संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ! आक्षेपकांचा परामर्श

आजच्या सुधारकच्या मे व जून १९९४ च्या अंकात ‘संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ या शीर्षकाने ‘धारणाद्धर्म इत्याहुः’, ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति आणि ‘रक्षण की राखण’ या विषयांचा ऊहापोह करण्यात आला होता. या तीनही विषयांची चर्चा आजच्या सुधारकमधून यापूर्वी श्रीमान् संपादकांसहित इतरांनी वरचेवर सदैव एकपक्षीय केलेली होती. ती अधिक समग्र व्हावी म्हणून या विषयाची संदर्भसहित दुसरी बाजू पूर्वोक्त लेखात मांडली आहे. त्या विषयी प्रा. सुनीती देव (जून ९४), श्री मधुकर देशपांडे, श्री. प्रमोद सहस्रबुद्धे आणि श्री. दिवाकर मोहनी (जुलै ९४), श्री. मा. श्री. रिसबूड व श्री गोमेद (ऑगस्ट ९४) आणि ललिता गंडभीर (ऑक्टो.९४) यांनी प्रकट केलेले अभिप्राय वाचले. विशेषतः मनुविचाराच्या विरोधी असणार्याज ह्या तोफा नागपूर, ठाणे, बेळगाव, पुणे एवढेच नव्हे, तर सुदूर अमेरिकेतूनही गरजल्या. या चिकित्सक पत्रलेखकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे विवेकवादी म्हणवणाच्या मनुविरोधक मंडळीचा मनुस्मृतीचा अभ्यास आणि त्याचा स्तर एकत्र लेखी स्वरूपात उपलब्ध झाला आहे.
आश्चर्य या गोष्टीचे वाटते की ‘धारणाद्धर्म इत्याहुः’ या शीर्षकाने झालेली चर्चा संदर्भरहित आणि अयोग्य आहे या मुख्य मुझ्यासंबंधी कोणीही बोलत नाही. तसेच कोणीही ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति या वचनांचा संदर्भ मनूने राजधर्माच्या अंतर्गत न्यायालयीन व्यवस्था सांगत असतांना (व्यवहार प्रकरणात) स्त्रीपुरुषविषयक विवादाच्या (स्त्रीपुंधर्मप्रकरण) प्रकरणातील स्त्रियांच्या विषयी पुरुषांनी कोणते (विधि) नियम (कायदे) पाळावे या प्रकरणात आहे, या मूळ लेखाच्या मुख्य मुद्यांचा परामर्श घेत नाही. केवळ ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ आणि रक्षण की राखण या अन्योन्यसंबंद्ध विषयांच्या मांडणीमुळे काहींचा झालेला क्षोभ त्यांच्या लेखातून प्रकट झाला आहे.
संदर्भामुळे अर्थनिश्चिती
संदर्भाने अर्थ वेगळा होतो हे जर श्री मधुकर देशपांडे मान्य करतात तर ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति – स्त्रियेला आत्मरक्षणासाठी स्वातंत्र्याची म्हणजे स्वतःवर निर्भर राहण्याची पाळी येऊ देऊ नये अशा अर्थाला त्यांनी ‘तिरकसे म्हणणे पूर्वग्रहदूषित व अविचाराचे ठरेल. ‘पिता रक्षति कौमारे’ या श्लोकाच्या तीन चरणात रक्षण करावे असा जर उल्लेख आढळतो तर चौथ्या चरणातील विधान रक्षणाच्या संदर्भात आहे हे अमान्य करता येत नाही. यामुळे स्त्रियेला रक्षणाविषयी स्वातंत्र्य देऊ नये यापेक्षा दुसरा कोणताही अर्थकरणे चुकीचे होईल. पुढे मनूचा पिता-पति-पुत्रादींना हा आदेश असल्यामुळे रक्षणाचे स्वातंत्र्य देऊ नये याचा अर्थ रक्षणाची जबाबदारी तिच्यावर सोपवू नये यापेक्षा भिन्न करणे युक्तिसंगत होणार नाही. आपण युक्तिसंगत असेल तेच स्वीकारतो अशी तर पुरोगामी बुद्धिवाद्यांची घोषणा आहे.
श्री देशपांडे काहीसे क्षुब्ध झालेले असले तरी ते समंजस आहेत असे मी समजतो. त्यांनी मूळ लेखातील ‘मनुस्मृतीतील मागोवा’ (पृ.६०) हा परिच्छेद कृपया पुन्हा वाचावा. अत्यंत स्पष्ट शब्दांत त्यात मागील संदर्भ दिला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात या विषयावर लिहिणार्याछ एकानेही या संदर्भाची दखल घेतल्याचे ज्ञात नाही. या प्रमादाचे परिमार्जन त्या संदर्भाच्या विचारानेच होईल. केवळ नवव्या अध्यायातील दोन श्लोकांच्या आधाराने हा निष्कर्ष काढला गेला आहे हे त्यांचे विधान त्यामुळेच बरोबर नाही. इतरही आक्षेपकांची उत्तरे यात समाविष्ट आहेत.
श्री. देशपांडे, प्रा. सुनीती देव आणि श्री प्रमोद सहस्त्रबुद्धे यांची पत्रे बहुधा जून १९९४ च्या अंकातील तिसरा लेख वाचण्याच्या अगोदर लिहिलेली असावी असे दिसते. तिसर्याप लेखात नवव्या अध्यायातील काही इतर श्लोक आणि त्यासंबंधीचे स्पष्टीकरण त्यांना वाचावयास मिळाले असावे किंवा न वाचले असल्यास त्यांनी कृपया वाचावे. इतर उदाहरणांविषयी पुढे एकत्र विचार केला जात आहे.
सामाजिक सुरक्षा
प्रा. सुनीती देवांना मनूने सामाजिक सुरक्षेचे कवच कायदेशीर रीतीने स्त्रियांना दिले हे व्यवहार्य वाटत नाही. त्या लेखातल्या मूळ मुक्ष्यांना स्पर्श न करता लिहितात स्त्री आता सर्व क्षेत्रांत पुढे गेली. पितापतिपुत्राची तिला संरक्षणाचे भक्कम कवच बहाल करताना फार तारांबळ उडेल. पण हे सर्व मूळ आशय लक्षात न घेतल्यामुळे त्या लिहीत आहेत. मनू जेव्हा सामाजिक सुरक्षेविषयी बोलत असतो तेव्हा जेथे कायद्याच्या रक्षकांचे हात पोहोचत नाहीत अशा स्थळप्रसंगाविषयी बोलत असतो. पितापुत्रादींनी सर्वत्र पोलिसांचे काम करावे असे त्याचे म्हणणे नाही. प्रभुसत्ता आणि समाजसत्ता यांनी अशीच परिस्थिती निर्माण करावी की स्त्री ही सर्वत्र निर्भय विचरू शकेल, हे त्याला अपेक्षित आहे. मनूचे नियम पाळणार्या् राजसत्तेचा दरारा कसा असे या विषयीचा एक उल्लेख कालिदासाच्या काव्यातून आलेला आहे. रघुवंशात दिलीपाविषयी कवी वर्णितो – ‘तो राजा (दिलीप ) शासन करत असता कधी वारांगनाही विहारासाठी बाहेर पडून मार्गात क्वचित पेंगुळल्या तरी त्यांच्या अंगावरचा पदर ढळवण्याचे सामर्थ्य वार्यानला सुद्धा नव्हते तर मग त्यांच्या वस्त्राला हात लावण्याचे साहस इतर कोण करणार? (रघु. ६.७५)
यस्मिन् महीं शासति वाणिजीनां निद्रां विहारार्धपथे गतानाम् । ।
वातोऽपि नासँसयदंशुकानि को लम्बयेदाहरणाय हस्तम् ।। (रघु ६.७५
संरक्षण कल्पनेतील व्याघात
स्त्रीला पुरुषापासून संरक्षण हवे तर पुरुषाकडूनच संरक्षण मागणे यात व्याघात नाही का असा प्रा. सुनीती देवांचा प्रश्न आहे. पण स्त्रीला पुरुषापासून संरक्षण हा विचार पुरुषद्वेषी स्त्रीमुक्तिवाद्यांचा आहे. मनूचा नाही. तो स्त्री आणि पुरुष हे परस्पर पूरक मानतो. स्त्रीला संरक्षण हवे ते दुष्टांपासून. तिला छळणारी स्त्रीही असू शकते. तेव्हा स्त्रीला पुरुषापासून संरक्षण हवे तर पुरुषाकडूनच संरक्षण कसे मागावयाचे ही सुनीती देवांची व्याघाताची कल्पना स्वयंनिर्मित आहे. मूळ लेखाशी तिचा संबंध नाही.
मनुविरोधकांचे इच्छाचिंतन
सुनीती देवांच्या मते स्त्रीसंरक्षणाविषयीच्या आजच्या आक्रोशाचे कारण पुरुषाचा स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोण न बदलणे आणि स्त्रीचाही स्वतःकडे बघण्याचा देहनिष्ठ दृष्टिकोण न बदलणे हे आहे. आमची स्त्रीमुक्तिवादी पुरोगामी बुद्धिवादी मंडळी देहात्मवाद मानतात. देह हेच जर आत्म्याचे स्वरूप आहे, सर्वस्व आहे, तर इतरांचा सोडा, पण वरील मंडळीच्या विचारात तरी कधी परिवर्तन होण्याचा संभव आहे काय? मुंबईच्या गाडीत बसून कलकत्याला पोहोचण्याचे हे इच्छाचिंतन आहे.
मनूच्या विचारात त्याला मान्य असणार्याो आत्मविचारामुळे, विशिष्ट आचरणाच्या नियमनामुळे, त्याला अभिप्रेत असणार्याल सामाजिक अनुशासनामुळे सुधारणा संभाव्य वाटते.
स्त्रीसुरक्षेचे तुमचे उपाय सांगा
स्त्रियांना सामाजिक सुरक्षा असावी असे मनूचे म्हणणे मी मांडले आहे. त्यांना सुरक्षित ठेवणे हे संबंधितांचे कर्तव्य आहे. ते त्यांनी पार पाडले पाहिजे अशी मनूची विधिबद्ध व्यवस्था आहे. ही व्यवस्था चुकीची, अनावश्यक अथवा अव्यवहार्य आहे असे एखादा म्हणू शकतो. मग स्त्रीसुरक्षेचा आज अक्राळ विक्राळ बनलेला प्रश्न तुम्ही कसा सोडवू इच्छिता याचे व्यावहारिक उपाय आपण सांगा ना.
श्री मोहनींचे आक्षेप
मनुस्मृतीच्या स्वरूपाविषयी श्री. मोहनींनी केलेली चर्चा मूळ लेखातील विषयाच्या दृष्टीने अनुपकारक आहे. गेली दोन हजार वर्षे प्रस्तुत ग्रंथ विद्यमान स्वरूपात उपलब्ध आहे. तो ग्रंथ भृगुकुलोप्तन्न स्खलनशील ब्राह्मणांनी लिहिला असे जर श्री मोहनींचे संशोधन असेल तर मग मनूला शिव्या देण्याचे कारण श्री मोहनींनी सांगितलेले बरे!
मनुवचनांचा भिन्न भिन्न टीकाकार वेगळा अर्थ करतात तर कुल्लूकभट्टांचाच अर्थ आम्ही प्रमाण कां मानावा? आम्हाला पटेल तो अर्थ करू हे श्री मोहनींचे म्हणणे त्यांच्या आत्मविश्वासाचे सूचक आहे. पण त्यामुळे त्यांनी थोडे अभ्यासाकडेही लक्ष द्यावे. ज्यावचनासाठी (न स्त्री स्वातंत्र्यमर्हति) ही सर्व चर्चा चालू आहे त्याच्या संदर्भाविषयी आणि अर्थाविषयी कोणत्याही टीकाकाराचा मतभेद नाही. कुल्लूकभट्टाने मान्य केलेला संदर्भ आणि केलेले विवेचन यात काय चुकते हे दाखविल्याशिवाय ‘आम्ही मानत नाही असे म्हणणे अत्यंत असमंजसपणाचे ठरते सर्व आक्षेपकांच्या जवळ याविषयी कांहीही उत्तर नाही.
न भजेत् स्त्री स्वतन्त्रताम्
वस्तुतः ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ या वचनाचा मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायातील श्री मोहनींच्या मते स्त्रीला पुरुषाच्या तुलनेत हीन लेखणाया, स्त्रीधर्म सांगणाच्या १४६ ते १६६ श्लोकांशी विषयदृष्ट्या काहीही संबंध नाही. चर्चाविषय असणारे वचन पुरुषांचे स्त्रीप्रत कायदेशीर कर्तव्य सांगते, तर पाचव्या अध्यायातील पूर्वोक्त श्लोक स्त्री कशी वागली म्हणजे आदर्श समजली जाईल याचे निरूपण करतात. त्यामुळे मूळ लेखमर्यादेत विषयभिन्नतेमुळे त्यांची चर्चा असंबद्ध आणि अनावश्यक आहे. पण मनुस्मृतीत स्त्रीविषयीची तुच्छता आणि पुरुषवर्चस्व हेच आढळते हे मनात ठसवून घेतलेल्या मनूच्या मित्रांना पाचव्या अध्यायातील ‘न स्वातन्त्र्येण कर्तव्यं किंचित् कार्यं गृहेष्वपि (मनु.५.१४७) ‘न भजेत् स्त्री स्वतन्त्रताम् (मनु.५.१४८) हे अंश असणारे श्लोक दिसल्याबरोबर आपल्याला नवा आधार सापडला असा आनंद होणे स्वाभाविक आहे. श्री देशपांडे यांनीही या श्लोकांचा उल्लेख केला आहे. हा भाग झाकून ठेवण्यात आला असा श्री मोहनींचा आक्षेपही आहे.
मनुस्मृतीतला संदर्भ
तेव्हा मनुस्मृतीतला संदर्भ तपासूनच त्याचे स्वरूप पाहू या. मनू पाचव्या अध्यायातील १४६ ते १६६ या श्लोकात स्त्रीधर्म – म्हणजे स्त्रीने कसे वागावे हे सांगत आहे. स्त्रीचे स्वतःचे असे क्षेत्र आहे; पुरुषाने ते तिच्याकडे सोपवले पाहिजे असा कायद्याच्या स्वरूपाचा आदेश पुढे मनूने व्यवहारप्रकरणात नमूद केला आहे. ‘धनाची बचत, धनाचा व्यय, स्वच्छता, धर्माचरण, पाकसिद्धी, आणि उपस्कराचे (घरांतील विविध उपकरणांचे. परिरक्षण (देखभाल) हे स्त्रीचे क्षेत्र होय. (मनू. ९-११) श्री मधुकरराव देशपांडे हाच श्लोक अपूर्ण अर्थ लिहून स्त्रियांना मनूने द्वेषबुद्धीने वागविल्याचा पुरावा म्हणून उल्लेखितात! (पृ.११८) मूळ श्लोक असा आहे –
अर्थस्य संग्रहे चैनां व्यये चैव नियोजयेत् ।।
शौचे धर्मेऽन्नपक्त्यां च परिणाह्यस्य वेक्षणे।। (मनु . ९.११)
यावर पाचव्या अध्यायात हे नवव्या अध्यायातील श्लोक कशाला असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. संपूर्ण ग्रंथ अंतिम आशयाच्या अनुरोधाने एक महावाक्य असते. वाक्यमीमांसा शास्त्राच्या नियमाने एका विषयाशी संबंधित जेवढी विधाने पूर्ण ग्रंथात आली असतील त्यांतील परस्पर विरोध टाळून समन्वय करणे तात्पर्य निश्चयासाठी आवश्यक असते. आजही न्यायालयात कायद्याचा अर्थ लावत असतांना वाक्यमीमांसा शास्त्राचा असा उपयोग अपरिहार्य मानला जातो. त्या शास्त्राच्या नियमाने विशिष्ट कामे तिचे अधिकारक्षेत्रात येतात असे म्हणणे आणि तिने लहानसेही काम स्वतंत्रपणे करू नये असे विधान करणे याचा अर्थ होईल – आपले क्षेत्र सोडून इतर कोणतेही काम स्त्रीने पतिपुत्रादींच्या सहमतीनेच करावे, अनिर्बधपणे वागू नये. स्त्री हठखोरपणाने एकेरीवर येऊन वागू लागली तर सर्व गृहसौख्य नाहीसे करू शकेल. तेव्हा स्त्री ही लहान, तरुण वा वृद्ध कशीही असो तिने स्वैरपणे वागू नये असा मनूचा उपदेश आहे. स्वक्षेत्राव्यतिरिक्त तिने बाल्यकाळी पित्याच्या, तारुण्यात पतीच्या, पतीच्या मृत्यूनंतर पुत्राच्या सहमतीने कार्य करावे. अनिर्बधपणा नसावा. (मनु.५.१४७.१४८) मनूचा आशय सांगणार्याा कुल्लूकभट्टाच्या ‘भर्नाद्यननुमतं न स्वातन्त्र्येण कर्तव्यम्’ या वाक्यांशाचा किंवा…… ‘आयत्ता स्यात्, कदाचिन्न स्वतन्त्रा भवेत् या वाक्यांशाचा आशय स्वैर स्त्रीहट्टाचा अथवा स्वैर स्त्रीवर्तनाचा निषेध करणे आहे असे म्हणणे अधिक युक्तिसंगत आहे. त्यानंतरचे सर्व श्लोक एक कुटुंब सुखी समृद्ध व प्रतिष्ठित बनवण्यासाठी स्त्रीला कोणता त्याग करावा लागेल आणि कोणते धोरण सांभाळावे लागेल याचे उदात्त व मनोज्ञ चित्रण करतात. बदफैली आणि दारूबाज अशा नवव्यामुळे बिघडलेले इतर स्त्रियांचे संसार मार्गी लावणे हे कार्य जर सामाजिक हिताचे आज जाणते स्त्रीपुरुष मानतात, तर तसाच प्रयत्न स्वतःचा तशा कारणांनी उधळलेला संसार ताळ्यावर आणण्यासाठी स्त्रीने सर्व शक्ती पणास लावून करावा असे मनूचे सांगणे स्त्रीद्वेषाचे आहे असे त्यांना म्हणता येणार नाही. पूर्वोक्त १४६ ते १६६ हे श्लोक यापेक्षा काहीही अधिक सांगत नाहीत.
थोडे हेही वाचा
स्त्रीद्वेष आणि पुरुषी वर्चस्वच मनुस्मृतीत आहे असे म्हणणारे मनुविरोधक पुरुषांसाठी काय बंधने आहेत. त्यांना तर खुली छूट आहे असे नेहमी उथळपणे बोलत असतात. त्यांनी स्त्रीपुंधर्म प्रकरणातला मनूने दोघांनाही पाळावयास सांगितलेला कायदा पाहावा. स्त्रीपुरुषविषयक कायद्यांचे हे प्रकरण संपवताना धर्मसंमत जीवनमार्ग हे सूत्र धरून केलेल्या आदेशांचा उपसंहार करताना मनू सांगतो- ‘स्त्री आणि पुरुष यांनी मृत्यूपर्यंत जीवनभर परस्परांशी अव्यभिचरित रीतीने पूर्ण इमानदारीने (धर्मे च अर्थे च कामे च नातिचरामि – या शपथेनुसार) वागणे हाच संक्षेपाने स्त्रीपुरुषांचा श्रेष्ठ धर्म होय. शब्द असेआहेतः
अन्योन्यस्याव्यभीचारो भवेदामरणान्तिकः ।
एष धर्म : समासेन ज्ञेयः स्त्रीपुंसयोः परः ।। (मनु ९.१०१)
पुढे तो आणखी निःसंदिग्धपणे आदेश देतो की, यास्तव विवाहित स्त्रीपुरुषांनी नेहमीप्रयत्नपूर्वक धर्म, अर्थ आणि काम या तीनही पुरुषार्थाच्या साधनेत एकमेकांची फसवणूक होईल असे वागता कामा नये.
तथा नित्यं यतेयातां स्त्रीपुंसौ तु कृतक्रियौ।
यथा नाभिचरेतां तौ वियुक्तावितरे तरम् ।। (मनु. ९.१०२)
स्त्रीपुरुष विषयक कर्तव्यपालन इतक्या खणखणीतपणे उभयतांना बजावणारा मनू ‘पुरुषांना सगळ्या सवलती आणि स्त्रियांना मात्र नको तेवढी जाचक बंधने सांगणारा आहे असे जेव्हा आक्षेपक म्हणतात तेव्हा त्यांनी मनुस्मृतीचे अध्ययन केले आहे असे म्हणवत नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.