भक्ती हे मूल्य आहे काय?

आपल्या तत्त्वज्ञांनी आणि संतांनी भक्तीला एक श्रेष्ठ स्थान दिले आहे. गीतेत मोक्षाच्या सर्व मार्गात भक्तिमार्ग श्रेष्ठ मानला आहे. एखादा मनुष्य भगवद्भक्त आहे असे म्हणणे म्हणजे त्याची अत्युच्च स्तुती करणे आहे असे आपण समजतो.
भक्तीला एवढे माहात्म्य कशामुळे प्राप्त झाले?भक्तीविषयीचे हे जे सार्वत्रिक मत आहे ते बरोबर आहे काय?असा प्रश्न कोणी विचारल्यास त्याला आपण काय उत्तर देऊ शकू?
भक्तीचा उचित विषय म्हणजे परमेश्वर. तसे इतरही अनेक विषय मानले गेले आहेत. पिता, माता, गुरू, पती आणि स्वामी यांचे माहात्म्य आपल्या धर्मग्रंथांतून केलेले आपण पाहतो. अलीकडे त्यांत देशाचाही समावेश झाला असून देशभक्ती कदाचित् अन्य भक्तींपेक्षा श्रेष्ठ मानली जात असल्याची शक्यता आहे. परंतु देशभक्ती ही काहीशा आलंकारिक अर्थाने भक्ती मानली जाते याबद्दल दुमत असू नये. वाच्यार्थाने भक्ती फक्त चेतन पदार्थांचीच करता येते असे म्हणता येईल.
त्यांतही माता, पिता, गुरू, पती किंवा स्वामी हे कितीही थोर असले तरी सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वसाधु परमेश्वराची बरोबरी ते करू शकत नाहीत.
तेव्हा भक्ती ही खर्याू अर्थाने फक्त परमेश्वराचीच करता येते असे आपण समजू या.
पण भक्ती परमेश्वराची करायची म्हणजे काय करायचे?
भक्ती करणे म्हणजे परमेश्वराला अनन्यभावाने शरण जाणे, स्वतःला कःपदार्थ समजून त्याची करुणा भाकणे, त्याची विविध प्रकारे स्तुती करून आपली स्वतःची शक्य ती सर्व निंदा करणे, आपण पापी आहोत, सर्व प्रकारच्या दोषांचे आगर आहोत, आणि म्हणून ईश्वराच्या कृपेला पात्र नाही अशी भूमिका घेणे, आणि तरीही त्याने आपल्यावर कृपा करावी अशी याचना करणे – हे भक्तीचे स्थूल स्वरूप सांगता येईल.
आता अशा प्रकारची भक्ती ज्याची करायची त्या परमेश्वराचे स्वरूप काय असेल? तो अशा प्रकारच्या भक्तीची अपेक्षा करणारा, अशा भक्तीने प्रसन्न होणारा असावा लागेल. अशा प्रकारच्या परमेश्वराची कल्पना एखाद्या अहंकारी, जुलमी, तामसी राजावरून घेतलेली आहे असे म्हणता येईल. मानवी राजे ज्याप्रमाणे सर्वाधिकारी, जुलमी, स्तुतिप्रिय असतात तसाच ईश्वर असतो अशी ही कल्पना आहे. तो मत्सरी असतो, त्याला भक्तीत कोणी वाटेकरी चालत नाही. मामेकं शरणं व्रज’ अशी त्याची मागणी असते. भक्ताने अत्यंत दीनपणा धारण केला, आपण पूर्णणे अपात्र आहोत अशी कबुली वारंवार दिली की तो प्रसन्न होतो. भक्तीचे स्वरूप वर जे वर्णिले तिला लायक परमेश्वराची कल्पना अशी करावी लागेल.
पण असा स्तुतीला हपापलेला, प्रार्थनांनी पाघळणारा ईश्वर खरोखर सर्वोत्तम आहे। असे आपण म्हणू शकू काय?जुलमी, मदोन्मत्त, अरेरावी राजांना आपण खरोखर चांगले म्हणत नाही. मग त्यांच्यासारखाच मानलेला परमेश्वरही सर्वोत्तम तर राहोच, पण चांगलाहीआपण म्हणू शकणार नाही.
पण कोणी म्हणेल की ईश्वर तुम्ही म्हणता तसा नाहीच. तो सर्वसदगुणसंपन्न, करुणाघन आणि न्यायी असा आहे. जे गुण मानवातदेखील दोषास्पद आहेत, ते ईश्वराच्या ठिकाणी कसे असतील?
पण तसे असेल तर ईश्वराची भक्ती करणे उचित होईल काय याचा विचार करा.
प्रथम न्यायी ईश्वराचा विचार करू. ईश्वर जर न्यायी असेल, व आपले (म्हणजे मानवाचे) गुणदोष तो जाणू शकत असेल (तो सर्वज्ञ असल्यामुळे त्याला हे सहज शक्य आहे), तर अशा परमेश्वराची भक्ती करणे चुकीचे होईल. तो न्यायी म्हणजे आपल्या पापपुण्यानुसार तो आपल्यांत सुखदुःखांची वाटणी करणारा असल्यामुळे प्रार्थना करणे व्यर्थच होईल, कारण तो प्रार्थनेने द्रवून अन्यायी वर्तन करणार नाही, आणि प्रार्थना न केली तरी न्यायाने वागायला चुकणार नाही. खरे म्हणजे प्रार्थनेत ईश्वराच्या न्यायीपणाला आवाहन नसतेच; उलट ईश्वराने आपला न्यायीपणा आपल्यापुरता बाजूला ठेवावा अशी भक्ताची आळवणी असते. ईश्वर न्यायी आहे असे मानले तर त्याची भक्ती करणे निरर्थकच होईल. जर तो न्यायी असेल तर तो आपल्या पापपुण्यानुसार त्यांची फळे आपल्याला देईल. ज्याची भक्ती करावी लागते असा ईश्वर न्यायी असू शकत नाही.
वास्तविक पाहता एखाद्या उन्मत्त, अडाणी, अहंकारी मनुष्याप्रमाणे जर ईश्वर स्तुतीला भाळणारा आणि प्रार्थनेने द्रवणारा असेल, तर त्याची भक्ती करणे स्वाभिमानी मनुष्याला लाजिरवाणे वाटेल. अशा प्रकारच्या भक्ताची कल्पना म्हणजे गुलामाची कल्पना. सुबुद्ध मनुष्याने स्वतःविषयी अशी कल्पना करणे नामुष्कीचे आहे. ते मनुष्याला शोभणारे नाही. मनुष्याजवळ बुद्धी आहे, आणि भल्याबुर्याषचा विवेक करण्याचे सामर्थ्य आहे. अशा प्राण्याला भक्ताची भूमिका शोभणारी नाही.
कोणी म्हणेल की निदान परमेश्वरापुढे नतमस्तक होण्याला तर हरकत असू नये?ईश्वराची कल्पना जर सर्वथा साधु असे चैतन्य अशी केली तर त्याच्यापुढे भल्याबुर्यानचा भेद ओळखणार्यार आणि भल्याची चाड असणार्याअ कोणाचेही मस्तक झुकेल, आणि असे करण्यात नामुष्की किंवा लाजिरवाणे काही नाही.
हे म्हणणे बरोबर आहे. पण साधुत्व ओळखून त्याच्यापुढे नतमस्तक होणे म्हणजे भक्ती नव्हे. प्रशस्य गुणांनी प्रभावित होणे, आणि त्याबद्दल आदर वाटणे हे स्वाभाविकच नव्हे, तर योग्यही आहे. परंतु भक्तीची गोष्ट वेगळी आहे. आदरणीय गोष्टीविषयी आदर बाळगणे म्हणजे भक्ती नव्हे. भक्ती म्हणजे आपण अगदी रजःकणासारखे कवडीमोलाचेआहोत असे मानणे. याच्या उलट आदर वाटण्याकरिता मनुष्यात थोडेबहुत सत्त्व असावे लागते. निःसत्त्व मनुष्यात लाचारीची भावना असते, आदराची असू शकत नाही. आदर वाटत असतानाही, मस्तक झुकवतानाही, आपला स्वाभिमान, आपले सत्त्व कायम असावे लागते. ज्याला स्वतःचे थोडेबहुत मूल्य आहे त्यालाच मूल्याचा आदर असू शकतो.
खरी गोष्ट अशी आहे की भक्तिभावात भक्तिविषय-पदार्थाच्या अमर्याद शक्तीची जाणीव प्रधान असते. सर्वशक्तिमत्त्व हा सर्व धर्मांनी ईश्वराचा प्रधान गुण मानला आहे. त्याखेरीज त्याच्या ठिकाणी अन्य प्रशस्य गुण असतील किंवा नसतील. ज्यूंचा जेहोवा हा प्रामुख्याने सर्वशक्तिमान् असा ईश्वर आहे. त्याच्याजवळ दयालुत्व किंवा न्यायीपणा हे गुण फारसे नाहीत. परंतु ईश्वर म्हटला की त्यात सर्वशक्तिमत्त्व असतेच. अशा ईश्वरापुढे भक्त दीनपणे लोटांगण घालतो. परंतु ज्याला मूल्यांची जाण आहे, आणि ज्याला भल्याबुच्यामध्ये विवेक करता येतो, असा मनुष्य केवळ नागड्या शक्तीपुढे नम्र होत नाही. तो तिचा प्रतिकार करू शकत नसेल, पण तिला शरण जाण्यास, तिच्या अंकित होण्यास त्याचा विरोध असतो. पाशवी शक्तीपुढे तो आत्मनाश पसंत करील. शक्तीमध्ये भिवविण्याचे सामर्थ्य असेल, पण आदरभावना स्फुरविण्याचे सामर्थ्य तिच्यात नसते.
म्हणून बुद्धिमान आणि मूल्यांची जाण असणार्याण मनुष्याने ज्याची भक्ती करावी अशा परमेश्वराची कल्पनाच करता येत नाही. भक्तीचा महिमा गाणारे पंथ आपल्याला काहीतरी अश्लाघ्य करायला सांगत आहेत असे म्हटले पाहिजे. न्यायी ईश्वर भक्तीला भीक घालणार नाही. सर्वशक्तिमान ईश्वर भक्तिप्रिय असेल, पण त्याची भक्ती करणे नामुष्कीचे असेल. परमकारुणिक ईश्वर ज्यांना त्याच्या कृपेची गरज आहे त्यांच्यावर कृपा करील, पण त्याकरिता तो प्रार्थनेची वाट पाहणार नाही, किंवा प्रार्थनेने पाघळणार नाही. सारांश, भक्ती हा एक निरर्थक, व्यर्थ, लाजिरवाणा व्यापार आहे.
आतापर्यंत आपण ईश्वर आहे असे धरून चाललो होतो. तो आहे असे गृहीत धरले तरच त्याचे स्वरूप काय असेल असा प्रश्न निर्माण होईल. परंतु ईश्वर (मग तो कोणत्याही वर्णनाचा असेना) आहे असे मानायला काही आधार आहे काय?हा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागते. कोणत्याही वर्णनाच्या ईश्वराचा थोडाही समर्पक, अंशतःही निर्णायक पुरावा सापडत नाही. आतापर्यंत गेली २-३ हजार वर्षे अत्यंत बुद्धिमान अशा हजारो माणसांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा शोधून काढण्याचा भगीरथ प्रयत्न केला आहे आणि निर्णायक पुरावा म्हणून विविध युक्तिवाद मांडले आहेत. परंतु ते सर्व फुसके आहेत असे निर्णायक रीतीने तत्त्वज्ञांनी दाखवून दिले आहे. ईश्वर म्हणजे जगाचा उत्पत्तिकर्ता असे मानले तर लगेच ‘मग ईश्वराचा उत्पत्तिकर्ता कोण आहे?’ असा प्रश्न विचारता येतो. जगताचे कारण किंवा जगताचा निर्माता हे ईश्वराचे त्यातल्या त्यात सयुक्तिक वाटणारे स्वरूप. त्याची ही अवस्था. बाकीचे युक्तिवाद तर याहूनहीअविश्वसनीय. दुर्जनांना दंड देणारा आणि सज्जनांना पारितोषिके देणारा’तो ईश्वर हे त्याचे आणखी एक लोकप्रिय स्वरूप. पण असा कोणी ईश्वर आहे असे मानायला कारण दिसत नाही, कारण सुखदुःखे मनुष्यांच्या सदाचार-दुराचारांच्या प्रमाणात मिळतात असा सुतराम अनुभव नाही.
तेव्हा भक्ती ही एका नसलेल्या वस्तूची भक्ती होणार. हे तिच्या वैयथ्र्याचे आणि असमंजसपणाचे आणखी एक कारण!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.