श्री दिवाकर मोहनींच्या स्त्री-पुरुष संबंधाच्या भ्रामक कल्पना

आजचा सुधारकच्या काही अंकातून दिवाकर मोहनी यांनी स्त्रीपुरुषांमधील स्वातंत्र्याचा विचार मांडताना स्त्रीपुरुषात स्वैर लैंगिक स्वातंत्र्य असावे असे म्हटले आहे. त्याना एकपतीपत्नीव्रताची कल्पना मान्य नाही. बहुपतिक किंवा बहुपत्नीक कुटुंब असल्यास हरकत नाही असे त्याना वाटते. त्यांच्या एकूण विचारावरच लैंगिक स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य असून इतर मूल्ये दुय्यम स्वरुपाची आहेत असे त्यांचे मत असावे असे वाटते. त्यांनीह्या प्रश्नाच्या सर्व अंगाचा विचार केला आहे असे दिसत नाही.
ह्या प्रश्नाचा विचार करताना प्राचीन भारतीयानी काम व अर्थ यांच्यापेक्षा धर्म आणि मोक्ष (स्वातंत्र्य) यांना अधिक महत्त्व दिले होते. काम व अर्थ यांना जीवनात महत्त्व आहे हे आपण ओळखतो. पण कामापेक्षा अन्य श्रेष्ठ मूल्ये आहेत हेही आपण जाणतो. उदाहरणार्थ एखाद्या विद्याथ्र्याचे एखाद्या मुलीशी लैंगिक संबंध असले तर त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते व तो परीक्षेत नापास होतो ही गोष्ट जशी शालेय शिक्षणाच्या बाबतीत खरी आहे तीच उच्च शिक्षणाच्या बाबतीतही खरी आहे.
स्त्रीपुरुषांना अमर्याद लैंगिक स्वातंत्र्य बहाल केले तर त्याचे मानसिक परिणाम कोणते होतील ह्या मुद्द्याकडेही आपण लक्ष पुरविले पाहिजे. सध्याच्या काळी कायद्याने लैंगिक स्वातंत्र्यावर काही मर्यादा पडल्या आहेत. अशा स्थितीतही घटस्फोटाची व प्रेमभंगाची प्रकरणे वाढत्या प्रमाणावर आहेत, व जर स्त्रीपुरुषांना अमर्याद लैंगिक स्वातंत्र्य दिले तर घटस्फोटाची व प्रमेभंगाची प्रकरणे आताच्यापेक्षा अधिक वाढतील. अशा प्रसंगी मनुष्य सुखी नसतो. त्याच्यात विफलतेची भावना निर्माण होते व मनुष्य आत्महत्या करण्यास सुद्धा तयार होतो. त्याने आत्महत्या जरी केली नाही तरी त्याच्यात द्वेषाची व मत्सराची विफलतेची भावना कायम असते व तिचा परिणाम त्याच्या पुढील क्रियांवर होत असतो.
वास्तविक पाहता १८ ते ४० या वयोगटातील तरुण शरीराने सुदृढ असतात. पण याच वयोगटातील तरुण इतर वयोगटातील तरुणांच्या तुलनेत क्षयरोगाने जास्त ग्रस्त असतात असे एका पाहणीत आढळून आले. या विषयी अधिक अभ्यास केल्यावर या तरुणातील बहुसंख्य जण प्रेमभंगाने ग्रस्त होते असे दिसून आले.
स्त्रीपुरुषांमधील संबंध स्वैर असावे असे प्रतिपादन करतांना स्त्रीपुरुषांचे स्वतःच्या मनावर नियंत्रण असावे किंवा नाही, नियंत्रण आवश्यक असल्यास ते किती प्रमाणात हा मुद्दा मोहनींनी स्पष्ट केला नाही. प्राचीनांनी ह्या गोष्टीचा विचार करूनच उच्च मूल्याच्या सिद्धीसाठी नियंत्रणाची आवश्यकता ओळखली होती. पुढे या गोष्टीचा अतिरेक झाला. उच्च ज्ञानप्राप्तीसाठी सर्व इच्छांचे दमन करणे आवश्यक आहे असे मानले जाऊ लागले.आता विज्ञानाच्या विकासाबरोबर फ्रॉइडसारख्यांच्या शोधामुळे लंबक दुसर्या टोकाला। जाऊ पाहत आहे. आपणास स्वच्छंदीपणे वागण्यास मुभा असावी असे म्हणणारे लोक आपल्या कृतीच्या मानसिक व बाह्य परिणामाकडे लक्ष देण्यास तयार नसतात.
स्त्रीपुरुषांमधील मुक्त लैंगिक संबंधाचा विचार करताना अशा संबंधांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्याविषयक (व एड्सविषयक), लोकसंख्याविषयक व कायदेविषयक कोणते परिणाम होतील हेही पाहाणे आवश्यक आहे. ह्या प्रश्नाच्या कायद्याच्या बाजूचा आपण विचार केला नाही असे मोहनी म्हणतात. हा विचार त्यानी अवश्य करावा. इतकेच नव्हे तर त्यांनी ह्या प्रश्नाच्या विविध पैलूंचे परस्पराशी संबंध कसे असतात ह्याचाही विचार करावा. आपण लोकसंख्येचा मुद्दा विचारात घेऊ. लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याची निकड आपणास चालू शतकाच्या मध्यापासून भासावयास लागली. १९५२ साली भारताच्या लोकसंख्यावाढीचे प्रमाण शे. १३ होते. त्या वेळपासून प्रत्येक पंचवार्षिक योजनेत कुटुंबनियोजनासाठी करोडो रुपये खर्ची घालण्यात आले. पण त्याचा काहीच फायदा झालेला दिसत नाही. सध्याच्या काळी लोकसंख्यावाढीचे प्रमाण कमी न होता ते शेकडा २४ इतके झाले आहे. अशा स्थितीत स्त्रीपुरुषांचे स्वैर संबंध व लकसंख्यावाढ यात परस्पर संबंध नाही असे कोणलातरी म्हणता येईल काय?
किंवा आता स्त्रीपुरुषामधील वितुष्ट व त्याचा त्यांच्या अपत्यावरील परिणाम हामुद्दा विचारात घेवू. स्वैर स्त्रीपुरुषसंबंधामध्ये प्रेमभंगाचे व घटस्फोटाचे प्रमाण वाढेल हे उघड आहे व त्याचा परिणाम मुलांवरही होईल. पतीपत्नीमधील संबंध सुसंवादी नसेल तर त्याचा परिणाम मुलांवर होऊन त्याचा शारीरिक, भावनिक, मानसिक विकास खंटतो. मुलांच्या विकासासाठी त्यांना आईवडीलाचे प्रेम हवे असते. प्रेमाच्या अभावी ती विकृत मनाची बनतात. मुक्त स्त्रीपुरुषसंबंधात त्या मुलांची काळजी कोण घेईल? त्याना कोणत्या प्रकारचे शिक्षण कोण देणार? व अशा शिक्षणामुळे आपण कोणत्या स्वरूपाची संस्कृती निर्माण करणार ह्याचा विचार कोणी करताना दिसत नाही. मुक्त स्त्रीपुरुषसंबंधामुळे निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यामागे आवश्यक असणार्याद शिक्षणाचा साधा आराखडासुद्धा मोहनीपाशी नाही. मग त्याच्यासंबंधाने प्रयोग करणे दूरच राहिले.
स्त्रीपुरुषसंबंधाचा व्यापक दृष्टीने विचार केल्यास पुरुषांनी स्त्रियांना समान अधिकार देण्यापासून वंचित केले याची परिस्थिजन्य कारणे काहीही असली तरी मानसशास्त्रीय कारण पुरुष हा स्त्रीपेक्षा अधिक आक्रमक व दलितावर अधिसत्ता गाजविणारा असतो हे आहे. हे कारण जोपर्यंत आपण नष्ट करीत नाही तोपर्यंत पुरुषाचे क्रौर्य कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही.
शेवटी मला एका मुद्द्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. दिवाकर मोहनी हे जडवादी आहेत. त्यांनी मनाची एक विशिष्ट कल्पना स्वीकारली आहे व त्यांचा स्त्रीमुक्तीसंबंधीचा आदर्श या कल्पनेशी सुसंगत असाच आहे. जडवादी मनुष्य मूलतः स्वतंत्र आहे असे मानतो. त्याच्यावर जी बंधने पडलेली दिसतात ती वरवरची असून साध्या उपायाने घालवून देता येतील असे त्याला वाटते. याच्याविरुद्ध चैतन्यवादी मनुष्य मनुष्यावर (मानसिक) बंधने पडलेली असून ती साध्या उपायांनी घालवून देता येणार नाहीत असे मानतो. यांच्याच जोडीला दुसराही एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. प्राचीनानी जीवनात अदृष्ट असून त्याचा प्रभाव मनुष्याच्या दैनंदिन जीवनावर पडतो असे मानले होते. त्या अदृष्टाची कल्पना नीटपणे समजून न घेताच तिचा उपयोग दलिताना अंकित करून त्याचा छंळ करण्यासाठी केला गेला. जडवादी मनुष्य अदृष्टाची कल्पना स्वीकारीत नाही व आतापर्यंत ते योग्यच होते. पण आता फ्रॉइड, युंग, अॅडलर व अन्य मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे मनुष्याला ह्या अदृष्टाचा (अव्यक्त मनाचा) शोध लागला आहे, व अदृष्टाचा (अव्यक्त मनाचा) आपल्या व्यक्त मनावर प्रभाव असतो हेही आता सिद्ध झाले आहे. ह्या अदृष्टाचे स्वरूप समजून घेण्यासाठी आता मानसशास्त्रज्ञ प्रयोग करीत आहेत. अशा स्थितीत सर्व जडवाद्यानी मनाच्या स्वरूपाची आपली कोती कल्पना टाकून देऊन मनोव्यापाराकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. जडवाद्यांनी आता ह्या अदृष्ट व्यापाराचा दृष्ट (व्यक्त) मनाशी संबध कसा येतो हे समजून घेतले पाहिजे. त्यानी असे केले नाही तर त्यांचे सुधारणेचे सर्व प्रयत्न एकांगी, अल्पजीवी व अंतिमतः घातक ठरल्याशिवाय राहाणार नाहीत

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.