चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?

दिवाकर मोहनी ह्यांच्या लेखामधली स्त्री ही “स्वतःची लैंगिक स्वातंत्र्याच्या बाबतीत स्वामिनी’ ही कल्पना भारतीय स्त्रीपुरुषांना समजणेच (माझ्या अनुभवाप्रमाणे) अशक्य आहे. भारतीयांच्या दृष्टिकोणाप्रमाणे स्त्रीचा पतिव्यतिरिक्त पुरुषाशी संबंध आला की ती वेश्या नसली तरी वेश्येसारखीच होते. लैंगिक स्वातंत्र्य व स्वैराचार ह्यातला फरक समजणे भारतीयांना (एवढेच नव्हे तर आशियातल्या अनेक समाजांना) कठीण जाते. अमेरिकेत स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य आहे, म्हणून त्या “लूज’ आहेत, असे अनेक भारतीय म्हणतात.
“वेश्या परतंत्र आहे. तिला नकार देण्याचा अधिकार नाही” हा मुद्दा मात्र मला मान्य नाही. वेश्येलाही नकार देण्याचा अधिकार आहे व तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी समागम केल्यास तो बलात्कार होतो.
हवाई, आफ्रिका व भारतातही स्त्रीला लैंगिक स्वातंत्र्य असणारे समाज होते व आहेत.
हवाईत विवाहापूर्वी मुलामुलींना पूर्ण लैंगिक स्वातंत्र्य होते. लग्न झाल्यावर त्या कुटुंबातील भावांशी भावजयींचे संबंध समाजमान्य होते. घराबाहेरचे स्त्रीपुरुष संबंध समाजमान्य नसले तरी त्यांच्याकडे कानाडोळा केला जात असे.
कुमारी मातेस मूल झाले तर ते तिचे आईवडील वाढवत असत.
आफ्रिकेतील काही समाजात तर विवाह व कुटुंब हे फक्त ईकॉनॉमिक युनिट मानले जाते. स्त्रीपुरुषांना पूर्ण लैंगिक स्वातंत्र्य असते. मुले ज्या स्त्रीला होतील त्या कुटुंबाची मानली जातात.
आफ्रिकेत व हवाईमध्ये वैधव्य व अनौरस संतती हा प्रकारच नव्हता. त्या समाजात पतीचा मृत्यू झाल्यास स्त्री त्याच्या भावाची पत्नी होते.
बलात्कार, लैंगिक विकृती, प्रेमभंगामुळे होणारे दुःख, वेश्याव्यवसाय ह्या समाजात नव्हते. घटस्फोट क्वचितच होत, पण त्यामुळे स्त्रियांकडे कमीपणा येईल अशी भीती नव्हती.
पण लैंगिक स्वातंत्र्य असले तरी हवाईतल्या किंवा आफ्रिकेतल्या स्त्रिया पूर्णअर्थाने मुक्त नव्हत्या. त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास केल्यास स्त्रियांचे स्थान त्यांच्या समाजात दुय्यमच होते हे समजते.
लैंगिक स्वातंत्र्य हा स्त्रीमुक्तीच्या अनेक पैलूंपैकी एक पैलू आहे. पूर्ण स्त्रीमुक्तीच्या वाटेतला तो एक टप्पा आहे.
आ. ह. साळुखे यांच्या हिंदू संस्कृती व स्त्री ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या हिंदुधर्मात स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य होते. पराशर, बृहस्पती, वशिष्ठ यांची मते वाचून मला वाटते की, भारतात स्त्रीमुक्ती होण्यासाठी परदेशी कल्पनांची आयात करण्याची जरूरी नाही. आपल्याच खर्‍या सनातनी धर्माचे पुनज्जीवन करावे.
माझ्या ह्या लेखात श्री. दि. मा. खैरकर, प्रा. लोही यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांना उत्तरे दिली आहेत.
दि. मा. खैरकर यांच्या पत्रातील (मानसशास्त्रीय दृष्ट्या) “पुरुष हा स्त्रीपेक्षा अधिक आक्रमक व दलितांवर सत्ता गाजवणारा असतो” ह्या विधानाला माझा आक्षेप आहे. स्त्रियांचे वर्चस्व असलेले समाज जगात होते. आणि हे मानसशास्त्र कुणी लिहिले? पुरुषप्रधान समाजातील पुरुषांनीच. मानसशास्त्रीय दृष्ट्या (नैसर्गिक रीत्या, धर्मानुसार) पुरुष अधिक आक्रमक किंवा श्रेष्ठ, ह्याच धर्तीचे तत्त्वज्ञान काळेगोरे, नाझीज्यू, ब्राह्मणब्राह्मणेतर, युरोपमधले जमीनदार व सर्फ ह्यांच्यातली उच्चनीचता सिद्ध करण्यासाठी वापरले गेले आहे.
ग. य. धारप यांच्या पत्राबद्दल येवढेच लिहिते की त्यांच्या पत्रात चित्रित केलेली स्त्री शिक्षित असेल पण मुक्त नाही.’ खरी मुक्त स्त्री सासू, नणंद, भावजया व आईबहीण असे भेदभाव करीत नाही. हे भेदभाव पारंपरिक पुरुषप्रधान विचारसरणीमुळे निर्माण होतात.
“स्त्री कशी असावी?” ह्याचे चित्र रंगवताना पुरुषप्रधान समाजाने पुरुष कसा असावा ह्याचेही चित्र रंगवलेले आहे. (धाडसी, हुषार, शूर, खूप पैसे मिळवणारा इ. इ.) सगळे पुरुष असे नसतात. परिणामी ह्या ठराविक साच्याच्या (स्टीरिओटाईप) कल्पनेत स्वतः ला बसवताना पुरुषांचीही आयुष्ये उद्ध्वस्त होतात. दारूचे व्यसन, हृदयविकार, रक्तदाब अशा आजारांचे प्रमाण पुरुषांत जास्त आहे. जगातील भीषण गुन्हे पुरुष करतात. पुरुषच विषम प्रमाणात तुरुंगात खितपत पडतात, युद्धात मरतात व गुन्ह्यांना बळी पडतात.
पुरुषप्रधान समाजाची तत्त्वे ही स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही हानिकारक आहेत.
पण आपल्या पुरुषप्रधानतेच्या शृंखला पुरुष तोडायला तयार होत नाहीत. (दिवाकर मोहनींच्या लेखांवर झालेली टीकाच वाचून पाहावी.) माझ्या मते स्त्रीमुक्तीमध्ये पुरुषमुक्ती ही सुद्धा अभिप्रेत आहे. आपल्याला फक्त स्त्रीमुक्तीची नव्हे, तर मानवमुक्तीची समतोल, न्याय्य समाजासाठी जरूरी आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.