चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?

फेब्रुवारी १९९५ अंकामध्ये माझ्या लेखमालेचा पाचवा भाग प्रकाशित झाल्यानंतर मला जी पत्रे आली ती पुढे दिली आहेत. बहुतेक सार्‍या पत्रलेखकांनी सध्याच्या स्त्रीपुरुषसंबंधविषयक संकल्पनांमुळे मुख्यतः स्त्रियांवर गुलामगिरीसदृश अन्याय होतो ह्या माझ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे, त्याबद्दल मौन बाळगले आहे. त्यांनी सद्यःपरिस्थितीमध्ये माझ्या कल्पना कश्या व्यवहार्य नाहीत, रोगापेक्षा उपचार कसा भयंकर आहे, मी कसा स्वप्नात वावरत आहे किंवा माझ्या सूचनांमुळे कसा स्वैराचार माजणार आहे ह्याचाच सविस्तर ऊहापोह केला आहे. मी (दिवाकर पुरुषोत्तम मोहनी) कोणी एक राजा आहे. वा स्मृतिकार आहे व मी फर्मान काढल्याबरोबर स्त्रियांना लैंगिक स्वायत्तता प्राप्त होऊन स्त्रीमुक्ती प्रत्यक्षात येणार आहे अशी कल्पना करून घेऊन माझ्यावर बहुतेकांनी टीका केली आहे. कोणाचीही मते आम्हाला दडवून ठेवावयाची नसल्यामुळे ती प्रकाशित करीत आहोत.
सद्यःस्थलकालाचा व्यावहारिक संदर्भ बाजूला ठेवून आपणाला पहिल्याने फक्त तात्त्विक चर्चा करावयाची आहे ह्याकडे सारेच लेखक दुर्लक्ष करीत आहेत. ह्या विषयावरच्या आजवरच्या चर्चेने मला हवे असलेले वळण घेतलेच नाही. मला वादंग माजवावयाचे नाही, वाग्युद्ध खेळण्यात मला स्वारस्य नाही हे पूर्वीच सांगून झाले आहे. स्त्रियांची सध्याची स्थिती पुरुषांच्या गुलामासारखी आहे; ती आम्हाला लांच्छनास्पद आहे; ती बदलण्याची गरज आहे येथपर्यंत जर माझे वाचक माझ्याशी सहमत असतील तर पुढचा मार्ग सगळे मिळून आखू या; नसतील तर ते तसे का नाहीत, ते त्यांनी विस्तारपूर्वक सांगावे म्हणजे माझा तरी भ्रमनिरास होईल असे मला वाटत होते. पण दोनही घडले नाही.
अजून त्या दिशेने आपली वाटचाल होऊ शकेल का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.