उपयोगितावाद – काही स्पष्टीकरणे

ज्याल इंग्लिशमध्ये ‘Utilitarianism’ असे नाव आहे आणि ज्याला मराठीत ‘उपयुक्ततावाद’ म्हणतात, त्या मतासंबंधी खूपच पूर्वग्रह आणि गैरसमज आढळतात. हे पूर्वग्रह आणि गैरसमज केवळ सामान्य लोकांच्या मनांतच आहेत असे नसून ते विद्वानांच्या मनांतही मोठ्या प्रमाणात दिसतात. अनेक टीकाकार उपयुक्ततावाद ही उपपत्ती नीतिशास्त्रीय उपपत्ती आहे हे मानायलाही तयार नसतात, आणि काही तर उपयुक्ततावादी जीवन म्हणजे डुकरांना योग्य जीवन असेही म्हणतात. एखाद्या मताविषयी अशी उपेक्षेची भूमिका एवढ्या मोठ्या प्रमाणात का तयार व्हावी आणि ती दीर्घकाळ टिकून का राहावी हा एक कूट प्रश्नआहे. पूर्वग्रह नाहीसे करणे किती कठीण आहे याचेच हे द्योतक आहे.
हे विचार सुचण्याचे कारण म्हणजे मी नुकतेच डॉ. रावसाहेब कबसे यांचे हिंदुमुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदु राष्ट्रवाद हे पुस्तक वाचले. त्या पुस्तकात सावरकरांच्या उपयुक्ततावादासंबंधी लेखकाने काढलेल्या उद्गारात मला असाच गैरसमज आढळला.डॉ. कसब्यांचा राजकारण आणि समाजकारण यांचा व्यासंग चांगला आहे; परंतु तत्त्वज्ञानाविषयी – विशेषतः पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाविषयी ते लिहू लागले की त्यांचा अभ्यास किती जुजबी आणि तोकडा आहे हे लक्षात येते. आता हे खरे आहे की ही गोष्टतत्त्वज्ञानाचे विशेषज्ञ नसलेल्या सगळ्याच लेखकांच्या बाबतीत खरी आहे. त्यामुळे हा डॉ. कसब्यांचा मुलखावेगळा दोष आहे असे म्हणता येणार नाही.
या लेखात मी डॉ. कसब्यांच्या पुस्तकातील विवेचनावर लिहिणार नसून उपयुक्ततावादाविषयी लिहिणार आहे. त्यात उपयुक्ततावादाचे शक्य तितके स्पष्ट आणि सुबोध विवरण करून त्यावरील प्रस्तुत आक्षेपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.
प्रथम एक पारिभाषिक बदल करणे इष्ट आहे असे वाटते. ‘Utilitarianism’ या शब्दाला मराठीत वापरण्यात येणारा ‘उपयुक्ततावाद’ ह्या पर्यायाऐवजी आपण ‘उपयोगितावाद’ असा पर्याय वापरावा असे मी सुचवितो. त्याचे कारण असे की utility हा शब्द या वादात एक पारिभाषिक शब्द म्हणून वापरला जातो. ‘Utility’ म्हणजे usefulness’, म्हणून त्याचे भाषांतर ‘उपयुक्तता’ असे करणे स्वाभाविक आहे. पण ‘उपयुक्त’ या शब्दाच्या अर्थच्छटा अनेक असल्यामुळे ‘utility’ या पारिभाषिक शब्दाला एखादा पारिभाषिक शब्दच वापरणे योग्य होईल. त्याकरिता ‘उपयोगिता’ हा शब्द वापरावा असे मी सुचवितो. हा शब्द अर्थशास्त्रात utility’ चा मराठी पर्याय म्हणून रुढ आहेच.
उपयोगितावादाविषयी सांगावयाची पहिली गोष्ट म्हणजे ही की ती एक नीतिशास्त्रीय, नीतिविषयक मीमांसा आहे, मनुष्यांच्या कर्तव्याविषयीची एक उपपत्ती आहे. मनुष्यांची कर्मे युक्त (right) किंवा ‘अयुक्त’ (wrong) कशाने होतात, त्यांची कर्तव्यता कशाने ठरते, याचा विचार या मीमांसेत प्रामुख्याने केला गेला आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या उपयोगितावादी विचार प्राचीन काळातही आढळतो. प्राचीन ग्रीसमधे एपिक्युरसने आणि भारतात चार्वाकाने त्या वादाचा पुरस्कार केला होता. पण अर्वाचीन काळात जेरेमी बेंटम (Jeremy Bentnam) या इंग्लिश तत्त्वज्ञाने १७८९ साली लिहिलेल्या आपल्या InHroduction to the Principles of Morals and Legislation , या ग्रंथात या मताची नव्याने मांडणी केल्यापासून त्याला पुष्कळच प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्याचा शिष्य जॉन स्टुअर्ट मिल् याने आपल्या Utilitarianism (१८६३) या छोटेखानी ग्रंथात त्याने आणखी विवेचन केले आणि आक्षेपांना उत्तरे दिली. त्यानंतर हेन्री सिज्विक यांनी Methods of Ethics (१९७४) या ग्रंथात त्याची साधकबाधक सविस्तर मांडणी केली. हे तीन ग्रंथउपयोगितावादाचे अभिजात साहित्य होत. या तीन ग्रंथातून व्यक्त झालेला विचार येथे संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
उपयोगितावादाचा मुख्य सिद्धांत असा आहे की सुख ही एकमेव स्वतोमूल्यवान किंवा स्वार्थ वांछनीय वस्तू आहे. स्वतोमूल्यवान’ म्हणजे ज्याचे मूल्य ती वस्तू अन्य कशाचे साधन असल्यामुळे तिला प्राप्त झालेले नसून ती स्वतःच साध्य असल्यामुळे तिला असलेले मूल्य आहे. सुख स्वार्थ वांछनीय आहे याचा अर्थ ते केवळ स्वार्थ म्हणजे केवळ सुखार्थच आपल्याला हवे असते. अन्य सर्व वस्तू त्यांच्यापासून मिळणाच्या सुखामुळे आपण इष्टमानतो. परंतु सुख हे स्वतःच इष्ट आहे. आपली कोणतीही इच्छा पूर्ण झाली की आपल्याला समाधान लाभते. हे समाधान किंवा सुख एखादी इच्छा पूर्ण झाल्याचे द्योतक असते.
आता सुख जर स्वतोमूल्यवान वस्तू असेल, म्हणजे ती स्वार्ध म्हणजे तिच्या स्वतःकरिताच साध्य वस्तू असेल, तर तिच्यासंबंधाने एकप्रकारची कर्तव्याची भावना व्यंजित होते असे आपल्या लक्षात येईल. एखादी वस्तू स्वतोमूल्यवान आहे याचा अर्थ ती अस्तित्वात असावी अशी वस्तू आहे. याच्याउलट प्रकार असा असेल की एखादी वस्तू स्वतः वाईट, अनिष्ट आहे. ती स्वतः वाईट असूनही ती काही चांगल्या वस्तूंचे साधन असू शकेल. उदा. क्विनीन. हे स्वतः वाईट, म्हणजे कडू असते, पण काही रोगांवर ते गुणकारी औषध असू शकेल. आता दुःख ही गोष्ट स्वयमेव वाईट आहे. ते प्रसंगी सुखाचे साधन असू शकेल, उदा. शिक्षा. परंतु साध्य म्हणून त्याचे मूल्य नुसते शून्यच नव्हे, तर उलट असते असे म्हणावे लागेल. अशा मूल्याला ऋणमूल्य (negative value) असे म्हणतात. एखादी वस्तू चांगलीही नसेल आणि वाईटही नसेल, ती उदासीन किंवा तटस्थ असू शकेल.
आता धनमूल्य किंवा ऋणमूल्य ज्यांत असेल अशा वस्तूंसंबंधाने आपण उदासीन किंवा तटस्थ राहू शकत नाही. त्यांचे आपल्याला सोयरसुतक नाही अशी वृत्ती आपण धारणकरणे असमंजसपणाचे ठरते. एखाद्या वस्तूला स्वरूपगत धनमूल्य असेल तर तिच्यासंबंधानेएक प्रकारचे कर्तव्य व्यंजित होते. ती वस्तू निर्माण करणे, तिची मात्रा वाढविणे, तिचे रक्षण करणे योग्य आहे असे आपण म्हणू शकतो. उलट ज्या वस्तूत स्वरूपगत ऋणमूल्य असते ती वस्तू नष्ट करण्याची, ती निर्माण न करण्याची भूमिका योग्य आहे असे म्हणता येते. मूल्यहीन, म्हणजे जिला धन किंवा ऋण कोणतेही स्वतोमूल्य नाही, अशा वस्तूसंबंधाने (आणि केवळ अशाच वस्तूंसंबंधाने) आपण उदासीन राहणे योग्य असते.
आता उपयोगितावादानुसार सुख ही एकमेव स्वतोमूल्यधन वस्तू असल्यामुळे ते निर्माण करणे, जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण करणे आपले कर्तव्य ठरते. पण या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो. सुख हे कोणातरी व्यक्तीत असते, मनोनिरपेक्ष सुख असू शकत नाही. तेव्हा सुखाची मात्रा महत्तम वाढवायची हे मान्य केले तरी कोणाच्या सुखाची हा प्रश्न शिल्लकच राहतो. या प्रश्नाला एक उत्तर आहे – स्वतःचे सुख. हे उत्तर देणार्या् लोकांना स्वार्थवादी उपयोगितावादी (Egoistic Utilitarianism) असे नाव आहे. पण हे मत फारसे कोणाच्या पसंतीस उतरलेले नाही. कारण एकतर कोणताही प्राणी स्वाभाविकच सामान्यपणे स्वसुखार्थ धडपडत असतो; त्यामुळे तसे धडपडणे त्याचे कर्तव्य आहे असे म्हणणे तर्कदृष्ट होईल. कर्तव्याची भाषा आपण फक्त अशाच कर्मासंबंधाने वापरतो की जी आपण स्वाभाविकपणेच करीत नसतो. दुसरे असे की सुख हे स्वतोल्यवान आहे म्हणून ते निर्मिणे आपले कर्तव्य आहे असे आपण म्हणालो आहोत. पण माझे स्वतःचेच सुख तेवढे स्वतोमूल्यवान आहे, आणि इतरांचे नाही असे आपण म्हणू शकतो काय? असे म्हणणेउघडच चुकीचे दिसते. म्हणून सुखनिर्मिती करायची ती सर्वांच्या सुखाची. पण सर्व म्हणजे कोण? देशबांधव की सर्व मानव? आणि सर्व मानव असे उत्तर दिल्यास सर्व चेतनसृष्टी का नाही? या प्रश्नांना उपयोगितावादाच्या पुढील सूत्रात उत्तर मिळते : ‘Greatest happiness of the gretest number’, ‘भूमिष्ठांचे किंवा बहुतमांचे महत्तम सुख’ हे आपल्या कर्माचे उद्दिष्ट असले पाहिजे. ‘Greatest number’ मध्ये ज्याला ज्याला सुखदुःखांची जाणीव आहे अशा सर्व प्राण्यांचा अंतर्भाव उपयोगितावादाला अभिप्रेत आहे.
सर्व मानवांच्याच नव्हे तर सर्व पशुपक्ष्यांच्याही सुखाची महत्तम वाढ व्हावी असे जर उपयोगितावादाचे ध्येय असेल, तर त्याच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करणे अशक्यच होणार! असली नीतिमीमांसा काय कामाची? कोणतेही ध्येय व्यवहार्य असले पाहिजे. या आक्षेपाला उपयोगितावाद्यांचे उत्तर असे आहे की ‘बहुतमांचे महत्तम सुख’ या वचनाचा अर्थ ज्यांच्या सुखार्थ प्रयत्न करावयाचा त्यांचा संख्येला वरची मर्यादा (upper limit) नाही. कोणीही आपल्या शक्त्यनुसार जितक्या जास्त लोकांच्या (यांत आपल्या संबंधात असलेले पशुपक्षीही आले) सुखाचा विचार करता येईल तितका करावा, त्या विचारातून कोणालाही वज्र्य मानू नये. सामान्यपणे आपण जी कर्मे करतो त्यांत आपल्या कुटुंबातील लोक, मित्रमंडळी, काही परिचित लोक, काही पाळीव पशू इतक्यांचाच संबंध येतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांत यांचाच तेवढा विचार करणे अवश्य असते. पण एखादा अधिकारी, राजकीय पुढारी, सामाजिक नेता, मंत्री इत्यादि लोकांच्या कामाचा प्रभाव मोठ्या संख्येवर पडतो. त्यांच्या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांत या सर्वांचा अंतर्भाव होतो. राष्ट्रांचे प्रमुख, सेनाधिकारी, इत्यादींचे कार्यक्षेत्र याहून विस्तृत असते. या सर्वांनी आपली कर्मे करताना जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख ज्याने निर्माण होईल असे कृत्य करावे असा उपयोगितावादी तत्त्वाचा अभिप्राय आहे.
उपयोगितावादी मीमांसेत कर्तव्यविचार नसतो, त्यात फक्त स्वार्थी सुखलोलुपता असते असे म्हणणार्यां चे प्रतिपादन किती चूक आहे हे आता कळून येईल. उपयोगितावादाचे प्रतिपादन मनुष्याने सुखप्राप्ती करावी (किंवा दुःखपरिहार करावा) असे जरी असले तरी त्यात आपल्या स्वतःच्या सुखाचाच विचार करावा असे म्हटलेले नाही हे लक्षात ठेवणे अवश्य आहे. आपण कोणते कर्म करावयाचे हे ठरविताना आपल्याला स्वतःला किती सुख होण्याचा संभव आहे एवढाच विचार करावयाचा नसून जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख कोणत्या कर्माने होईल असा विचार करावयाचा असतो. जास्तीत जास्त लोकांच्या सुखाचा विचार करताना त्यात आपल्या स्वतःच्या सुखाचाही अंतर्भाव अर्थात् करावा लागेल. परंतु आपल्याला कसलेही विशेष सवलतीचे स्थान द्यायचे नाही असा उपयोगितावादी नीतीचा कटाक्ष असतो. याविषयी बेंटमचे पुढील वचन प्रसिद्ध आहे : ‘Everyone is to count for one and no one for more than’. म्हणजे आपल्या कर्मातून उद्भवणाच्यासंभाव्य सुखदुःखांचा हिशेब करताना कोणाचीही गणना केवळ एक मनुष्य म्हणून केली जावी, एकाहून अधिक अशी कोणाचीही नव्हे. याचा अर्थ सर्व व्यक्तींचा सुखप्राप्तीचा हक्क समानआहे असे त्यात मानले आहे.
आता सुखाचे असंख्य प्रकार आहेत – भोजनाचे सुख, काव्यवाचनाचे सुख, खेळण्यापासून मिळणारे सुख, शास्त्रीय संशोधनापासून प्राप्त होणारे सुख, इ. जास्तीत जास्त लोकांच्या जास्तीत जास्त सुखाचा हिशेब करताना वरील सर्व प्रकारच्या सुखांची बेरीज करावी लागणार. ती करायची तर सर्व सुखे एकाच जातीची आहेत, त्यांच्यात फक्त मात्रेचे म्हणजे कमीजास्तीचे भेद आहेत असे मानावे लागेल. या बाबतीत बेंटमचे मत स्पष्ट आहे. तो म्हणतो, ‘Pushpin is as goodas poetry, providedit gives equal pleasure’, म्हणजे काव्यवाचन आणि पुश्पिन (एक मुलांचा खेळ) ह्यांपासून जर सारखेच सुख मिळत असेल तर त्यांचे मूल्यही सारखेच असते.
उपयोगितावादाच्या दृष्टीने कोणतेही सुख वयं नाही. तापसवादी नीती आणि उपयोगितावाद यांच्यात येथे भेद आहे. कोणतीही नैसर्गिक इच्छा दडपण्यास उपयोगितावाद सांगत नाही. त्याला अभिप्रेत बंधन एकच आहे. आपल्या कर्मातून जास्तीत जास्त संख्येचे जास्तीत जास्त सुख निर्माण झाले पाहिजे. या बंधनामुळे ज्या इच्छांच्या पूर्तीमुळे आपल्या किंवा कोणत्याही अधिक प्रबल इच्छा दडपल्या जाऊन सुखापेक्षा जास्त दुःख निर्माण होते त्या इच्छा वर्ण्य मानाव्या लागतात. एखाद्या इच्छेला परवानगी नाकारणे केवळ एका कारणाकरिता समर्थनीय मानता येईल – ते कारण म्हणजे त्यामुळे जरी काही दुःख निर्माण झाले तरी त्यामुळे एकंदरीत अधिक सुखाची निर्मिती झाली पाहिजे हा आग्रह.
या मीमांसेवर अनेक तत्त्वज्ञांनी अनेक आक्षेप घेतले आहेत. त्या आक्षेपांचा विचार पुढील अंकात करू.
(अपूर्ण)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.