पुरुषी वर्चस्वाचे दुष्परिणाम

पुरुषी वर्चस्वाचे काही अनिष्ट परिणाम झाले आहेत. मानवी संबंधांपैकी जो अत्यंत जिव्हाळ्याचा – म्हणजे विवाहाचा – त्याला दोन समान भागीदारांतील संबंधाऐवजी स्वामी आणि दास या संबंधाचे रूप त्यामुळे प्राप्त झाले. स्त्रीला आपली पत्नी म्हणून प्राप्त करण्यासाठी तिला सुखविण्याची गरज वाटेनाशी झाली, आणि त्यामुळे प्रियाराधनेचे क्षेत्र विवाहबाह्य संबंध असे ठरले. कुलीन स्त्रियांवर लादल्या गेलेल्या चार भिंतींमधील जीवनामुळे त्यांची बुद्धी आणि मनोहारित्व नाहीसे झाले; आणि मनोहारित्व, साहस हे गुण बहिष्कृत स्त्रियांपुरते सीमित झाले. विवाहसंबंधात समानता नसल्यामुळे पुरुषाची हुकूम गाजविण्याची वृत्ती पक्की झाली. ही स्थिती आता नागरित (civilised) देशांमध्ये बर्‍याच प्रमाणात संपली आहे, परंतु बदललेल्या परिस्थित्यनुरूप आपले आचरण बदलायला खूप कालावधी लागेल. मुक्तीचे नेहमीच काही वाईट परिणाम होतात. तिच्यामुळे पूर्वीचे श्रेष्ठ नाराज असतात, आणि पूर्वीचे कनिष्ठ आक्रमक होतात. परंतु काळ याही बाबतीत तडजोड घडवून आणील अशी आशा आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.