ईश्वरावरील श्रद्धा आवश्यक?

आम्हाला नांदेडचे श्री सुभंत रहाटे यांचे पुढे दिलेले पत्र आले आहे.
प्रा. दि. य. देशपांडे
देव असो वा नसो, देवावर विश्वास ही कित्येकांची मानसिक गरज असते. आपल्या दुःखाचे व काळजीचे ओझे देवाच्या डोक्यावर टाकले की आपला भार हलका होतो. देवावर श्रद्धा असणारा माणूस ऐहिक अडचणींनी खचून जात नाही. मानसिक ताण कमी करण्यापुरते देवाचे अस्तित्व कबूल करणे आवश्यक बनते, अशी एक मांडणी केली जाते. या मांडणीत ग्राह्यांश नाही का? विवेकवाद्यांचे या प्रतिपादनाला काय उत्तर आहे?
सुभंत रहाटे
रोहिणी सदन, कैलासनगर
वर उल्लेखिलेले मत फार मोठ्या प्रमाणावर व्यक्त केले जाते. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
श्री. रहाटे म्हणतात की ईश्वर असो वा नसो, त्याच्यावर विश्वास ठेवणे ही अनेकांची मानसिक गरज असते. पण देवावर विश्वास ठेवायचा म्हणजे देव आहे हे मानायचे. म्हणजे त्याकरिता ईश्र्वैराच्या अस्तित्वाचे कसलेही, अंशतःही निर्णायक प्रमाण नाही, उलट त्याच्या अस्तित्वाला बाधक असा पुष्कळ निर्णायक पुरावा आहे, इत्यादि गोष्टींचे ज्ञान त्या मनुष्याला असून चालणार नाही. निदान नास्तिकांचे युक्तिवाद त्यांच्या कानावर गेले असले तरी त्याच्या मूळ श्रद्धेला धक्का लागता कामा नये. हे सहज शक्य आहे. कारण आपल्या समाजात आस्तिक्याचे वातावरण इतके सार्वत्रिक आणि दाट आहे की इथे जन्मलेले प्रत्येक मूल अल्पवयापासूनच ईश्वरवादी बनते, आणि मग त्याला प्रौढपणी विवेकवाद्यांचे विरोधी युक्तिवाद पटणे अशक्य होऊन जाते. विशेषतः मोठमोठे विद्वान लोक, थोर महात्मे आस्तिक असल्यामुळे विवेकवाद्यांचे आक्षेप फसवे आणि उपेक्षणीय असले पाहिजेत अशी त्याची धारणा बनते.
श्री. रहाटे यांचे ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीचे मत काय आहे ते मला माहीत नाही. पण निदान युक्तिवादाकरिता ते ईश्वर नाही (किंवा तो नसेल) हे मानायला तयार आहेत,आणि त्या पक्षीही ईश्वरावरील श्रद्धा ही उपयुक्त असते असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे पुढील विवेचनात ईश्वर नाही हे गृहीत धरून युक्तिवाद करावयाचा आहे.
आता ईश्वर नसूनही जर त्याच्यावरील श्रद्धेने आस्तिकाचा दुःखभार हलका होत असेल तर त्याचे कर्तृत्व ईश्वराकडे नसणार हे मान्य करावे लागेल. ती शक्ती ईश्वराची नसून ईश्वरावरील श्रद्धेची आहे असे मानावे लागेल. पण श्रद्धेचे कार्यक्षेत्र मानसिक असणार; म्हणजे श्रद्धेने साध्य होणार्याअ गोष्टी मानसिक, मानसशास्त्रीय असणार. श्रद्धेचे सामर्थ्य मनाबाहेरील जगात, भौतिक जगात, चालत नाही हे गृहीत धरावयास हरकत नाही. मानस विश्वातील काही गोष्टी सोडून दिल्या तर अन्यत्र श्रद्धेची मात्रा चालू शकणार नाही. उदा. श्रद्धेने एखाद्या मानस विकारावर विजय मिळविता येईल, पण शारीर आजारांच्या बाबतीत ती निरुपयोगी ठरणार.
पण श्रद्धावादी म्हणेल की आम्ही श्रद्धेने भौतिक सृष्टीत काही बदल घडवून आणता येतात असे म्हणतच नाही. आम्ही एवढेच म्हणतो की श्रद्धेने दुःख सुसह्य होते, आपत्तींना तोंड देण्यास सामर्थ्य लाभते. हे म्हणणे खरे आहे की नाही?
या प्रश्नाला उत्तर देण्याकरिता आपण एक उदाहरण घेऊ. समजा आपल्या प्रिय माणसाला एखादा दुर्धर रोग झाला आणि त्यात तो दगावण्याची शक्यता आपल्याला दिसते. अशा परिस्थितीत ईश्वरावर आपला भार टाकून आपण आपली चिंता हलकी करू शकतो म्हणजे काय याचा विचार करू. समजा आपला असा पक्का विश्वास आहे की ईश्वर आपले वाईट करणार नाही, आणि आपण त्यामुळे निश्चित आहोत. परंतु त्यामुळे आजार्याकच्या आजारावर काहीही परिणाम होऊ शकत नाही. त्याला झालेल्या व्याधीचा जोर, त्याला मिळणारे औषधपाणी, इत्यादि गोष्टींनी तो बरा होणार की दगावणार हे ठरणार. तेव्हा चिंताजरी कमी झाली तरी कदाचित् रोगी दगावेलही. मग त्यात ईश्वरावरील विश्वासाचा काय उपयोग होईल?यावर कोणी म्हणेल की ईश्वरावर विश्वास असँणे म्हणजे तो आपले कदापि वाईट करणार नाही अशी खात्री बाळगणे. त्यामुळे जे ईश्वर करील त्यात आपले भलेच आहे असे आस्तिकाला वाटते. ईश्वराच्या मनात जे असते तेच होते या विश्वासाने जे घडते ते स्वीकारण्यास मदत होते.
आता जर ईश्वरावरील श्रद्धा या कोटीची- म्हणजे जे होईल ते ईश्वराच्या मर्जीने होईल याविषयी पूर्ण खात्री या कोटीची असेल तर तिच्यामुळे काही लोकांचे दुःख सुसह्य होते हे मान्य करावयास हरकत नाही. पण या कोटीची श्रद्धा फारच थोड्यांची – जवळपास स्थितप्रज्ञाचीच असते. बाकीच्या लोकांची श्रद्धा तिला अनुकूल परिणाम दिसतात तोवर टिकते, पण नंतर निरुपयोगी ठरते. आपल्या समाजातील बहुतेक सर्वच जवळजवळ ९९% लोक ईश्वरावर विश्वास ठेवणारे असतात. श्रद्धावाद्यांचे म्हणणे खरे असेल तर समाजातील बहुतेक सर्व लोक धैर्याने शांतपणे संकटांना सामोरे जाणारे, आपत्तींनी खचून जाणारे असावयास हवेत. पण तसे दिसत नाही.
परंतु हा विचार अश्रद्ध माणसालाही वर्ण्य आहे असे मानण्याचे कारण नाही. तो ईश्वराची इच्छा, त्याची योजना यांची भाषा वापरणार नाही. परंतु ज्या विचाराने सश्रद्ध मनुष्य स्वतःला सावरू शकतो तो विचार ईश्वरेच्छा नाकारूनही त्याला बळ देऊ शकतो. अश्रद्ध मनुष्य असा विचार करू शकतो की आपले ज्ञान आणि शक्ती मर्यादित आहेत, त्यामुळे आपल्यावरील संकटांचे निराकरण आपण नेहमीच करू शकत नाही. आपल्या सामथ्र्यानिशी पूर्ण प्रयत्न केल्यानंतरही एखादे अनिष्ट आपल्यावर कोसळले तर त्यामुळे खचून न जाता आपले जीवन सावरण्याचा प्रयत्न करणे ह्यातच आपले हित आहे. हा विचार स्वाभाविक आणि समंजसपणाचा आहे. शेवटी श्रद्धावाद्यालाही याच विचाराचा आश्रय घ्यावा लागतो. त्यात फरक एवढाच आहे की अश्रद्ध मनुष्य निसर्गाची वाटचाल अपरिहार्य आहे असे मानून शोक व्यर्थ आहे असे ठरवितो. तर सश्रद्ध मनुष्य ईश्वरेच्छा बलीयसी असे म्हणून शोक आवरतो. भारतीय युद्धाच्या आरंभी अर्जुनाचा विषाद घालविण्याकरिता श्रीकृष्णाने वापरलेल्या युक्तिवादांपैकी एक युक्तिवाद ‘तस्मादपरिहार्येऽर्थेन त्वं शोचितुमर्हसि हाचहोता.
शेवटी एक विचारमांडावासा वाटतो. आरंभी म्हटल्याप्रमाणे सश्रद्धाची श्रद्धा विवेकवाद्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षित जपून ठेवावी लागते. हे करण्याकरिता त्यालाआपल्या बुद्धीला पूर्ण रजा द्यावी लागते. बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने मिळेल त्या भल्याबुच्या कल्पनांचा आश्रय करावा लागतो. लहान मुलाला ज्याप्रमाणे आपण परीकथा सांगून भुलवितो तसा सश्रद्ध माणूसही कशानेही भुलतो. अनेक गोष्टी लहान मुलाच्या आकलनाबाहेर असल्यामुळे त्याला परीकथा सांगणे अपरिहार्य असते. पण प्रौढानेही त्याचप्रकारच्या दिलाश्याची अपेक्षा करणे ह्यात आपण अजून बालक आहोत याची कबुली देणे आहे. हे कितपत समंजस आहे, सुबुद्ध मनुष्याला शोभणारे आहे याचा सश्रद्धांनी विचार करावा

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.