बंडखोर पंडिता (भाग ३)

रमाबाईंनी हिंदू धर्म सोडला, पण हिंदुस्थानची नाळ तोडली नाही, बाईंनी हिंदुसंस्कृतीचा त्याग केला नाही याची विपुल उदाहरणे त्यांच्या चरित्रात आहेत.

‘तुमचे आईवडील सद्धर्माने (ख्रिस्ती धर्माने) देऊ केलेल्या तारणाला वंचित झाले’, असे कुणीसे म्हणाले. त्यावर ताड्कन त्या उत्तरल्या : ‘माझे आई-वडील इतके परमेश्वरभक्त, कनवाळू व सच्चरित्र होते की, त्यांच्या बाबतीत असा संशय व्यक्त केला तरी मला सहन होणार नाही. अमेरिकेत अल्पावधीत लोकप्रियता पावलेले त्यांचे पुस्तक The High-Caste Hindu Woman आईला अर्पण करताना त्या लिहितात, ‘जिचा मधुर संस्कार व समर्थ शिकवण माझ्या जीवनाला सतत मार्गदर्शक ठरली व माझ्या जीवनाला प्रकाशित करीत राहिली त्या माझ्या प्रियतम आईस – आदरपूर्वक समर्पण.’ | इंग्लंड-अमेरिकेहून परतल्यावर पुण्याला सुधारणावादी मंडळीत आणि हिंदू समाजात त्या पूर्वीच्या सहजतेने मिसळल्या. हे न आवडलेल्या रे. बाबा पदमनजी, रे. लोटलीकर यां सारख्या नवख़िस्त्यांनी ख्रिस्तदास’ या नावाने ज्ञानोदय या अमेरिकन मिशनच्या पत्रात त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यावर प्रत्युत्तर देताना त्या म्हणतात, ‘हिंदू देवळात पुराण करण्यात एवढे अनन्वित कृत्य काय झाले ते समजत नाही. बार्शीसारख्या ठिकाणी जेथे बायकांना सभा म्हणजे बाऊ वाटतो व ज्यांना पुराणच काय ते ठाऊक, अशांनापुराणातले एखादे वाक्य घेऊन चार बोधपर गोष्टी सांगणे यात काय पाप आहे?… आपण म्हणता तद्वत मशिदीत कुराण सांगण्यासही मी सिद्ध आहे… टीकाकार मराठी भाषा बोलतात तेव्हा बहुतकरून ह्या हिंदूंच्या देशातच त्यांचा जन्म झाला असावा असे वाटते. ते ह्या हिंदूंच्या भूमीवर राहिले कसे? … हिंदूंचे व मुसलमानांचे तितके अपवित्र असे मानण्याइतका सद्धर्माचा आवेश माझ्या अंगात नाही. माझे आईबाप हिंदू होते. त्यांचे नीतिपर उपदेश माझ्या हाडांत खिळून गेलेले आहेत. तसेच हिंदू शास्त्रे-पुराणे वगैरेंचे अध्ययन करण्यात माझे अर्धे अधिक आयुष्य गेले आहे. त्यात त्याज्यांश जरी पुष्कळ आहे तरी चांगला ग्राह्यांशही पुष्कळ आहे.’३

इ. स. १८९७ सालची गोष्ट. प्लेगच्या उपद्रवाइतकेच ब्रिटिश अधिकार्‍यांचे अत्याचार असह्य झाले होते, तेव्हाची गोष्ट, रमाबाईंनी बॉम्बे गार्डियन साप्ताहिकात पत्र लिहून सरकारी दडपशाहीचा इतका बोभाटा केला होता की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांनी ते पत्रच वाचून दाखवले. त्यावेळी मुंबईला गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट होते. त्यांना उद्देशून बाईंनी लिहिले, ‘हिंदी लोकच फक्त पुरावा न देता धडाधड आरोप करतात असे काही लोकांना वाटते. तथापि आमच्या माननीय गव्हर्नरासारखे अनेक पाश्चात्य लोकही…. माझ्या विधानाची शहानिशा न करताच, “ते खोटे आहे’ असे कसे म्हणू शकतात?” रमाबाई ख्रिस्ती झाल्या पण कोणत्याही पंथाचा (चर्चचा) शिक्का आपल्यावर बसू देण्याचे त्यांनी नाकारले. आज शंभर वर्षांनी भारतीय समाजाशी सांधा जुळविण्याचा जो उद्योग ख्रिस्ती धर्मगुरूंनी आरंभिला आहे तो रमाबाईंनी तेव्हाच अंमलात आणणे सुरू केले होते. केडगावच्या मुक्तिसदनात मुलींसाठी त्यांनी मराठी प्रार्थना तयार केल्या. रे. टिळकांच्या सल्ल्यावरून इनॉक धैर्यशील गवई यांच्याकडून देशी संगीतावर आधारित चाली बसवून घेतल्या. ख्रिस्ती झालेल्या मुलींना परकी हेंगाडी नावे न देता त्या मराठमोळी नावे देत. स्वतः दीक्षा घेतली तेव्हा त्यांना व त्यांची कन्या मनोरमा हिला मेरी हेच नाव देण्यात आले होते. ते । त्यांनी कधी लावले नाही.
हिंदी भारताच्या राष्ट्रभाषेची जागा घेऊ शकते हे त्यांनी कधीच हेरले होते. या संबंधी त्यांचे विचार एखाद्या द्रष्ट्या देशभक्तासारखे आहेत. त्यावेळच्या राष्ट्रीय सभां(काँग्रेस) मध्ये पुढारी इंग्रजीतून बोलत. त्यासंबंधी त्या म्हणतात, ते इंग्रजीतून भाषणे झोडतात त्याचा सर्वसाधारण लोकांस काय फायदा? आमच्या सर्व भाषा नाहीशा करून त्याजागी इंग्रजी भापा स्थापणे म्हणजे हिंदुस्थानला समुद्रात बुडवून त्या जागी ब्रिटिश बेटे आणून ठेवण्यासारखे आहे. आमचे विद्वान लोक स्वदेशाची उन्नती करू पाहतात तर आपल्या देशात सगळ्यांना समजेल अशी एक भाषा व ती स्वदेशी भाषा असणेच आवश्यक आहे … ‘अवाढव्य अमेरिकेने “एक भाषा – एक राष्ट्र” ह्या सूत्राने स्वतःची साधलेली प्रगती व ऐक्यभावना जाणून हिंदुस्थानने पण हिंदी राष्ट्रभाषा व देवनागरी लिपी यांचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे, हे त्या १०० वर्षांपूर्वी सुचवताना दिसतात.

हे सगळे पाहिल्यावर विठ्ठलराव घाटे म्हणतात ते खरे वाटू लागले. ‘रे. टिळक आणि रमाबाई ख्रिस्ती झाल्या, पण त्यांनी ख्रिस्ताला हिंदू केले.६
* * *
अमेरिकेत त्यांनी जाऊ नये या आग्रहाला म्हणा की दडपणाला म्हणा दाद न देता त्या अमेरिकेला गेल्या. डॉ. आनंदीबाई जोशी यांचा पदवीदान समारंभ झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी रमाबाईंचा स्वागत-सत्कार करण्यात आला. आदल्या दिवशी पदवीदान समारंभात व्यासपीठावर त्यांना बसविण्यात आले होते. त्यांचे व्यक्तिमत्व पाहणार्‍याला भारून टाकणारे होते. त्याने प्रभावित झालेल्या लोकांना दुसर्‍या दिवशी त्यांच्या वक्तृत्वाने मंत्रमुग्ध केले. यानंतर ठिकठिकाणाहून बाईंना भाषणे, मेजवान्या, सभा, सम्मेलनाची आमंत्रणे येऊ लागली. भारतातल्या उच्चवर्णीय स्त्रीची विषम स्थिती- विशेषतः विधवांची कुचंबणा- हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय होता. या व्याख्यानांमधूनच The High Caste Hindu Wontan हे त्यांचे पुस्तक आकाराला आले. ह्या पुस्तकाच्या १० हजार प्रती हातोहात खपल्या. रमाबाईंचे लक्ष तेथील शिशु-शिक्षणपद्धतीकडे गेले. त्यांनी स्वतः त्याची एक वर्षाची पदविका घ्यायचे ठरवले. मुलांना व त्यांच्या आयांना कसे शिकवायचे याचे शिक्षण घेणे सध्या मला महत्त्वाचे वाटत आहे असे त्या एका पत्रात म्हणतात. ही शिक्षणपद्धती विचार करायला शिकवते. ते आपल्या बायकामुलांना मिळाले तर त्यांच्या अंधश्रद्धा आपोआप नष्ट होतील असे त्यांना वाटे.
पुस्तकविक्रीतून आलेल्या पैशातून त्यांनी आपल्या भावी शाळेतील मुलींसाठी रचलेल्या पुस्तकांमध्ये घालायला विविध रंगी चित्रे, मॉडेल्स अशी उपयुक्त सामग्री तयार करून घेतली. अमेरिकेत त्यांनी ३० हजार मैल प्रवास केला. सहा महिने राहायच्या इराद्याने आलेल्या बाई तीन वर्षे रमून गेल्या. तेथेच त्यांनी संघटित स्त्रीशक्तीचा प्रत्यय घेतला. मद्यपान निषेधाच्या एका महिला आघाडीत त्या सहभागी झाल्या. अशा उपक्रमांमुळे अमेरिकन लोकस्थितीचे त्यांना जवळून दर्शन झाले. युनायटेड स्टेटची लोकस्थिति व प्रवासवृत्त या आपल्या ग्रंथात त्यांनी आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. ५० वर्षांपूर्वी … इथल्या स्त्रीचे वर्णन “त्या केवळ विकत घेतलेल्या दासांप्रमाणे आहेत” असे केले (जात) होते. पण आज केवढ्याशा अल्पकाळात स्त्रियांनी आपली खूप उन्नती करून घेतली आहे. त्यांचा स्वतःचा अनुभव फारसा वेगळा नव्हता. एका गावी भाषणाचे वेळी बाईंना चर्चमधे वेदीवर (pulpit) बसण्याचा प्रसंग आला. त्यांनी आपल्या सोबतच्या चार चौघींना जवळ बोलावले.पण कोणी धजेना, अपाय होईल ही भीती. ‘होय नाही करता करता ४-५ बायका… तयार झाल्या, आणि माझे भाषण संपेपर्यंत तेथेच बसल्या होत्या तरी त्यांस काही अपाय झाला नाही हे सांगणे नको.’
भारतात परतल्यावर रमाबाईंनी विधवाश्रम काढायचे ठरवले. निरक्षर स्त्रियांसाठी शाळा काढायचे ठरवले. या कामी मदत करण्यासाठी अमेरिकेत ‘रमाबाई असोसिएशन नावाची संस्था स्थापन झाली, रमाबाईंच्या ग्रंथाने आणि भाषणांनी इतके जनमत तयार केले होते की, रमाबाईंना पहिली १० वर्षे आवर्ती खर्चासाठी सालिना ५ हजार आणि इमारतीआदि अनावर्ती खर्चासाठी २५ हजार डॉलर्स एवढी मदत करण्याचा पत्कर या संस्थेने घेतला. याप्रमाणे पुढील १० वर्षांची बेगमी करून इ.स. १८८९ साली जपानमार्गे रमाबाई मातृभूमीला परतल्या त्यावेळी त्यांचे वय होते ३१ वर्षांचे. उरी एकच तळमळ – आपल्या हतभाग्य देशभगिनींसाठी सांत्वना देणारे, मायेचा आसरा देणारे, घर उभारायचे असा निश्चय करून रमाबाई मातृभूमीला परतल्या.

मुंबईला प्रार्थना समाजाच्या पुढार्‍यांनी रमाबाईंचे स्वागत केले. सर्व प्रकारे साहाय्य देऊ केले. चौपाटीजवळ विल्सन कॉलेजच्या मागे एका भाड्याच्या बंगल्यात रमाबाईंनी शारदासदन स्थापन केले. वॉण्टेज इथल्या सिस्टर जिराल्डीन या आपल्या धर्ममातेला त्या लिहितात, ‘शारदा ही विद्येची देवी. मला इथे संस्कृती आणि घर (सदन) यांचा संगम साधायचा आहे. शारदासदनाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षपद सौ. काशीबाई कानिटकर यांनी भूपविले होते, एखादी हिंदी स्त्री सभेची अध्यक्ष असण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. या प्रसंगी रमाबाई म्हणाल्या आपल्या देशातील स्त्रियांची स्थिती हृदयाच्या ठिकन्या उडवून टाकण्याइतकी शोचनीय आहे. … ब्रिटिश पार्लमेंटात आपला एकही प्रतिनिधी नाही..
.. ह्यामुळे गरीब हिंदुस्थानच्या खच्या परिस्थितीचे त्यांना आकलन करता येत नाही. हिंदी स्त्रियांची स्थितीही अगदी तशीच आहे. सद्गृहस्थहो, तुमच्याही पार्लमेंटमध्ये/ (काँग्रेस) आमच्यापैकी एकाही स्त्रीला तुम्ही कधी आपली शोचनीय स्थिती तुमच्यापुढे मांडण्याची संधी दिली नाही. … तुम्हाला तुमच्या स्त्रियांची दुःस्थिती अधिक चांगली ठाऊक आहे अशी माझी खात्री आहे.’ १०
शारदासदन दोन मुलींसमवेत सुरू झाले. त्यातली एक, गोदू जोशी पुढे पुण्याला गेल्यावर पुनर्विवाह करून धोंडो केशव कर्वे यांची पत्नी आनंदीबाई कर्वे झाली.
शारदासदन मुंबईला सुमारे दीडवर्ष होते. ते पुण्याला सदन का हलविले याचे कारण सिस्टर जिराल्डीनला एका पत्रात त्यांनी कळविले ते असे की, ‘मुंबई हे खर्चाच्या दृष्टीने फार महाग शहर आहे. तशात इथली हवा ही फार वेळ काम करण्याच्या दृष्टीने निरुत्साही आहे.

पुण्याला मूळ मुंबईच्या सल्लागारांशिवाय आणखी काही साहायक मंडळी लाभली. रा. ब. नूलकरं, डॉ. भांडारकर, सुधारककार आगरकर, मराठाचे संपादक वासुदेवराव केळकर ही त्यातली प्रमुख नावे
* * * * * *
पुण्याला रमाबाई उणीपुरी १० वर्षे राहिल्या. ही त्यांच्या आयुष्यातली अत्यधिक वादळी वर्षे होती. सुरुवात चांगली झाली. मागे सांगितल्याप्रमाणे भाषणे, प्रवचने होऊलागली. त्यांच्या अमेरिकेतील अनुभवांवर आधारित युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती हे. पुस्तक निघाले. अमेरिकन स्त्रियांची स्थिती त्यांना सर्वोत्तम वाटे, कारण त्यांच्यात स्त्रियांस व पुरुषांस समान मानतात. पण हे धर्मामुळे झाले म्हणणे पूर्ण बरोबर नाही. ख्रिस्ती म्हणवणाच्या सगळ्या जातीत स्त्रियांची स्थिती एकाच प्रकारची आहे असे नाही. … स्त्रियांस धर्मासनावर चढून पुरुषांप्रमाणे उपदेश करण्याचा अधिकार नाही. संस्कारादि धर्मकृत्य करण्याचा अधिकार नाही. विवाह होताच “मी आपल्या भ्रताराची आज्ञा पालन करीन” अशी शपथ घ्यावी लागते. नवरा बायकोच्या शिरःस्थानी आहे, असे ख्रिस्ती धर्मोपदेशकाचे सांगणे आहे. पण येशू असे म्हणत नाही. खरा येशूचा धर्म हे पाळतच नाहीत. त्या भटांनी ख्रिस्तीधर्माच्या किती निरनिराळ्या आकृती चोपून मळून केल्या आहेत. ११
अमुक एक क्षेत्र स्त्रियांचे नाही हे रमाबाईंना कधी पटलेच नाही.
त्या म्हणतात, ‘आजपर्यंत जितक्या कल्पना निघाल्या त्या सर्व पुरुषांनी काढल्या, बायकांनी काढल्या नाहीत, याचे कारण त्यांच्या मेंदूचा कमीपणा नव्हे, तर त्यांच्या कल्पनाशक्ती विकास पावण्यास कोणी अवसर वा उत्तेजन मुळीच दिले नव्हते.९२
मुंबईला राष्ट्रीय काँग्रेस भरली. तिला प्रसिद्ध बुद्धिवादी चार्लस अँडला यांच्या प्रेरणेने काही स्त्रियांनी जावे यासाठी रमाबाईंनी खटपट केली. काशीबाई कानिटकर इच्छुक होत्या, पण भीत होत्या. पती सरकारी नोकरदार म्हणून. खुद्द न्या. मू. रानडे, स्त्रियांनी राजकारणात भाग घेण्याची वेळ अद्याप आलेली नाही या मताचे होते. रमाबाईंनी गव्हर्नर लॉर्ड रे यांची भेट घेऊन खुलासा मागितला. त्यांनी ‘पुरुष आमचे नोकर आहेत, बायका नाहीत असे उत्तर देऊन संभ्रम दूर केला. रमाबाईंनी सात आठ प्रतिनिधी काँग्रेसला नेल्याच. अधिवेशनात पुरुष प्रतिनिधींना उद्देशून त्या आपल्या भाषणात म्हणाल्या, ‘सरकारने जनतेचे वाक्स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. हाचे न्याय सर्व स्त्रिया पुरुषांजवळ मागत आहेत.
* * * * * *
‘शारदासदन’ पुण्यास आले अन् विद्यार्थिनींची संख्या वाढली. पहिल्या वर्षभरात ते वर्तमानपत्री चर्चेचा विषय झाले. कारण झाले धर्मांतर! रमाबाईंनी कोणाला ख्रिस्तीधर्म स्वीकारण्याची बळजबरी केली नव्हती हे खरे. पण मुली, एकीमागे एक, आम्हाला ख्रिस्ती करा’ असे म्हणू लागल्या होत्या हेही खरे. शारदासदनाचे काम धर्मप्रसारासाठी करावयाचे नसून तेथे पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य राहील असे त्यांच्या साह्यकर्त्या रमाबाई असोसिएशनचेमार्गदर्शक तत्त्व होते. मग हे काय सुरू झाले या विचाराने शारदासदनाचे एतद्देशीय सल्लागारही चिंतेत पडले.
झाले काय की, शारदासदन हा एक शुष्क विधवाश्रम न राहता ते मुलींचे प्रेमळ माहेरघर बनले होते. मुलींना खाण्या-पिण्याची रेलचेल, खेळण्या-बागडण्याची पूर्ण मुभा होती. कशाची उणीव भासू दिली जात नव्हती. धार्मिक स्वातंत्र्य होते. इतके की, सोवळेओवळे पाळता येई. राहत्या जागी पूजा-अर्चा करता येई. पोथी-पुराण, उपासतापास व्रतेवैकल्ये असे स्वातंत्र्य असे. तिकडे रमाबाईही आपल्या निवासस्थानी प्रार्थना करत. बाईंनी आपल्या मायेने मुलींची अंतःकरणे जिंकलेली होती. त्यांना रमाबाईंच्या प्रार्थनेबद्दल कुतूहल असे. बाईंबरोबर त्यांची कन्या मनोरमा व एक ख्रिस्ती शिक्षिका प्रार्थना करीत. ख्रिस्ताची गाणी म्हणत. मुलींना तेथे बसण्याची परवानगी होती. ज्यांच्यावर परमेश्वराचा कृपाप्रसाद व्हावा असे बाईंना वाटे त्यांची नावे घेऊन त्यांच्यासाठी आर्तभावाने बाई प्रार्थना करीत. हे सर्व पाहून मुली प्रभावित झाल्या नसत्या तरच नवल. एखाद्या आख्यायिकेसारखे बाईंचे चरित्र त्यांच्या कानी आलेले असे. दुःखतप्तांचे अश्रू पुसून तिथे हसू फुलविण्याची ख्रिस्ताची शिकवण मनोभावे आचरणात आणणाच्या बाईंचे चारित्र्य त्या सांजसकाळ पाहात होत्या. ख्रिस्ताचे शुभवर्तमान बाईंच्या मुखातून ऐकताना आपण साक्षात् देववाणी ऐकत आहोत असे त्यांना वाटत असणार. साहजिकच एक एक मुलगी मला ख्रिस्ती करा, मला ख्रिस्ती करा असे विनवू लागली. शारदासदनात बाप्तिस्मा घेता येत नसे. म्हणून बाहेर मिशनमध्ये जाऊन दीक्षा घेऊन मुली परत येत. केसरी, पुणे वैभव अशा हिंदुधर्माभिमानी पत्रांत टीकेची झोड उठली. न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर, रा. ब. भट अशा सल्लागार- साहाय्यकर्त्यांनी मंडळाचे राजीनामे पाठविले. परिणामी सदनातल्या ५० पैकी २५ मुलींना पालकांनी काढून घेतले. सुधारककर्ता गोपाळ गणेश आगरकरांनी दीर्घकाळपर्यंत बाईंची बाजू लढविली. शेवटी त्यांनीही आपली मामेबहीण वेणूबाई नामजोशी यांना सदनातून काढून घेतले. त्या आधी त्यांनी रमाबाईंची दीर्घ मुलाखत घेतली होती. पुढे ती सुधारकात प्रसिद्ध केली. २१ ऑगस्ट १८९३ च्या सुधारकात आगरकरांनी या प्रकाराबद्दल स्फुट लिहिले. त्यातील पुढील उतारासारे काही सांगून जातो.
ज्या अर्थी डॉ. भांडारकर, रा. ब. रानडे व रा. ब. भट यांच्यासारख्या विचारी व चौकस गृहस्थांस सदनाच्या साहाय्यकारिणी मंडळीतून आपली नावे काढून घेणे अवश्य वाटले आहे त्या अर्थी सध्या त्या संस्थेची असावी तशी स्थिती नसली पाहिजे असे अनुमान करणे अवश्य आहे. तथापि ती आजच केवळ असह्य झाली आहे असे आम्हास वाटत नाही. तसेच शारदासदन केव्हाही निव्वळ मिशनरी संस्था होईल असे आमच्याने म्हणवत नाही. हिंदु धर्माप्रमाणे आचरण करू इच्छिणाच्या मुलींस तसे करण्याला रमाबाईंकडून यत्किंचितही प्रतिबंध होत नाही असे आम्हास पक्के ठाऊक आहे. परंतु असल्या संस्थेत एवढा नियम पाळल्यानेच धर्मातराची भीती नाहीशी होत नाही. ती होण्यास आईबापांच्या किंवा पालकांच्या स्पष्ट परवानगीशिवाय … स्वधर्मातून परावृत्त न होऊ देण्याचा … मुख्यचालिकेचा दृढ संकल्प असला पाहिजे. आणि तो असेल तरच ती (संस्था) लोकांच्या आदरास व विश्वासास पात्र होऊन तिच्यापासून होईल तितका फायदा करून घेण्यास त्यांच्या मनाची प्रवृत्ती होऊ शकणार आहे. सदनाच्या सांप्रत स्थितीविषयी आम्हास जी माहिती लाभली आहे तीवरून असले दृढबंधन करून घेण्याची इच्छा किंवा शक्ती रमाबाईंस आता राहिली नाही असे वाटते. तेव्हा अर्थातच पूर्वी एकदा ज्या ईर्षेने या शाळेचा पक्ष आम्ही घेतला होता त्या ईर्षेने तो आज घेण्याला आम्ही असमर्थ आहो. धर्मासंबंधी आमची मते कशीही असली तरी हिंदू स्त्रियांनी किंवा पुरुषांनी कोणत्याही ऐहिक अथवा पारमार्थिक लाभासाठी ख्रिस्ती व्हावे ही गोष्ट आम्हांस बिलकूल संमत नाही. मुमुक्षु मत्र्यांनी धर्मावाचून मरू नये हे खरोखरीच इष्ट असल्यास,
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः
या गीतावचनातील रहस्य आम्हांस पूर्णपणे मान्य आहे.’
आगरकरांना दिलेल्या मुलाखतीत रमाबाई म्हणतात, ‘मी आपणहून मुलींना ख्रिस्ती होण्यास उद्युक्त करीत नाही. पण कोणी माझ्या प्रार्थनेच्या वेळेस येऊन बसल्या, बायबल समजून घेण्यास उत्सुक असल्यास मी नाही म्हणत नाही. … सदनात येताना मुलीचा धर्म हिंदू असला तरी त्यातून ती बाहेर पडताना तो धर्म हिंदू राहीलच असा जिम्मा माझ्याने घेववत नाही.’ १३ आगरकरांनी विचारले होते, तुम्ही ख्रिस्ती नसता तर या तुमच्या सदनापासून महाराष्ट्रीय लोकांना पुष्कळच फायदा झाला नसता काय?’ त्यावर रमाबाई उत्तर देतात,” मी ख्रिस्ती नसते तर मुळी शारदासदनच अस्तित्वात आले नसते. जे मी करीत आहे ते मी चांगले समजून करीत असल्यामुळे त्याचा परिणाम कसाही झाला तरी त्याबद्दल मला पश्चात्ताप होणार नाही.” १४
पंडिता रमाबाईंचे आत्मकथन म्हणता येईल असे माझी साक्ष हे एक पुस्तक आहे. मूळच्याA Testimony या पुस्तकाचे हे भाषांतर आहे. पुस्तकाच्या शेवटी रमाबाईंनी आपले नाव घालून जुलै १९१७ असा कालनिर्देश केला आहे. मला १९७० ची दुसरी मराठी आवृत्ती मिळू शकली. पुस्तकाचे शेवटचे प्रकरण ‘माझी अल्प सेवा’ या नावाचे आहे. त्यात रमाबाई म्हणतात, ‘सुरुवातीला माझे कार्य फक्त शैक्षणिक होते. माझ्या शाळेतील सर्व मुलींना धार्मिक स्वातंत्र्य देण्याचे ठरविले होते. पुढे त्या म्हणतात,’… मुंबईला उतरेपर्यंत, आपल्या मनात असे ठरविले की, जरी उघड धर्मशिक्षण देता आले नाही तरी मी रोज पवित्र शास्त्र मोठ्याने वाचून दाखवीन आणि … त्यामुळे माझ्या सदनातील संर्वांना धर्मशिक्षण मिळेल, आणि माझ्या देशभगिनी हे चाललेले पाहून व ऐकून खरा धर्म व मुक्ती या विषयी चौकशी करू लागतील.’ १६

संदर्भ

१. जेन चॅपल : वूमन हू वर्ड अंड वन, पृ १३१ वरून उद्धृत. मृणालिनी जोगळेकरकृत पंडिता रमाबाई चरित्र, पृ. ११८
२. त्यावेळी धर्मातर केलेले दादाभाई नौरोजी, नारायण शेषाद्री, बाबा पदमनजी यांना पोलिससंरक्षण घेऊन वावरावे लागे. (श्यामसुंदर आढावः पंडिता रमाबाई, पृ. ११)
३. ज्ञानोदय, २४ जुलै १८८९, पृ. २३७. मृणालिनी जोगळेकरकृत उपर्युक्त ग्रंथात पृ. १४३.
४. दे. ना. टिळक : महाराष्ट्राची तेजस्विनी – पंडिता रमाबाई, प्र. आवृत्ती, पृ. ३०१.
५. युनायटेड स्टेटस्ची लोकस्थिती, पृष्ठे ८४, ८५ व १८३ वरून उद्धृत – मृणालिनी जोगळेकर कृत पूर्वोक्त ग्रंथात, पृ. १४९.
६. वि. द. घाटे : विचारविलसिते – धर्मातर’ हा लेख उद्धृत, महाराष्ट्र टाइम्स५.२.९५
७. श्यामसुंदर आढाव हे बाईंचे व्यासंगी चरित्रकार. त्यांच्या मते हे भारतीय स्त्रीने लिहिलेले पहिले इंग्रजी पुस्तक आहे.
८. पृ. २६८
९. तत्रैव.
१०. देवदत्त नारायण टिळक : महाराष्ट्राची तेजस्विनी, पृ. २२२
११. मृणालिनी जोगळेकरकृत : पंडिता रमाबाई चरित्र, पृ. ८५
१२. तत्रैव, पृ. ८६
१३. प्रतिभा रानडे, : स्त्रीप्रश्नांची चर्चा–एकोणिसावे शतक, पृ. ४१
१४. तत्रैव
१५. माझी साक्ष पृ. ४७
१६ तत्रैव पृ. ४८

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.