासारख्या देशात पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर एकत्रित प्रयत्न होणे जरूरीचे आहे. आजपर्यंत प्रगत देशांनी भारतासारख्या विकसनशील आणि इतर अविकसित देशांवर पर्यावरणाला हानी पोहचवण्याचा आरोप केला. परंतु हा आरोप खोटा असून उलट प्रगत पाश्चात्य राष्ट्रांकडूनच पर्यावरणाचे जास्तीत जास्त नुकसान झाले आहे व होत आहे हे आता स्पष्ट झाले आहे. परंतु याच प्रगत राष्ट्रांनी पर्यावरण वाचवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडी घेतली आहे. असेच प्रयत्न येथेही आवश्यकआहेत.
भारतातील परिस्थितीच्या अनुषंगाने काही बाबी प्रामुख्याने पर्यावरण-रक्षणात समाविष्ट कराव्या लागतील. एक, शक्य त्या सर्व माध्यमांतून जनजागृती. दुसरे, देशाच्या आर्थिक-औद्योगिक धोरणांतील पर्यावरणविषयक कलमांचे व तरतुदींचे जाहीर मूल्यमापन करणे व त्यांना अधिक व्यापक व वस्तुनिष्ठ करणे. तिसरे, पर्यावरणरक्षणासाठी केलेल्या तरतुदींचा कडक अंमल. चवथे, आपल्या शेती करण्याच्या पद्धतींतून निर्माण होत असलेल्या धोक्यांवर उपाय करणे. पाचवे, पाणी व कचरा व्यवस्थापन(वॉटर व वेस्ट मॅनेजमेंट) यासाठी राष्ट्रव्यापी धोरण व मोहीम उभी करणे. सहावे, पुनर्वापराचे तंत्रज्ञान (रिसायक्लिग टेक्नॉलॉजी) विकसित करून त्याचे प्रचंडजाळे उभारणे, इत्यादि.
एकूणच पर्यावरण हा राष्ट्रीय विषय आहे आणि त्याला तसे महत्त्व देणे अपरिहार्य आहे. या विषयाचे स्वरूप अतिशय व्यापक आणि गुंतागुंतीचे आहे. प्रस्तुत लेखात केवळ काही अंगेच विचारात घेता आली आहेत. सरतेशेवटी, हेन्रीे थोरोच्या शब्दांत एवढेच म्हणता येईल की जर आपल्याजवळ एक चांगला, सुंदर आणि स्वच्छ ग्रहच नसेल तर त्यावर राहण्यासाठी सुंदर बंगला बांधण्याचा काय उपयोग? आपल्याला हा ग्रह उपयुक्त वातावरण, सुपीक जमीन आणि पिण्याच्या चांगल्या पाण्यासह मिळाला आहे. यापेक्षा चांगल्या अवस्थेत शक्य नसेल तरी किमान आहे त्या अवस्थेत तरी आपण तो आपल्या लेकरांकडे सोपवू या!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.