बंडखोर पंडिता (भाग १)

पंडिता रमाबाईंच्या कार्याची ओळख आजचा सुधारकच्या वाचकांना करून देण्याचा विचार तसा लांबणीवरच पडत गेला. मध्यंतरीच्या एका घटनेने ते काम आणखी रेंगाळले.आजचा सुधारकच्या सल्लागार मंडळावरील एका विदुषीने धर्मांतर केले. ही गोष्ट सुधारकाला खटकली. समाजसुधारणेसाठी धर्माचे माध्यम आवश्यक समजणे ही गोष्ट त्याच्या धोरणात बसत नाही तर मग धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्या रमाबाई सुधारक कशा? आणि आंबेडकर, गांधी यांना तरी तुम्ही सुधारक समजता की नाही? त्यांची धर्मनिष्ठा तर जगजाहीर आहे. अशी बरीच भवति न भवति (मनाशी) केली. शेवटी निष्कर्ष निघाला तो असा:
आजचा सुधारकला स्वतःचे धोरण ठरविण्याचा अधिकार आहे. धर्माच्या नावाने सुधारणेचा पुरस्कार त्याच्या धोरणात बसत नाही कारण धर्माचा आधार श्रद्धा आहे. आप्तवचनाला धर्मात प्रामाण्य आहे. विवेक तेथे दुय्यम आहे. सुधारकी भूमिकेत विवेकाला अग्रक्रम आहे. धर्मबंधन व्यक्तिस्वातंत्र्यातला अडथळा आहे. विचारस्वातंत्र्याला विवेकनिष्ठेशिवाय दुसरी मर्यादा नाही. अर्थात धर्मनिष्ठांना ही भूमिका नाकारण्याचाअधिकार आहे तसा सुधारकालाही त्यांचा सल्ला नाकारण्याचा आहे. बस इतकेच.
आता गांधी, आंबेडकरांसारख्या महापुरुषांनी या समाजाच्या सुधारणेसाठी जिवाचे रान केले हा तर इतिहास आहे. तो नाकारण्याइतका आ. सुधारक करंटा नाही. त्यांची महात्मता मान्य करूनही त्यांच्या मार्गातले धोके सुधारकाला दिसतात. कोणाच्याही महात्मतेचे दडपण येऊ न देता स्वतः विचार करणे हा विवेकाचा मार्ग आहे. हा दृष्टिकोण अंगीकारून पंडिता रमाबाईंचे चरित्र अभ्यासणे योग्य आहे, आवश्यक आहे आणि उपयुक्तही.
रमाबाईंची जीवनकथा अद्भुत आहे पण रम्य नाही. ती दाहक आहे. तिच्यात एकाटोकापासून दुसर्याप टोकाकडे आंदोलन आहे. धर्मभोळ्या सनातनी कर्मठ ब्राह्मण कुटुंबात त्याजन्मल्या. अंत झाला तो कट्टर ख्रिश्चन म्हणून. ज्या उच्च वर्गातल्या अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध त्या पेटून उठल्या त्या समाजानेच त्यांना विजनवासात धाडले. स्वजनांकडून उपहास त्यांना हिंदु-बांधवांकडून वाट्याला आला तसाच नव्या ख्रिश्चन धर्मबांधवांकडूनही आला. रात्रंदिन ज्यांना युद्धाचा प्रसंग असेच जिणे त्यांना लाभले. परंतु प्रोमिथ्यूअसच्या अतूट धैर्याने आणि अदम्य विश्वासाने त्यांनी उभारलेले बंडाचे निशाण कधीही खाली ठेवले नाही.
रमाबाईंचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे दशग्रंथी ब्राह्मण, कर्नाटकातील आपले गाव कायमचे सोडून पुण्यसंचयासाठी तीर्थाटन करीत निघाले होते. पैठण मुक्कामी त्यांची अशाच दुसर्याम यात्रेकरूशी गाठ पडली. विपन्नावस्थेला कंटाळून या दुसर्याह ब्राह्मणाने अधिक उग्र मार्गाचा अवलंब केलेला होता. तो साष्टांग नमस्कार घालीत वाट चालत होता. सोबत गरोदर पत्नी आणि ९ वर्षांची ‘उपवर मुलगीही होती. त्याने अनंतशास्त्री या ४४ वर्षे वयाच्या विधुराला पुन्हा संसाराला उद्युक्त केले. आपल्या ९ वर्षाच्या लक्ष्मीचे कन्यादान करून बरेच पुण्य गाठी बांधले. अनंतशास्त्री पुन्हा गृहस्थाश्रमाच्या लोभात पडले याला तसेच एक कारण होते. स्वस्त्रीला विद्याविभूषित करण्याची त्यांची आकांक्षा अपुरीच राहिली होती. त्यांच्या डोक्यात हे स्त्री शिक्षणाचे खूळ शिरले होते त्यांच्या गुरुगृही. पुण्याला त्यांचे गुरू पेशवेवाड्यात संस्कृत शिकवीत. गुरूबरोबर वाड्यावर त्यांनी दुसरे बाजीराव पेशवे यांच्या पत्नी वाराणसीबाईंचे संस्कृत अध्ययन अवलोकिले होते. त्यांची अध्ययनातील गती, शुद्ध संस्कृतोच्यार आदींनी प्रभावित होऊन, मीही माझ्या पत्नीला अशीच विद्यालंकृत करीन अशी मनोकामना त्यांनी वर्षानुवर्षे उरी बाळगली होती. लक्ष्मीला घेऊन ते गावी परतले आणि तिला शिकवणे सुरू केले. त्यांची ही कृती ब्रह्मवृंदाला अर्थातच रुचली नाही. पण त्यांनी माघार घेतली नाही. वेद वगळता अन्य संस्कृतविद्या स्त्रियांना देण्यास शास्त्रांचा मज्जाव नाही अशी त्यांची भूमिका होती. ते माध्व वैष्णवपंथी होते. धर्माचार्यासमोर निर्णयासाठी दोन महिने वाद चालला. चारशे सनातनी पंडित विरुद्ध एक सुधारकी पंडित असा हा वाद झाला. त्यात ते जिंकले. आपल्या भूमिकेला पुष्टी देणारी शास्रवचने व टीकांश त्यांनी एकत्र ग्रथित करून पुस्तक तयार केले होते. ते पुढे कुठेतरी गहाळ झाले. वादातला विजय व्यवहाराला पुरला नाही. शेवटी सगळ्या कटकटींपासून दूर जाण्याचा एक मार्ग त्यांनी काढला. डोंगरमाथ्यावर जिथून तुंगा, भद्रा आणि कृष्णा उगम पावतात त्या गंगामूळ या ठिकाणी त्यांनी बरीचशी पडीक जमीन मिळवली. तिथे स्वतःचा आश्रम उभारला. निर्वेधपणे पत्नीचे शिक्षण सुरू ठेवले. त्यांच्या विद्वत्तेचा लौकिक होताच. इतरही शिष्य जमून गुरुकुल तयार झाले. लक्ष्मीबाई सुदैवाने मेधावी होत्या. त्यांनी शीघ्रगतीने प्रगती केली. लवकरच इतके प्रावीण्य संपादन केले की, पत्नीच्या माघारी छात्रांना त्याच पाठ देत. या ठिकाणी अनंतशास्त्री १३ वर्षे राहिले. रमाबाई त्यांचे शेवटचे अपत्य. त्या ६ महिन्याच्या असताना शास्त्रीबुवांनी पुन्हा तीर्थाटनाच्या मार्गाने जायचे ठरवले. आपली मोठी कन्या कृष्णा, श्रीनिवास हा पुत्र आणि लहानगी रमा यांना घेऊन हे दाम्पत्य पुन्हा पायी तीर्थयात्रेला निघाले. रमेला टोपलीत घालून भारवाहकाच्या मदतीने पदयात्रा सुरू झाली. अर्भकावस्थेपासून सुरू झालेला रमाबाईचा हा प्रवास पुढे २० वर्षे चालू होता. त्यांचे कलकत्त्याला आगमन झाले तेव्हाच तो संपला. ते वर्ष होते इ.स. १८७८. आता या कुटुंबातले दोघेच राहिले होते. श्रीनिवास आणि रमाबाई. आई-वडील आणि कृष्णाबाईमद्रास इलाख्यातील दुष्काळात अन्नान्न दशा होऊन निवर्तले. योगायोगाने ही भावंडे कलकत्त्याला आली आणि त्यांचा अज्ञातवास संपला. तिथून पुढे कायम त्यांच्यावर प्रकाशझोत राहिला. तिथे नवजागृत सुशिक्षित वर्गाने त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. वीस वर्षांची ही तेजःपुंज तरुणी व्याख्यान-प्रवचन करते. संस्कृतात भाषण-संभाषण करते. शीघ्रकविता रचते. अख्खे भागवत-पुराण, गीता, कित्येक स्तोत्रे असे हजारो श्लोकांचे तिचे पाठांतर आहे. असा लौकिक झाला. वर्तमानपत्रांनी तो सर्वदूर पसरवला. पंडितसभांनी त्यांना शारदा, सरस्वती, पंडिता अशा बिरुदांनी गौरविले. त्यांची किर्ती महाराष्ट्रात येऊन पोचली. न्या.मू. रानडे, तेलंग, भांडारकर अशा समाजधुरीणांनी त्यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून मायभूमीला येण्याचे आमंत्रण केले.
ज्या रमाबाईंचे जे पांडित्य पाहून कलकत्त्याचे विद्वान स्तिमित झाले होते ते त्यांनी कुठून मिळविले होते? त्यांचे आईवडील हेच त्यांचे गुरू. ‘चरैव इति चरैव इति’ (चालत राहा, चालत राहा) हा वैदिक उपदेश त्यांच्या तीर्थरूपांनी अक्षरशः पाळलेला. अखेरपर्यंत. वडील वारले तेव्हा रमाबाईंचे वय १६ वर्षांचे होते. मागोमाग एका महिन्यात आई वारली. अनंतशास्त्र्यांचे अखंड परिभ्रमण सुरू असे. काशी ते रामेश्वर आणि द्वारका ते गंगासागर अशा प्रवासात मुक्कामाच्या गावी शास्त्रीबोवा देवळात भागवत वाचीत असत.
आईने सकाळी ४ वाजता ब्राह्म मुहूर्तावर उठावे. मुलांना संस्कृतचे पाठ द्यावेत असा क्रम असे. थोडी प्रगती झाल्यावर व्याकरण, कोषादींचा उपयोग करून स्वतःच स्वतःचे शिक्षक बनावे असे शिक्षण आईवडिलांनी दिल्याचे रमाबाई सांगत. या प्रकारचा दिनक्रम चालला असता १२ वर्षांचे वय होईतो रमाबाईचे १८ हजार श्लोकी भागवत, गीता, स्तोत्रे, कोष असे प्रचंड पाठांतर झाले होते. हे कुटुंब १८७३-७४ साली मद्रास इलाख्यात यात्रा करीत असता अत्यंत भीषण दुष्काळात सापडले. दिवसचे दिवस उपवास पडत. झाडपाला खाऊन भुकेची आग विझेना. एकदा तर जलसमाधी घेण्यास निघालेल्या आईवडिलांना श्रीनिवासने महत्प्रयासांनी अडविले. पण दुष्काळाने शेवटी त्यांचा बळी घेतलाच. मृत्युसमयी मला थोडे साखरपाणी द्या म्हणून विनवणाच्या शास्त्रीबुवांना पुत्राने पाणी पाडले. पण साखर कुठून आणणार? उमेदीच्या काळात जिच्या ओसरीवर पाचपन्नास पाने रोज उठत ती अन्नपूर्णा लक्ष्मीबाई अन्न अन्न करून मेली. हा दुष्काळ रमाबाईच्या मनावर फार खोल ठसा उमटवून गेला. पुढे मध्यप्रदेशात आणि गुजरातेत दुष्काळ पीडितांना वाचविण्यासाठी रमबाईंनी अतोनात परिश्रम घेतलेले दिसतात. दया हे धर्माचे मूळ आहे हे रमाबाई स्वतःच्या अनुभवग्रंथातूनच शिकल्या. दुसरा धडा रमाबाईंनी घेतला तो उपयुक्त शिक्षणाचा. आपल्यासमोरआईवडील अन्नासाठी तडफडत असता आपण काही करू शकत नव्हतो हे शल्य त्यांना फार लागून राहिले होते. त्यांना वाटे आईवडिलांनी आम्हाला खूप विद्या दिली. पण ती पोट भरण्याच्या कामाची नव्हती. अर्थोत्पादक कौशल्य ना त्यांच्यापाशी ना त्यांच्याभावापाशी, त्यांचा धर्म त्यांना भीक मागू देत नव्हता. श्रीनिवासने मोलमजुरी करणे पत्करले. पण त्याने निभाव लागला नाही. रमाबाईंनी पुढे आपल्या केडगावच्या मुक्ति आश्रमात स्त्रियांना अर्थकरी विद्या देण्यावर भर दिला त्याचे मूळ या अनुभवात आहे. आईवडिलानंतर वर्षाच्या आत कृष्णाबाईचा अंत झाला. श्रीनिवास आणि रमाबाईंनी आणखी दोन वर्षे भारतभ्रमण चालूच ठेवले. त्यातले एक दोन प्रसंग असे. प्रवासात वडिलांचा नेम असा असे की पुराण वाचीत असता पोथीपुढे कोणी ठेवलेला पै-पैसा, डाळतांदूळ घ्यायचे, आपली गरज भागताच उरलेले धान्य, पै-पैसा दक्षिणा म्हणून वाटून टाकायचे. संचय करायचा नाही. वडिलांचा हा धर्म भावंडे पाळीत होती. वस्त्रे, प्रावणे यांची वानवा असायची. स्नानानंतर धूतवस्त्र परिधान करावे असा धर्मनियम पाळणे कधी कठीण होऊन बसे. कारण दुसरे वस्त्रच नसायचे. अशा वेळी रमाबाई अंगावरचे अर्धे वस्त्र धुवून वाळवत, नंतर ते नेसून उरलेले धूत असत. छत्री, पादत्राणे यांचा प्रश्नच नव्हता. एकदा हिवाळ्यात पंजाबात परिभ्रमण चालले होते. रात्री थंडी इतकी असह्य झाली की झेलम नदीच्या पात्रात खड्डे करून दोघांनी त्यात गळ्यापर्यंत गाडून घेतले. अशी दिशाहीन भटकंती किती चालली असती कोणास ठाऊक. तशात त्यांचे कलकत्त्याला आगमन झाले आणि रमाबाईंच्या जीवनाला अकल्पनीय अशी कलाटणी मिळाली.
कलकत्त्याला त्यांना लाभलेले सुखाचे आणि मान्यतेचे दिवस फार काळ राहिले नाहीत. दोन वर्षांनी श्रीनिवासचा अचानक मृत्यू झाला (८ मे १८८०). त्या दोन वर्षांत कलकत्त्यातील नवशिक्षितांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. केशवचंद्र सेन आणि त्यांचे समानधर्मी विद्वानांच्या इच्छेवरून त्यांचा ब्राह्मो समाजाशी संबंध आला. त्याच दरम्यान आणखी एक आक्रीत घडले. रमाबाईंच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाने आणि अमोघ वक्तृत्वाने भारलेल्या त्या बंग भद्रजनांनी त्यांना विनविले की आमच्या पडदानशीन कुलास्त्रिया निरक्षर आहेत. आपण त्यांना स्त्रीधर्माचे ज्ञान द्यावे.
या व्याख्यानांसाठी म्हणून रमाबाईंनी धर्मशास्त्राचे वाचन केले. त्यातच त्यांच्या पुढच्या कामगिरीचे बीजारोपण झाले. पुढे ४ वर्षांनी पुण्याला गेल्यावर त्यांचे स्त्री-धर्मनीति’ हे पहिले पुस्तक निघाले. त्यातून जी द्रव्यप्राप्ती झाली तिच्यातून त्यांचे इंग्लंडला जाण्याचे भाडे सुटले आणि प्रत्यक्षात एप्रिल १८८३ मध्ये त्या इंग्लंडला जाऊ शकल्या.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.