वैज्ञानिक पद्धतीची सार्वजनिकता

निसर्गविषयक विज्ञानाची दोन वैशिष्ट्ये महत्त्वाची आहेत. ती दोन मिळून जिला ‘वैज्ञानिक पद्धतीची सार्वजनिकता’ म्हणता येईल ती बनते. पहिले वैशिष्ट्य मुक्त टीका. आपल्या उपपत्तीवर आक्षेप घ्यायला जागा नाही अशी वैज्ञानिकाची खात्री असेल; परंतु तिचा त्याच्या सहकारी आणि स्पर्धक वैज्ञानिकांवर काही प्रभाव पडणार नाही, उलट ती त्यांना आव्हान वाटेल. वैज्ञानिक वृत्ती म्हणजे सर्व गोष्टींची परीक्षा घेणे, आणि म्हणून ते अधिकाराने दबत नाहीत. आणि दुसरे वैशिष्ट्य असे की वैज्ञानिक परस्परांना समजतील असेच युक्तिवाद वापरतात. ते वेगवेगळ्या मातृभाषा वापरीत असले तरी एकच भाषा बोलण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. नैसर्गिक विज्ञानात हे संपादन करण्याचा उपाय म्हणजे आपल्या वादात वैज्ञानिक अनुभव हाच अपक्ष निर्णेता म्हणून ओळखतात. ‘अनुभव’ या शब्दाने मला सार्वजनिक स्वरूपाचा, अनुभव व प्रयोग यांच्यासारखा अनुभव अभिप्रेत आहे, आभिरौचिक किंवा धार्मिक अनुभवासारखा खाजगी अनुभव नव्हे. जो अनुभव कोणालाही अवश्य ते कष्ट घेतल्यावर येऊ शकेल तो सार्वजनिक अनुभव. आपले युक्तिवाद परस्परांना न कळल्यामुळे विफल होऊ नयेत म्हणून वैज्ञानिक ज्यांचे परीक्षण आणि खंडन (किंवा मंडनही) होऊ शकेल अशा स्वरूपातच ते व्यक्त करतात.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.