सी.पी. स्नो ह्यांच्या दोन संस्कृती :ह्या पुस्तकाच्या निमित्ताने

विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा तिहेरी भूमिकेतून आजपर्यंत शिक्षणाशी जेव्हा संबंध आला तेव्हा ज्या अनेक गोष्टी जाणवल्या त्यातील एक महत्त्वाची म्हणजे विज्ञान आणिकला ह्या दोन शाखांमधील वाढत जाणारे अंतर. मी विद्यार्थीदशेत असताना हे अंतर फार नव्हते, स्पर्धाही जीवघेणी नव्हती. कलाशाखेतील विद्याथ्र्यांना विज्ञान-तंत्रज्ञान वगैरे शाखांमधील लोकांबद्दल आदर होता, पण स्वतःबद्दल न्यूनगंड नव्हता. पराभूतपणाची भावना तर अजिबात नव्हती. नंतरच्या दहा वर्षांत हे चित्र पाहता पाहता पालटून गेले. ह्या दोन ज्ञानशाखांमधले अंतर विस्मयकारक रीतीने वाढले होते. कोठेच प्रवेश न मिळालेले विद्यार्थी नाइलाजाने कलाशाखेत प्रवेश घेत होते. त्यांना स्वतःवर लादल्या गेलेल्या ह्याज्ञानशाखेत ना रस होता, ना कुतूहल, ना अभिमान.
म्हणूनच जेव्हा सी.पी. स्नो ह्या लेखकाच्या The Two Ciutttires (दोन संस्कृती) ह्या पुस्तकाच्या मागच्या पानावर छापलेली त्या पुस्तकाची ओळख वाचली तेव्हा ते वाचलेच पाहिजे हे जाणवले.“आपला समाज, आपली शिक्षणसंस्था, आपले बौद्धिक जीवन हे दोन संस्कृतींमधील विभाजनामुळे ग्रासले आहे. कला-मानव्यशास्त्रे एका बाजूला आणि विज्ञान दुसर्या बाजूला ही भावना नवी नाही. पण १९५९ मध्ये सी.पी. स्नो ह्यांनी केम्ब्रिजमधे दिलेल्या ‘रीड व्याख्यानांमुळे (Rede Lectures) तिचे महत्त्व समाजापुढे आले आणि तेव्हा सुरू झालेला वादविवाद अजूनही गाजतो आहे.”
पुस्तक वाचल्यावर जाणवले की पुस्तकात चर्चिलेले सगळे मुद्दे भारतीय परिस्थितीला लागू पडणारे नाहीत. १९५९ नंतरच्या पस्तीस वर्षांत इंग्लंडमधील आणि आपल्याकडील परिस्थितीही वेगाने बदलली आहे. स्नोंचे विचार ‘भाषणाच्या स्वरूपातले आहेत, निबंधाच्या नाहीत. स्वतःच्या पांडित्याच्या जाणिवेतून आलेला ‘शहाणे करूनी सोडावे सकळजन असा आवही आहे. चिंतनाची स्वतःच्या विचारांत इतरांना सहभागी करून घेण्याची निबंधाची जवळीक नाही. तरीही ह्यातले मुद्दे मला महत्त्वाचे वाटले. स्नोंच्या व्याख्यानाइतकाच स्टेफन कॉलिनी (Stefan Collini) ह्यांनी स्वतःच्या प्रदीर्घ ६६ पानी प्रस्तावनेत त्या व्याख्यानांतील मुक्ष्यांचा आजच्या परिस्थितीतील अन्वयार्थ शोधण्याचा केलेला प्रयत्नही मला महत्त्वाचा वाटला. हे मुद्दे आजचा सुधारकच्या वाचकांनाही विचारार्ह वाटतील ह्या भावनेतून ह्या पुस्तकाची ही थोडक्यात ओळख.
ज्या दोन संस्कृतींची स्नो आपल्या व्याख्यानांत चर्चा करतात त्यातली पहिली संस्कृती वाङ्मयीन बुध्दिमंतांची (literary intellectuals) आणि दुसरी निसर्ग वैज्ञानिकांची (natural scientists). ह्या दोन्ही संस्कृतींबद्दल जाणकाराच्या भूमिकेतून बोलण्याचा स्नो ह्यांना अधिकार होता?कारण ते कादंबरीकार आणि विचारवंत म्हणून प्रसिद्ध होते आणि महत्त्वाच्या वैज्ञानिक घडामोडी सुरू असताना केम्ब्रिजमध्ये संशोधक म्हणून काम करीत होते. त्यांच्या मते एकच वांशिक, बौद्धिक, आर्थिक आणि सामाजिक पाश्र्वभूमी असलेल्या ह्या दोन गटांमधील व्यक्तींमध्ये कुठल्याही प्रकारची वैचारिक देवाणघेवाण नाही. संपूर्ण पाश्चात्त्य जगात ह्या दोन संस्कृतींमध्ये बौद्धिक पातळीवरअफ्लेली ही दरी व्यावहारिक आणि भावनिक पातळीवरही पसरत चालली आहे. अशी भीती व्यक्त करून स्नो म्हणतात की अनोळखी भाषा बोलणाच्या दोन वेगळ्या संस्कृतींमध्ये जणू ह्या दोन गटांचे ध्रुवीकरण झाले आहे. विपर्यास आणि द्वेष ह्याने भरलेल्या वातावरणात एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती हळूहळू नाहीशी होत आहे.
ह्या दोन गटांमध्ये एकमेकांबद्दल असलेल्या गैरसमजाबद्दल बोलताना स्नो ह्यांनी दोन मुद्दे उदाहरणादाखल घेतले आहेत. विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत उदा. टी. एस्. इलियट, एझुरा पाऊंड, डब्ल्यू.बी. येट्स ह्यांचे लिखाण वैज्ञानिकांना राजकीय दृष्टिकोणातून खुळचट आणि समाजविरोधी वाटते. भाषणाच्या एकंदर रोखावरून स्नो ह्यांना हा फारसा गैरसमज आहे असे वाटत नाही हे लक्षात येते, पण ह्याचा विपर्यास करू नये अशी समज ते देतात. उलट वैज्ञानिकांचा आशावाद वैज्ञानिकेतरांना पोरकट, बढाईखोरपणा वाटतो. पण हा गैरसमज व्यक्तिगत अनुभव आणि सामाजिक अनुभव ह्यातील गोंधळामुळे निर्माण झाला आहे. व्यक्तिगत अनुभव हा शोकात्म असू शकतो ह्याची जाण वैज्ञानिकांनाही आहे पण म्हणून सामाजिक अनुभव/अवस्थाही शोकात्म असावी हे त्यांना मान्य नाही. समाजातील इतर व्यक्तींच्या अवस्थेत बदल करण्यासाठी प्रयत्न करणे हा वैज्ञानिकांचा आशावाद आहे. आशादायक भविष्यावर त्यांचा विश्वास आहे.
दुसर्याक ध्रुवाच्या आसपास वावरणाच्या सर्वांनाच हा आशावादच नव्हे, तर विज्ञानच ‘अज्ञेय’ वाटते. स्नो ह्यांच्या मते अजूनही रूढ संस्कृतीवर वाङ्मयीन बुद्धिमंतांचे – म्हणजे लेखक आणि कवींचे वर्चस्व असल्यामुळे समाजातल्या मोठ्या वर्गाला विज्ञान दुर्बोध वाटते.
अशा तर्हेठने बुद्धिमान लोकांचे दोन गटांत कायमचे विभाजन होणे हे समाजाला घातक आहे. ज्ञानाच्या एका महत्त्वाच्या शाखेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असणे आणि त्याचा खेदही नसणे हे धोकादायक आहे. अभिजात वाङ्मयाची तोंडओळखही नसलेले अनेक वैज्ञानिक एका मोठ्या वैचारिक/कल्पनात्म वारशाला मुकतात हे खरे आहे; पण भौतिक जगाच्या वैज्ञानिक स्पष्टीकरणाची दूरान्वयाने तरी किती साहित्यिकांना – वैज्ञानिके – तरांना ओळख आहे? त्यांना तर त्याच्या अस्तित्वाचीही जाणीव नाही. एखाद्या वैज्ञानिकाला शेक्सपिअरची नाटके माहीत नाहीत म्हणून हसणाच्या किती वैज्ञानिकेतरांना ‘सेकंड लॉ आफ थर्मोडायनॅमिक्स’ माहीत असतो? वैज्ञानिकांच्या जगात त्याला शेक्सपिअरच्या नाटकाचेच महत्त्व आहे.
दोन संस्कृतींमध्येही दरी निर्माण होण्यामागे इंग्लंडमधील शैक्षणिक धोरण जबाबदार आहे. शिक्षणात बोकाळलेल्या विशेषाध्ययनाच्या (Specialization) तत्त्वामुळे एखाद्या विद्याशाखेतले विशेषज्ञ तयार केले जातात. लोकसंख्येच्या मानाने ते मोजकेच असतात आणि समाजात अशा विशेषज्ञांचा एक उत्तमजनवर्ग’, ‘अभिजनवर्ग (elitegroup) नव्याने तयार होतो. वर्गभेदांची जाणीवपूर्वक जोपासना करणार्याअ इंग्रजी समाजात हा वर्ग इतर समाजापासून दुरावत जातो. ह्या अवस्थेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे – शिक्षणाचा पुनर्विचार.
पण शिक्षण हे एकच कारण नाही. वाङ्मयीन बुद्धिमंतांचे समाजातील वर्चस्व हेही एक कारण आहेच. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात यंत्रांच्या वापराला विरोध करणाच्या माणसांना लडाईट (Luddite) म्हणत असत. साहित्यिक हे स्वाभाविक लडाइट असतात. औद्योगिक क्रांतीचे आगमन कुणाला त्याची जाणीव न होताच झाले. जेव्हा जाणीव झाली तेव्हा पहिली प्रतिक्रिया तिला नाकारण्याची झाली. स्नोंच्या मते रूढ संस्कृतीने औद्योगिक क्रांतीला नाके मुरडली, पण त्यातून निर्माण झालेली संपत्ती मात्र खुशीत उपभोगली, समृद्धीच्या मुळाशी असणारया उद्योगाची प्रक्रिया समजावून घेण्यासाठी आपली बुद्धी किंवा कल्पना वापरली गेली नाही. ९९ टक्के लोकांना ज्या संधी आजपर्यंत नाकारल्या गेल्या होत्या त्या औद्योगिक क्रांतीने उपलब्ध करून दिल्या. आरोग्य, अन्न आणि शिक्षण हे गरिबांपर्यंत पोचवण्याचा पराक्रम औद्योगिक क्रांतीशिवाय इतर कुणालाही जमला नसता. ह्या सगळ्याचा सहानुभूतिपूर्वक विचार कुठल्याही थोर लेखकाने केला नाही असे स्नो ह्याचे म्हणणे आहे.
औद्योगिक क्रांती आणि वैज्ञानिक क्रांती ह्यांतला भेद स्पष्ट करताना स्नो म्हणतात की, विज्ञानाचा उपयोग जेव्हा उद्योगांमध्ये जाणीवपूर्वक करण्यात आला तेव्हा वैज्ञानिक क्रांती घडून आली. रासायनिक उद्योग, अणुऊर्जेचा औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापर वगैरे उदाहरणे ते देतात. ह्या उद्योगांच्या स्वरूपात इतर उद्योगांमुळे जगामध्ये फार मोठे बदल घडून येतील म्हणून “वैज्ञानिक क्रांती” ह्या नावाला ते पात्र आहेत.
स्नोंच्या मते आधुनिक आयुष्याचा हा भौतिक पाया आहे आणि त्याबाबत आपण पूर्णपणे अज्ञानी आहोत. शुद्ध विज्ञान (pure science) आपल्या आवाक्याबाहेर आहेच, पण उपयोजित विज्ञानाची (applied science) तर आपल्याला तोंडओळखही नाही. सुरवातीच्या काळात आणि काही प्रमाणात अजूनही शुद्ध वैज्ञानिक सुद्धा (pure scientists) अढ्यिताखोरपणे उपयोजित विज्ञान हे दुय्यम दर्जाच्या बुद्धीचे कार्यक्षेत्र मानत असत. पण युद्धकाळात उपयोजित विज्ञानातून निर्माण झालेल्या तंत्रशास्त्राच्या अभ्यासाची निकड उत्पन्न झाली आणि त्यांना ते आत्मसात करणे भाग पडले.
इथे स्नो पुन्हा शिक्षणाकडे वळतात आणि पारंपरिक शिक्षणक्रम बदलण्याची गरज आग्रहाने मांडतात. त्यांची मते १९५९ च्या शैक्षणिक परिस्थितीला लागू पडतात हे विसरता कामा नये. विशेषाध्ययनामुळे इंग्लंडमध्ये झालेले परिणाम स्नो इतर देशांतील शिक्षणपद्धतींशी ताडून पाहतात. वैज्ञानिक क्रांतीच्या प्रगतीकरता कोणत्या प्रकारच्या सुशिक्षित स्त्री-पुरुषांची गरज आहे याबद्दलचे विचार सांगतात. त्यांच्या मते पुढीलप्रकारचे लोक समाजात असणे आवश्यक आहे :(१) उत्कृष्ट वैज्ञानिक(२) उत्कृष्ट व्यावसायिक जे वैज्ञानिकांच्या संशोधनाला साहाय्य करणारे अभिकल्प (designs) आणि विकास योजनांचे आराखडे तयार करतील.(३) ह्यांच्यापेक्षा कमी शिकलेला तिसरा स्तर जो दुय्यम दर्जाची तांत्रिक कामे करूशकेल. पण – जर त्यांच्यातील वेगवेगळ्या क्षमता विकसित करण्याचे अभ्यासक्रम विद्यापीठाने आपल्या शिक्षणक्रमात उपलब्ध करून दिले तर ह्यांच्यातीलच काही मानवी हिताच्या संदर्भात महत्त्वाच्या जबाबदार्याल निभावू शकतील. अशा शिक्षणाची सोय दूरदृष्टी वापरून रशियाने उपलब्ध करून दिली आहे, इंग्लंडमध्ये मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.(४) राजनीतिज्ञ आणि व्यवस्थापक ज्यांना वैज्ञानिकांचे म्हणणे समजून घेण्याइतके विज्ञानाचे ज्ञान असेल.
१९५९ मधला इंग्लंडमधील समाज अशा सुशिक्षितांचा नाही ह्याची स्नो ह्यांना खंत होती. नवीन जगात जगायला स्वतःला लायक बनवायचे असेल तर प्रचलित शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे असे त्यांचे मत होते.
आतापर्यंत फक्त पाश्चात्य देशांचा विचार केल्यावर स्नो जागतिक प्रश्नांकडे वळतात. औद्योगिकीकरण झालेले पाश्चात्य देश आणि औद्योगिकीकरण न झालेले इतर देश ह्यांच्यातील वाढत जाणारे अंतर हा वैज्ञानिक क्रांतीचा परिणाम असल्याचे दाखवून स्नो म्हणतात की हे अंतर शेवटी श्रीमंत देश आणि गरीब ह्यांच्यातील अंतर आहे. पण ह्या अंतराची जाणीव गरीब देशांना झाली आहे आणि ज्याअर्थी त्यांना ही जाणीव झाली आहे त्या अर्थी हे अंतर फार काळ टिकणार नाही. दारिद्र्याचे सुबत्तेमध्ये परिवर्तन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना पाश्चात्त्य देशांनी हातभार लावला पाहिजे.
मागच्या शतकापर्यंत मानवाच्या इतिहासात सामाजिक बदल जाणवणारही नाहीत इतक्या संथपणे होत असत. औद्योगिक क्रांतीनंतर ह्या बदलाचा वेग कल्पनेपेक्षा जास्त वाढला. पण ह्या वेगाचीही माणसांना सवय झाली आणि त्यांच्या अपेक्षाही वाढल्या. आपल्या हयातीत हे बदल घडून आलेले पाहण्याची इच्छा गरीब देशांमधील लोकांना झाली. कारण असे बदल रशिया आणि चीनसारख्या देशांमध्ये शक्य झालेले त्यांनी पाहिले.
ह्यामागचे महत्त्वाचे कारण असलेली तंत्रज्ञान ही मानवी ज्ञानाची अशी शाखा आहे की जिच्याकरता परंपरेची आणि तांत्रिक पाश्र्वभूमीची गरज फार कमी आहे. एखाद्या देशाच्या औद्योगिकीकरणासाठी प्रशिक्षित वैज्ञानिक, अभियंते, तंत्रज्ञ, आणि तीव्र इच्छाशक्ती एवढ्याच गोष्टींची निकड असते. स्नोंच्या म्हणण्याप्रमाणे गरीब आणि श्रीमंत देशांतील अंतर तर कमी होईलच. पण जर पाश्चात्त्य देशांनी संकुचित वृत्तीने ह्या प्रश्नाकडे पाहिले तर युद्ध, उपासमार, वगैरेसारख्या टोकाच्या मार्गाचा अवलंब केला जाईल. त्यापेक्षा हे अंतर नसणे हे आपल्या हिताचे आहे हे लक्षात घेऊन पाश्चात्य देशांनीच मदतीचा हात पुढे करावा.
काही मदत भांडवलाच्या तर काही प्रशिक्षित तंत्रज्ञांच्या रूपात करावी लागेल. ही मदत अनुग्रह करीत असल्याच्या अभिनिवेशाने करून चालणार नाही, तर समानतेच्या, सहव्यावसायिकाच्या पातळीवरून ती करावी लागेल.
व्याख्यानाच्या शेवटी स्नो म्हणतात की असे घडेल हा आशावाद कितपत बरोबर आहे हे सांगता येणार नाही. कुठल्याही वास्तववादी व्यक्तीला माणसाचा गर्व, दुबळेपणा, पोकळ दिमाख, सत्तेची हाव ह्या दुर्गुणांची जाणीव असतेच, पण हे दुर्गुण म्हणजेच माणूस हे म्हणणेही काही वास्तववादी नाही. ह्या दुर्गुणांवर माणसे प्रसंगी मातही करतात ह्या वास्तवाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.
चार वर्षांनी ह्या व्याख्यानांतील मुद्द्यांचा स्नोंनी पुन्हा आढावा घेतला आहे. व्याख्यानावरील प्रतिक्रियांवर स्वतःची मते व्यक्त केली आहेत. एकमेकांची भाषा ने समजणाच्या संस्कृती समाजात असल्याने निर्माण झालेले धोके पुन्हा प्रतिपादन केले आहेत आणि शेवटी केवळ औपचारिक शिक्षणातल्या बदलामुळे समस्या सुटणार नाहीत, पण हे बदल झाले नाहीत तर समस्यांचे मौलिक स्वरूप जाणून घेणेही आपल्याला शक्य होणार नाही असा इशारा दिला आहे.
स्टेफन कॉलिनी ह्यांची दीर्घ प्रस्तावना स्नो ह्यांच्या दुसर्याल व्याख्यानांवर तीस वर्षांनी म्हणजे १९९३ मध्ये लिहिली आहे. व्याख्यानांनंतर त्यावर झालेला वादविवाद, विशेषतः एफ. आर. लीव्हिससारख्या विचक्षण पण विवाद्य समीक्षकाने घेतलेले आक्षेप त्यांनी नेमक्या शब्दांत मांडले आहेत. श्रेष्ठ वाङ्मयाच्या अधिकाराची महती सांगताना लीव्हिसचा तीव्र स्वर स्नो ह्यांच्या बाबतीत निष्ठुर झाला आहे. श्रेष्ठ वाङ्मय हे माणसाने जीवनाला दिलेल्या जोमदार प्रतिसादाचे भांडार आहे. गुंतागुंतीच्या सखोल अनुभवांतून निर्माण झालेल्या प्रतिभावंतांच्या कलाकृती ह्या आधुनिक काळातील बहुजन समाजाच्या प्रभावामुळे भ्रष्ट आणि हिणकस बनलेल्या जीवनानुभवावर एकमेव उतारा आहे. वाङ्मयाचा अभ्यास आणि समीक्षा ह्यांकडे गंभीर आणि पवित्र जबाबदारी म्हणून बघणाच्या लीव्हिसला स्नोसारख्या दुय्यम दर्जाच्या कादंबरीकाराने आणि त्याहूनही कमी दर्जाच्या संशोधकाने ‘औद्योगिक क्रांतीचे मानवी जीवनावरील परिणाम ह्या विसाव्या शतकातही हळव्या समजल्या जाणार्या विषयावर अधिकाराने भाष्य करावे हे पटणे शक्यच नव्हते. औद्योगिक क्रांतीकरता मोजावी लागलेली ‘मानवी’ किंमत ह्याबद्दल चर्चा करणार्या् १९व्या शतकातील लेखकांना ‘लडाईट’ म्हणणाच्या स्नोबद्दल लीव्हिसला संताप येणे स्वाभाविक होते. मानवाच्या अनुभवविश्वाचे ज्या प्रगतीमुळे नुकसान झाले आणि त्याचे दुःख ज्यांनी व्याकुळ होऊन आपल्या लिखाणातून मांडले त्या श्रेष्ठ कलाकारांना लडाईट म्हणणाच्या स्नोंचा लेखक म्हणून आणि वैज्ञानिक म्हणून असलेला अधिकारच लीव्हिसला मंजूर नव्हता.
अनेकांना लीव्हिसचा आक्रस्ताळा आणि तुच्छता व्यक्त करणारा स्वर आवडला नाही, पण त्याचे आक्षेप कुणालाच चुकीचे वाटले नाहीत. पण भाषा आणि मांडणी चुकीची असली तरी जगभरातल्या वेगवेगळ्या लोकांना स्नोंच्या व्याख्यानातले मुद्दे का महत्त्वाचे वाटले ह्याकडे लीव्हिसने दुर्लक्षच केले. कारण जगातल्या विविध भागांतून, वेगवेगळ्या बौद्धिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांकडून या व्याख्यानांवर प्रतिक्रिया आल्या. १९५९ साली हे व्याख्यान पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्यानंतर आतापर्यंत त्याची ३० पुनर्मुद्रणे झाली आहेत.
स्नोंचे व्याख्यान ज्या काळात झाले तो रशियन स्पुटनिकच्या प्रभावाचा काळ होता. तांत्रिक चढाओढीच्या काळाला सुरुवात झालेली होती. ब्रिटनच्या ‘आधुनिकीकरणाची घोषणा हॅरल्ड विल्सन सारखे लोक आपल्या निवडणुकीच्या भाषणात करीत होते. पण तीस वर्षानंतर परिस्थिती इतकी बदलली आहे की तत्कालीन गरजा आणि रशियाच्या तंत्रज्ञानाचे आदर्श बिनमहत्त्वाचे ठरले आहेत. अशा वेळी स्नोंच्या दोन संस्कृतींचा सिद्धान्त कितपत टिकला आहे? त्यासाठी कॉलिनी एकंदर जागतिक परिस्थितीत झालेले बदल आणि विद्यापीठीय शिक्षणप्रणालींमध्ये झालेले बदल तपासून पाहतात.
वरवर पाहता विशेषाध्ययनाचा अतिरेक झाल्यासारखा वाटेल इतक्या फांद्याउपफांद्या प्रमुख ज्ञानशाखांना फुटल्या आहेत, पण त्याचबरोबर आंतरशास्त्रीय (inter-disciplinary) दळणवळणही खूप वाढले आहे. सर्वसामान्यपणे विद्वज्जनांनी हे सत्य स्वीकारले आहे की विविध प्रकारच्या बौद्धिक शोधांतून आपल्याला विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान उपलब्ध होत असते; त्यांपैकी कोणताही एक प्रकार इतरांनी ‘आदर्श म्हणून स्वीकारून त्याचा कित्ता गिरवावयाची गरज नाही.
व्यवहारात जरी ‘विज्ञान’ ह्या ढोबळ संज्ञेचा वापर पूर्वीप्रमाणेच होत असला तरी प्रत्यक्षात मात्र वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रणालींमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत. रेण्वीय जीवशास्त्राचा (wolecular biology) विकास ह्या महत्त्वाच्या बदलामुळे विविध क्षेत्रांतील – विशेषतः वैद्यकीय संशोधन, जैवरासायनिक शास्त्र ह्यांच्यातील संशोधनाच्या क्षेत्रांची पुनव्र्याख्या करावी लागली आहे.
(अपूर्ण)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.