दुबळी माझी झोळी!

वेताळ विक्रमादित्याच्या खांद्यावरून बोलता झाला : “राजा, तू मोठा विचारवंत आहेस. आपल्या प्रजेचे हित, न्याय, समाजव्यवस्था, मानवांचा स्वतःची उन्नती करायचा मूलभूत हक्क, असल्या विषयांवरची तुझी विवेकी, मानवतावादी आणि उदार मते सर्वांना माहीत आहेत. परंतु मला नियतीने नेमून दिलेले काम आहे, ते तुला गोंधळात टाकण्याचे. याच उद्देशाने मी तुला एक घडलेली घटना सांगतो. या घटनेसारख्या घटना घडू नयेत असे सर्वांनाच वाटते, ही माझी सुद्धा खात्री आहे. तर माझ्या कहाणीच्या शेवटी तू सांगायचे आहेस, की असल्या घटना कशा टाळाव्या. तुला नेमके उत्तर सांगता आले, तर मी माझ्या शिराचे सहस्र तुकडे करून ते एकेक करून तुझ्या चरणी-वाहीन. जर तू उत्तर चुकीचे दिलेस, तर मात्र तुला या भारतवर्षात जगायला नालायक ठरवून मी तुला “ग्रीन कार्ड” देऊन अमेरिकेत पाठवीन! तरी तू कहाणी मनोभावे ऐक.
तुला आठवतच असेल की एकेकाळी या देशावर एका जवाहर नामक राजाचे राज्य होते. उच्च कोटीचे तंत्रज्ञानच या देशाला प्रगत करील असा त्या जवाहर राजाचा समज होता.आणि यासाठी भारतात उच्च कोटीचे तंत्रज्ञ घडवणे आवश्यक होते. तर एका विधानचंद्र राय नामक सामंत्मच्या सल्ल्याने व भूतलावरील इतर राजांच्या साहाय्याने जवाहराने उच्च तांत्रिक शिक्षण देणान्या काही संस्था सुरू केल्या. त्यांना “आयायट्या” असे नाव आहे.
कल्पना अशी होती, की माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या मुलामुलींपैकी एक हजार हुषार मुले एका प्रवेश-परीक्षेद्वारे निवडायची. अशा मुलांना जगातील सर्वांत अद्ययावत अशी तंत्रविद्या द्यायची. असे केल्यानंतर हे उच्च कोटीचे तंत्रज्ञ या समाजाला आपोआपच भौतिक प्रगतीच्या वाटेवर नेऊन सोडतील. मग त्या प्रगतीची फळे चाखणे, हेच या समाजाने करायचे! तर आज चाळीसेक वर्षे या आयायट्या दर वर्षी हजारभर तंत्रज्ञ पैदा करीत आहेत. परंतु या तंत्रज्ञांची भौतिक प्रगती जरी बरीच झाली असली, तरी एकूण समाज म्हणावा तेव्हढा प्रगत झालेला नाही हे तू जाणतोसच. परंतु जवाहराचा स्वप्नभंग यावर तुला मी आज प्रश्न विचारीत नाही.
आयायट्यांमधून बाहेर पडणारे तंत्रज्ञ ही जागतिक बाजारपेठेत एक उच्च दराने विकाऊ असलेली “कमॉडिटी” आहे, हे राजा, तुला ठाऊक असेलच. त्यामुळे या संस्थेतयेनकेनप्रकारेण प्रवेश मिळविण्याची अनेकांना इच्छा असते.
मी जरी “येनकेनप्रकारेण” म्हटले, तरी याचा सामान्यपणे भारतात जो अर्थ घेतात, तो येथे घ्यावयाचा नाही. आयायट्यांच्या प्रवेशपरीक्षेचे पेपर “फोडणे, वा पुढेही परीक्षकांना भेटून गुण “वाढवून घेणे, अशा क्रिया पैसे देऊन किंवा वशिला लावून करवून घेता येतनाहीत, अशीच आजवरची ख्याती आहे. हे एक आश्चर्यच असले तरी ते खरं आहे. तरी, हे विक्रमादित्या, तू तुझ्या चेहेर्याकवरचे ते तुच्छतादर्शक स्मित पुसून टाक!
मी जे “येनकेन प्रकार” म्हटले, ते वेगळ्या जातीचे आहेत. तुला ठाऊकच आहे, की या देशात प्रत्येक राजकारणी पुरुष व स्त्री कोणत्या तरी भौगोलिक, धार्मिक किंवा जातीय गटाचे प्रतिनिधित्व करतो किंवा करते. तर आपल्या विशिष्ट गटाला या आयायट्यांमध्ये प्रवेश मिळणे सोपे जावे, यासाठी अनेक राजकारण्यांचे प्रयत्न सुरू असतात, व ते विधिवत् मार्गानेच असतात. आता लोकशाही राज्यांमधील लोकप्रतिनिधींनी अशा गटांपुरते स्वतःला मर्यादित ठेवणे योग्य आहे काय, असे जर तू विचारशील तर तुच्छतेचे स्मित माझ्या चेहेर्याअवर उमटेल. पण ते असो!
तर या लोकांच्या प्रयत्नांमुळे जाती-जमातीनिहाय जागा राखण्याचे तत्त्व आयायट्यांनाही लागू झाले. जवाहरराजा व बिधानचंद्र सामंत यांना केवळ गुणवत्ताच आयायट्यांच्या प्रवेशाची कसोटी असावी असे प्राचीन काळी वाटत असे. त्यांना आज जर तेथे आरक्षण दिसले तर त्यांना ही पथभ्रष्टता वाटेल हेही खरे. पण जर त्या दोघा दिग्गजांना आजवर आयुष्य व सत्ता लाभली असती, तर त्यांनीही जातीनिहाय जागा राखल्या असत्या. कारण ते साधेसुधे नव्हे, तर मुरब्बी राजकारणी होते व राजकारण ही शक्यतेची कला होय.
परंतु आयायट्यांमध्ये शिकविणार्यांाना व एकूणच त्या संस्था चालवणार्यां ना गुणवत्ता टिकविणे महत्त्वाचे वाटत असते. जसजशी प्रवेश घेऊ इच्छिणार्यांाची संख्या वाढत होती, तसतसे हे संस्थाचालक प्रवेश-परीक्षा जास्त जास्त अवघड करू लागले. यात हेतू हा असे, की विद्यार्थी कितीही असोत, केवळ हजारभर अत्युत्कृष्ट तेवढेच परीक्षेतून निवडले जावे. आता राजा, तू विचारशील की तंत्रज्ञानासारख्या पूर्णपणे उपयुक्ततेवर भर देणार्याष देशातील गुणवत्ता केवळ एका किंवा काही परीक्षांवर जोखणे कितपत योग्य आहेतर हा प्रश्न येथे गैरलागू आहे. मी केवळ घडले काय, ते सांगत आहे.
प्रवेश-परीक्षा अत्यंत अवघड करणे, याने निवड सोपी होणार नाही, कारण एखादे वेळी सार्याथच परीक्षार्थीना शून्य गुण मिळतील! तर परीक्षेचा अवघडपणा परीक्षार्थीच्या गर्दीप्रमाणे बदलावा लागतो. राजा, या संस्था चालवणार्यांरनी यावर बराच तरल विचार केला आहे, आणि आपले गुणवत्ता (किंवा परीक्षांमधून दिसते, ती गुणवत्ता) टिकविण्यावरचे प्रेम सिद्ध करायला या आचार्यांनी एक “कट-ऑफ” नामक संकल्पना घडविली आहे. परीक्षार्थीपैकी गुणानुक्रमे एक हजारांना घ्यायचे, असे न करता “ज्यांना साठाहून जास्त गुण पडतील अशांना घ्यावे, व यातही एक हजाराची मर्यादा राखावी’, असा नियम केला आहे.
आता जेव्हा जातीनिहाय जागा राखण्याचा प्रश्न आला, तेव्हा ती संकल्पना व कट-ऑफ यांचा मेळ घालणे आवश्यक झाले. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर आज असेसाधारण चित्र आहे, की ज्या अनुसूचित जाती, जमाती, मागास जाती, जमाती वगैरेंसाठी राखीव जागा ठेवायच्या त्यांना प्रवेश-परीक्षेतील गुणांचा कट-ऑफ तीस टक्के व इतरांना साठ टक्के. या प्रमाणांचा वापर केल्यास साधारणपणे राखीव जागांचे प्रमाण अपेक्षेइतके जुळते.
सो फार सो गुड, राजा, येथपर्यंत ठीकच आहे. आता एक वेगळाही प्रकार या प्रवेशांमध्ये घडतो आहे. तुला जाणवलेच असेल की आता इंग्रजी माध्यमाकडे आपण वळत आहोत!
पूर्वी प्रवेश-परीक्षेत चार भाग असत. गणित, भौतिकी व रसायनशास्त्र या तांत्रिक विषयांसोबत “इंग्रजी व सामान्य ज्ञान” असाही एक भाग असे. जगातील अद्ययावत तंत्रज्ञान गोळा करून जर गुणवंत भारतीयांना द्यायचे, तर शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच हवे, या तत्त्वास अनुसरून प्रवेश-परीक्षेत इंग्रजीचे ज्ञान तपासले जात असे.
पण भारतात इंग्रजी ही केवळ भाषाच नव्हे, तर सामाजिक विषमता टिकविण्याचे महत्त्वाचे साधन आहे, असे बहुतेक लोकप्रतिनिधी व प्रशासक मानतात, हे मी तुला सांगायला नकोच. भाषा काही क्षेत्रांत ज्ञानभांडाराची गुरुकिल्ली असू शकते, व नेमक्या त्याच वेळी इतर क्षेत्रांत दडपशाहीचा दंडुका होऊ शकते, असे तूच मागे बोलला होतास, ते आठव. परंतु तुझे विचारी तोलून मापून घडलेले मत आणि राजकारण्यांची मते यात फरक असणारच.
तर आधी प्रवेश-परीक्षेतून इंग्रजीचे उच्चाटन झाले. सोबत “सामान्य ज्ञानाचीही गरज उरली नाही. आजच्या तंत्रज्ञांना त्यांच्या क्षेत्राबाहेर काहीही माहीत नसते – पण तो मुद्दा अलाहिदा. प्रवेशासाठी इंग्रजीची प्रश्नपत्रिका उरली नाही, पण इतर तीन विषयांत परीक्षेचे माध्यम मात्र इंग्रजीच राहिले. या असह्य दडपशाहीवर इलाज म्हणून एक वेगळा मार्ग काढला गेला. प्रवेश-परीक्षांसाठी कोणतीही अनुसूचित भारतीय भाषा माध्यम म्हणून योग्य ठरवली गेली. आणि राजा, दार किलकिले करायच्या या कृतीमुळे सुटकेचा निःश्वास सोडून काही मुले-मुली मराठी, बंगाली, गुजराती वगैरे भाषांमधून प्रवेश-परीक्षा देऊ लागली.
यापैकी काही मुले परीक्षेत निवडली जाऊन आयायट्यांमध्ये दाखलही होऊ लागली. एकदा का आयायट्यांमध्ये शिरले, की मग मात्र इंग्रजीला पर्याय नाही. ज्या पातळीचे तंत्रज्ञान विद्याथ्र्यांना या संस्थांमधून दिले जाते, ते केवळ इंग्रजीतच उपलब्ध आहे. तर इंग्रजी सोडून इतर माध्यमांतून प्रवेश घेतलेल्यांसाठी एक जलद, “इंटेन्सिव्ह’ असा इंग्रजीचा अभ्यासक्रम घडविण्यात आला! इतर तांत्रिक अभ्यासक्रमांसोबतच या इंग्रजीतर विद्याथ्र्यांसाठी हा इंग्रजीचा“डोज” पिणे आवश्यक केले गेले.
परंतु यासाठी जास्त वेळ घेणे मात्र कोणालाच मान्य नव्हते. विद्याथ्र्यांना झटपट तंत्रज्ञ होऊन देशाची भौतिक प्रगती करायची आस –व शिक्षक-संस्थाचालकांना केवळ एका भाषेच्या शिक्षणासाठी जास्त वेळ देणे नामंजूर!
तर राजा, एक टैंकरभर तेल जाळून मी तुला ही पाश्र्वभूमी सांगितली. आता तुला प्रत्यक्ष घटना सांगतो.
पूर्व भारतातील बंगाल प्रांतातील एका “अनुसूचित जमातीतील एक मुलगी शालेय शिक्षणात बर्यातपैकी गती दाखवीत असे. इंग्रजी हा विषय म्हणजे शत्रुपक्ष, परंतु हे काही अपवाद मानण्याजोगे नव्हतेच. तर या मुलीने आयायट्यांमध्ये प्रवेश घ्यायचे ठरवले. मातृभाषा बंगाली, तर त्याच माध्यमातून प्रवेश-परीक्षा दिली, आणि “हलक्या” कटऑफच्या मदतीने तिची निवडही झाली.
राजा, एक मागासवर्गीय मुलगी एका उच्च तंत्रनिकेतनात प्रवेशासाठी निवडली जाणे, हे आश्चर्य घडले. ती, तिचे कुटुंबीय, तिचे शिक्षक, तिचे स्नेही-सोबती, या सान्यांना झालेला हर्ष, या सार्यांिनी पाहिलेली स्वप्ने, हे सगळे मी तुझ्या कल्पनाशक्तीवर सोडतो. काय तिच्या पित्याला हुंड्याचे ओझे कोणी पिसाप्रमाणे अलगद उचलून घेतल्याचा भास झाला?काय तिच्या शिक्षकांना अरिस्टॉटल व दोमनाचार्यांना जाणवलेला कृतकृत्य भाव जाणवला? पण असो. तुझ्यापाशीही कल्पनाशक्तीचा तुटवडानाहीच.
मुलगी सारा उपखंड ओलांडून मुंबईतील आयायटीत दाखल झाली. ज्या इंग्रजीने आजवर दगा दिला, त्या भाषेचाच एक जड अभ्यासक्रम आता करायचा होता. आणि त्याच काळात, तीच भीतिदायक भाषा वापरून अनेक अवघड व नवीन विषयही शिकायचे होते. मूळ गावी या चुणचुणीत मुलीचे कौतुक होत असे. शिक्षक व इतर सारे तिच्या समस्या सोडविण्यास उत्सुक असत. आता ती हुषार विद्याथ्र्यांमध्ये गणली जात नसे. उलट उच्चवर्गीय, उच्चवर्णीय, वाघिणीच्याच दुधावर पोसलेल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या संचात ही मुलगी जवळपास मतिमंद गणली जाऊ लागली.
शिक्षक अगम्य भाषेत काही तरल असे सांगत. ते समजले नाही म्हणून विचारावयास जावे, तर अधिकच अगम्य “स्पष्टीकरणे” मिळत. तिकडे इंग्रजी शिकताना सतत जाणवे की नवी भाषा सहज शिकण्याचे वय आता गेलेले आहे. आणि हेही जाणवे, की आपल्याला मूळ भाषाच नव्हे, तर तिची एक कठीण, “जार्गनयुक्त’ उपभाषा शिकणे आहे. आणि या सान्याला आवश्यक असे भरपूर वेळेचे स्वातंत्र्य नव्हते. उलट अपार दबावाखाली सारे करणे भाग होते. राजा, ही मुलगी पहिल्या दोन वर्षांत, म्हणजे चार शैक्षणिक सत्रांत, एकाही विषयात उत्तीर्ण होऊ शकली नाही, याचे तुला आश्चर्य वाटायला नको.
सख्या-सोबत्यांना जे उघड, सोपे, सहज वाटे, ते या मुलीला घाबरवत राक्षसी रूपात पुढे येई. परंतु उच्च शिक्षणात आजकाल बराच लवचीकपणा आहे. एखादा विषय ठरीव काळात झेपला नाही, तरी “वर्ष वाया जाऊ देत नाहीत. पण पुढील वर्षातही वेगळे विषय, अधिक अवघड अभ्यासक्रम असतात. त्यांच्याशी झगडत जुनेही “शत्रू’ जिंकायचे असतात.आणि राजा, इंग्रजी!
इकडे संस्थाचालकांनाही शासकीय बंधने होतीच. तर त्यांनी या मुलीला एक प्राकारिक”, “प्रो-फॉर्मा” पत्र पाठविले, की जर येत्या परीक्षेत सुधारणा दिसली नाही, तर तिचा आयायटी प्रवेश रद्द समजण्यात येईल. राजा, मागे वापरलेली तुझी कल्पनाशक्तीरिव्हर्स गियरमध्ये चालव. दोन वर्षे व हजारो रुपये घालवून, लाक्षणिक अर्थाने मागील दोन पायांमध्ये शेपूट घालून गावी परतण्याचे दृश्य नजरेपुढे आण.
मुलीच्या नजरेसमोरही ते आलेच असेल. त्यावर अनेक तास, दिवस, आठवडे खिन्न विचारही झाला असेल. अखेर मुलीला जीवशास्त्र, शरीरशास्त्र, गुरुत्वाकर्षण व एक दोरखंड यांची संयुक्त आठवण झाली. तिने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
राजा, मी यापुढे काही बोलू इच्छीत नाही. घटना तुझ्यापुढे आहे. टाळावी कशी, ते सांग.”
विक्रमादित्याचा वेग मंदावला होता. खांद्यावरच्या ओझ्यात विचारांच्याओझ्यांची भर पडली होती. परंतु राजा सच्चा भारतीय उदारमतवादी होता. त्याला प्रत्येक प्रश्नाच्या दीड-सहस्र बाजू दिसत. मुलगी, पालक, शिक्षक, आयायट्यांचे चालक, त्यांच्या प्रवेश परीक्षांचे नियामक, तंत्रविद्येचे शिक्षक, मुलीचे शाळेतील व आयायटीतील सहाध्यायी सान्यांच्या बाजू त्याला दिसत होत्या.
एक दीर्घ सुस्कारा सोडून राजा म्हणाला, “वेताळा! तू मला गोंधळवण्याचे तुझे काम केलेस. पण वैचारिक तत्त्वे कृतीत उतरवताना जर अनपेक्षित दुष्परिणाम घडले, तर वापरायचे भारतीय तंत्र तुलाही ठाऊक असेलच. तर घटना टाळण्याचे विसर आणि मजसोबत म्हण, “असले तर अधूनमधून घडतेच. याला कधी ओल्याबरोबर सुके जळण्याची उपमा देतात, तर कधी अंडी फोडल्याशिवाय ऑमलेट करता येत नाही, हा दृष्टांत देतात.”
आणि वेताळाने आपल्या शिराचा पहिला तुकडा राजाच्या चरणी वाहिला.
राजाची “सिनिसिझम’ कितपत योग्य, हा मुद्दा आजचा सुधारकच्या वाचकांनी चर्चेला घ्यावा. जमल्यास वेताळाच्या प्रश्नाचे उत्तरही द्यावे!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.