जडवाद, इहवाद, स्त्रीमुक्ती, वगैरे

आजचा सुधारकच्या डिसेंबर ९४ च्या अंकात श्री दि.मा. खैरकर यांचा ‘दिवाकर मोहनींच्या स्त्रीपुरुषसंबंधाच्या भ्रामक कल्पना’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या शेवटच्या छेदकात त्यांनी काही तात्त्वज्ञानिक सिद्धांतांचा आणि संकल्पनांचा उल्लेख केला आहे.जडवाद, चैतन्यवाद, अदृष्ट इत्यादि गोष्टींसंबंधी त्यांनी लिहिलेला मजकूर वाचल्यावर या सर्वच गोष्टींसंबंधीचे त्यांचे प्रतिपादन बरेचसे गैरसमजावर आधारलेले आहे असे लक्षात आले. त्यामुळे त्या कल्पनांचे वास्तव स्वरूप काय आहे हे सांगणे अवश्य वाटल्यामुळे पुढील चार शब्द लिहिले आहेत.
खैरकर म्हणतात की दिवाकर मोहनी जडवादी आहेत. पण मोहनींच्या लिखाणात मला जडवादाचे चिन्ह सापडले नाही. खरे सांगायचे म्हणजे जडवाद किंवा चैतन्यवाद या गोष्टींचा त्यांच्या विवेचनाशी कसलाही संबंध नाही.
जडवाद आणि चैतन्यवाद हे दोन्ही वाद अतिभौतिकीय (metaphysical) सिद्धांत असून त्यांचे प्रयोजन विश्वाचे वास्तव किंवा अंतिम स्वरूप काय आहे ते सांगणे आहे. जडवादाचे (Materialism) प्रतिपादन असे आहे की विश्व वस्तुतः किंवा परमार्थतः जड किंवा अचेतन पदार्थाचे बनलेले आहे. ज्यांना आपण चेतन किंवा मानस पदार्थ म्हणतो तेही वस्तुतः जडाचीच रूपे आहेत. चैतन्य हे कोणी स्वतंत्र तत्त्व नसून जडाच्याच काही विकारांत आढळणारा गुण किंवा व्यापार आहे. याच्या विरुद्ध मत म्हणजे चैतन्यवाद (Idealism). त्याचे प्रतिपादन जडवादाच्या पूर्ण विरुद्ध आहे. त्याचे प्रतिपादन असे आहे की जगात सर्वत्र केवळ चेतन पदार्थच आहेत. चैतन्य हे निरवकाश असणार, म्हणजे त्याच्या ठिकाणी विस्तार-लांबी, रुंदी, जाडी इ. असणार नाही. अर्थात या वादानुसार जगात काहीही अचेतन किंवा विस्तारयुक्त नाही. सकृद्दर्शनी जड वाटणाच्या वस्तू – उदा. टेबल, खुर्ची, इ.- खरोखर चेतनामय आणि अविस्तृत आहेत, पण त्या आपल्याला विस्तारयुक्त आणि अचेतन भासतात. उदा. बाक्र्ली या इंग्लिश तत्त्वज्ञाचे मत असे होते की आपल्याला विस्तारयुक्त भासणाच्या वस्तू खरोखर आपल्या मनात असणार्यार कल्पना आहेत, आणि लाइब्नित्स या जर्मन तत्वज्ञाचे मत असे होते की विस्तारयुक्त वस्तू वस्तुतः अगणित आत्म्यांचे समूह असतात. भारतीय तत्त्वज्ञानातील वेदांती करीत असलेला व्यावहारिक आणि पारमार्थिक सत्ता यामधील भेद प्रसिद्ध आहे.
आता मोहनींच्या लेखाचा या सबंध विषयाशी कसलाच संबंध नाही. मोहनी जडवादी असतीलही कदाचित; पण स्त्रीमुक्तिविषयक त्यांच्या लेखाचा जडवाद किंवा चैतन्यवाद या अतिभौतिकीय वादांशी कसलाच संबंध नाही. आणि खरी गोष्ट अशी आहे की जडवाद किंवा चैतन्यवाद यांपैकी कोणताही वाद स्वीकारला तरी मनुष्य स्त्रीमुक्तिवादी असूही शकेलआणि नसूही शकेल. उदा. जॉन स्टुअर्ट मिल एका अर्थाने चैतन्यवादी होता आणि कार्ल मार्स जडवादी होता. पण दोघांनाही स्त्रीमुक्ती मान्य होती. गांधीजी आणि गोळवलकर गुरुजी दोघेही चैतन्यवादी होते, पण गांधीजी स्त्रीमुक्तिवादी होते आणि गोळवलकर स्त्रीमुक्तिविरोधी होते.
मोहनी जडवादी असतील असे मला वाटत नाही. पण ते इहवादी (secularist)मात्र आहेत.‘सेक्युलरिझम’ हा शब्द अनेक अर्थानी वापरला गेला आहे. पण त्यांपैकी ‘इहवाद असे प्रतिपादतो की इहलोकाखेरीज अन्य लोक नाही. इहवादी ईश्वर, परलोक, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, इत्यादि गोष्टी मानीत नाहीत. या सर्व गोष्टींविषयी सक्रिय भूमिका घेण्याकरिता आवश्यक असलेली पुरेशी विश्वसनीय माहिती नसल्यामुळे त्यांविषयी इहवादी उदासीन असतो. परंतु परलोकाविषयी उदासीन असला तरी इहलोकाविषयी मात्र त्याला विलक्षण प्रेम, चिंता आणि कर्तव्ये यांची जाणीव असते. मानवाचे आयुष्य जे काय पाचपन्नास वर्षांचे त्याला लाभत असेल ते त्याला एकदाच लाभते, आणि हे सुसह्य, नव्हे सुखमय व्हावे अशी त्याची इच्छा आणि धडपड असते.
श्री खैरकरांनी ‘अदृष्टाविषयी जे लिहिले आहे त्यावरून ते ‘अदृष्ट’ हा शब्द unconscious’ या अर्थाने वापरीत आहेत असे स्पष्ट दिसते. परंतु ‘अदृष्ट’ हा शब्द मीमांसाशास्त्रातील असून त्याचा अर्थ आपण विविध कर्मे करीत असताना जे पाप किंवा पुण्य कमावतो ते असा आहे. अदृष्टामुळेच आपल्याला कर्माची फळे चाखावी लागतात,आणि त्याकरिता आपला पुनर्जन्म होतो. फ्रॉइड, युंग, इत्यादि लोकांनी ज्याचा अभ्यास केला ते हे नव्हे. त्यांचा विषय होता असंज्ञा.
परंतु जडवादी असंज्ञा मानीत नाहीत किंवा मानू शकत नाहीत असे नाही. टोकाचा जडवाद- म्हणजे सर्व वस्तू अचेतन आहेत हे मत – कोणीच स्वीकारीत नाही, कारण मी त्या अर्थाने जडवादी आहे असे म्हणणे म्हणजे वदतोव्याघात होईल. म्हणून जडवाद्याला नेमस्त जडवादाची भूमिका घ्यावी लागते आणि म्हणावे लागते की जे चेतन आहे ते अंती जडच आहे. पण नेमस्त जडवाद्याचे असंज्ञेशी वैर असण्याचे काही कारण नाही. जडवाद हे अतिभौतिकीय मत आहे, तर असंज्ञेचा अभ्यास करणारे मानसशास्त्र हे विज्ञान आहे. अतिभौतिकी आणि विज्ञान यात विरोध असू शकत नाही. फारच झाले तर विज्ञानाचा स्तर व्यावहारिक आहे आणि अतिभौतिकीचा स्तर पारमार्थिक आहे असे म्हणावे लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *