चर्चा- भक्ती हे मूल्य आहे काय?

आ. सु. च्या डिसेंबर १९९४ अंकात “भक्ती हे मूल्य आहे काय?” हा प्रा. दि. य. देशपांडे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे भक्तीला आपल्या देशांत पुरातन कालापासून तो आजवर इतके महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे की यासंबंधी केवळ विवेकवादांतूनच नव्हे तर सर्व दृष्टिकोनांतून सखोल चर्चा होणे हे अगत्याचे आहे.
हा लेख वाचल्यावर मनांत आलेले काही विचार, प्रश्न आणि शंका अशा : प्रथम लेखाच्या उतरार्धातील कांही विधाने घेतो. (१) “परंतु ईश्वर (मग तो कोणत्याही वर्णनाचा असेना) आहे असे मानायला कांही आधार आहे काय? हा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तरनकारार्थी द्यावे लागते. याबरोबर, लेखांतील शेवटची ओळ, (२) “ तेव्हा भक्ती ही एका नसलेल्या वस्तूची भक्ती होणार हे तिच्या वैयर्त्यांचे आणि असंमजसपणाचे (आणखी एक) कारण’. यासंबंधात सर कार्ल पॉपर याअर्वाचीन तत्त्ववेत्त्याचे विचार महत्त्वपूर्ण आहेत. त्यांनी या संदर्भात म्हटले आहे, “God exists’ can be a meaningful stastement and it may be true, but since there is no conceivable means by which it can be falsified, it is not a scientific statement.”१ (ईश्वर आहे हे विधान अर्थपूर्ण आणिखरे पण असू शकते. पण हे विधान खोटे आहे असे सिद्ध करण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे, वैज्ञानिक पद्धतीच्या चौकटीत न बसणारे हे विधान आहे.). कार्ल पॉपर यांच्या विज्ञानविषयक तत्त्वज्ञानांत verification पेक्षा falsification हा निकष महत्त्वाचा आहे.Deduction, not Induction.तेव्हा पॉपर यांच्या मते ईश्वराचे अस्तित्व खरेही मानता येत नाही आणि खोटे पण पाडता येत नाही. पण ‘ईश्वर आहे हे विधान अर्थपूर्णआणि खरे सुद्धा असू शकते हे त्यांनी मान्य केले आहे. तेव्हां भक्ती ही जरी विज्ञानाने सिद्ध न होणार्या् वस्तूविषयीं (ईश्वराविषयी) असली तरी प्रा. देशपांड्यांच्या लेखांतील वर दिलेल्या (१) आणि (२) या विधानांत म्हटल्याप्रमाणे मूल्यहीन आहे असे मानण्याचेकारण नाही.
२० व्या शतकांतील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक Einstein हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांचा ईश्वरावर विश्वास होता. पण त्यांनी हे स्पष्ट केले आहे की, मानवी जीवनांतील व्यक्तिगत सुखदुःखाकडे लक्ष देणारा ईश्वर (personal God) त्यांना मान्य नव्हता. Spinoza या तत्त्ववेत्त्याच्या ईश्वराच्या संकल्पनेवर त्यांचा विश्वास होता. (I believe in Spinoza’s God’) ही संकल्पना वैश्विक संज्ञेच्या (cosmicconsciousness) च्या स्वरूपाची आहे.आपणा
सर्वांचा चेतन सृष्टिविषयक विज्ञानांतील उत्क्रांतिवादावर (Theory of Evolution) विश्वास आहे असे मानले तरी सध्याचा मानवी समाज आणि त्यांतील सर्वसाधारण व्यक्ती यांना वैचारिक दृष्टीने Einstein च्या बरोबरीची पात्रता येण्यास ( हे शक्य आहे असे धरून चालल्यास) किती कालावधी लागेल हे सांगणे कठीण आहे. तेव्हा सध्याच्या परिस्थितीत तरी सामान्य माणसाला अभिप्रेत असलेला ईश्वर हा वैयक्तिक स्वरूपाचा (personal God) असणार हे निश्चित. संकटकाळांत धीर देणारा व भक्ताचा मानसिक तोल संभाळणारा ईश्वर.
प्रा. देशपांडे यांच्या लेखांत भक्तीचे स्वरूप मोक्षप्राप्तीचा एक मार्ग (कर्म व ज्ञान यांप्रमाणे) यावर आधारित आहे. ईश्वर हा सर्वशक्तिमान, दुराचाराला शिक्षा देणारा आणि सदाचारासाठी बक्षिस देणारा असे चित्र उभे केले आहे. याच्या उलट ईश्वरभक्त हा अत्यंत दीनवाणा, स्वतःला कःपदार्थ समजणारा, दुबळा याचक, प्रार्थनेवर सर्वस्वी अवलंबून राहणारा असे मानले आहे. पण ईश्वर व भक्त यांचे हे वर्णन योग्य आहे का? मला असे वर्णन एकांगी (one – sided) आणि अतिरंजित (extremist) स्वरूपाचे वाटते. ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग यांच्याशी तुलना केली तर भक्ती ही पूर्णतः भावनात्मक स्वरूपाची आहे. म्हणूनच सामान्य व्यक्तीला ती शक्य आणि आकर्षक वाटते. पण हा मार्ग स्वीकारलेल्या भक्तांत अनेक दोष असू शकतातच. उदा. पूजा-अर्चेचा निरर्थक पसारा, गुरुभक्तीचे थोतांड, स्वतःच्या कर्तव्याबद्दल उदासीनता आणि निष्क्रियता वगैरे. यांबाबत अत्यंत जागरूकता राखणे आवश्यकच आहे.
विवेकवाद कितीही तर्ककठोर केला तरी सामान्य माणसाच्या स्वाभाविक भावनांना त्यांत स्थान दिलेच पाहिजे. खर्याा भक्तीच्या स्वरूपांत, करुणा (compassion) आणि प्रेम (love) यांचा समावेश होतो असे मला वाटते.
तेव्हा एक वैज्ञानिक आणि एक सामान्य माणूस या दोन्ही भूमिका स्वीकारून, प्रा. देशपांड्यांच्या “भक्ती हे मूल्य आहे काय?” या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.