संपादकीय

आजचा सुधारकच्या स्तंभांमधून अधूनमधून अन्यत्र प्रकाशित झालेला मजकूर पुनःप्रकाशित होत असतो. असा मजकूर कधीकधी आमच्या पुष्कळ वाचकांच्या वाचनात आलेला असतो. मग असा मजकूर पुन्हा प्रसिद्ध करण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न आमच्या काही वाचकांनी उपस्थित केला आहे.
लेखकाला प्रसिद्धी देणे हा त्यामागचा हेतू नाही हे स्पष्टच आहे कारण तो लेख ज्याचा प्रसार पुष्कळ मोठा आहे अशा नियतकालिकातून घेतलेला असतो. तो केवळ वाचनीय असतो म्हणून नव्हे तर त्यातील आशय चिंतनीय-मननीय असतो, त्यातून समाज परिवर्तनाची आणखी एखादी समस्या अधोरेखित होत असल्यामुळे तो संग्राह्य होत असतो, म्हणून तो पुनःप्रकाशित केला जातो, हे सांगण्याची गरज आहे.
वाचकांच्या विचाराला चालना देणे, समाजातील विभिन्न समस्यांवर चर्चा घडवून आणून त्या समस्यांवरचे सर्वमान्य उपाय शोधणे ह्या एकमेव हेतूने हे मासिक चालविले जात असल्यामुळे अन्यथा अल्पजीवी मानल्या गेलेल्या दैनिकांतील विशिष्ट मजकूर आमच्या वाचकांना त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदविता याव्या व पुढेमागे त्या समस्या सोडविण्यामध्ये हातभर लावता यावा येवढ्याच हेतूने आम्ही छापत असतो. तरी आमची ही भूमिका समजून घ्यावी आणि विधायक चर्चेमध्ये आमच्या वाचकांनी सहभागी व्हावे असे त्यांना आमचे आवाहन आहे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.