तुमचे सर्व लिखाण भाबडेपणाचे, तर्कदुष्ट

श्री दिवाकर मोहनी यांस
सप्रेम नमस्कार
गेले सहा महिने आजचा सुधारकच्या वेगवेगळ्या अंकांतून आपले स्त्रीमुक्तिविषयक विचार मोठ्या हिरीरीने तुम्ही मांडत आहात. त्यामुळे समाजकल्याण होणारच असा तुमचा विश्वास तुमच्या लिखाणात दिसतो. स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य हा स्त्रीमुक्तीचा ‘अनिवार्य पैलू तुमच्या मते आहे. स्त्रियांची मागणी असो किंवा नसो, हे दिले नाही तर समाज कर्तव्याला चुकला असे तुम्ही सतत लिहीत असता. यासंबंधी तुमच्याशी सहज बोलणे झाले असता त्यावर तुम्हाला याहून भिन्न दृष्टिकोण समजून घ्यायचा आहे असे तुम्ही सुचविल्यामुळे पुढील विचार तदनुसार कळवीत आहे.
तुमचे हे सर्व लिखाण भाबडेपणाचे, भावनावशतेने लिहिलेले, तर्कविरुद्ध व अयुक्त असल्याचे कां वाटते ते पुढे नमूद करीत आहेत. तुमच्या मते कुटुंब बळकट ठेवून लैंगिक स्वातंत्र्याचा लाभ स्त्रियांना घ्यावयाचा आहे. वस्तुतः स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य कायम ठेवून कुटुंबव्यवस्था टिकून राहते असे म्हणणे म्हणजे अग्नी आणि पाणी दोघेही एकत्र सुखरूप राहतात असे विधान करण्यासारखे आहे.
स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य याचा अर्थ यच्चयावत् स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य असाहोतो. आणि तो तसा तुम्हाला मान्य आहे. वस्तुतः स्वातंत्र्य ही संकल्पना, जिला स्वची जाणीव आहे, आपल्या कृतीचे बरे वाईट परिणाम समजतात अशा विचारी व्यक्तीच्या बाबतीत विचारणीय ठरू शकते. भावनावेगात वाहून जाणाच्या सामान्य स्त्रीवर्गात अशा व्यक्तींचे प्रमाण अत्यंत विरळ. यच्चयावत् स्त्रियांचे बाबतीत ही शक्यता केवळ असंभव अशी आहे. अल्पवयीन मुली अशा वागू लागल्या म्हणजे काय होते याची साक्ष अमेरिकेतीलआईबापांकडे जरा विचारून पाहावी.
कुटुंब-व्यवस्था ही कुटुंबीयांच्या स्वातंत्र्यसंकोचावर आधारली असल्यामुळे कुटुंब आणि स्वातंत्र्य ह्या दोन गोष्टी एकत्र नांदणे संभवनीय नाही. निसर्ग व स्वभाव या दोन्हीमुळे कुटुंबाचा खरा आधार स्त्री असते. तिला जेव्हा लैंगिक स्वातंत्र्य वापरावेसे वाटते याचा एक अर्थ ती ज्या पुरुषाच्या आजच्या मते वैध संबंधात आली असते त्याच्या द्वारा होणार्याा कामोपशमामुळे समाधानी नाही, यास्तव ती अन्य व्यक्तीच्या शोधात असते, असा होतो. या प्रमाणे कामसुखार्थ इतरांचा शोध घेणारी स्त्री आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक राहण्याची अजिबात शक्यता नाही.
तुमच्या मते ‘काही स्त्रियांनी नेहमीसाठी तसेच बहुसंख्य स्त्रियांनी अधून मधून बहुपतिकत्व स्वीकारणे व समाजातील सर्व पुरुषांच्या ठिकाणी असणाच्या कामप्रेरणेचे समाधान होण्यास वाव देणे यामध्ये स्वैराचार नाही. याचा व्यावहारिक अर्थ स्त्रियांनी वेश्यासदृश जीवन स्वीकारणे यापेक्षा वेगळा होत नाही. हेच त्यांचे समाजहितकर व नैतिक आचरण आहे, हे तुमचे विधान अफलातून आहे. कारण कोणत्याही स्त्रीला आपले असे स्वातंत्र्य सिद्ध करावयाचे असेल तर परव्यक्तीशी लैंगिक संबंध स्वेच्छेने स्वीकारावा लागेल. एवढेच नव्हे तर असे गरजू पुरुष शोधून त्यांचे समाधान घडविल्याशिवाय त्यांचे कर्तव्यपालन होणार नाही व स्त्री आदर्श ठरणार नाही. (एकीकडे स्त्रियांना स्वातंत्र्य आहे असे म्हणणे आणि स्वमने त्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा निकष सांगून ते मर्यादित करणे यातीलप्रतिपादनातला आत्मविरोध स्पष्ट आहे.)
स्त्री अशी स्वतंत्र झाली तरं पुरुषही असाच स्वतंत्र झाल्याशिवाय हे तथाकथित लैंगिक स्वातंत्र्य संभवणार नाही. पुढे या स्वातंत्र्यविचारामुळे एकाच पुरुषाविषयी अनेक स्त्रिया आणि एका स्त्रीविषयी अनेक पुरुष जर इच्छा करू लागले तर उत्पन्न होणार्याा सुंदोपसुंदीमुळे समाजाचे स्वास्थ्य टिकून राहण्याची शक्यता वाटते काय?
तुमच्या मते ‘एकापेक्षा अधिक स्त्रीपुरुषांनी एकमेकांवर (आणि एकमेकांच्या मुलांवर सुद्धा) समान प्रेम करणे म्हणजे सर्वांबद्दल समान जिव्हाळा बाळगणे आणि हे काम शक्य तो जगभर करावयाचे आहे. इकडे विवाहसंस्काराचे महत्त्व, पातिव्रत्याचे, निष्ठेचे महत्त्व कमी करावे लागेल. येथे मनाच्या विकारवशतेमुळे होणारी स्वातंत्र्याची वाटचाल आणि मनाच्या अध्यात्मिकतेमुळे अत्यंत अल्पसंख्य स्थितप्रज्ञतेकडे झुकलेल्या स्त्रीपुरुषांनाचसाध्य होण्याचा संभव असणारे सर्वाप्रति आत्मीयतेचे तत्त्व हा एक नवनीतगोमयमिश्रणाचा अद्भुत प्रकार मानसशास्त्र व समाजशास्त्र या सर्वांच्या अत्यंत विरोधी आहे.
स्त्रीजीवनातील तुम्ही दाखविलेली दुःखे व न्यूनता ही नाहीशी करण्यासाठी तुम्ही कल्पिलेले ध्येय आणि त्यासाठीचे उपाय धन्वतरीलाही आव्हान ठरणाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या रोगावर ‘वाईचे घ्या, वाताचे घ्या’ असे म्हणत गल्लीबोळात फिरणाच्या जडीबुटीवाल्या भटक्या बाईने दिलेल्या मात्रेसारखे वाटतात.
कामसमर्पणाच्या संबंधात समान प्रेमाची कल्पना मनोव्यापाराविरुद्ध आहे. काम ही सहजप्रेरणा आहे. उचित काळी तिच्या उपशमाची समाजहितकारक सोय असावी म्हणून विवाहसंस्था विकसित झाली. समाज हा एकसुरी आणि एकस्पर्शी कधीही नसतो हे लक्षात घेऊन भारतासारख्या विशाल देशात तिच्यात प्रदेश-समाजपरत्वे काही बदलही झाले. पातिव्रत्य, बह्मचर्य ह्या कल्पना जीवनमूल्य म्हणून विकसित झाल्या. (महानंदेसारख्या गणिकेलाही वेश्या असोनी पतिव्रता असे राहावे असे वाटत होते.) त्या सर्व गुंडाळून ठेवून तुम्हाला ‘आदिवासींचे’ किंवा आफ्रिकेतील वन्य जमातींचे कुटुंबजीवन आदर्श व स्त्रीसमाजाच्या दुःखावर रामबाण उपाय वाटते हे जरा अधिक तपासून पाहणे इष्ट होईल. केवळ नर आणि मादी असा संबंध असलेले पशुजीवन आणि सर्वप्रकारचे मुक्त स्त्रीपुरुष संबंध मान्य करणारे तुमचे तथाकथित आदर्श जीवन यात मला तरी काडीचाही फरक दिसत नाही.
कुटुंब म्हटले की व्यवस्था आली, अनुशासन आले. याचा अर्थ असा की कुणी तरी कुटुंबप्रमुख म्हणून मान्य झाल्याशिवाय व्यवस्था वा अनुशासन उत्पन्न होणार नाही. प्रायः स्त्रीमुक्तिवादी वा तथाकथित सुधारक हे अनुशासन पाळणारे मुळातच असू शकत नाहीत असे जाणवते. त्यांची कृती तथाकथित बुद्धिवादाचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे नाव सांगून समाजाचे अनुशासन वा त्यातील प्रचलित व्यवस्था योग्य पर्यायाचा अवलंब न करता मोडीत काढणारी असते. उदाहरणार्थ पूर्वी समाजात विधवांनी कुंकू लावू नये असा प्रघात होता. तेव्हा जुने सुधारक म्हणत, ‘कुंकू लावणे’ हा स्त्रीचा जन्मसिद्ध हक्क आहे. विधवांनी कुंकू लावावे. पुढे कुंकवाचा विस्तार घटता घटता पूर्ण पुसला गेला. आता कुंकू न लावणे हा आमचा अधिकार आहे असे सुधारणावादी सधवा किंवा अविवाहिता समर्थन करताना आढळतात. त्यांच्या मते विधवांनी कुंकू लावणे व सधवांनी कुंकू पुसणे ही झाली सुधारणा! पूर्वी विधवांनी न्हाव्याकडून केस कापवून घेणे हे अयोग्य असे म्हटले जाई. आता सुधारणा अशी की सधवांनीही न्हाव्याकडून केस कापवून घेणे सुधारणा म्हणवली जाते!
कुटुंबात अनुशासन असावे हे मान्य केल्यास कुटुंब कमीत कमी ज्या दोन स्त्रीपुरुषांचे असेल, ते दोघेही सर्वतंत्रस्वतंत्र वागू लागले तर त्यांच्या मतभेदामुळे एकसंध कुटुंब ही कल्पना कधीही सिद्ध होणार नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती हा अनुभव या आक्षेपाच्या मुळाशी आहे. वस्तुतः कुटुंबाच्या कार्यक्षेत्राची वाटणी करून आपल्या क्षेत्रात प्रत्येकाला पूर्ण मुभा हा उपाय स्वातंत्र्याची बूज राखण्याचा आहे. भारतीय समाजचिंतक हा उपाय मान्य करतात.
समाजात पुरुष जास्त व स्त्रिया कमी असे जनगणनेच्या इतिवृत्तात तुमच्या वाचनात आले, आणि ‘करितो चिंता विश्वाची ह्या चालीवर संभाव्य कामवंचित पुरुषांचा कळवळा तुम्हाला अस्वस्थ करता झाला. त्यावरून टिट्टिभ पक्ष्याची गोष्ट आठवली. हा पक्षी आकाश कोसळेल या भीतीने आकाशाला आधार देण्यासाठी रोज रात्री आपले पाय वर करून झोपत असतो! (उत्क्षिप्य टिट्टिभः पादावास्ते भङ्गभयाद्दिवः)
जगाच्या तुम्हाला वाटणाच्या समस्येवर भिन्न भिन्न समाजांची प्रकृती लक्षात न घेता, त्यांच्या चालीरीती, त्यांचे संस्कार यांचा काही एक विचार करता तुमची काळजी व तुमचा उपाय या टिट्टिभ पक्ष्याच्या वर्तनासारखा भासतो.
विवाहयोग्य वयाचा विचार करता समाजात पुरुष जास्त व स्त्रिया कमी हे जर वास्तव असेल तर आज अनेक स्त्रियांचे विवाह जमत नाहीत, वये वाढत आहेत, व अनेकांना अविवाहित राहावे लागत आहे हे कसे? विवाहजुळणी, हुंडापद्धती, सुनांचा छळ, विधवांचा प्रश्न इत्यादींसाठी एकपत्नीकत्वाचा प्रचलित नियम (विधी) सैल करणे हा उपाय विचारणीय ठरू शकतो. भारतात किंवा जगातही स्त्रीपुरुषसमाज हा धर्म, जाती, भाषा, प्रदेश, संस्कृती यांनी शतखंड असल्यामुळे जगात समाजात दर हजारी पुरुष इतके व स्त्रिया इतक्या असे वर्णन करणार्या, जनगनणावृत्ताचा कामपूर्तीच्या प्रश्नाचा विचार करताना नेमका उपयोग होऊ शकतो असे वाटत नाही. उलट तसे करणे चुकीचे ठरते.
पुरुष जास्त व स्त्रिया कमी अशी अवस्था जर निर्माण झाली तर त्यावरचा उपाय म्हणून भारतीय आश्रमव्यवस्था पुन्हा दृढमूल करणे इष्ट होईल. वैराग्यवृत्तीच्या पुरुषांनी नैष्ठिक ब्रह्मचर्य, वानप्रस्थाश्रम वा संन्यासाश्रम यांचेकडे वळण्यास प्रोत्साहन देणे हाही उपाय विचारात घेतला पाहिजे. आजही अनेक पुरुष ध्येयसाधनेसाठी व्यक्तिगत गृहजीवनाचा होम करून समाजसेवा, विद्या, संगीत, कला यांसारख्या क्षेत्रांत आयुष्यभर खपत असतात. या पद्धतीने कामप्रेरणेचे उदात्तीकरण हाही त्या समस्येवरचा एक उपाय संभवतो.
स्त्रियांचे विधवा, सधवा, कुमारिका, घटस्फोटिता, बलात्कृता इत्यादी सर्व भेद नाहीसे करणे, पवित्र अपवित्र इत्यादी लचांड विसरून जाणे, अशा उपायांनी स्त्रियांचे प्रश्न सुटतील व जळगावकांडासारखे प्रसंग उत्पन्न होणार नाहीत हे सर्व लिखाण भरमसाट व कल्पनातरंगावर आधारलेले झाले आहे. वस्तुतः जळगावचा प्रश्न हा शासनव्यवस्था बिघडल्यामुळे, युक्तायुक्ततेची, पापपुण्याची जाणीव नाहीशी झाल्यामुळे व बेछूट व्यक्तिस्वातंत्र्याच्या भन्नाट प्रसारामुळे उत्पन्न झाला आहे. त्यासाठी तुमचा मार्ग रोगापेक्षा उपाय भयंकर अशा स्वरूपाचा, स्त्रीजीवनच काय, पण पूर्ण समाजजीवन उद्ध्वस्त करणारा होऊ शकतो.
हवे तसे स्त्रीपुरुषसंबंध ठेवणे, संभाव्य एड्ससारखे दुर्धर रोग टाळण्यासाठी प्रतिबंधक साधने वापरणे इत्यादी तुम्ही सुचविलेल्या उपायांनी समाज कोणत्या दशेला जाऊशकेल याची चिकित्सा वैद्यकीय दृष्टिकोणातूनही होणे आवश्यक आहे. मानसशास्त्र, कामशास्त्र, समाजशास्त्र व वैद्यकशास्त्र इतक्या शास्त्रांतील तज्ज्ञ मंडळींशी परामर्श करून सोडवावयाचे प्रश्न आपण अगदी चुटकीसरसे सोडवून दाखवतो असे सुचवून निश्चितार्थतेच्या आविर्भावात लिहिणे हे बुद्धिवादाला सोडून होईल असे नमूद करावेसे वाटते. तार्किक दृष्टीने तुमच्या स्वातंत्र्यकल्पनेत फार मोटी अनुपत्ती आहे. स्वातंत्र्य ही संकल्पना ज्या वर्तनात इतर कोणाच्याही सहयोगाची अपेक्षा नसते अशा आत्मनिर्भर वर्तनात संभवू शकते. लैंगिक वर्तन इतर जोडीदाराच्या सहकार्याशिवाय संभवत नाही म्हणून लैंगिक स्वातंत्र्य हे असंभव कोटीतले आहे. तुमचे प्रतिपाद्य असणारे लैंगिक स्वातंत्र्य इतराला फुसलावून वा इतरांच्या फुसलावण्याला बळी पडून होणार्याी दुर्वर्तनाशिवाय दुसरे संभवत नाही.
समाजातील स्त्रियांच्या व पुरुषांच्यादुःखनिवारणासाठी अशा तर्हेीचा मार्ग चोखाळणारी कुटुंबे वा एखादे कुटुंब तरी तुमच्या माहितीचे नागर जीवनात आढळते काय? असे असल्यास त्यांच्या अनुभवांना प्रसिद्ध करणे हे तुमच्या विधानाला पाठबळ देणारे अल्प मात्रेत का होईना होण्याचा संभव आहे.
तुम्ही व्यक्त करीत असलेले विचार योग्य व समाजमान्य झाले आहेत, अशा तर्हे ची तुमची समजूत तुम्ही स्वतःच्या लेखात वेळोवेळी व्यक्त केली आहे. तेव्हा त्यासंबंधी काय वाटते हे तुम्ही विचारल्यामुळे लिहून कळविले आहे. विचाराच्या अभिव्यक्तीत काही कमीजास्त लिहिले गेले असल्यास ते व्यक्ती या नात्याने तुमच्याविषयी नाही, हे तुम्ही जाणताच. तुम्ही आपुलकीने सामाजिक विचार मांडता हे लक्षात घेऊन झालाच तर उपयोग व्हावा या आशेने लिहिले आहे. ‘यद्रोचते तद् ग्राह्यं यन्न रोचते तत्त्याज्यम्’असे सुचवून खूप लांबलेले हे लेखवजा पत्र संपवतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.