बंडखोर पंडिता (भाग २)

एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा असे रमाबाईंचे जीवनचरित्र आहे. कलकत्याहून रमाबाई पुण्याला आल्या खर्या , पण मध्यन्तरी अशा काही घटना घडल्या की कदाचित् त्या कधीच पुण्याला आल्या नसत्या. कारण त्यांनी लग्न करून आसामात सिल्चर येथे संसार थाटला होता. हे लग्नही जगावेगळे होते. त्यांचा भाऊ श्रीनिवास याचे एक बंगाली मित्र बिपिनबिहारी दास मेधावी यांनी त्यांना मागणी घातली होती. भावाच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्या एकाकी झाल्या होत्या. त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. बिपिनबाबू ब्राह्मोसमाजी होते. पण बंगाल-आसामकडच्या रिवाजाप्रमाणे ते शूद्रच गणले जात. तिकडे ब्राह्मणआणि शूद्र असे दोनच वर्ण मानत. ब्राह्मणेतर तो शूद्र हा प्रकार आपल्याकडे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात आजही आढळतो असे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. हा विवाह नोंदणी पद्धतीने झाला. संसारसुख म्हणतात ते रमाबाईंनी पुढील १६ महिने काय ते अनुभवले, कारण एप्रिल १८८१ मध्ये कन्या मनोरमा हिच्या जन्मानंतर एकाच महिन्याने बाबू मेधावी प्लेगला बळी पडले. मेधावींचा हा आंतरप्रांतीय, प्रतिलोम विवाह त्यांच्या स्वजनांना संमत नव्हताच. पुन्हा रमाबाई एकाकी पडल्या.
कलकत्त्याच्या वास्तव्यात रमाबाईंच्या एक गोष्ट लक्षात आली. इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले. इंग्रजीने बंगाल-आसाम प्रांतात आचार विचारात केलेली क्रान्ती त्यांनी पाहिली. इंग्रजीमुळे भारताबाहेरच्या प्रबुद्ध जगाशी संबंध कसा जोडला जातो हेही त्यांच्या लक्षात आले होते. त्यांनी इंग्रजी आत्मसात करायचे ठरवले. त्यासाठी त्या मद्रासला गेल्या. पण तेथे त्यांचा जम बसला नाही.
तेवढ्यात महाराष्ट्रातील धुरीण लोकहितवादी, न्या. मू. रानडे, भांडारकर, तेलंग, चंदावरकर यांच्याकडून त्यांना आग्रहाचे आमंत्रण आले. त्याचा मान राखून मे १८८२ मध्ये त्या पुण्यास आल्या. इंग्लंडला जायला निघण्यापूर्वी सुमारे वर्षभर त्या पुण्यात होत्या. ह्या एका वर्षात त्यांनी इंग्रजीशी चांगलीच ओळख वाढविली. नुकत्याच स्थापन झालेल्या आर्य महिला समाजाचे काम वाढवले. नगर- सोलापूर, ठाणे-मुंबई अशा ठिकाणी दौरे केले, शाखा उघडल्या, व्याख्याने दिली. उच्चवर्णीय विधवांची परवशता हा त्यांना व्यथित करणारा विषय होता.
** १. प्रबोधनकार ठाकरे : पंडिता रमाबाई सरस्वती, पृ. २५, प्रथम आवृती १९५०
‘स्त्रीधर्मनीति’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी आपली ही व्यथा बोलून दाखविली आहे. त्याआधी स्त्रियांना नैतिक शिक्षण देवळातल्या पुराणिकाकडूनच काय ते मिळत असे. रमाबाईंनी पारंपारिक चौकटीच्या मर्यादेत पण डोळस मार्गदर्शन त्यांना केले. स्त्री ही पुरुषाची परम मित्र असते हे खरे, पण खुशामत करणे हे मित्राचे काम नाही असे त्या बजावतात. ‘सुखाचे मुख्य स्वरूप जे स्वावलंबन ते सांप्रत अगदी नाही याची आठवण त्या स्त्रीसमाजाला करून देतात. गृहकृत्य हेच स्त्रियांचे काम, पति-पत्नीचा स्वार्थ परस्परांच्या साहाय्यावाचून सिद्धीस न जावा असा संबंध पति-पत्नीत (निसर्गाने) ठेवला आहे- अशी शिकवण त्यावेळच्या त्यांच्या व्याख्यान-प्रवचनांत आणि पुस्तकात आहे.
उच्चवर्गातील निराधार विधवा स्त्रियांना आश्रय देण्यासाठी एखादा आश्रम उभारावा असे तेव्हापासून त्यांच्या मनात होते. पण त्यांच्यापाशी त्या कामासाठी पैसा नव्हता. पुरेशी शैक्षणिक पात्रता नव्हती. पुण्याला मिसेस सोराबजी नामक एक पारशी मैत्रीण त्यांना लाभली होती. त्यांचे म्हणणे होते की रमाबाई इंग्लंडला जातील तर त्यांना ह्या दोन्ही गोष्टी लाभतील. रमाबाईंना वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. भारतात फक्त मद्रास येथे स्त्रियांसाठी या शिक्षणाची सोय होती. त्यासाठी आधीमॅट्रिक होणे जरूर होते. शिवाय मद्रास येथील शिक्षणही अपुरे होते. इंग्लंडला जायला मिळाले तर इंग्रजी भाषा, मॅट्रिक्युलेशनची परीक्षा आणि पुढे वैद्यकीय शिक्षण ह्या गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी इंग्लंडला जाण्याचा धाडसी विचार पक्का केला.
मात्र रमाबाई इंग्लंडला गेल्या की ख्रिस्ती झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी भीती त्यांच्या चाहत्यांना पडली. तिला उद्देशून त्या सभांत आणि खाजगीतही म्हणत, ‘मीही प्रतिज्ञेवर सांगते की मी ख्रिस्तीधर्म स्वीकारणार नाही. लोकांना भीती वाटली ती अगदी निराधार नव्हती. कारण रमाबाईंची ख्रिस्ती धर्माशी जवळीक त्यांना दिसत होती. रमाबाईंच्या इंग्लिश शिक्षिका मिस् हरफर्ड या पंचहौद मिशनशी संबद्ध होत्या. त्यांची अट होती की रमाबाई बायबल वाचायला तयार असतील तरच आपण इंग्रजी शिकवू. रमाबाईंना आधीच बायबलमधील नवा करार आवडू लागला होता. सिल्चर येथे त्यांच्या पतीचे एक मिशनरी मित्र मि. अॅलन त्यांच्याकडे येत असत. त्याच सुमारास बाईंची श्रद्धा हिंदुधर्मावरून उडू लागली होती. मि. अॅलन नव्या करारातील गोष्टी सांगत त्यांनी रमाबाई चांगल्याच प्रभावित झाल्या होत्या. या नवीन धर्मात पूर्ण समाधान प्राप्त होत असल्यास मी ख्रिस्ती होण्यास तयार असल्याचे जाहीर केले हे बिपिनबाबूंना आवडले नाही. आपण मि.अॅलनला घरी येण्यास बंदी घालू असे ते म्हणाले. हा प्रसंग सांगून रमाबाई म्हणतात, ‘ते आणखी जगले असते तर काय झाले असते ते मला सांगता येत नाही.’
**२. सरोजिनी वैद्य – काशीबाई कानिटकर – चरित्र व आत्मचरित्र पृ. ९१
**३. पंडिता रमाबाई – माझी साक्ष पृ. २२
याशिवाय नीळकंठशास्त्री गोरे हे संस्कृतविद्याविभूषित पंडित ख्रिस्ती झाले होते. त्यांचेही रमाबाईंकडे जाणे येणे असे. ते मूळ शैव, मध्वभक्तिमार्ग पटला म्हणून रमाबाईंच्या वडिलांप्रमाणे वैष्णव झाले होते. हे रे, फादर गोरे आणि पुढे इंग्लंडला गेल्यावर वाँटेज मठातील सिस्टर जिराल्डीन या दोघांनी खरे आपल्याला ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेण्यास उद्युक्त केले असे रमाबाई कृतज्ञतापूर्वक म्हणत.
हिंदुधर्माबद्दल त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला होता. कलकत्त्याला धर्मशास्त्रांचे अध्ययन सुरू केल्यावर त्यांच्या लक्षात आले की आपले धर्मग्रंथ विसंगतींनी भरले आहेत. एका ग्रंथात जे वंदनीय म्हटले ते दुसर्याात निंद्य ठरवले आहे. जवळ जवळ प्रत्येक बाबतीत परस्परविरुद्ध भूमिका स्वीकारल्या आहेत. मात्र एका बाबतीत सर्व धर्ममतांचे पूर्ण ऐक्य
आहे. ती बाब म्हणजे स्त्री! तिच्या बाबतीत दोन गोष्टी सर्व धर्मग्रंथ एकमुखाने सांगत. एक म्हणजे स्त्री एकजात वाईट. अगदी भूतपिशाच्चापेक्षाही वाईट. ती थेट मोक्षाला अनधिकारी आहे. आणि दुसरी ही की, पती हाच तिचा देव, मग तो कितीही दुष्ट, पापी, व्यसनी वा व्याधिग्रस्त असो. त्याची सेवा हाच तिचा धर्म. तिचे कर्मभोग, जन्ममरणाचे फेरे यातून सुटण्याचा तिला पतिसेवा हा एकच मार्ग.
रमाबाई म्हणतात, “या धर्मग्रंथांतून जे मिळाले त्यापेक्षा अधिक काही तरी मलाहवे होते.
रमाबाईंनी या पुणे-वास्तव्यात आणखी एक कामगिरी केली. तिचे इतके दूरगामी परिणाम झाले की, स्त्रियांसाठी स्वतंत्र फीमेल हायस्कुले आणि स्वतंत्र दवाखाने काढण्याची आवश्यकता सरकारला पटली.
त्या सुमारास प्रसिद्ध हंटरकमिशन शिक्षणाची चौकशी करण्याकरिता हिंदुस्थानात आलेले होते. त्यापुढे साक्ष देण्याची संधी रमाबाईंना मिळाली. साक्षीला हजर होण्यापूर्वी १८८१ चा खानेसुमारीचा अहवाल बाईंनी नीट अभ्यासला होता. त्यावेळी २९ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात विधवा होत्या २ कोटी ३० लक्ष. त्यातील ५ ते ९ या वयोगटातल्या ५१ हजार ८७५ आणि ४ वर्षांखालच्या होत्या १० हजार.
हंटरकमिशनने आपण कोणत्या नात्याने भारतातील शिक्षणपद्धतीवर मतप्रदर्शन करीत आहात अशा अर्थाचा जो प्रश्न केला त्यावर रमाबाईंचे उत्तर त्यांच्या जीवितकार्याचेमर्म उकलून दाखवणारे आहे. त्यांनी थोडक्यात आपल्या मातापितरांची हकीकत सांगितली आणि त्या म्हणाल्या, ‘ज्या गृहस्थाला आपल्या स्त्रीशिक्षणविषयक मतांमुळे पुष्कळ छळ सोसावा लागला व ज्याला आपल्या मतांच्या पुरस्कारार्थ वादविवाद करावे लागले व आपली मते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रत्यक्षात आणून दाखवावी लागली त्या गृहस्थाची मी मुलगी आहे. मला माझ्या आयुष्यभर ह्या कार्यासाठी झगडणे हे आपले कर्तव्य वाटत आहे व ह्या देशाच्या स्त्रियांची परिस्थिती लोकांपुढे मांडणे हे मी आपले कर्तव्य समजते.’
** ४. तत्रैव पृ. २३
** ५. अनृतं, साहस, माया, मूर्खत्वं, अतिलोभता । अशौचत्वं, निर्दयत्वं स्त्रीणां दोषाः स्वभावजाः ।।
** ६. माझी साक्ष पृ. २० ७. दे. ना. टिळक : महाराष्ट्राची तेजस्विनी – पंडिता रमाबाई पृ. १११
मुलींच्या शिक्षणासाठी स्त्रीशिक्षिका असाव्या. मुलींना मातृभाषेप्रमाणेच इंग्रजीचे ज्ञान द्यावे. त्यांच्यासाठी वसतिगृहे असावी. मुलींच्या शाळा-तपासनीस स्त्रिया असाव्यात. त्या सहृदयतेने स्त्रीशिक्षकांच्या अडचणी समजू शकतील. स्त्री-डॉक्टरांनी तपासले तरच आमच्या रुग्ण स्त्रिया आपल्या रोगांसंबंधी बोलतील. एखाद्या पुरुषास काही सांगत बसण्यापेक्षा त्या जीव देणे पत्करतील. याप्रमाणे बालमृत्यू, स्त्रियांचे मृत्यू यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याची व्यवस्था व्हावी. इ. इ. रमाबाईंच्या या अभ्यासपूर्ण आणि धीट साक्षीने हंटरसाहेब प्रभावित झाले. परत गेल्यावर त्यांनी रमाबाईंच्या कामगिरीवर एक व्याख्यान दिले. त्याचा वृत्तांत वाचनात येऊन व्हिक्टोरिया राणीने भारतीय स्त्रियांच्या वैद्यकीय शिक्षणास चालना दिली. स्त्री डॉक्टर, स्त्रियांसाठी दवाखाने यांचा भारतात उदय झाला. पुढे लॉर्ड डफरिन व्हाइसरॉय म्हणून आले तेव्हा त्यांच्या पत्नीने राणीच्या उत्तेजनाने जागोजागी स्त्रियांसाठी डफरिन दवाखाने सुरू केले.
रमाबाई एप्रिल १८८३ मध्ये मिस् हरफर्डबरोबर इंग्लंडला गेल्या. तेथे ऑक्सफोर्ड जवळ वाँटेज नावाच्या लहान शहरातील जोगिणींच्या मठात त्यांची व्यवस्था झाली. सिस्टर जिराल्डीन ह्या त्यांच्या धर्ममाता बनल्या. त्या मठातून महाराष्ट्रातील त्यांच्या संस्थांमध्ये सेवाकार्यासाठी येऊ इच्छिणाच्या जोगिणींना मराठी शिकावे लागे. पंडिता रमाबाईंनी तेथे वर्षभर मराठी शिकविण्याचे हे काम करून तेथील निवासाचा खर्च भागविला. रमाबाईंनी अल्पावधीत इंग्रजीत प्रावीण्य मिळविले. परंतु कर्णबधिरतेमुळे त्यांना सायन्सविषयांची तयारी आणि त्या विषयावर अवलंबित वैद्यकीय शिक्षण याचा नाद सोडावा लागला. मात्र आपल्या श्रवणदोषावर मात करून त्यांनी इंग्रजी शब्दोच्चार, स्वराघात या गोष्टी चांगल्याच आत्मसात केल्या. रमाबाई सायन्स विषय शिकण्यासाठी जवळच चेल्टनहॅम येथील स्त्रियांच्या कॉलेजमध्ये दाखल झाल्या होत्या. तेथे त्यांना संस्कृत विषय शिकविण्याचे काम मिळाले. तेथील प्रिन्सिपल मिस् बील या बाईंनी त्यांना फार आपुलकीने वागवले. वॉण्टेज आश्रमात असता तेथील भगिनींबरोबर त्या एकदा पतित स्त्रियांच्यासाठी चालविल्या जाणार्याम फुल्हॅम येथील सुधारगृहाला भेट देण्यास गेल्या. तेथील काम पाहूनबाई अगदी गतसंदेह झाल्या. पतितांचा आणि अबलांचा खरा कैवार ख्रिस्ताने घेतला आहे, याची त्यांना खात्री पटली. त्या म्हणतात, ‘आयुष्यात प्रथमच मला आपणही हिंदुस्थानातील पतित स्त्रियांसाठी काहीतरी करावे असे वाटू लागले आणि माझी खात्री झाली की जगातील सर्वच दडपलेल्या स्त्रियांचा उद्धार ख्रिस्तच करू शकेल. हिंदुधर्म पतित स्त्रियांबाबत कोणताच दयेचा व्यवहार करत नाही.
रमाबाईंनी आपली कन्या मनोरमा हिच्यासह १८८३ मध्ये सप्टेंबर २९ तारखेस वॉण्टेज येथे बाप्तिस्मा घेतला. या घटनेसंबंधी बाईंचे विख्यात चरित्रकार देवदत्त नारायण टिळक म्हणतात, त्यांनी हिंदुधर्माचा त्याग केला असला तरी हिंदुत्वाचा कधीच केला नव्हता. तो त्यांनी शेवटपर्यंत केला नाही. पुढे हे दिसून येतेच. अर्थात् हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व हे आपल्याला अभिप्रेत आहे असा खुलासा त्यांनी केला आहे.
इंग्लंडमध्ये जाताना रमाबाईंना डॉक्टर व्हायचे होते, आणि अमेरिकेत जायचे त्यांच्या मनातही नव्हते. पण त्यांना डॉक्टर होता आले नाही आणि अमेरिकेत जावे लागले. आणि तेथेच त्यांना आपला जीवितहेतू सफल करण्याचे सामर्थ्य मिळाले. त्याचे असे झाले की रमाबाई इंग्लंडला जायला निघाल्या त्याचवेळी (एप्रिल १८९३) आनंदीबाई जोशी वयाच्या १८ व्या वर्षी अमेरिकेला जायला निघाल्या होत्या. त्यांनाही डॉक्टर व्हायचे होते. वयाच्या १० व्या वर्षी चाळिशी उलटलेल्या गोपाळराव जोशी या बिजवराशी त्यांचे लग्न झाले होते. स्त्रीशिक्षणाचा ध्यास घेतलेल्या गोपाळरावांनी लग्नानंतर ८ वर्षांत आनंदीबाईंना एकटीने – अक्षरशः एकटीने – ५२ दिवस प्रवास करून फिलाडेल्फिया येथील कॉलेजात वैद्यकीय शिक्षण घेण्यास सज्ज करून पाठविले होते. आनंदीबाईच्या रमाबाई दूरच्या आप्त. त्यांनी आपल्या कॉलेजच्या डीन चेल बाँडले यांच्याजवळ रमाबाईबद्दल जे काही सांगितले होते त्यामुळे आनंदीबाईंच्या पदवीदान समारंभासाठी तरी रमाबाईंनी अमेरिकेला यावे असे त्यांना वाटे. जवळ जवळ वर्षभर पत्रव्यवहार करून त्यांनी रमाबाईंचे मन वळविले. त्यांच्या प्रवासखर्चाची तरतूद केली आणि अशा रीतीने रमाबाई अमेरिकेला पोचल्या त्या मार्च १८८६ मध्ये. डॉ. बॉडले यांचा जेवढा आग्रह, तेवढा त्यांच्या इंग्लिश हितचिंतकांचा त्यांच्या अमेरिकायात्रेला विरोध होता. तेथील वातावरण धर्मदृष्ट्या अधिक शिथिल आहे, त्याचा रमाबाईवर वाईट प्रभाव पडेल असे मिशनला वाटे. मुंबईच्या बिशपनी देखील या भेटीला विरोध दर्शवला होता. इतकेच काय, इंग्लंडमधल्या एका सधन सद्गृहस्थांनी त्या अमेरिकेला न जातील तर त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च आपण करू अशी लालूच त्यांना दाखविली होती.
** ८. माझी साक्ष पृ. ३१ (मृणालिनी जोगळेकर कृत पंडिता रमाबाईचरित्रात उद्भूत. ही पृष्ठसंख्या पहिल्या आवृत्तीतील असावी.)९. दे. ना. टिळक : पंडिता रमाबाई पृ. १२९
पण रमाबाई आपल्या स्वातंत्र्याच्या मोबदल्यात कोणतीच तडजोड करायला राजी नव्हत्या. त्यांचे एक पत्र यादृष्टीने फार बोलके आहे. त्या म्हणतात, ‘मी इथून जायचा व पुन्हा इथे न परतण्याचा निर्णय खूप विचारांती घेतला आहे. हा निर्णय मला अतिशय, वेदनाकारक आहे…. मी माझा देश सोडून इतक्या आपत्तींना तोंड देत इथे आले, ते एक ध्येय उराशी धरून. ईश्वरेच्छेनुसार मला एक मार्ग सोडून नवा मार्ग घ्यावा लागला. (बहिरेपणामुळे डॉक्टर होता आले नाही.) पण त्याचे दुःख नाही. माझ्या देशभगिनींची मला सेवा करता येणार असली तर तो मार्ग कोणता हे महत्त्वाचे नाही. काही लोक ह्याला ambition म्हणतात. कदाचित ते खरेही असेल… पण ज्या गोष्टीला मी भयंकर भिते, जी मला अपमानास्पद वाटते अशी गोष्ट माझ्या कानावर आली, ती म्हणजे काही सिस्टर्सना आपल्या इच्छेविरुद्ध मला इथे ठेवून घ्यावे लागत आहे. ही कल्पना मात्र मी एक क्षणभरही सहन करू शकणार नाही. त्यापेक्षा माझ्या देशात, माझ्या लोकात अर्धपोटी काम करण्यात मी धन्यता मानीन. मी व माझी मुलगी यांचे भरणपोषण मी कसेही करीन, पण इथे अशा क्लेशकारक विचारांच्या छायेत पळभरही सुखासीन आयुष्य स्वीकारू शकणार नाही. १०
पंडिता रमाबाईंनी इंग्लंडमधील या वास्तव्यात आपली चिकित्सक बुद्धि सोडलेली नव्हती. ‘I cannot do a single thing without knowing why I am to do it’ हा त्यांचा बाणा होता. त्यामुळे सनातनी-पंथीयांचे व त्यांचे संघर्ष होत. उदाहरणार्थ चेल्टनहॅम कॉलेजात त्या एका तरुण पुरुषाला संस्कृत शिकवीत हा वॉण्टेज मठातल्या जोगिणींना अधर्म वाटे. रमाबाईंनी त्यांच्या विरोधाला भीक घातली नाही. प्रिन्सिपल मिस् बोलने रमाबाईंचीच बाजू घेतली. ख्रिस्ती धर्मपरंपरेतल्या प्रभुभोजनातल्या मद्यपानाला त्यांचा आक्षेप होता. त्या स्वतः या प्रसंगी मनुकांचे पाणी पीत. गळ्यात किंवा चर्चवर क्रॉस मिरवणे त्यांना पटत नव्हते. आणि त्यावर लॅटिन अक्षरे कशाला?लिहायचीच तर भारतीय ख़िस्त्यांनी देवनागरीतली अक्षरे लिहावीत असे त्यांचे म्हणणे. त्यांना आमरण कांदा-लसूण वर्म्य असे. पुढे केडगावी मुक्ति आश्रमात सर्वांची जेवणे ताट-पाटावर असत. या व अशा अनेक अर्थानी त्या हिंदू ख्रिस्ती होत्या.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.