मी आस्तिक का आहे?

कवळे येथील श्रीशांतादुर्गा ही आमची कुलदेवता. शांतादुर्गा आमच्या कुटुंबातीलच एखादी वडीलधारी स्त्री असावी तसं तिच्याविषयी माझे आजोबा-आजी, आई-वडील आणि इतर मोठी माणसं, माझ्या लहानपणी बोलत आणि वागत. अतिशय करडी, सदैव जागरूक असलेली पण अतीव प्रेमळ, संकटात जिच्याकडे कधीही भरवशाने धाव घ्यावी अशी वडीलधारी स्त्री. ती आदिशक्ती, आदिमाया, विश्वजननी आहे हे त्यांना माहीत होते. पण हे विराट, वैश्विक अस्तित्व कुठेतरी दूर, जिथे वाणी आणि मनही पोहोचू शकत नाही अशा दुर्गम स्थानी विराजमान झालेले आहे, तिथून ते आपल्याला न्याहाळत असते, आपले आणि इतरांचे नियंत्रण करते असे त्यांना वाटत नव्हते. शांतादुर्ग, ही विश्वजननी अशी दूरस्थ, सर्व अनुभवांच्या आणि तर्काच्या पलीकडे असलेली अशी आहे असे तिचे स्वरूप असेलही. पण ह्याबरोबरच राजस रूप धारण करून आपल्या जवळपास सदैव वावरणारी, आपल्या मनात खोल दडलेली अशीही सुखदुःखे जाणणारी, आपल्यावर मायेची पाखर घालणारी, आपल्या हातून घडलेल्या अपराधांची क्षमा करणारी, सगळे आधार तुटले तरीही जिच्यावर विश्वासाने भिस्त ठेवावी अशी स्त्री हेही त्यांच्या दृष्टीने तिचे स्वरूप होते. संकटे येत, आपत्ती येत आणि त्यांना ही माणसे अर्थात् तोंड देत. “देवी जर आपली आहे, सर्वशक्तिमान आहे, जर ती आपले भले चिंतिणारी आहे तर ह्या आपत्ती येतात तरी कशा?” हा प्रश्न कुणी विचारीत नसे. “तिच्या मनात काय आहे कोण जाणू शकेल? पण अखेरीस सगळे चांगले होणार,” अशी त्यांची धारणा असे. आणि संकट संपुष्टात आल्यावर हे जे सर्व चांगले अखेरीस घडून यायचे होते, ते घडून आले आहे, असेच त्यांना दिसत असे. ह्या सबंध दृष्टीत जर काही तार्किक विसंगती असतील तर त्या त्यांना जाणवलेल्या नव्हत्या. ह्या दृष्टीकडे बाहेरून पाहणारे आपण तिचे वर्णन ‘श्रद्धा’ असे करू. पण अनुभव आणि अनुमान ह्यांच्यापासून मिळणारे प्रमाणज्ञान आणि श्रद्धा ह्यात आपण भेद करतो. हा भेद ही माणसे करीत नव्हती. अनुभवाने आणि तर्काने ज्याचे प्रामाण्य सिद्ध करता येत नाही, असे काहीतरी सत्य म्हणून स्वीकारण्याचा निर्णय आपण केला आहे अशी त्यांची धारणा नव्हती. ती त्यांची स्वाभाविक ‘श्रद्धा’ होती. ह्या श्रद्धेने भारलेल्या वैचारिक, भावनिक वातावरणात त्यांच्या आधीच्या पिढ्या जगत आल्या होत्या आणि तसेच तेही जगत होते. तिच्या प्रामाण्याविषयी प्रश्न उपस्थित करण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नसता. ह्या श्रद्धेचा संस्कार लहानपणी माझ्यावर झाला होता.

वाढत्या वयात अर्थात ह्या श्रद्धेविषयी अनेक शंका माझ्या मनात आल्या. पण ह्या श्रद्धेचा लळाही मला जडला होता. आपण कल्पनेने एखाद्या परक्या, वास्तव जगाशी संबंधित नसलेल्या भावविश्वात जगू शकतो. उदा. सॉक्रेटिसच्या अथेन्समध्ये किंवा कालिदासाच्या उज्जयनीमध्ये. तसे शांतादुर्गेच्या भक्तांच्या संगतीत तिच्या भक्तीने भारलेल्या वातावरणात विहरावे अशी ओढ माझ्या मनाला होती. म्हणजे तिचे सान्निध्य अनुभवावे, ह्या सान्निध्यातून एका शुद्धतेचा, पावित्र्याचा स्पर्श आपल्या अंतःकरणाला होतो आहे, मनात साचलेले किल्मिष, ‘दुरित’ ह्या स्पर्शामुळे क्षीण होते आहे, विरत चालले आहे आणि काही विलक्षण शांतीने मन भरून येत आहे, असा अनुभव घ्यावा, पूजा, आरती, उत्सव ह्यांच्याद्वारा देवीशी जवळीक साधावी, म्हणजे देवीचे खरेखुरे भक्त जसे देवीच्या पायाशी रमतात, तसे आपणही रमावे अशी माझी उत्कट इच्छा असे. असा मी रमतही असे. पण ते नाटक होते. नट आपल्या भूमिकेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, तसा भक्ताच्या भूमिकेशी एकरूप होण्याचा मी प्रयत्न करीत असे. पण नट भूमिकेशी कितीही एकरूप झाला तरी नट आणि पात्र ह्यांतील फरक राहतोच. तसे माझेही होते. पण ह्यात खोटेपणा नव्हता, असे मला वाटते. कारण मला एक आशा होती. ती ही की देवीच्या भक्ताची मी करीत असलेली भूमिका ही अखेरीस भूमिका राहणारच नाही; ते माझे जगणेच होईल. (नटाच्या बाबतीत अशा आशेला स्थानच असत नाही.) तेव्हा मी करीत असलेले ‘नाटक’ एका अंगाने ‘साधना’ होती. पण साधना करण्याचा अधिकार मला नाही, मी त्याच्या खूपच अलीकडे आहे, ही जाणीवही मला होती. देवीची मी करीत असलेली भक्ती ह्या स्वरूपाची माझी साधना नव्हती. तर अशी साधना पुढे माझ्याकडून घडावी ह्यासाठी केलेली ती साधना होती.

जो खरा भक्त आहे त्याला प्रश्न पडत नाहीत. सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला मिळालेली असतात असे नसते. पण एका मोठ्या, मध्यवर्ती प्रश्नाचे संपूर्ण उत्तर त्याला मिळालेले असते आणि मग किरकोळ प्रश्न त्याला सतावीत नाहीत. ज्याची भक्ती करावी असा जगाचा नाथ आहे ह्या दर्शनात सगळे प्रश्न विरून गेलेले असतात. भक्ताचा संपूर्ण भार देवावर असतो. अंतर्यामी उमटणाऱ्या देवाच्या आदेशाप्रमाणे जगणे एवढाच भक्तावरचा भार असतो. पण हा भार नसतो. तो आनंद असतो.

पण खरे भक्त फारच विरळा असतात. सर्वसामान्य संसारी माणसांना देवाधर्माविषयीचे, परलोकाविषयीचे खूप प्रश्न भंडावत असतात. मी महाविद्यालयात अभ्यासासाठी तत्त्वज्ञान हा विषय निवडल्यामुळे माझी परिस्थिती अधिकच बिकट झाली. कारण ईश्वर आहे काय, असल्यास त्याचे आणि ह्या जगाचे, ह्या दृश्य सृष्टीचे नाते काय आहे, ईश्वराचे आणि माणसाचे नाते काय आहे, हे तत्त्वज्ञानातील काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. (एवढेच महत्त्वाचे प्रश्न तत्त्वज्ञानात आहेत, असे नाही. पण हे तत्त्वज्ञानातील महत्त्वाचे असे काही प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आणि त्यांचे महत्त्व अजून टिकून आहे.)

तत्त्वज्ञानात ईश्वराविषयी सातत्याने आणि विस्तृतपणे चर्चा होत आली आहे. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानात आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानातही. एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. ईश्वराची संकल्पना ही तत्त्ववेत्त्यांनी निर्माण केलेली संकल्पना नव्हे. ती त्यांना श्रद्धाळू, धार्मिक वृत्तीच्या व्यक्तीकडून मिळालेली संकल्पना आहे. तत्त्ववेत्ते तिला नेटके स्वरूप देण्याचा आणि तर्काच्या कसोटीवर ती कितपत टिकून राहते हे पाहण्याचा प्रयत्न करतात.

ईश्वर म्हणजे काय? तर ईश्वर म्हणजे ह्या जगाचा, ह्या दृश्य विश्वाचा निर्माता. पण एवढेच ईश्वराचे स्वरूप नही. तो सर्वशक्तिमान आहे; त्याची शक्ती, सामर्थ्य अनंत आहे. शिवाय तो परिपूर्ण आहे. सर्व सद्गुण त्याच्या ठिकाणी ओतप्रोत, अपरिमित प्रमाणात आहेत; तो ‘अनंत-कल्याण-गुण-निधान’ आहे. म्हणून तो शुभंकर आहे. तो सर्वांचे कल्याणच घडवून आणतो. जे वाईट आहे, अमंगल आहे, अहिताचे आहे त्याला ईश्वराने निर्माण केलेल्या ह्या जगात स्थानच नाही. ‘आनंदाचे डोही आनंदतरंग’ असे ह्या विश्वाचे स्वरूप आहे. थोडक्यात ईश्वर दोन दृष्टींनी अनंत आहे. त्याचे सामर्थ्य अनंत आहे; आणि त्याचा चांगुलपणा अनंत आहे.

आपण धर्माचा इतिहास पाहिला तर ईश्वराविषयीची ही संकल्पना हळूहळू विकसित होत आली आहे, असे दिसून येईल. आणखी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. जगाचा निर्माता आणि सर्वस्वी चांगला असलेला असा ईश्वर आहे हा सिद्धांत सर्वच धर्म स्वीकारतात, असे नाही. बौद्ध आणि जैन हे धर्म ईश्वर मानीत नाहीत. फार काय पूर्वमीमांसा हा जो आपल्याकडचा सर्वात कडवा वैदिक पंथ आहे, तोही जगाचा निर्माता असा ईश्वर मानीत नाही. ईश्वराचे अस्तित्व न मानणारी व ह्या अर्थाने नास्तिक असलेली माणसे शुद्ध, सात्त्विक प्रवृत्तीची, अत्यंत सुशील असतात आणि ती चांगले, समृद्ध, कृतकृत्य, ‘आध्यात्मिक’ जीवन जगू शकतात, हा सर्वांचा अनुभव आहे. ज्यांची ईश्वरावर खरी श्रद्धा असते, त्यांचा अशा नास्तिकांशी काही वाद नसतो. त्यांना ते एवढेच म्हणतील की, “तुमचे बौद्धिक मत काहीही असो, ज्या रीतीने तुम्ही जगता त्यावरून तुम्ही तुमच्या खोल मनात ईश्वराला नकळत मानता असेच दिसून येते. आपण ईश्वराला नाकारीत आहोत असे तुम्हाला वाटते, पण ईश्वराने तुम्हाला स्वीकारलेले आहे.”

ते काही असो, ज्याचे सामर्थ्य अमर्यादित आहे आणि ज्याचा चांगुलपणा अमर्यादित आहे, असा जगाचा निर्माता असलेला ईश्वर आहे असे मानण्यात अनेक तार्किक अडचणी आहेत ह्यात शंका नाही. अनेक तत्त्ववेत्त्यांनी त्या दाखवून दिल्या आहेत आणि ह्या कारणांमुळे त्यांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. उदा. ह्या जगाचा कुणी निर्माता आहे असे मानायला आधारच काय, असा एक प्रश्न आहे. आता समजा ह्याचे उत्तर कुणी दिले की जी कोणती वस्तू अस्तित्वात असते तिचे तिच्याहून भिन्न असे काही कारण असते आणि ह्या कारणामुळे ती अस्तित्वात आलेली असते. आता जग अस्तित्वात आहे. तेव्हा जगाच्या अस्तित्वाचे, जगाहून भिन्न असे काही कारण असले पाहिजे. हे कारण म्हणजे ईश्वर, ह्या युक्तिवादातील अडचण उघड आहे. जर ईश्वर अस्तित्वात असेल तर, ह्या युक्तिवादाप्रमाणे, त्याचेही त्याच्याहून भिन्न असे कारण असले पाहिजे. आणि ईश्वराच्या ह्या कारणाचेही, त्याच्याहून भिन्न कारण असले पाहिजे. अशी कारणांची अनंत मालिका मानावी लागेल. आता ह्याच्यावर तोड म्हणून आपण जर असे म्हणालो की ईश्वर हे जगाचे कारण आहे हे खरे, पण ईश्वराचे, त्याच्याहून भिन्न असे कारण नाही. ईश्वर हा स्वतःच स्वतःचे कारण आहे. तो जगाचे कारण आहे आणि स्वयंभू आहे. मग प्रश्न असा येतो की स्वयंभू असलेले-म्हणजे ज्याचे स्वतःहून भिन्न असे काही कारण नसते, असे काहीतरी असू शकते हे मान्य करायला जर आपण तयार असलो तर जगही स्वयंभू आहे आणि त्याचे काही बाह्य कारण नाही, असे का मानू नये?

दुसरा प्रश्न असा की, समजा जगाचे – ह्या दृश्य विश्वाचे – त्याच्याहून भिन्न असे कारण आहे आणि हे कारण म्हणजे ईश्वर. पण हा ईश्वर, जगाचे हे कारण, सचेतन आहे, त्याला जाणीव आहे आणि त्याने जाणीवपूर्वक हे जग बनविले आहे, असे मानायला आधार काय? जे ईश्वर मानतात ते एवढेच मानीत नाहीत. त्याच्यापुढे जाऊन, ईश्वराने जाणीवपूर्वक जगाची रचना केली आहे. एवढेच नव्हे तर त्या ईश्वराच्या ठिकाणी अमर्यादित चांगुलपणा आहे. आणि ह्या जगात, माणसाच्या जीवनात, हा अमर्यादित चांगुलपणा प्रतिबिंबित झाला आहे, त्याचे प्रत्यंतर आपल्याला येत असते, असेही ते मानतात. ह्याला आधार काय?

ह्याला जो आधार देण्यात येतो तो असा की ह्या जगाकडे पाहिले तर कुणीतरी सहेतुकपणे त्याची रचना केली असली पाहिजे असेच त्याचे स्वरूप दिसते. ह्या जगात व्यवस्था आहे, नियमबद्धपणा आहे. श्रमण्यासाठी दिवस आणि विश्रांतीसाठी रात्र एकामागून एक येत राहतात. ऋतूंचे चक्र नेमाने फिरत राहते. जे काही घडते ते नियमांना अनुसरून घडते. म्हणून काय केले असता काय घडेल ह्याचे ज्ञान माणसाला मिळविता येते आणि आपल्याला जे हवे असेल ते शक्य असेल तर, माणूस घडवून आणू शकतो. वनस्पती, पशुपक्षी यांची शरीरे घ्या. आपापल्या परिसरात ते चांगल्या प्रकारे जगू शकतील अशी ह्या शरीरांची घडण असते. उदा. माणसाचा डोळा घ्या. कमी-अधिक दूरवरच्या वस्तू कमीअधिक प्रकाशात माणसाला स्पष्टपणे पाहता याव्यात अशी, अतिशय गुंतागुंतीची आणि अतिशय नाजूक अशी डोळ्याची रचना झालेली दिसून येते. हे सर्व आपोआप घडून आले आहे, केवळ जड अशा वस्तूंच्या ठिकाणी असलेल्या भौतिक शक्तींचा हा केवळ आंधळा खेळ आहे, असे मानता येणार नाही. कुणीतरी जाणीवपूर्वक ही रचना केलेली असणार आणि ह्या सृष्टीचा प्रचंड व्याप पाहिला तर ह्या रचनाकाराच्या अंगी अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत चांगुलपणा असणार असेच मानावे लागते. हा विश्वव्यवस्थेचा रचनाकार म्हणजे ईश्वर.

अनेकांना पटणारा असा हा युक्तिवाद आहे. पण त्याच्यावर दोन प्रबळ आक्षेप घेण्यात आले आहेत. एक असा : जगात व्यवस्था आहे तशीच अव्यवस्थाही आहे. सुख आहे तसेच प्रचंड दुःख आहे. विलक्षण क्रौर्य ह्या सृष्टीत आहे. प्राणी एकमेकांचा संहार करून जगतात. अनेक पिढ्यांच्या श्रमाने उभारण्यात आलेले एखादे सुरेख, संपन्न, सुसंस्कृत शहर दोन मिनिटे टिकणार्‍या धरणीकंपाने उद्ध्वस्त होते. जगात आढळणारे हे जे दुःख, क्रौर्य, विषमता, अन्याय आहे त्याला जबाबदार कोण? हे सारे जर ईश्वराने निर्माण केले असेल तर तो केवळ मंगलस्वरूप आहे, असे कसे म्हणता येईल? आणि समजा ह्याच्यावर कुणी असे उत्तर दिले की जगात जे दुःख आहे, जे जे अमंगल आहे ते माणसांनी केलेल्या पापांचे रास्त फळ म्हणून आहे, त्यात ईश्वराचा दोष नाही, तर मग असे विचारता येईल की सर्वशक्तिमान अशा ईश्वराने, जो पुढे पापे करणार आहे आणि स्वतःला व भावी पिढ्यांना दुःखात लोटणार आहे असा माणूस निर्माणच का केला? जो सदैव निष्पाप आणि म्हणून सुखी राहील असा माणूस का नाही निर्माण केला? तेव्हा जो सर्वशक्तिमान आहे आणि केवळ मंगलस्वरूप आहे, अशा ईश्वराची कल्पना टिकत नाही.

सृष्टीत जी व्यवस्था आढळते तिची कुणीतरी हेतूपूर्वक रचना केली असणार ह्या सिद्धांतावर आधुनिक काळात दुसरा आक्षेप घेण्यात आला आहे. डार्विनने असे दाखवून दिले आहे की, प्राण्यांच्या शरीरात आणि इंद्रियांत जी ‘रचना’ आढळते ती, ज्यांना आपण ‘आंधळ्या’ भौतिक शक्ती म्हणतो त्यांच्या कार्याचा परिणाम म्हणून हळूहळू विकसित झाली असण्याची शक्यता आहे. ही रचना कुणीतरी हेतूपूर्वक केली असणार असे मानायचे कारण नाही.

मग प्रश्न असा की हे आक्षेप जर मला माहीत आहेत तर माझी बालपणातील श्रद्धा मी का सोडून दिली नाही? मी ‘आस्तिक’ का राहिलो? ह्याचे थोडक्यात उत्तर असे की ही माझी स्वाभाविक श्रद्धा आहे. माणूस म्हणून असणारी ही स्वाभाविक श्रद्धा आहे. ह्या तार्किक आणि ‘वैज्ञानिक’ आक्षेपांमुळे ती सोडून द्यावी लागेल असे काही घडलेले नाही. मी माणूस आहे म्हणून मी ज्याप्रमाणे बाहेरच्या सृष्टीकडे पाहतो त्याप्रमाणे माझ्या अंतरंगात मी पाहतो आणि इतर माणसांच्या अंतरंगातही पाहू शकतो. तिथे मला काय आढळते? आपण माणसे ज्याप्रमाणे बाह्य वस्तूंचे निरीक्षण करून तार्किक विचाराने त्यांचे वैज्ञानिक ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो त्याप्रमाणे नैतिक नियमांचे आणि मूल्यांचे ज्ञानही आपण प्राप्त करून घेऊ शकतो. आणि ह्या नैतिक नियमांना अनुसरून आपण स्वतःच्या वर्तनाचे आणि इच्छांचे नियमन करू शकतो. निसर्गात जे सौंदर्य असते त्याचा तटस्थपणे पण उत्कटतेने आपण आस्वाद घेऊ शकतो आणि आपल्यातील काहीजण अशा सौंदर्याची निर्मिती करू शकतात – संगीतात, शिल्पात, साहित्यात. केवळ जड, भौतिक वस्तूंचा समूह म्हणजे विश्व आणि ह्या सर्व वस्तूंना घडणाऱ्या घटना काही सामान्य नियमांना अनुसरून निरपवादपणे घडतात. एवढेच जर विश्वाचे सबंध स्वरूप असेल तर विज्ञान निर्माण करणारा, नैतिक नियमांनी स्वतःचे नियमन करणारा, सौंदर्याचा आस्वाद घेणारा, सौंदर्य निर्माण करणारा माणूस विश्वाच्या स्वरूपाच्या ह्या चौकटीत सुसंगतपणे सामावूच शकणार नाही. विज्ञानाच्या दृष्टीने माणूस एक गूढ ठरतो.

माणसाच्या ह्या वेगवेगळ्या स्वाभाविक शक्तींशी प्रेरणा निगडित असतात. ज्ञानशक्तीशी ज्ञान मिळविण्याची प्रेरणा, नैतिक शक्तीशी नैतिकतेने जगण्याची प्रेरणा इ. तशीच श्रद्धा हीसुद्धा माणसाची एक स्वाभाविक शक्ती आहे आणि तिच्याशी एक प्रेरणा निगडित आहे. ह्या दृश्य विश्वाच्या पसार्‍यामागे, त्याला आधारभूत असलेली अशी एक मंगल शक्ती आहे, असे विश्वाचे दर्शन घेण्याची ही शक्ती आहे. आदिम काळापासून माणसांना ह्या परतत्त्वाची जाणीव आहे, असे दिसून येते. विश्वात जे अमंगल आहे ते सारे ह्या श्रद्धेच्या दृष्टीने एक गूढ राहते. हे गूढ माणसाला उकलू शकत नाही कारण माणस सान्त आहे, त्याच्या शक्ती मर्यादित आहेत. पण हे गूढ श्रद्धाळू माणसाची श्रद्धा विचलित करू शकत नाही. आणि ह्या श्रद्धेशी निगडित असलेली प्रेरणा अशी की हे गूढ उकलण्याचा भार ईश्वरावर सोपवून आपला स्वार्थ कमी कमी करत इतरांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करीत जगावे; ‘उरलो उपकारापुरता’ अशी स्थिती प्राप्त करून घ्यावी. श्रद्धेचा कस अशा रीतीने जगण्यात लागतो.

माझ्या वाडवडिलांची भोळी श्रद्धा हे त्यांचे एक सामर्थ्य होते. ह्या सामर्थ्याची जोपासना मी करू नये, असे काही घडलेले नाही.
मला गुरूसमान असलेले बर्ट्रांड रसेल ह्यांनी ‘मी ख्रिस्ती का नाही?’ ह्या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. म्हणजे आपण धार्मिक श्रद्धा का स्वीकारीत नाही ह्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. एकदा मध्यपूर्वेत प्रवास करीत असताना ते एका चर्चमध्ये, केवळ ते चर्च पाहण्यासाठी म्हणून शिरले आणि एकाएकी ‘आपण ख्रिस्ती आहोत’ अशी जाणीव त्यांना झाली, असे त्यांनी नमूद केले आहे. जगात शांतता नांदावी, अणुयुद्ध होऊ नये म्हणून आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, तुरुंगवास भोगला. हा जगण्याचा ख्रिस्ती, धार्मिक मार्ग होता. जे स्वतःला नास्तिक म्हणवतात आणि ह्या मार्गाने जगतात ते श्रद्धावान माणसाच्या दृष्टीने आस्तिकच असतात. काही माणसांनी ईश्वराला नाकारावे ही ईश्वराचीच लीला आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.