मी आस्तिक का नाही?

प्रा. मे. पुं. रेगे यांचा ‘मी आस्तिक का आहे?’ हा लेख ‘कालनिर्णय’ कॅलेंडरच्या १९९५ च्या आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. (हा लेख प्रारंभी उद्धृत केला आहे.) प्रा. रेगे यांचा तत्त्वज्ञानातील व्यासंग व अधिकार लक्षात घेता त्यांच्या या लेखाने आस्तिक लोकांना मोठाच दिलासा मिळेल यात शंका नाही. परंतु म्हणूनच आस्तिक्य न मानणाऱ्या विवेकवादी लोकांवर त्या लेखाची दखल घेण्याची गंभीर जबाबदारी येऊन पडते. ती जबाबदारी पार पाडण्याकरिता हा लेख लिहावा लागत आहे.

‘मी आस्तिक का आहे?’ या प्रश्नाचे प्रा. रेगे काय उत्तर देतात? ते उत्तर थोडक्यात असे आहे की आपली वडील मंडळी आस्तिक होती. त्यांच्या श्रद्धेचा आपल्यावर लहानपणीच संस्कार झाला, आणि ज्यामुळे ती श्रद्धा टाकून द्यावी असे काही घडलेले नाही.

‘मी आस्तिक का आहे?’ यासारख्या ‘का‘ या प्रश्नार्थी अव्ययाच्या साह्याने विचारलेल्या प्रश्नात आपण कशाचे तरी कारण मागत असतो. पण ‘कारण’ या शब्दाचे अर्थ अनेक आहेत. ‘पाऊस का पडतो?’ यासारख्या प्रश्नात ‘का’ म्हणजे ‘कशामुळे’ असा अर्थ अभिप्रेत असतो. एखादी घटना कशामुळे घडली असा तो प्रश्न असतो. परंतु ‘तू चोरी का केलीस?’, या प्रश्नात ‘का’ म्हणजे ‘कशाकरिता’, ‘कोणत्या हेतूने’ असा अर्थ असतो. हा अर्थ एखाद्या कर्माच्या किंवा कृतीच्या बाबतीत आपण विचारतो. पण ‘का’चा तिसराही एक अर्थ आहे-‘कशावरून?’. ‘माणसे स्वार्थी असतात असे तू का मानतोस?’ म्हणजे माणसे स्वार्थी असतात हे विधान खरे कशावरून? या तिसऱ्या अर्थी ‘का’ या प्रश्नाने एखाद्या विधानाचे समर्थन अभिप्रेत असते. विधानाचे समर्थन देणे म्हणजे ते एका किंवा अनेक सत्य विधानांवरून अपरिहार्यपणे निष्पन्न होते असे दाखविणे.

आता ‘मी आस्तिक का आहे?’ या प्रश्नाने कोणत्या प्रकारचे कारण मागितले आहे? वरील तीन प्रकारांपैकी पहिल्या आणि तिसऱ्या प्रकारचे कारण त्यात अभिप्रेत असू शकते.

(१) मी आस्तिक आहे ही स्थिती कशामुळे घडून आली? प्रा. रेग्यांनी दिलेले कारण या प्रकारचे असावे असे वाटते. त्यांचे आईवडील आणि इतर वडीलधारी माणसे आस्तिक होती, आणि त्यांच्या मतांचा परिणाम रेग्यांच्या बालमनावर झाला. म्हणजे ते आस्तिक झाले, नकळत, स्वाभाविकपणे.
(२) पण ‘मी आस्तिक का आहे?’ हा प्रश्न अशाही अर्थाने अभिप्रेत असू शकेल की त्याला वरील उत्तर योग्य होणार नाही. या प्रश्नाने रेग्यांच्या आस्तिक्याचे समर्थन मागितलेले असू शकेल. तसे असेल तर त्याला रेग्यांचे उत्तर काय आहे?

रेग्यांच्या लेखात या प्रश्नाची दोन उत्तरे दिसतात. एक उत्तर असे आहे की आस्तिक्याचे समर्थन होऊ शकत नाही. जगाचा सर्वशक्तिमान आणि सर्वथा मंगल असा निर्माता-नियंता आहे या मताला जितका साधक पुरावा आहे तितकाच आणि तुल्यबल बाधक पुरावाही आहे. ‘जो सर्व शक्तिमान आहे आणि केवळ मंगलमय आहे अशा ईश्वराची कल्पना टिकत नाही’ असे ते स्वतःच मान्य करतात.

एवढ्यावरून कोणाला वाटेल की मग रेग्यांची श्रद्धा असमर्थनीय आहे. पण नाही. ते म्हणतात की ‘माझी श्रद्धा स्वाभाविक आहे, आणि तार्किक आणि वैज्ञानिक आक्षेपांमुळे ती सोडून द्यावी लागेल असे काही घडलेले नाही.’

इथे एक प्रश्न उद्भवतो की ‘स्वाभाविक’ श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धेचा स्वाभाविकपणा हा एक विलक्षण गुण असावा का, ज्यामुळे तिचे सर्व प्रकारच्या आक्षेपांपासून रक्षण होते? असा हा विलक्षण चमत्कार करणारा गुण काय असेल याविषयी मात्र प्रा. रेगे आणखी काही बोलत नाहीत. पण असा गुण असू शकेल काय? स्पष्टच सांगायचे तर असा गुण असू शकत नाही. तर्काचे बंधन जिला नाही अशी गोष्ट अशक्यच असली पाहिजे. तर्काचे प्रमुख बंधन म्हणजे व्याघात (contradiction) निषेध. रेग्यांनी उल्लेखलेल्या तार्किक आणि वैज्ञानिक आक्षेपात असे दाखविले आहे की ईश्वरकल्पना आणि आपला प्रत्यक्ष अनुभव यांत उघड व्याघात आहेत. या व्याघातांमुळे जी बाधित होत नाही ती गोष्ट सार्थ भाषेच्या पलीकडे गेली आहे. जिला आपण निरर्थक म्हणतो अशी ती अक्षरशः आहे.

किंवा प्रा. रेग्यांना दुसरा एक प्रश्न विचारता येईल. ते म्हणतात की आपली श्रद्धा ज्यामुळे सोडून द्यावी लागावी असे काही घडलेले नाही. यात असा अभिप्राय व्यंजित दिसतो की काहीतरी असू शकते की जे घडले असते म्हणजे त्यामुळे त्यांना आपली श्रद्धा सोडावी लागली असती. तसे असेल तर ते काय असेल ते त्यांनी सांगावे. ते त्यांनी सांगितलेले नाही. ते फक्त एवढेच म्हणतात की ज्यामुळे आपली श्रद्धा सोडावी लागावी असे काही घडलेले नाही. परंतु माझा असा कयास आहे की असे काहीही असू शकत नाही असे त्यांचे मत असावे. कारण ते असेही म्हणतात की सामान्य श्रद्धावंताच्या एकंदर दर्शनात काही विसंगती असतील तर त्या त्याला जाणवलेल्या नसतात, आणि खऱ्या भक्ताला हे प्रश्न पडतच नाहीत. खरे भक्त फारच विरळा असतात असे रेगे स्वतःच म्हणतात. त्यामुळे सामान्य भक्तांच्या मनांत आपल्या श्रद्धेविषयी प्रश्न उद्भवणे अपरिहार्य आहे. मनुष्यांचा अनुभव सामान्यपणे असा असतो की त्यामुळे त्यांच्या श्रद्धेला आव्हान देतील असे प्रसंग वारंवार उद्भवतात. उदा. ईश्वर परममंगल आहे, आणि तो आपले काहीही वाईट करणार नाही. अशा श्रद्धेला धक्का बसेल असे प्रसंग वारंवार येतात. अशा प्रसंगी आपल्याला येणारे प्रतिकूल, अहितकर अनुभव खरोखर आपल्या भल्याकरिताच आहेत, त्यांतच आपले कल्याण आहे असे मानणे कठीण असते. स्वजनांचा, प्रियजनांचा मृत्यू, संपत्तीचे अपहरण आणि त्यातून उद्भवलेले दारिद्र्य आणि अन्नान्नदशा इत्यादि गोष्टी आपण वाईट समजतो. याही चांगल्याच आहेत असे समजणे म्हणजे चांगले आणि वाईट यांतील भेदच नाकारणे होईल. आपल्याला कसाही अनुभव आला, तो कितीही दुःखद असला, त्यात आपले पूर्ण वाटोळे झालेले असले, तरी त्यात आपले कल्याणच आहे असे जर कोणी म्हणू लागला तर तो कोठल्यातरी मुलखावेगळ्या अर्थाने भाषा वापरतो आहे असे म्हणणे भाग आहे. जर कोणताही अनुभव अहितकर नसेल तर ‘हित’ हा शब्द निरर्थकच होईल. जेव्हा आपण म्हणतो की श्रद्धावानाचे नेहमी कल्याण होते तेव्हा ‘कल्याण’ हा शब्द रूढ अर्थानेच अभिप्रेत आहे असे समजले पाहिजे. त्यामुळे ‘खरे’ भक्त सोडले, तर सामान्य भक्तांच्या जीवनात श्रद्धेतील विसंगती वारंवार लक्षात येणार, आणि त्यामुळे त्यांची श्रद्धा डळमळीत होणार हे अपरिहार्य आहे. अशा गोष्टींनीही रेग्यांची श्रद्धा विचलित झाली नसती काय?

रेगे म्हणतात की श्रद्धाळू माणसाची श्रद्धा कशानेही विचलित होत नाही. विश्वात जे अमंगल आहे त्यानेही ती डळमळीत होत नाही. विश्वातील अमंगल हे या श्रद्धेच्या दृष्टीने एक गूढ आहे. अमंगल गूढ आहे असे म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की त्याचे अस्तित्व या विश्वात सर्वत्र मंगल आहे या श्रद्धेच्या विरोधी आहे, आणि तो विरोध नाहीसा करता येत नाही. म्हणजे श्रद्धावानाला व्याघात स्वीकारावे लागतात. हे श्रद्धावानाच्या भूमिकेतील एवढे मोठे व्यंग आहे की त्यामुळे श्रद्धेचा त्याग करणे अनिवार्य व्हावे. त्याला गूढ म्हटल्याने त्याचा स्वीकार करण्यातील असमंजसपणा कमी होत नाही.

रेग्यांनी आस्तिक्याच्या समर्थनार्थ दोन उत्तरे दिली आहेत. असे वर म्हटले आहे. त्यापैकी पहिल्या उत्तराचा विचार आपण आतापर्यंत करीत होतो. आता दुसऱ्या उत्तराकडे वळू. ते उत्तर असे आहे : रेगे म्हणतात की विज्ञान निर्माण करणारा, नैतिक नियमांनी स्वतःचे नियमन करणारा आणि सौंदर्याची निर्मिती करून त्याचा आस्वाद घेणारा माणूस वैज्ञानिक विश्वात सुसंगतपणे बसूच शकत नाही. विश्व म्हणजे केवळ जड, भौतिक वस्तूंचा निरपवाद नियमांनी बद्ध असा समूह–असे विज्ञानाच्या मते विश्वाचे स्वरूप आहे. पण अशा विश्वात माणसाला स्थान नाही, कारण ज्ञानोपासना, नीत्युपासना आणि सौंदर्योपासना या गोष्टी म्हणजे कार्यकारणाच्या निरपवाद नियमांनी बद्ध गोष्टी नव्हेत. त्याकरिता माणसाजवळ अनेक स्वतंत्र स्वाभाविक शक्ती आणि प्रेरणा मान्य कराव्या लागतात. श्रद्धा हीसुद्धा अशाच शक्तींपैकी एक शक्ती आहे, आणि तिच्याशी एक प्रेरणा निगडित आहे. या दृश्य विश्वाच्या पसाऱ्यामागे त्याला आधारभूत असलेली एक मंगल शक्ती आहे असे विश्वाचे दर्शन घेण्याची ही शक्ती आहे.

क्षणभर आपण मान्य करूया की विज्ञानाची चौकट नियतिवादाची आहे. तसे मानले तर अर्थात् मानवांचे अनेक व्यापार त्या चौकटीबाहेर राहणार. मनुष्याजवळ निदान थोडीबहुत तरी स्वतंत्र ईहा (free will) आहे, आणि त्याच्या ज्ञानप्राप्त्यर्थ होणाऱ्या सुनियोजित क्रिया केवळ कार्यकारणाच्या नियतिवादी चौकटीत बसणार्‍या नाहीत हे मान्य करावे लागेल. तीच गोष्ट मानवाच्या नैतिक आणि आभिरौचिक (aesthetic) व्यवहाराविषयीही खरी आहे. पण हे मान्य करण्याकरिता आस्तिक्यही मान्य करावे लागते असे म्हणण्याचे कारण काय आहे? सत्य आणि असत्य यांतील भेद ओळखण्याकरिता श्रद्धेची, आस्तिक्याची गरज खचितच नाही, आणि त्याचप्रमाणे साधु आणि असाधु (किंवा मंगल आणि अमंगल) यांतील भेद आणि सुंदर आणि असुंदर यांतील भेद ओळखण्याकरिताही तिची गरज नाही. तसेच असत्यापेक्षा सत्य, असाधुत्वापेक्षा साधुत्व आणि असुंदरापेक्षा सुंदर वरचढ मानण्याकरिताही ईश्वरावरील श्रद्धेची गरज दिसत नाही. आता हे खरे आहे की अनेक ज्ञानोपासक (वैज्ञानिक), नीत्युपासक आणि कलावंत ईश्वर मानणारे होते आणि आहेत. पण तसेच या तिन्ही क्षेत्रातील अनेक लोक अश्रद्ध, निरीश्वरवादी होते आणि आहेत हेही प्रसिद्ध आहे. तेव्हा वैज्ञानिक, नैतिक आणि आभिरौचिक उद्योग करणाऱ्या लोकांचे आचरण कितीही गूढ वाटले तरी त्याची गूढता ईश्वर मानल्याने कमी होते असे म्हणता येत नाही.

प्रा. रेगे म्हणतात की श्रद्धा ही माणसाची एक ‘स्वाभाविक’ शक्ती आहे. या दृश्य विश्वाच्या पसाऱ्यामागे त्याला आधारभूत असलेली एक मंगलशक्ती आहे असे दर्शन घेण्याची ही शक्ती आहे. हे म्हणणे खरे असू शकेल. पण त्या शक्तीमुळे घडणारे दर्शन यथार्थ आहे की तो एक भ्रम आहे हा प्रश्न शिल्लकच राहतो. विश्वाच्या पसाऱ्यामागे त्याला आधारभूत असलेली एक मंगलशक्ती आहे असे दर्शन त्या शक्तीमुळे प्राप्त होऊ शकत असेल. पण हे दर्शन घेणे म्हणजे एक प्रकारचे आत्मसंमोहन असू शकेल ही शक्यता नाकारता येत नाही. एका पूर्णपणे निराधार, बिनबुडाच्या अस्तित्वाचे दर्शन घेण्याची ही शक्ती आहे असे म्हणण्यापेक्षा ते माणसाचे एक दौर्बल्य आहे हे म्हणणेच जास्त सयुक्तिक होईल. जिला कसलाही निर्णायक साधक पुरावा नाही, पण जिला बराच निर्णायक बाधक पुरावा आहे अशी एक कल्पना सत्य आहे असा भ्रम निर्माण करण्याची शक्यता हे त्या शक्तीचे स्वरूप असू शकेल. तेव्हा अशी शक्ती आहे हे मान्य करूनही तिने घडविलेले दर्शन निर्णायक बाधक पुराव्यामुळे यथार्थ मानता येत नाही.

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.