स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य

श्री. दिवाकर मोहनी यांच्यावर टीकेचा भडिमार न होण्याचे कारण त्यांचे स्त्रीमुक्तीवरील सर्वच विचार पटण्याजोगे आहेत हे नाही एवढेच त्यांना कळावे हा पत्र लिहिण्याचा उद्देश.
स्त्रीमुक्तीचा एक भाग म्हणून स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य द्यावे हा श्री मोहनी यांचा विचार आंधळ्याला बघण्याचे किंवा बहिर्‍याला ऐकण्याचे स्वातंत्र्य देण्यासारखा आहे. याचे कारण कळण्यासाठी आजचा सुधारक मार्च ९२ च्या पान क्र. २९ वरील श्री. विठ्ठल प्रभु यांच्या पत्रातील तिसरा परिच्छेद वाचावा.
स्त्रीला लैंगिक स्वातंत्र्य द्यावे म्हटल्यावर पुरुषासही लैंगिक स्वातंत्र्य देणे हे क्रमप्राप्तच आहे. सध्या पुरुषासही लैंगिक स्वातंत्र्य आहे असे म्हणता येणार नाही. कारण अशा पुरुषास बाहेरख्याली अशी संज्ञा मिळते व त्याकडे फार कौतुकाने पाहिले जात नाही. सध्या बेकायदेशीरपणे हे स्वातंत्र्य उपभोगणार्‍या पुरुषास हे स्वातंत्र्य कायदेशीरपणे मिळाल्यास कुटुंबसंस्थेची अवस्था काय होईल याचा विचार न केलेलाच बरा.
जे स्वातंत्र्य स्त्रीला नको असेल तरी मोहनी देऊ करतात त्याविषयी स्त्रीमनाचा कानोसाही त्यांनी घ्यावा अशी त्यांना नम्र विनंती. तरुणपणी पती मरण पावला तर विवाह न करता राहाणार्‍या स्त्रियांची संख्या पत्नी मरण पावल्यावर विधुर राहणार्‍या पुरुषांपेक्षा कितीतरी जास्त असते याचे कारण केवळ तिला लैंगिक स्वातंत्र्य नसते हेच नव्हे व समाजाचे दडपण हे तर नव्हेच.
श्री. मोहनी यांच्यावर टीका न होण्याचे कारण जसे पक्षाचा जाहीरनामा पक्ष आचरणात आणत नाही (निवडणुकीनंतर) म्हणून त्या पक्षावर टीका केली जात नाही तसेच आहे. म्हणजे जाहीरनामा हा केवळ जाहीर करण्यासाठीच असतो याची लोकांना खात्री आहे. तसेच श्री. मोहनी यांच्या विचारांची धास्ती घेऊन त्यावर टीका करण्याचे कारण नाही असेआजचा सुधारक वाचणार्‍या दोन पाचशे वाचकांना वाटत असणार -अस्तु!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.