ज्या विषयाशी आपली धड तोंडओळखसुद्धा नाही त्या विषयावर टीका करणे योग्य नाही. परंतु मी असे अनेक बुद्धिप्रामाण्यवादी (किंवा विवेकवादी) लोक पाहिले आहेत जे अनेक प्रसंगी असे बोलून जातात की, ज्योतिषशास्त्रातले आम्हाला जरी काही कळत नसले तरी ते एक थोतांड आहे हे आम्हाला ठाऊक आहे. असे बोलणे विवेकवादी म्हणवणाऱ्यांना शोभत नाही. त्यांनी हा विषय निदान ढोबळ मानाने तरी समजून घ्यावा असे मला वाटते. या विषयाद्दल फार मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा बाळगणारे लोक आहेत. ही अंधश्रद्धा साधार युक्तिवाद करून दूर करणे समाजहिताचे आहे, व ते विवेकवादी लोकांचे कर्तव्य आहे.
ग्रहांच्या हालचालींचा काहीतरी गूढ असा संबंध मनुष्याच्या नशिबाशी जोडलेला आहे अशी एक मूलभूत संकल्पना गृहीत धरून ज्योतिषशास्त्राची उभारणी झाली. अशीच सर्वसामान्य समजूत आहे. परंतु ही गोष्ट फारच थोड्या लोकांना ठाऊक असेल की ज्योतिषशास्त्रातल्या फार मोठ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागांची उभारणी प्राचीन काळी जी झाली तिचा संबंध अंतरिक्षातल्या प्रत्यक्ष ग्रहस्थितीशी अजिबात नाही. अंतरिक्षातल्या ज्योतींशी काहीही संबंध नसलेले शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र हा शब्दप्रयोग म्हणजेएक वदतोव्याघात आहे असेच कुणीही म्हणेल, पण ती वस्तुस्थिती आहे. म्हणून ज्योतिष हे दुहेरी अर्थाने थोतांड आहे हे ध्यानात येईल. ज्योतिषशास्त्र या शब्दात खगोलशास्त्र व भविष्य सांगू पाहणारे जातकशास्त्र या दोन्हींचा समावेश होतो. जातकशास्त्रासाठी हल्ली फलज्योतिष हा शब्द रूढ झाला आहे, परंतु त्याचा उल्लेख ‘ज्योतिष’ या सुटसुटीत नावानेही करतात. भविष्य सांगू पाहणारे, म्हणजेच ‘फलादेश’ सांगणारे ते फलज्योतिष, त्याचा उल्लेख इथून पुढे “शास्त्र” एवढ्याच शब्दाने मी करणार आहे, (जरी ते खरेखुरे शास्त्र नसले तरी!)
शास्त्राचे अध्वर्यु असे सांगतात की Astrology is a science of correlation of the movements of celestial bodies and terrestrial affairs which means natural phenomena, physical phenomena and human psychological phenomena. In other words, astrology is a science which deals with man’s responses to planetary stimuli. (Dr. B. V. Raman quoted in “Astrology and Hoax of Scientific Temper” by Gayatri Devi Vasudeo, editor of Astrological Magazine, Page 141).
माणसाच्या जन्मवेळेची ग्रहस्थिती कशी होती ते जन्मकुंडली दर्शवते. ती ग्रहस्थितीमाणसाच्या आयुष्याचा एकूण आराखडा ठरवते, आणि पुढील आयुष्यात वेळोवेळी जी ग्रहस्थिती निर्माण होते ती या आराखड्याला अनुसरून त्या त्या वेळी विवक्षित घटना घडवते अशी या शास्त्राची थिअरी आहे. वेळोवेळी निर्माण होत जाणारी ग्रहस्थिती ही प्रत्यक्ष दृग्गोचर होणारी अशा अर्थाने तिला ‘गोचरी’ असे म्हणतात. दैनंदिन ग्रहस्थिती (म्हणजे गोचरी) पंचांगावरून कळू शकते. पंचांग हे एका वर्षापुरतेच असते. त्यापुढच्या वर्षातली गोचरी समजण्याचे साधन उपलब्ध असल्याशिवाय पुढच्या आयुष्याची भाकिते वर्तवणे शक्य होणार नाही हे उघड आहे. ढोबळ मानाने एवढे सांगता येते की या वर्षी गुरू तूळ राशीत (म्हणजे सातव्या राशीत) आहे तर आणखी ५ वर्षांनी तो मीन राशीत (म्हणजे बाराव्या राशीत) असेल. शनी दर अडीच वर्षांत एक रास ओलांडतो म्हणून त्याच्याही बाबतीत असे ढोबळ अंदाज सांगता येतात, परंतु पाच-दहा वर्षानंतरच्या अमुक एका वेळी ग्रहस्थिती नेमकी काय असेल हे सांगण्याचे कोणतेही साधन पूर्वीच्या लोकांना उपलब्ध नव्हते. असे असतानाही ते सबंध आयुष्याची भाकिते कशी वर्तवीत असत?
सांगितले तर विश्वास बसणार नाही, पण आपल्या प्राचीन काळातल्या ज्योतिष्यांनी लोकांना “बनवण्यासाठी एक युक्ति काढली, ती अशीः ग्रहांची नावे मनाला येईल त्या अनुक्रमाने ओळीने लिहायची. त्या ग्रहांच्या नावापुढे मनाला येईल तो आकडा लिहायचा, आणि असे समजायचे की त्या ओळीतल्या प्रत्येक ग्रहाचा अंमल आकड्याने दर्शवलेल्या तितक्या वर्षापुरता चालेल. या युक्तीचे नाव त्यांनी ‘दशापद्धती असे ठेवले. ग्रहाचा अंमल म्हणजे त्या ग्रहाचा ‘दशा-काल’ असे त्यांनी ठरवले. प्रत्येक ग्रह त्याच्या दशाकालात त्याची फले देतो असेही त्यांनी ठरवले. जन्मतः कोणत्या ग्रहाची दशा सुरू होते हे ठरवण्यासाठी त्यांनी चंद्राची नेमणूक केली. म्हणजे असे की, जन्मवेळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राचा मालक (स्वामी) जो कोणता ग्रह असेल त्याची दशा जन्मवेळेपासून सुरू व्हायची, आणि मग त्याची मुदत संपल्याबरोबर ओळीत उभा असलेला पुढचा ग्रह त्याचा दशाकाल सुरू करील असे त्यांनी ठरवले. ओळीतल्या शेवटच्या ग्रहाचा दशाकाल संपला की पुनः पहिल्या ग्रहाचा दशाकाल! वाचकांना कल्पना येण्यासाठी ‘विंशोत्तरी नावाच्या १२० वर्षे मुदतीच्या दशेचे ग्रह पुढे दाखवतो :
(१) चंद्र १० वर्षे, (२) मंगळ ७, (३) राहू १८, (४) गुरू १६, (५) शनी १९, (६) बुध १७, (७) केतू ७, (८) शुक्र २०, व (९) सूर्य ६ वर्षे. (एकूण १२० वर्षे)
दुसर्या६ अनेक ज्योतिष्यांनी आपापल्या मनाला येईल त्याप्रमाणे १०८ वर्षे किवा ३६ वर्षे, अशा निरनिराळ्या मुदतीच्या व निरनिराळ्या ग्रह-क्रमांच्या ४२ दशा बनवल्या, आणि त्यांच्या साहाय्याने ते भाकिते वर्तवू लागले. आज सुद्धा याच पद्धतीने ज्योतिषी लोक भाकिते वर्तवीत असतात, आणि ‘आपण ही काय फसवणूक करीत आहोत’ अशा विचारही त्यांच्या मनांत येत नाही! अंधश्रद्धेने मने कशी निढवतात ते यावरून कळून येईल.
जन्मकुंडलीतले कोणते ग्रह बलवान आहेत, व कोणत्या प्रकारची सुख-दुःखे त्या कुंडलीच्या मालकाला (म्हणजे ज्योतिषीय भाषेत ‘जातका’ला) मिळतील त्याचे भविष्य सांगण्यासाठी प्राचीन ज्योतिष्यांनी एक युक्ती काढली तिचे स्वरूप असे :
राशिचक्राचे मनाला येईल तेवढे भाग पाडले आहेत अशी कल्पना करायची. असे भाग पाडण्याचे १६ प्रकार त्यांनी ठरवले. प्रत्येक भाग म्हणजे जणू काही एक रास आहे असे समजायचे. राशिचक्रांत जरी १२ राशी असल्या तरी होरा नावाच्या एका प्रकारात राशिचक्रात फक्त कर्कव सिंह या दोनच राशी आहेत असे समजायचे, आणि जन्मकुंडलीतले सर्व ग्रह या दोन राशीतच आणून बसवायचे! बाकीच्या पंधरा प्रकारांत तीनपासून सातशेवीसपर्यंत राशिचक्राचे भाग पाडायचे असतात, आणि प्रत्येक भाग म्हणजे एक रास असे समजायचे असते. या १६ प्रकारांनी १६ प्रकारच्या कुंडल्या मूळ जन्मकुंडलीवरून बनवायच्या असतात. त्यांपैकी एक प्रकार म्हणजे ज्यात राशिचक्राचे १०८ भाग पाडायचे असतात त्याला ‘नवांश कुंडली’ असे नाव असून ती कुंडली सर्वांत जास्त महत्त्वाची मानली जाते. जन्मकुंडली व नवांशकुंडली या दोन कुंडल्या शेजारीशेजारी मांडलेल्या अशा बहुतेक जन्मपत्रिकेत आढळतात, म्हणून या नवांश कुंडलीचे जरा तपशीलवार वर्णन करतो :
राशिचक्राचे जे १०८ भाग पाडले त्यांना १ ते १०८ असे क्रमांक द्यायचे. मग १ ते १२, १३ ते २४, २५ ते ३६ असे बारा-बारा भागांचे ९ गट पाडायचे, आणि प्रत्येक गटातल्या भागांना मेष, वृषभ, मिथुन अशी ओळीने १२ राशींची नावे द्यायची. जन्मकुंडलीतले ‘लग्न म्हणजे जन्मवेळी उदित होत असलेला राशि-चक्रावरचा बिंदू तो आणि बाकीचे ९ ग्रह, हे या १०८ भागात कुठे कुठे आलेले आहेत ते पहायचे. त्या त्या भागाला कोणत्या तरी एका राशीचे नाव मिळालेले असते, ते नोंदून घ्यायचे. मग एक नवी कुंडली मांडायची. ‘लग्न’ ज्या नव्या राशीत आले असेल ती रास १ क्रमांकाच्या घरात घालायची आणि मग बाकीच्या राशी उरलेल्या घरांत यथाक्रम घालायच्या. ग्रह कोणकोणत्या नव्या राशीत आलेले आहेत ते पाहून ते या नव्या कुंडलीत मांडायचे. याप्रमाणे जी कुंडली तयार होते तिला नवांश कुंडली म्हणतात. ही कुंडली सर्वस्वी काल्पनिक असते, तिचा अंतरिक्षातल्या ग्रहस्थितीशी सुतराम् संबंध नसतो. अंतरिक्षात जो बुध नेहमी सूर्याच्या जवळपास असतो. तो या नवांश कुंडलीत कधीकधी सूर्याच्या विरुद्ध बाजूला सुद्धा जाऊन पडतो! सर्वच्या सर्व १६ प्रकारच्या कुंडल्या या निव्वळ काल्पनिक असतात, आणि त्यांचा उपयोग करून ज्योतिषी लोक भविष्य सांगतात!
फलज्योतिष हे दुहेरी अर्थाने थोतांड आहे असे मी सुरुवातीस म्हटले आहे. एका अर्थाने अशासाठी की, ग्रह-ताऱ्यांचे भौतिक परिणाम पृथ्वीवरील सजीव सृष्टीवर जे काही घडत असतील ते मान्य केले तरी त्या परिणामामुळे प्राणिमात्राची सुख-दुःखे ठरवली जात असतील हे असंभवनीय वाटते, आणि त्याच्याही पुढे जाऊन, ही सुख-दुःखे कशी व केव्हा प्राप्त होतील याचे अंदाज आधी वर्तवणे ज्योतिषशास्त्राला शक्य आहे असे सांगणे हे शुद्ध दांभिकपणाचे वाटते. दुसऱ्या अर्थाने हे शास्त्र थोतांड, कारण, त्याचा मोठा भाग ग्रहताऱ्यांशी मुळातच संबंधित नाही. हे ठाऊक असूनही तो तसा आहे असे लोकांना भासवण्याचा प्रयत्न या तथाकथित शास्त्राचे विद्वान समर्थक मोठ्या हिरीरीने करीत असतात.
विवेकवादी वाचकांनी हा सर्व प्रकार नीट समजावून घेऊन, संधी मिळेल तेव्हा लोकांना समजावून द्यावा एवढीच अपेक्षा आहे.