चर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ५)

स्त्रियांची मागणी असो की नसो, त्यांची इच्छा असो की नसो, त्यांची मुक्ती झाली पाहिजे, इतकेच नव्हे तर त्या मुक्तीचा एक अविभाज्य वा अपरिहार्य अंश म्हणून म्हणा, त्याचे आवश्यक अंग म्हणून म्हणा किंवा त्याचा एक अनिवार्य पैलू म्हणून म्हणा, त्यांना लैंगिक स्वातंत्र्य दिले पाहिजे ह्या निष्कर्षावर मी येऊन ठेपलो असल्याचे मी पूर्वीच्या लेखांकांमधून सांगितलेले आहे.
स्त्रियांची मुक्ती ही न्यायोचित बाब आहे. त्यात कोणी मागणी करण्याची गरजच नाही. गुलामगिरीची प्रथा अन्याय्य आहे. ही गोष्ट विचारान्ती पटल्यावरसुद्धा एखाद्या गुलामांच्या मालकाने त्याचे गुलाम तशी मागणी करीत नाहीत तोवर- त्यासाठी उठाव करीत नाहीत तोवर – त्यांच्यावरचा हक्क कायम ठेवावयाची व त्यांची पिळवणूक, त्यांची खरेदीविक्री चालू ठेवावयाची हे जितके व जसे गर्हणीय आहे तितके व तसेच स्त्रियांच्या तश्या मागणीची, त्यांच्या त्यासाठी केलेल्या आंदोलनाची वाट पाहणे आमच्यासाठी लांच्छनास्पद, निंदास्पद आहे असे माझे मत आहे. ह्या विषयावर लेख लिहावयाला लागून मला आता सहा महिने झाले आहेत. ह्या सहा महिन्यांत मोठ्या संख्येने त्यांचे वाचन झालेले नसले तरी काही विचारकांनी तरी त्यांची खाजगी रीतीने दखल घेतली असावी अशी मला आशा आहे.
स्त्रीमुक्ती ही गोष्टच न्याय्य नाही व माझे म्हणणे सर्वथैव चूक आहे असे जर माझ्या लेखांच्या वाचकांना वाटले असते तर इतक्या कालावधीमध्ये त्यांनी ते माझ्या नजरेला आणून दिले असते. आमचे वाचक दुसर्‍याची चूक त्याच्या पदरात घालण्यासाठी उत्सुक असतात असा आमचा आजवरचा अनुभव आहे. ज्याअर्थी माझ्यावर टीकेचा भडिमार झालेला नाही, त्याअर्थी माझे म्हणणे विचारार्ह आहे एवढेच नव्हे तर सयुक्तिक आहे हे त्यांना मान्य असावे. त्याचबरोबर हळूहळू परिस्थिती बदलेल व आपोआपच इष्ट त्या घटना ह्या क्षेत्रात घडतील, आपण पुढाकार घेऊन काही करण्याची गरज नाही असेही आमच्या वाचकांना वाटत असण्याची शक्यता आहे. मला त्यांना एवढेच सांगावयाचे आहे की कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय, समाजाच्या कोणत्यातरी कोपर्‍यात हालचाल सुरू झाल्याशिवाय अशा आंदोलनांना गती येत नाही; व जोपर्यंत ती गती पकडत नाहीत तोपर्यंत ती बंद पडण्याचीही शक्यता असते. आणि ती एकदा बंद पडली की पुन्हा सुरू करण्यास अधिक कष्ट पडतात हे, आणि न्यायाला विलंब करणे म्हणजे न्याय नाकारणेच होय हे, सारे आपण जाणतोच.
स्त्रीमुक्तीच्या आंदोलनाचे स्वरूप ‘स्वतःसाठी मागितलेल्या सवलतींकरता मध्यमवर्गीय स्त्रियांनी केलेले आंदोलन’ असे न राहता अन्यायाच्या निर्मूलनासाठी व न्यायाच्या प्रतिष्ठापनेसाठी न्यायाची चाड असलेल्या सर्व स्त्रीपुरुषांनी केलेले आंदोलन असे व्हावयाचे असेल तर आम्हा सर्वांना आता आपला आळस झटकला पाहिजे व आंदोलनाला गती दिली पाहिजे असे माझ्याप्रमाणे आपणालाही वाटत नाही काय?
येथपर्यन्त स्त्रीमुक्तीचा विचार झाला. आता स्त्रीमुक्तीमधून उद्भवणाच्या अन्य प्रश्नांचा थोडक्यात विचार करू. त्यांमध्ये मुख्यतः स्वैराचार म्हणजे काय आणि नवे कुटुंब कसे असेल हे विषय आहेत. त्याचप्रमाणे लैंगिक स्वातंत्र्य हे स्त्रीमुक्तीचे आवश्यक अंग आहे ही गोष्ट आपण प्रारंभी केवळ तत्त्वतः मान्य केली तर त्याचे बरेवाईट परिणाम काय होतील तेही आता आपणास पाहावयाचे आहे. आणि खरे सांगावयाचे तर त्याचे वाईट परिणाम मला दिसतच नाहीत.
ही गोष्ट जर आपल्या आयुष्यभरात आपण घडवू शकलो तर एक प्रचंड उलथापालथ झालेली आपल्याला दिसेल. पाश्चात्त्य देशात काही अंशी स्त्री मुक्त होत असलेली किंवा झालेली आपल्याला दिसत असली तरी तेथल्या परिस्थितीत एक फार मोठी उणीव आहे. तेथे स्त्रीपुरुषसमागमाचा पापाशी संबंध जोडलेला आहे. तेथे एकत्र कुटुंब पद्धतीचे नावनिशाण उरलेले नाही; त्याचप्रमाणे तेथे आदिवासीच नव्हे तर ग्रामीण संस्कृतीही नष्टप्राय झालेली आहे. त्यामुळे तेथे single parenthood चा अतिशय अनिष्ट असा पायंडा पडत आहे. आपणास ते घडू द्यावयाचे नाही. कुटुंब बळकट ठेवून आपणास लैंगिक स्वातंत्र्याचा लाभ घ्यावयाचा आहे. हे काम आपला देश आदिवासीबहुल असल्यामुळेआपणासाठी थोडेफार सुकर होणार आहे.
स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य फक्त तत्त्वतः मान्य झाले – सर्वांकडून मान्य झाले – तर हुंडाबळीच नव्हे तर सगळी अनाथालये व निवारागृहे बंद पडतील. परित्यक्तांचे प्रश्न सुटतील कारण मुलींना विवाहावाचून राहण्याचे स्वातंत्र्य राहील. त्यांचे विवाहबाह्य यौन वर्तन लांच्छनास्पद मानले जाणार नाही. तरुण मुलींनाच नव्हे तर प्रौढ स्त्रियांनाही नमविण्याचा – त्यांना नामोहरम करण्याचा – हमखास मार्ग आज जर कोणता असेल तर तो त्यांच्या ‘शीला’विषयी, चारित्र्याविषयी अफवा उठवण्याचा. प्रत्यक्ष बलात्संभोगामधील क्रौर्यापेक्षाही जर स्त्रिया कशाला घाबरत असतील तर त्या आपल्या दुष्कीर्तीला घाबरतात; इतकेच नव्हे तर त्या दुष्कीर्तीच्या वा लोकापवादाच्या भयाने क्वचित् खरोखरच्या बलात्संभोगाला एकदा नव्हे तर पुन्हापुन्हा बळी पडतात हे जळगावप्रकरणाने आपल्या नजरेला नुकतेच आणून दिले आहे. म्हणून सर्व स्त्रिया भयमुक्त व्हाव्या असे जरआपल्याला खरोखर वाटत असेल तर त्यांच्या चारित्र्याची चर्चा ताबडतोब बंद करावयाला हवी. स्वतः तश्या चर्चेत भाग न घेता दुसर्‍यांनी केलेल्या चर्चेकडे दुर्लक्ष करावयाला हवे. समजा चाकोरीबाहेर जाऊन कोणत्या स्त्रीने काही वर्तन केलेच तर तो तिचा प्रश्न आहे. आपण कसे वागावयाचे ते ठरविण्याचा तिला हक्क आहे; तिची ती मुखत्यार आहे इतकेच म्हणून चूप बसावयाचे. आणि मुख्यतः स्त्रियांनी आपल्या शुद्ध चारित्र्याची शेखी मिरवावयाची नाही. ह्यापलिकडे कोणी मुद्दाम आपल्या आजच्या वर्तनक्रमाबाहेर जाण्याची गरज नाही. वरच्या वाक्यातला मुद्दाम हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण आज स्त्रीपुरुषसंबंधविषयक नियम इतके कठोर असले तरीसुद्धा त्यांना झुगारून देऊन तद्विपरीत आचरण करणार्‍या स्त्रिया आहेतच. त्यांच्या ठिकाणची कामप्रेरणा इतकी प्रबळ आहे की त्या ह्या कृत्रिम बंधनात अडकून राहू शकत नाहीत. अश्या स्त्रिया बाकीच्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त करण्याचे कार्य धीरे धीरे करतील. त्यांच्यावर चिखलफेक करावयाची नाही, त्यांचे पाय ओढावयाचे नाहीत एवढेच पथ्य आपण सध्या पाळू या.
आपल्या परंपरेने नवर्‍याला, सासूला व नणंदेला काही अधिकार देऊन ठेवले आहेत. त्यांपैकी जे जाचक अधिकार आहेत ते आता स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्यामुळे आपोआपच नष्ट होतील. नवविवाहितेचा छळ करण्याचाच नव्हे तर सर्वच स्त्रियांवर विविध प्रकारची लाचारी लादण्याचे साधन, त्याचा पाया वा आधार स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्यावर असणारे निर्बंध हाच आहे. स्त्रियांचा तो न्याय्य हक्क तत्त्वतः मान्य केल्याबरोबर त्यांची कुचंबणा थांबते इतकेच नव्हे तर इतरेजनांच्या हातातले त्यांना छळण्याचे साधनच हिरावून घेतले जाते.
स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यांमधल्या भेदांवर पूर्वी थोडे लिहून झाले आहे तरी त्याचा पुन्हा आढावा घेतो.
आपणाला अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य हे समाजातल्या सर्वांचे समान स्वातंत्र्य असल्यामुळे तेथे कोणीच निरंकुश नसतो. प्रत्येकालाच एकमेकांचे हित सांभाळावयाचे असते. पुरुषाचे हित मर्यादेबाहेर गेले की स्त्रीस्वातंत्र्याचा संकोच होतो. तो आता आम्हाला दूर करावयाचा आहे. कोणीच कोणाच्या हिताविरुद्ध कृती करावयाची नाही. ह्यासाठी आम्हाला पुरुषांच्या स्वातंत्र्याला आळा घालणे आवश्यक आहे. आज पुरुषाच्या अमर्याद स्वातंत्र्यामुळे स्त्रियांच्या वाजवी स्वातंत्र्याचा संकोच झालेला आहे.
सर्वांच्या समान हक्कांमध्ये एकमेकांचे स्वातंत्र्य सांभाळावयाचे असते आणि कोणीच एकमेकांच्या हितविरोधी कृती करावयाची नसते. आम्हाला प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे, स्वैराचार नको कारण स्वैराचारामध्ये इतरांच्या हिताचा विचार नसतो.
ज्या ठिकाणी किंवा ज्या व्यवहारात, ज्या वर्तनात किंवा ज्या व्यापारात उभयतांचे हित सांभाळले जाते, उभयतांची गरज भागवली जाते ते वर्तन आमच्यासाठी ग्राह्य होय. ज्या वर्तनात फक्त एकाच पक्षाच्या हिताचा विचार आहे ते वर्तन स्वैर वर्तन आहे, बेजबाबदार वर्तन आहे व म्हणून ते आमच्यासाठी त्याज्य आहे. दुसर्‍या शब्दांत कोणीही एकाने आपले सुख दुसर्‍याला ओरबाडून प्राप्त करून घेणे हा स्वैराचार आहे.
आपल्या कृतीच्या दूरगामी परिणामांचा विचार न करता, केवळ सद्यःफलाशेने कोठल्याही कृतीचा अतिरेक करणे हाही स्वैराचार होय. ह्यामध्येच आपल्या दैनंदिन कर्तव्यांमध्ये आणि/अथवा जबाबदार्‍यांमध्ये ज्याचा अडथळा येईल असे आचरण येते व तेही स्वैराचारामध्येच मोडते. थोडक्यात बेजबाबदारपणे केलेले विवेकशून्य आचरण म्हणजे स्वैराचार होय. तसेच आपण केवळ एक व्यक्ती आहोत असे नाही तर एका कुटुंबाचे, त्याहीपेक्षा एका समाजाचे – संपूर्ण मानवसमाजाचे – घटक आहोत व व्यक्तिगत, कौटुंबिक किंवा जातीच्या (पक्षाच्यासुद्धा) स्वार्थापेक्षा संपूर्ण समाजाचे हित श्रेष्ठ आहे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून केलेले वर्तन हादेखील स्वैराचार होय.
हे सारे निकष आपण लैंगिक आचरणाला लावू या. एकमेकांशी विधिपूर्वक विवाह केलेला असला तरी पतिपत्नींमधली लैंगिक वर्तन जर वरील कसोट्यांना उतरत नसेल तर तोच स्वैराचार होय हे आपण नीट समजून घेतले पाहिजे आणि कोणत्याही स्त्रीपुरुषांचे (अविवाहितसुद्धा) वरील कसोट्यांना उतरणारे लैंगिक वर्तन योग्य, स्वीकार्य व म्हणून नैतिक आहे हे जाणले पाहिजे.
आपल्या समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा कमी आहे. अश्या परिस्थितीत काही स्त्रियांनी नेहमीसाठी तसेच बहुसंख्य स्त्रियांनी अधूनमधून बहुपतिकत्व स्वीकारणे व समाजातील सर्व पुरुषांच्या ठिकाणी असणार्‍या कामप्रेरणेचे समाधान होण्यास वाव देणे ह्यामध्ये स्वैराचार नाही. उलट हेच त्यांचे समाजहितकर व म्हणून नैतिक आचरण आहे असे मानावे लागेल. (अर्थात् ज्यांना आजन्म नैष्ठिक ब्रह्मचारिणी राहावयाचे आहे त्यांची गोष्ट अलाहिदा. पण त्यामुळे त्या इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरत नाही ही गोष्ट ध्यानात ठेवलीच पाहिजे.)
हे सारे घडण्यासाठी आणि नाहीतरी, एकापेक्षा अधिक स्त्रीपुरुषांनी एकमेकांवर (आणि एकमेकांच्या मुलांवरसुद्धा) समान प्रेम करणे म्हणजे सर्वाबद्दल समान जिव्हाळा बाळगणे आवश्यक आहे; आणि हे काम शक्यतो जगभर करावयाचे आहे. त्यासाठीआमच्या शिक्षणामध्ये ह्या बाबीवर भर द्यावा लागणार आहे. आमच्या मनामधले विवाहसंस्काराचे महत्त्व, पातिव्रत्याचे, निष्ठेचे महत्त्व कमी करावे लागेल. Among Hindus marriage is not a contract, but a sacrament and we ought to preserve its sanctity ही गोष्ट आता विसरावी लागेल. आपले कायदे आपल्यालाआजच्यापेक्षा पुष्कळ उदार करावे लागतील व हे कार्य कालबद्ध रीतीने हाती घ्यावे लागेल.
स्त्रीपुरुषसंबंधांची स्वाभाविक लय पुनःप्राप्त होईपर्यंत काही व्यक्तींकडून अतिरेक होण्याची शक्यता आहे. दुष्काळातून आल्यावर जशी खायखाय सुटते तसे ह्याही बाबतीत होईल. जुन्या डोळ्यांना अतिशय त्रास होईल. पूर्वीची स्थिती बरी होती असे सतत वाटेल. पण आपल्याला म्हणजे ज्यांना हे स्वातंत्र्य मान्य आहे त्यांना धीर धरावा लागेल. कायदे करण्याच्या, बदलण्याच्या अगोदर पुष्कळ समाजजागरण करावे लागेल आणि पुढेही ते काम चालूच ठेवावे लागेल.
नव्या कुटुंबासंबंधी पुढच्या वेळी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.