संपादकीय

हा सहाव्या वर्षाचा पहिला अंक. मार्च ९५ चा अंक प्रकाशित झाला तेव्हा आजच्या सुधारकने पाच वर्षांची वाटचाल पुरी केली होती, आणि या अंकाबरोबर तो सहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. गतेतिहासाकडे मागे वळून पाहिले तर पाच वर्षे संपली हे सांगूनही खरे वाटत नाही. दर महिन्याचा अंक प्रकाशित करण्याच्या धामधुमीत काळाचे भानही नाहीसे होत होते. या काळात अनेक अडचणी आल्या, नाहीत असे नाही; पण त्या आपोआप सुटत गेल्या. जुने वर्गणीदार बरेचसे दरवर्षी गळत गेले, पण नवेही मिळत गेले आणि जरी स्वावलंबी होण्याकरिता अवश्य असलेले साडेसातशे वर्गणीदारांचे लक्ष्य आम्ही गाठू शकलो नाही, तरी कूर्मगतीने का होईना आम्ही त्याच्याजवळ जात राहिलो. गेल्या एकदोन वर्षांत बरेच नवीन लेखक मिळाले आणि त्यांचे विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित करता आले. आज आत्मविश्वासाने पुढील मार्ग आक्रमण्यास आम्ही सुरवात करीत आहोत.
येत्या वर्षात करावयाच्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे आगरकर निर्वाण शताब्दी अंकाचे प्रकाशन. १७ जून १८९५ या दिवशी आगरकरांचे निधन झाले. त्या घटनेला शंभर वर्षे पुरी होत आहेत. या निमित्ताने विशेषांक प्रकाशित करून त्या थोर महात्म्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. विविध विषयांवरचे अनेक विशेषांक प्रकाशित करण्याचा आम्ही जाहीर केलेला संकल्प अजून प्रत्यक्षात आलेला नाही, पण या आगरकर विशेषांकाने त्याच्या पूर्तीचा आरंभ होईल अशी आशा आहे. या अंकात आगरकरांच्या निधनानंतरच्या शंभर वर्षांत महाराष्ट्रात सुधारणेची वाटचाल कशी आणि किती झाली,आणि अजून किती बाकी आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.
वाचकांना एक अप्रिय बातमी सांगायची आहे – मासिकाची वर्गणी वाढविण्याविषयी. कागदाचे भाव गेल्या काही वर्षांत दीडपटीपेक्षा जास्त वाढले आहेत
आणि अन्यही खर्चात वाढ झाली आहे. आधीच करीत असलेल्या पदरमोडीत भर पडली आहे. त्यामुळे मासिकाच्या किंमतीत वाढ करण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही. या अपरिहार्य वर्गणीवाढीला आमचे वाचक आनंदाने संमती देतील अशी आम्हाला खात्री आहे. नवीन वर्गणीचे दर असे आहेत व्यक्तींसाठी वार्षिक वर्गणी रु. ५०/-. आजीव वर्गणी रु. ५००/-. संस्थांसाठी वा. व. रु. ७०/-. किरकोळ अंकास रु. ५/-. वाचकांनी आतापर्यंत जसे सहकार्य दिले तसे ते पुढेही देतील अशी आशा आहे.
एक विनंती लेखकांना. आजचा सुधारकमधील लिखाण एकसुरी असते अशी तक्रार पहिल्या वर्षापासून केली गेली आहे. एका विशिष्ट विचारसरणीला वाहिलेल्या मासिकात हे काही प्रमाणात अपरिहार्य आहे. परंतु तरीही त्या चौकटीत अनेक प्रकारचे लिखाण येऊ शकते हे गेल्या वर्षातील श्री. नंदा खरे, डॉ. पु. वि. खांडेकर, डॉ. र. वि. पंडित इत्यांदींच्यालेखांनी दाखवून दिले आहे. आमची अडचण चांगले साहित्य मिळत नाही ही आहे. म्हणून लेखकांनी विविध प्रकारचे लेखनसाह्य करावे अशी विनंती आम्ही येथे करीत आहोत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *