संपादकीय

महाराष्ट्र फाउंडेशन ह्या अमेरिकेमधल्या अनिवासी महाराष्ट्रीय श्री.सुनील देशमुख यांनी स्थापलेल्या संघटनेने आपल्या ह्या मासिकाला, आजचा सुधारक ला, उत्तम वैचारिक मासिकाला द्यावयाचा रु. ५०,००० चा पुरस्कार दिला आहे हे सांगण्यालाआम्हाला आनंद होत आहे.
आम्ही महाराष्ट्र फाउंडेशनचे त्यासाठी अत्यन्त आभारी आहोत. मासिकाच्या ह्या यशाचे श्रेय कोणा एकट्याचे नसून लेखकांसह सगळ्या परिवाराचे आहे ह्याची कृतज्ञ जाणीव संपादकाला आहे.
ह्या पुरस्कारामुळे आमची विचारप्रवर्तक उत्कृष्ट साहित्य सतत देण्याची व समाजपरिवर्तनासाठी निष्ठेने आंदोलने चालविण्याची जबाबदारी वाढली आहे. ती पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करूच आणि त्याहीकरिता आपणा सर्वांचे साह्य आम्हाला लागेल. सामाजिक सुधारणा करणे हे जगन्नाथाचा रथ ओढण्यासारखे आहे. एकट्या दुकट्याचे ते कामच नव्हे.
सुधारककतें गोपाळ गणेश आगरकर ह्यांची शंभरावी पुण्यतिथी पुढच्या महिन्यात येत आहे. त्या निमित्ताने आजच्या सुधारकाचा विशेषांक, जून-जुलैचा जोड अंक म्हणून २० जून च्या सुमाराला प्रसिद्ध होईल व जुलैचा अंक बंद राहील ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ही विनंती.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.