दिवाळीतील ओळखी

टिळकांनी लिहिलेः ग्रंथ हे आमचे गुरू होत, आणि पुढे बजावले, छापण्याची कला आल्यापासून ग्रंथनिर्मितीला सुमार राहिलेला नाही. त्यामुळे निवड करून चांगले तेवढेच वाचा. आयुष्य थोडे आहे.
महाराष्ट्रात मासिकांची – नियतकालिकांची दिवाळी येते तेव्हा तर हा उपदेश फारच आठवतो.
आणखी एक, फडक्यांनी (ना. सी.) एका सुंदर गुजगोष्टीत हितोपदेश केला, तो मार्मिक आहे. आयुष्य कसे घालवावे, आपले काय काय चुकले, ते कसे टाळता आले असते इत्यादी गोष्टींचे ज्ञान माणसाला होते त्यावेळी त्याच्या आयुष्याची संध्याकाळ झालेली असते. आता उमजले तसे जगायला आयुष्य फारसे उरलेले नसते.
असे गंभीर विचार डोक्यात घोळवतच मी दिवाळी अंकांच्या वाटेला जातो. अनेक वर्षांच्या अनुभवाने मी दिवाळी अंकांचे काही मार्गदर्शक खुट करून ठेवले आहेत. मौज – म.टा,. दीपावली -.किस्त्रीम, सकाळ – साधना असे काहीसे. एवढ्यात या यादीत काही भर पडली आहे.‘अबकडई’, ‘साप्ता. सकाळ’, ‘आजचा चार्वाक’, ‘कालनिर्णय’ अशी. याचे कारण केवळ दुर्गा भागवत, मे. पुं. रेगे अशा काही नावांचे आकर्षण.
अनिल अवचटांचा ‘शोध आरोग्याचा’ या नावाचा लेख दिवाळीत वाचला. नावावरून तो य. दि. फडक्यांचा असावा असे क्षणभर वाटले. शोध बाळगोपाळांचा’ पासून त्यांनी अशा वळणाच्या शीर्षकांचा पाऊस पाडला आहे. थोरले अवचटही सदैव शोधात असतात, आडरानात आडवाटेने गेलेल्या माणसांच्या. गेल्यावर्षी नाही का त्यांनी हिरेमठ अन् पन्नालाल शोधून काढले. ते वर्षभर मनात घर करून होते. आणि पुढेही राहतील. यंदा त्यांनी महाराष्ट्राच्या अंदमानात – गडचिरोलीच्या जंगलात मुसंडी मारली आणि बंग दाम्पत्याचे अद्भुत दर्शन घडवले ते साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात, अभय बंग आणि राणी बंग हे डॉक्टर दाम्पत्य. अभयनी लोकसेवेचा वसा आपल्या गांधीवादी तीर्थरूपांकडून – ठाकुरदास बंग यांच्याकडून घेतलेला. पण राणी अय्यंगारांचे तसे नव्हते. पतीच्या ध्येयवादी वाटचालीत मनापासून सोबत देणारी पत्नी या दुर्लभ समागमाचे हे उदाहरण. नागपूर मेडिकल कॉलेजमधली नोकरी सोडून त्या या वनवासात गेल्या. गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा. डॉ. अभयने ती आपली कर्मभूमि केली अमेरिकेतून परतल्यावर, बाल्टिमोर येथील जॉन्स हॉप्किन्स या जगन्मान्य संस्थेत आपल्या विषयात ९९ टक्के गुण मिळवण्याचा उच्चांक स्थापन केल्यावर तिथेच बहुमानाच्या, बहुधनाच्या नोकर्‍या त्यांना सांगून आल्या. पण स्वर्णमयी लंकेतील मोहांनी भुलून न जाता जननी जन्मभूमिश्च ह्या स्वर्गीपेक्षा मोठ्या आहेत असा निश्चय करून ते भारतात परतले. ग्रामीण आरोग्य सेवेच्या उपयुक्ततेत काही सुधारणा घडविण्याची त्यांची योजना सरकारने स्वीकारली आणि त्याच्या मागणीप्रमाणे गडचिरोलीचे सिव्हिल हॉस्पिटल त्यांच्याकडे सुपूर्द केले. डॉ. अभयच्या समाजसेवेच्या संकल्पापेक्षाही मोठे आश्चर्य अवचटांना वाटले ते ह्या सरकारी निर्णयाचे. एखाद्या कामगिरीसाठी लायक माणसाची नेमणूक तत्परतेने करण्याचे.
गडचिरोलीत काम करताना तेथे येणाच्या रुग्णांच्या कुपोषणाकडे डॉ. अभयचे लक्ष गेले. सरकारी रोजगार हमी योजनेत काम करणार्‍या या मजुरांना किमान वेतन रोजी ४ रु. दिले जाई. हा दर कसा ठरवला याचा शोध घेता घेता त्यांना कळले की मजुरी ठरवताना या योजनेचे जनक श्री. वि.स. पागे यांनी मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतलेला होता. पाग्यांनी ज्यांचा सल्ला घेतला ते डॉक्टर डायबिटीसचे तज्ञ होते. त्यांनी २२०० उष्मांकाचे अन्न रोज लागते असा आधार दिला होता. डॉ. अभयनी या विषयाच्या खोलात जाऊन अभ्यास केला. आकडेवारी जमवली. हवापाणी, शारीरिक कष्टाचे काम इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन–शिस्तशीर, शास्त्रीय संशोधनाने दाखवून दिले की अशा कामगाराला ३९०० उष्मांकाचे अन्न लागते. आपले संशोधन त्यांनी आटोपशीर निबंधाद्वारे या विषयावरील जागतिक कीर्तीच्या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध केले. त्याच्या आधारे त्यांनी सरकारशी पत्रव्यवहार करून भेटीगाठी घेऊन तीन वर्षात या कामावरील मजुरांची रोजी ४ रु. वरून १२ रु. वर वाढविण्यात यश मिळविले. डॉ. अभय डॉ. अवचटांना म्हणाले, मोर्चे,धरणे या मार्गानी हजारो मजूर झगडत राहिले असते तरी जे काम झाले नसते ते या एका लहानशा शास्त्रीय शोधनिबंधाने केले. या यशाने अभयच्या ठिकाणचा संशोंधक सुखावला.
आदिवासी भागात बालमृत्यूचे प्रमाण फार. डायरिया हा तिसर्‍या जगातील बाळांचा संहारक हे सर्वमान्य मत. डॉ. अभयच्या संशोधनात त्यांना आढळले की, या बालकांचा खरा मारेकरी न्यूमोनिया आहे. बालमृत्यूंपैकी ४० टक्के मृत्यू न्यूमोनियाने होतात हे त्यांनी दुसन्या तशाच शोधनिबंधात सिद्ध केले. निबंध त्यांनी ज्या लॅन्सेट या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध केला तिचा दबदबा इतका की तीत वाचकांचा पत्रव्यवहार या सदरात आपले पत्र छापले गेले तरी देशी वर्तमानपत्रात फोटोसहित बातमी प्रसिद्ध करणारे डॉक्टर आपल्याकडे आहेत. गेल्या ८ वर्षात या पत्रिकेत जे ४ भारतीयांचे निबंध प्रसिद्ध झाले त्यातले दोन या बंग दाम्पत्याचे आहेत. त्यामुळे जगभरच्या जाणत्यांमध्ये त्यांचे नाव गेले. देशोदेशीच्या वैद्यकीय परिषदांमध्ये निबंध सादर करण्याची आमंत्रणे त्यांना येऊलागली.
डॉ. राणी बंग स्त्रीरोग या विषयात सुवर्णपदाच्या मानकरी. स्त्रियांचे रोग मातृत्वाशी संबंधित असतात ही जगभरची मान्यता. ती प्रमाण धरून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO ने) आपल्या स्त्रीसंबंधी शाखेला ‘मदर अँड चाइल्ड हेल्थ (MCH) असे नाव दिलेले. डॉ. राणी बंग यांना मात्र काही वेगळेच दिसून आले. डॉ. राणीने (आणि अभयनेही) केलेल्या संशोधनात त्यांना आढळले की १३ वर्षापासून पुढच्या जवळ जवळ सर्व (९२ टक्के) स्त्रियांना कोणता ना कोणता स्त्रीरोग असतो. त्यांच्यापैकी फक्त ८ टक्के स्त्रियांना डॉक्टरचे दर्शन घडते. तेही प्रायः कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून. याचा अर्थ असा की या तिसर्‍या जगातील जवळजवळ अर्धी लोकसंख्या वैद्यकीय मदतीला वंचित आहे. अर्थात स्त्रियांवरील उपचारांचे लक्ष्य मातृत्वाशी निगडित ठेवणे चूक आहे. राणीच्या शास्त्रीय संशोधनाने ही गोष्ट निर्विवादपणे सिद्ध झाली. WHO ने हे संशोधन स्वीकारले आणि आपली उपचारविषयक योजनांची कक्षा वाढविली. ह्या शाखेला आता वूमन अँड चाइल्ड हेल्थ (WCH) हे नाव दिले गेले आहे हे राणीच्या संशोधनामुळे. सर्वेक्षण करीत असताना बंगबाईंनी सर्व थरांतल्या स्त्रियांचा विश्वास इतका संपादन केला की मनातले गुह्यातले गुह्य त्या निःशंकपणे बाईजवळ उकलू लागल्या. आपली भारतीय संस्कृती, आपली नीतिमूल्ये, आपल्या खेड्यातील साधेभोळे मर्यादशील जीवन या समजुतींना धक्का देणारी एक गोष्ट बंगबाईंना आढळली ती ही की, स्त्रीरोगविषयक पाहणीत जेवढ्या अविवाहित मुली होत्या त्यातल्या ४२ टक्के मुलींना विवाहपूर्व शरीरसंबंधाचा अनुभव होता!
ग्रामीण महिलांच्या एका गटासमोर महिलांना रोगांचा कसा प्रतिकार करता येईल ते डॉ. राणी बंग सांगत होत्या. मधेच न राहवून एक महिला उभी राहून म्हणाली, बाई, आमचा खरा रोग दारू आहे. आमच्या नवर्‍यांना दारूपासून सोडवा, आमची अर्धी दुखणी कमीहोतील. ते म्हणणे खरे होते. दारूमुळे मुळातले कुपोषण अधिक वाढले होते यात शंका नाही. डॉ. राणी बंग यांनी ते आव्हान घेतले. दारूबंदीला जनमान्यता आधी मिळवल्याशिवाय राजमान्यता मिळणार नाही आणि मिळाली तर टिकणार नाही. म्हणून उभयतांनी पुन्हा दारूग्रस्तांचे संशोधन सुरू केले. दारूचा खप, त्यासाठी होणारा खर्च, सरकारला मिळणारे उत्पन्न यांची चोख आकडेवारी गोळा केली. राणी-अभय यांनी दाखवून दिले की एकट्या गडचिरोली जिल्ह्यात १ लाख लोक नियमित दारू पितात. त्यातले १५ ते २० हजार हे दारुडे आहेत. वर्षात १ हजार लोक दारूने मरतात. सरकारला अबकारी कराद्वारे ४ कोटी रु. उत्पन्न मिळते. २० कोटी रु. ची दारू विकली जाते. सरकारी विकासाचे बजेट वर्षाकाठी ७ कोटी रुपयांचे असते.
महाराष्ट्र सरकारचे नंबर एकचे उत्पन्न सेल्स टॅक्समधून, खालोखाल दुसर्‍या नंबरचे दारूमधून.
शेजारच्या वर्धा जिल्ह्यातही गांधीचा जिल्हा म्हणून सरकारने दारूबंदी केली होती. पण अंतुल्यांनी आदेश काढताना तेव्हा एक चलाखी केलेली. सडकेवरची, मोक्याची ९० गावे या बंदीतून वगळली. तिथे एका ग्राहकाला एकावेळी १२ बाटल्या घेण्याची मुभा होती. दिवसातून कितीही वेळा. त्यामुळे उपदुकानदारी फोफावली होती. अभय-राणी यांनी या गोष्टींची पुनरावृत्ती गडचिरोलीत होऊ न देण्याची खबरदारी घेतली. आता तर शरद पवारांनी राज्यभर ‘मागणी तेथे दारूबंदीची घोषणा केली आहे. आधी ग्रामपंचायतीचा ठराव एकमुखी असावा लागे, आता साधा बहुमताचा ठराव आला तरी बंदी करू असे सरकार म्हणते.
अभयच्या संशोधकवृत्तीचे अवचट तोंडभर कौतुक करतात. अवचट म्हणतात : ‘आम्ही गेली ८ वर्षे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करतोय. पण दारू किती खपते,त्याचा सरकारला कर किती मिळतो याची आकडेवारी गोळा करायचे काही माझ्या मनात आले नाही.’
प्रौढ वयात साधारण मैत्री घट्ट होत नाही. पण डॉ. अभयचा म. टा. मधे एक लेख ९२ मधे अवचटांनी पाहिला. तेव्हा ठरवले की, याला भेटले पाहिजे. पहिल्या भेटीतच तू, तुझे शी एकेरीने सुरुवात झाली. गेल्या दीड-दोन वर्षांत जीवश्च कंठश्च इतकी मजल मारली गेली.
डॉ. अनिल अवचट यांच्या शैलीबद्दल सदा डुम्बर्‍यांनी संपादकीयात त्यांना नावाजलेआहे. ते बरोबरच आहे. मी एक वाचक एवढ्याच योग्यतेच्या नात्याने एक अभिप्राय नोंदवतो. अवचटांच्या लिखाणातला इंग्रजी शब्दांचा मारा सोसवत नाही. मेजवानीच्या जेवणात तेलंगी आचारी मुक्त हस्ताने मसाले घालतात. पण ते समजण्यासारखे आहे. ते खास जेवण असते. पण आपण अवचटांची शैली तर सहजसुंदर म्हणून नावाजतो.
अवचटांनी अभयची काही संशोधन सूत्रे नोंदवली आहेत. ‘रिसर्च-नॉट आन दि पीपल, बट वुईथ द पीपल.’ आणि दुसरे ‘थिंक ग्लोबली, अॅक्ट लोकली.

साप्ताहिक सकाळचा दिवाळी अंक तर्हे,तर्हे.च्या पिकांनी बहरलेल्या शेतासारखा भरगच्च आहे.
बंध-अनुबंधानंतर?
‘बंध अनुबंधानंतर ह्या लेखात कमल पाध्यांनी ‘बंध-अनुबंध’ या आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतरचे अनुभव सांगितले आहेत. पति-पत्नीच्या नात्यात सर्वसाधारण मैत्री होणं कठीण जातं ती त्या नात्याची शोकांतिका आहे हे सार जेवढ्या पाल्हाळानंतर काढलं आहे, तेवढ्याच काटकसरीच्या कथेत–केवळ दोन पानात ‘जगीं सर्वसुखी’ या गोष्टीत ते गौरी देशपांड्यांनी काढले आहे. ‘इतकी वर्षे तिचा नवरा म्हणून वावरलेला हा बाबा तिच्या अजिबात ओळखीचा नव्हता हे कळून आलेली बायको. तिची नोकरी पहिली दुसरीच्या मुलांना हाकायची. पण या ‘रटाळ कंटाळवाणेपणातच तिला कितीतरी समाधानी क्षण, हास्यानंदाचे क्षण, समव्यवसायी आणि सहकार्यांबरोबर वाटून घ्यायचे क्षण मिळत होते’ हे गावीच नसणारा नवरा जगीं सर्वसूखी’त गौरीबाईंनी दाखवलाआहे.
साप्ता. सकाळमधलाच ‘आत्मचरित्रातील सत्य आणि कल्पित’ हा य.दि. फडक्यांचा लेख वाचून वाचक दोन कारणांनी थक्क होतो. एक त्यांचे वाचन, अन् दुसरे त्यांनी नोंदवलेले निरीक्षण. त्यांच्या मते कोणत्याही आत्मचरित्राला ३ परिमाणे असतात.
१. लेखकाला वाटत असते, की आपण स्वतःला दिसतो तसे वाचकाला दिसावे.
२. वाचकांना मात्र तो वेगळा दिसतो अन् ते त्याला लेखनात तसे पाहू इच्छितात.
३. वाचकांना आत्मचरित्राचा लेखक कसा दिसेल ते सांगता येत नाही. (यातल्या तिसर्‍याचा दुसर्‍याशी मेळ घालणे कठीण आहे.)
महात्मा गांधींसंबंधी निरीक्षण थक्क करणारे आहे. आपल्या आयुष्यातील कुरूप गोष्टी ‘मीच सांगितल्या पाहिजेत’ असे म्हणणारे गांधीजीसारखे सत्याची साधना आणि प्रयोग करणारे आत्मचरित्रकार सत्य सांगतील, पण सर्व सत्ये सांगतीलच असे नाही. सरलादेवी चौधुराणी ही रवींद्रनाथ टागोरांची विवाहित भाची. तिच्या स्पर्शाने आपल्या मनात कसा वासनेचा डोंब उसळला याची कबुली द्यायला सत्यशोधक महात्माजी विसरले हे। मार्टिन ग्रीन या लेखकाने दाखवून दिले आहे याची माहिती फडके देतात.
य. दि. फडक्यांचा म.टा. वार्षिकांकातील ‘मोरारजी देसाई हा लेख मला जादा । सरस वाटला. द्वैभाषिक मुंबईराज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत (१९५२) भाऊसाहेब हिन्यांना एकाकी पाडण्यात मोरारजी यशस्वी झाले. त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाणांचा प्याद्यासारखा उपयोग करून घेतला. पुढे १९५९ मध्ये मुंबईसह महाराष्ट्र राज्य द्यायची वेळ आली तेव्हा दिल्लीश्वर मोरारजींना दूर ठेवून यशवंतरावांना हाताशी धरून खेळी खेळले. यशवंतराव दिल्लीच्या वाया करत, मोरारजींकडे उतरत पण काय शिजते आहे याचीगंधवार्ता त्यांनी मोरारजींना लागू दिली नाही. हा प्रकार सांगून यशवंतरावांनी आपला कसा विश्वासघात केला ह्या आठवणीने व्यथित झालेल्या मोरारजींना- लहान तोंडी मोठा घास घ्यायची हीच वेळ आहे असा मनाचा हिय्या करून फडके म्हणतात, राजकारणात निष्ठा, कृतज्ञता, सुसंगती यांना जागा कुठे आहे? हिच्यांना नामोहरम करण्यात तुम्ही चव्हाणांचा बाहुल्यासारखा उपयोग केला तर पुढे त्यांनी तुम्हाला शिडीसारखे वापरले. ही नृपनीति आहे. यावर उठून मोरारजी एक पत्र काढून फडक्यांच्या हाती देतात. १९५६ मध्ये द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी नोव्हेंबर ५५ मध्ये चव्हाणांनी मोरारजींना लिहिले होतेः
‘सभोवार काळोख दाटला असून काही दिसेनासे झालेले असताना प्रेमळ पित्याप्रमाणे तुम्ही प्रकाश बनून मला मार्ग दाखवावा म्हणजे इतकी वर्षे आपण माझ्याबद्दल जो विश्वास बाळगला आणि आशा बाळगल्या त्या पुण्या करायचा मी पुन्हा यथाशक्ति प्रयत्न करीन.’
पत्र संपल्यावर मोरारजी म्हणाले :
‘राजनीती झाली म्हणून काय कृतज्ञतेला तिलांजली द्यायची काय प्रोफेसर!’

म. टा. मध्ये पाहिलेल्या कालनिर्णयच्या जाहिरातीने थोडीशी फसगत झाली. मे. पुं. रेग्यांचा खास लेख इतर मान्यवरांच्या लेखाबरोबर असणार होता. कालनिर्णयच्या दिवाळी विशेषांकात कुठे रेग्यांचा लेख दिसेना तेव्हा भिंतीवरी कालनिर्णय असावे म्हणून जे म्हणतात ते पाहिले. अन् आश्चर्य म्हणजे त्यात हा खास लेख होता. मी आस्तिक का आहे?’ हा रेग्यांचा लेख अनेक अर्थानी महत्त्वपूर्ण आहे. रेग्यांनी इतक्या वेगवेगळ्या लोकांबरोबर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे काम केले आहे की ते नेमके कुठे बसतात असा प्रश्न आम्हाला पडत असे. त्यामुळे त्यांनी या विषयाला स्वतःहून तोंड फोडले आणि निस्संदिग्ध शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली हे फार चांगले झाले. इतक्या संक्षेपात त्यांनी लिहिले तसे पूर्वी कधी लिहिले की नाही याची शंका वाटते.
वाडवडिलांच्याकडून वारश्याने आलेल्या श्रद्धेविषयी वाढत्या वयात शंका उत्पन्न झाल्या. महाविद्यालयीन शिक्षणात तत्त्वज्ञानाचे अध्ययन करून परिस्थिती अधिकच बिकट झाली. ईश्वरसंकल्पना तत्त्वज्ञांची निर्मिती नाही. इतरांची आहे. तत्त्वज्ञ तिला तर्काच्या कसोटीवर घासून पाहतात. ईश्वर नाकारणारी नास्तिक माणसे शुद्ध, सात्त्विक प्रवृत्तीची असू शकतात हा अनुभव आहे.
सर्वशक्तिमान् अन् परमकारुणिक ईश्वर मानण्यात अनेक तार्किक अडचणी आहेत. ईश्वर आदिकारण म्हणावे तर त्याचे कारण काय ते सांगता येत नाही. त्याला कारण लागत नाही म्हणावे तर मग विश्वालाच कशाला कारण हवे हा प्रश्न उरतो.
जगात सुव्यवस्था आहे. ती एक सहेतुक रचना आहे म्हणावे तर अव्यवस्थाहीदिसते. वादळे, धरणीकंप काय आहेत?आपल्याच पूर्वकर्माचे ते फळ म्हणावे तर ईश्वराने पापी माणूस घडवलाच का हा प्रश्न उरतो.
असे असताना आपली बालपणीची श्रद्धा टिकलीच कशी याचे उत्तर रेगे देतातही श्रद्धा स्वाभाविक होती म्हणून. माणूस म्हणून मला नैतिक नियमांचे जे ज्ञान होते ते एरवी होते ना. विश्व भौतिक आहे आणि त्यात घडणार्‍या घटना नियमेकरून-निरपवाद घडतात असे म्हणण्यात मनुष्याच्या स्वभावाचे आकलन पूर्ण झाले असे होणार नाही. विज्ञानाचा निर्माता, नीतिनियमांचा कर्ता, सौंदर्यास्वादक निर्माता विश्वाच्या वरीलचौकटीत मावणार नाही. माणूसपणाचे गूढ कायमच राहील.
ज्ञानप्रेरणा, नीतीची प्रेरणा यांप्रमाणे श्रद्धा हीही माणसाची एक स्वाभाविक शक्ती आहे. तिची एक प्रेरणा असते. विश्वातील अमंगलाचे गूढ माणसाला उकलू शकत नाही. तो भार ईश्वरावर सोपवून आपण उरलो उपकारापुरता अशी स्थिती प्राप्त करून घ्यावी. असे जगता येण्यात श्रद्धेचा कस लागतो. नास्तिकाग्रणी रसेलचे वागणे आस्तिकाला आस्तिकपणाचेच वाटते. अणुयुद्ध झाले तर जगाचा संहार होईल म्हणून त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या पर्वात तुरुंगवास भोगला हा त्यांचा जगण्याचा मार्ग धार्मिक -ख्रिस्ती होता.
पुन्हा साप्ता. सकाळकडे वळतो. त्यातल्या एका लेखाने मी सुन्न-बधिर झालो. प्राचार्य लीला पाटील यांच्या लेखात एक विव्हळ करणारी हकीकत आहे. वाल्मीकी ब्राह्म मुहूर्तावर उठून स्नानास निघाले असताना एका झाडावर काममोहित क्रौंचमिथुनापैकी एकाला मारणाच्या पारध्याला उद्देशून त्यांनी जी शापवाणी उच्चारली, तिची आठवण यावी अशी ही हकीकत आहे. तिच्यात घायाळ विद्ध झालेली क्रौंचपक्षिणी आहे. लेखिकेची आई मनोरमाबाई फडके. दिगंतकीर्ति कादंबरीकार ना. सी. फडके यांची पहिली, परित्यक्ता पत्नी. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचे ना. सी. फडक्यांशी लग्न झाले. बेचाळिसाव्या वर्षी ४ मुलगे आणि १ मुलगी त्यांच्या पदरात घालून फडक्यांनी त्यांना सोडून दुसरे लग्न केले. लग्नानंतर कोल्हापूरसारख्या एकाच शहरी राहणे. मनोरमाबाईंना आणि १५ वर्षांच्या कन्येला किती अपमानास्पद जिणे जगावे लागले याची अत्यंत हृदयद्रावक कहाणी संयत शब्दात लीलाबाईंनी लिहिली आहे. फडक्यांनी दुसन्या लग्नाआधीचे जीवन पूर्वजन्मासारखे विसरावे, नव्या घरात त्याची शब्दानेही आठवण काढू नये, अशा अटी दुसरी पत्नी कमलाबाई यांनी घातलेल्या होत्या, आणि त्या त्या अतिरेकी निर्दयतेने पाळायला लावत अशी कबुली त्यांचे पुत्र श्री. विजय फडके यांनी फडके जन्मशताब्दीनिमित्त लिहिलेल्या आठवणीत दिली आहे. फडक्यांच्या दुसर्‍या लग्नानंतर दोन अडीच वर्षांनी लीलाबाईंनी प्रेमविवाह केला. तो खुद्द फडक्यांना मान्य नव्हता. आईने नाखुषीने का होईना हे रजिस्टर लग्न लावून दिले. पण त्याहीपेक्षा आणखी सत्त्वपरीक्षा पुढे झाली. एकदा भररात्री दारुड्या घरमालकानेआपल्याला आत्ताच्या आता घर खाली करून पाहिजे म्हणून आरडाओरडा सुरू केला. तेव्हा मनोरमाबाईंनी शांततेने “माडी आत्ता खाली करून देते, उद्या संध्याकाळपर्यंत दुसरे घर पाहाते म्हणून गयावया करून रात्र कशीबशी काढली अन् दुसर्‍या दिवशी रात्रीचे भातपिठले दुसर्‍या घरी शिजवले. त्या माऊलीने हे सारे निमूटपणे सहन करताना फडक्यांबद्दल कधीही अपशब्द स्वतः उच्चारला नाही की, मुलाबाळांना उच्चारू दिला नाही. त्यांची शिकवण असे ते तुमचे वडील आहेत. तुम्ही त्यांचा अनादर करता कामा नये.
प्राचार्य लीला पाटील यांनी इतक्या वर्षानंतर हा लेख लिहितानाही ती मर्यादा पाळली आहे. आपले आणि आपल्या सर्व भावंडाचे जीवन जे यशस्वी झाले आहे त्यात आईच्या शिकवणुकीचा आणि विशेषतः वर्तणुकीचा प्रभाव कारणीभूत आहे असे त्या आवर्जूनसांगतात.
ना.सी. फडके–अनेकांप्रमाणे माझेही कॉलेज जीवनात अत्यंत आवडते कादंबरीकार होते. त्यांची शाकुन्तल ही कादंबरी तिच्या आरंभी ‘माझ्या लाडक्या कमलास’ ही त्यांची अर्पणपत्रिका आणि कमलाबाईंचा सुंदर फोटो हे सगळे आजही मला डोळ्यासमोर दिसते. त्यांनी पहिल्या पत्नीला सोडलेले आहे याचे वैषम्य तेव्हा फारसे खुपले नव्हते. पुढे आनंद साधल्यांनी ‘मातीची चूल’ या आत्मचरित्रात स्वतःच्या पत्नीचे, तिच्या अमर्याद कष्टांचे त्यागाचे केवढे सुंदर चित्र रेखाटून-थोड्या दिवसांनी त्यांना टाकून दुसरे लग्न केले. हे वाचल्यावर एवढे संस्कृत साहित्याचे आस्वादक साधले यांना उत्तररामचरितातल्या वासंतीच्या उद्गारांची आठवण कशी झाली नाही असा प्रश्न मला पडे. वासंती, रामाच्या सीतात्यागाच्या वार्तेने विव्हळ झालेली वासंती, याला जुन्या आठवणी देऊन म्हणते, तेव्हा कसा रे, “तू माझे जीवन, तू माझे द्वितीय हृदय, तू माझ्या डोळ्यांचे चांदणे” अशा शेकडो प्रियवचनांनी तिला आळवायचा, आणि आता तिलाच — जाऊ दे, बोलायचे तरी काय?
असे प्रसंग पुढे जेव्हा कानी येत तेव्हा माझे विवेकवादी मित्र म्हणत, प्रेम जडणे आणि उडणे या आपल्या स्वाधीनच्या गोष्टी नव्हत. त्यात कोणी जर होरपळला तर त्याने आपले दुःख अटळ समजून सहन करणे एवढाच मार्ग आहे. मनोरमाबाईंनी ते दुःख मुके होऊन सहन केले. ते वाचून विवेकवादी नीतिशास्त्रज्ञही त्यांच्यासमोर नतमस्तक होईल यात शंका नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.