सी. पी. स्नो ह्यांच्या दोन संस्कृती” ह्या पुस्तकाच्यानिमित्ताने (उत्तरार्ध)

गेल्या वीस वर्षांतील ‘नवीन भौतिकीमुळे भौतिक शास्त्राच्या पारंपारिक कल्पनेतही महत्त्वाचे बदल घडून आले आहेत. ह्या बदलांचे वर्णन कॉलिनी पुढील शब्दांत करतो,क्वाँटम भौतिकी” “आणि “केआस थिअरी” सारख्या नवीन कल्पनांनी द्रव्याच्या (matter) गुणधर्माचे जुने जडवादी (mechanistic) रूप – जे न्यूटनपासून प्रचलित होते – टाकून द्यायला भाग पाडले आहे. शिवाय सैद्धांतिक भौतिकी (Theoretical Physics), खगोलशास्त्र (Astronomy) आणि विश्वरचनाशास्त्र (Cosmology) ह्यांसारख्या विषयांमधील क्रांतिकारक प्रगतीमुळे अनुभवजन्य निरीक्षणातून, अचूक निगमनाने नियंत्रित अनुमान काढण्याची जुनी वैज्ञानिक विचारपद्धतीही सदोष असल्याचे लक्षात आले आहे. रूपक, समरूपता, अंतःस्फूर्ती ह्यासारखे मानव्यशास्त्रात वापरले जाणारे मानसिक व्यवहार विज्ञानातही उपयोगी पडतात हे जाणवल्यामुळे ह्या दोन ज्ञानशाखांमधील साधम्र्याची चर्चा सध्या जास्त महत्त्वाची ठरू पाहात आहे.
हे अंतर कमी होण्यासाठी विज्ञानाचे इतिहासकार, तत्त्वज्ञ अशासाख्या लोकांनी फार मौलिक कामगिरी केली आहे. विज्ञानाबद्दलची आपली समज समृद्ध करीत असतानाच विज्ञानाच्या मर्यादाही त्यांनी उघड केल्या आहेत. ह्या दृष्टिकोणातून पाहिल्यावर विज्ञान ही पण समाजाचे जगाशी असलेले नाते समजावून घेण्याची धर्म किंवा कला ह्यांच्यासारखीच एक सांस्कृतिक प्रक्रिया आहे असे मानता येते.
वाङ्मय शाखेचा विचार करताना महत्त्वाचा बदल म्हणून अमेरिकेत रुजलेल्या ‘वाङ्मय आणि विज्ञान’ ह्या आंतरशास्त्रीय शाखेचा उल्लेख कॉलिनी करतात. ह्या संस्थेची व्यावसायिक संघटना आहे, खास प्रकाशनेही आहेत. प्रत्यक्षात वैज्ञानिक त्यांची प्रायोगिक तंत्रे शेक्सपिअरच्या नाटकांवर प्रकाश टाकण्यासाठी वापरताना दिसले नसले तरी वाङ्मयीन मीमांसक (theorists) मात्र उत्साहाने त्यांच्या विश्लेषणाच्या पद्धती वापरून वैज्ञानिक शोध-निबंधांतील आलंकारिक सौंदर्य तपासताना आढळतात! विश्वविद्यालयातले किती तरी संशोधक विविध सामाजिक, उपयोजित, व्यावसायिक शाखांमधून असे काम करत असतात की त्यांचे मानव्यशाखा अथवा विज्ञानशाखा ह्यांपैकी कशातच वर्गीकरण करता येणार नाही – ज्यांना दोन संस्कृतींची संकल्पनाही निरुपयोगीआणि कालबाह्य वाटेल.
स्नोंचा दुसरा आक्षेप विशेषाध्ययनाला (specialization) होता. पण कुठल्याहीज्ञानशाखेच्या बौद्धिक विकासामधे त्यातील संकल्पना आणि तंत्र अधिकाधिक सूक्ष्म आणि परिष्कृत (refined) होत जाणे अटळ आहे. जो विषय आपला नाही त्यातले सूक्ष्म पदर आपल्याला उलगडता आलेच पाहिजेत असा अट्टहास करणे वेडेपणाचे ठरेल.
हेही जाणून घेतले पाहिजे की समाजात आपण एकच भूमिका वठवत नाही. सामाजिक, वांशिक, धार्मिक, लैंगिक, बौद्धिक, राजकीय अशा अनेक भूमिकांतून आपण ओळखले जातो. तसेच फक्त एकच समान संस्कृती असू शकत नाही. तिची अनेक रूपे असतात ज्यात कमी अधिक प्रमाणात आपण सहभाग घेत असतो.
दोन संस्कृतींतील भेद उघड करतात स्नोंनी सेंकड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स माहीत नसलेल्या लोकांना दोष दिला. समान संस्कृती ह्याचा अर्थ ज्ञानाचे/माहितीचे समाईक भांडार असलेल्या लोकांची संस्कृती असा करणे योग्य ठरणार नाही. माणसाचे ज्ञान मर्यादितच असणार, पण ज्ञानाच्या विचाराच्या देवाणघेवाणीवरच समाजाचे स्वास्थ्य निर्भर असते. अतिविशेषाध्ययनामुळे हा संवाद जर खुटणार असेल तर तो धोका टाळण्याचे वेगळे मार्ग शोधले पाहिजेत. अनुकूल असे सांस्कृतिक, सामाजिक वातावरण निर्माण व्हायला हवे ज्याच्यामधे संवादाची शक्यता आणि एकमेकांच्या ज्ञानशाखांबद्दल योग्य अशी आदराची भावना रुजू शकेल. स्टीव्हन जे. गूल्ड, रिचर्ड डॉकिन्स, स्टीव्हन हॉकिंग ह्यासारखे श्रेष्ठ वैज्ञानिक अशा आदर्श समान संस्कृतीचे उदाहरण ठरू शकतात. उच्च दर्जाच्यां वैज्ञानिक संशोधनाचा तपशील जरी नाही तरी त्यांचे महत्त्व समाजातील मोठ्या गटाला समजावून सांगण्याची हातोटी त्यांना साधली आहे.
स्नोंच्या व्याख्यानांतले दोष स्वीकारूनही हे मान्य करावेच लागेल की ज्ञान आणि शिक्षण ह्याबद्दल आत्मतुष्ट असलेल्या समाजाला त्यांनी जागे केले. जागतिक पातळीवर स्नो ह्यांची भविष्यवाणी कितपत खरी ठरली? गेल्या तीस वर्षांत झालेल्या बदलांचा विचार करता त्यांच्या दोन संस्कृतींच्या सिद्धांतात थोडे फेरफार करावेच लागतील. उदाहरणार्थ वैज्ञानिक प्रगतीची जाणीव सुशिक्षित समाजाला टेलिव्हिजनच्या प्रभावी माध्यमामुळे जशी झाली तिची कल्पना स्नोंच्या काळात येणे शक्यच नव्हते. आपल्या रोजच्या आयुष्यात वापराव्या लागणाच्या अनेक महत्त्वाच्या यंत्रांपैकी संगणक हे फक्त एक यंत्र आहे. उपयोजित विज्ञानाचा इतका सहज वापर स्नोंनाही अपेक्षित नसणार.
विज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबर त्याच्या दुष्परिणामांची चिंताही वाढत चाललीआहे. पण ह्या दुष्परिणामांची जाणीवही वैज्ञानिक प्रगतीमुळेच शक्य झाली हे विसरता कामा नये. ओझोनच्या थराला पडलेली भोके हे एक उदाहरण आहे. विज्ञानाला योग्य तो मान मिळत नाही ही स्नोंना वाटणारी चिंता दुसर्याे बाजूने खरी होण्याची भीती निर्माण झाली आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक विचारपद्धती यांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.
इंग्रजीचा आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून झालेला प्रसार ही अलीकडची घटना आहे. व्यापारी आणि तांत्रिक क्षेत्रातील विकासाच्या प्रभावाखाली विज्ञानाची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजी सगळ्या जगाने स्वीकारली. एका समान भाषेच्या वापरानेही देशांमधले अंतर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
औद्योगिकीकरणाने गरीब देशांचे प्रश्न सुटतील अशी स्नो ह्यांची कल्पना बालिश होती हे सिद्ध झाले आहे. सामाजिक पद्धती, सांस्कृतिक परंपरा, धर्म ह्यांनी निर्माण होणारे अडथळे दूर करणे सोपे नाही हे काही भागात लक्षात आले आहे. राजकीय आणि सामाजिक शक्ती कसे व्यवहार करतात ह्याची माहिती तंत्रज्ञानातील विज्ञान माहीत असण्यापेक्षा जास्त आवश्यक असते. आर्थिक किंवा तांत्रिक प्रगतीमुळे जग ‘उत्क्रांत होत नाही. राष्ट्रवाद, धार्मिक मूलतत्त्ववाद, वांशिक निष्ठा अशासारख्या आधुनिक नसलेल्या भावना अजूनही जगाला ओरबाडत आहेत. अशा परिस्थितीत स्नोंना वाटले होते त्याप्रमाणे रासायनिक किंवा भौतिक शास्त्राच्या अभ्यासाने जग बदलणार नाही, पण कदाचित इतिहास किंवा तत्वज्ञानाचा अभ्यास उपयोगी ठरेल.
तरी पण दोन संस्कृतींचा हा सिद्धांत जागतिक पातळीच्या संदर्भात स्नोंना नेहमीच विशेष महत्त्वाचा वाटत राहिला. जगण्याकरता हेतू पाहिजे असे म्हणणाच्या तरुणांना त्यांनी सोपा संदेश दिला -“शांती. अन्न. ह्या पृथ्वीला पेलवतील, पोसता येतील एवढीच माणसे – हा हेतू सिद्ध करण्यासाठीच झटा.”
तरी काही मुद्दे निसटूनच गेले आहेत. मुद्दे विशद करण्याकरता वापरलेली उदाहरणे वगैरे वगळल्याने हा सारांश जरा शुष्कही वाटेल. पण मला नोंदवायची आहे ती माझी प्रतिक्रिया. कला आणि मानव्यशाखांना पाश्चात्य समाजात अनेक वर्षे मानाचे आणि अधिकाराचे स्थान होते – अजूनही आहे. शिक्षण ही जेव्हा उत्तमजनांची (elite class) मिरासदारी होती तेव्हा तर ही एवढीच ज्ञान शाखा आणि गणित असा अभ्यासक्रम असे. अनेक राजनीतिज्ञ, मुलकी अधिकारी (civil servants) आणि उच्चवर्गीय लोक ह्या शिक्षणाच्या शिदोरीवर कार्यक्षम आयुष्य जगून गेले. आपल्याकडे कला आणि मानव्यशाखांना अशी परंपरा अथवा अधिकार कधीच नव्हते. मागच्या शतकात मेकॉलेने आपल्या आधुनिक शिक्षणाचा पाया घातला आणि पाश्चात्य अनुभवात रुजून वाढलेले हे शिक्षण आपण आपलेसे केले म्हणूनही कदाचित असेल, पण शिक्षणाचा आणि रोजच्या जगण्याचा काही संबंध आहे ह्याची जाणीव आपल्या शिक्षणात फार कमी प्रमाणात मिळते. शिक्षण हा जगणे समजून घ्यायचा एक मार्ग आहे, म्हणून ते मनोरंजक आणि महत्त्वाचे आहे अशी भावना मनात न येता ते रोजगार मिळवायचे एक साधन आहे एवढाच विचार शिक्षणाबद्दल महत्त्वाचा ठरला. ह्याचीच पुढची पायरी म्हणून तंत्रशिक्षणाची पदवी महत्त्वाची ठरली कारण हमखास नोकरीचे ते प्रमाणपत्र असल्याचे सिद्ध झाले. तंत्रशिक्षणाच्याअभ्यासातून हळूहळू मानव्य आणि कलाशाखेचे एकेक विषय अतिरिक्त म्हणून गळत गेले आणि अशा त-हेने आपल्याकडे विज्ञान आणि मानव्य-कला शाखेमधे दरी निर्माण झाली. पदवीचा नोकरीशी संबंध जुळल्यामुळे शिक्षणात भिनलेला भ्रष्टाचार हा वेगळाच विषय आहे, पण जी पदवी नोकरी मिळवून द्यायला निरुपयोगी ठरते ते शिक्षण–ती ज्ञानशाखाही- कुचकामी असा नवा आणि धोकादायक विचार समाजात मूळ धरू लागला. जरा थांबून विचार केला तर लक्षात येते, स्वातंत्र्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवणाच्या किती दर्जेदार संस्था निर्माण झाल्या सर्व आय्.आय्.टी.ज, राष्ट्रीय पातळीच्या विविध प्रयोगशाळा – दिल्लीला N II, हैद्राबादला C CM B, बंगलोरला IS, मुंबईला T F R वगैरे; पण मानव्यशाखांकरता किती थोड्या नामवंत संस्था आहेत? पुण्याला गोखले इन्स्टिट्यूट, मुंबईला T IS S एवढ्याच मला माहीत आहेत. स्नोंच्या भाषणामुळे इंग्लंडमधील शैक्षणिक धोरण बदलले किंवा नाही हे मला माहीत नाही; पण आपल्या शैक्षणिक धोरणामुळे एका प्राचीन, मौल्यवान आणि अभिजात अशा ज्ञानशाखेची होत असलेली हेळसांड थांबवली पाहिजे.