चर्चा : खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (६)

स्त्रियांवर अन्याय करणारी, मुख्यतः त्यांनाच दुःखात लोटणारी विवाहसंस्था व तिच्यासोबत उदय पावलेले अनेक समज- उदा. पातिव्रत्य, प्रत्यक्ष परमेश्वरानेच घालून दिलेल्या पतिपत्नींच्या गाठी, जन्मोजन्मी एकच पती असावा असा फक्त स्त्रियांवर केला जाणारा संस्कार, (जन्मोजन्मी एकच पत्नी असावी असा पुरुषाने विचार करून त्यासाठी काम्य व्रतांचे पालन केल्याचे कोठे ऐकिवात नाही. उलट त्याने आपल्या धर्मपत्नीला टाकून देऊन तिची परोपरीने कुचंबणा केल्याची उदाहरणे अनंत आहेत!) त्याच अनुषंगाने विवाहविधीचेआणि स्त्रीयोनीचे पावित्र्य – हे सारे मानवनिर्मित आहेत; त्यांविषयीच्या कल्पना भिन्नभिन्न काळांत व प्रदेशांत बदललेल्या आहेत; त्यांमध्ये सनातन किंवा शाश्वत असे काही नाही हे एकदा मनामध्ये स्पष्ट झाले की स्त्रियांचे दुःख कमी करण्यासाठी सध्याच्या एतद्विषयक परिस्थितीमध्ये परिवर्तनीय काय आहे हे ठरविण्याची आपल्यावर जबाबदारी येते. त्यातून जळगाव प्रकरणासारख्या मनाला हादरवून टाकणाच्या घटना घडल्या की त्यासंबंधी विचार करणे अपरिहार्य होऊन बसते.
गेल्या वर्षीच्या जळगाव-प्रकरणामुळे मी ह्या विषयासंबंधी लिहावयाला सुरुवात केली. अलीकडेच त्या प्रकरणी नेमलेल्या विशेष न्यायमूर्ति मृदुला भाटकर ह्यांनी दिलेला निकाल प्रसिद्ध झाला आहे. त्या निकालावरून असे स्पष्ट होते की काही मुलींना नको त्या पुरुषांच्या बलात्काराला पुन्हा पुन्हा बळी पडावे लागले ते blackmailing मुळे व नीच पुरुषांना blackmailing शक्य झाले ते योनिशुचितेविषयीच्या प्रचलित कल्पनांमुळे.
योनिशुचितेवदलच्या कल्पना देशकालाप्रमाणे बदललेल्या आहेत हे आपल्याला ठाऊक आहे. मग त्या पुन्हा बदलल्या, त्या विचारपूर्वक बदलता आल्या, तर blackmailing करणार्या अधम पुरुषांच्या हातातले शस्त्रच काढून घेतल्यासारखे होऊन ते पूर्णतया निर्बल होतील असे मला वाटले व तसे मी माझ्या लेखांमध्ये प्रतिपादन केले. आहे ती परिस्थिती बदललीच पाहिजे कारण ती पुरुषांना पक्षपात करणारी आहे व स्त्रियांना अतिशय अन्यायकारक आहे; कोणत्याही परिस्थितीत तिचे समर्थन होऊ शकत नाही असे मला जे वाटते ते चूक कसे नाही हे पुन्हा सांगण्याची, थोडी कैफियत देण्याची पाळी माझ्यावर आली आहे, कारण आजचा सुधारकच्या एप्रिल अंकात डॉ. नी. र. वर्हाहडपांडे, डॉ. के. रा. जोशी, प्रा. श्याम कुळकर्णी, श्री. मोरेश्वर वड्लकोंडावार आणि श्री. वि. बा. अलोणी इतक्यांची पत्रे वा लेख प्रकाशित झाले आहेत.
– ‘आल्फ्रेड किन्सेचे” पुस्तक मी फार वर्षांपूर्वी, त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाल्यावरोवर वाचलेले आहे. ते American Males व American Females विषयी। आहे. त्यानन्तर भारतीय स्त्रीपुरुष-संबंधांवरची म्हणून हिमाचल प्रदेशातील बहुपतिप्रथेवरची काही पुस्तके वाचली आहेत. एक तेथील माजी राज्यपाल प्रभुदास पटवारी ह्यांनी लिहिलेले आणि दुसरे तेथील माजी मुख्यमन्त्री डॉ. वाय्. एस्. परमार ह्यांचे. (ती वाचली तेव्हा त्यांचा संदर्भ पुढेमागे द्यावा लागेल ह्याची कल्पना नसल्यामुळे त्यांची, त्यांच्या प्रकाशकांची नावे, पृष्ठक्रमांक वगैरे नोंदी करून ठेवल्या नाहीत.) ती कोणत्याही चांगल्या ग्रन्थालयात सापडतील. ती वाचल्यामुळे माणसाचे वर्तन जैविकीवर आधारलेले थोडे व सामाजिक परिस्थितीवर आधारलेले अधिक असते अशी माझी खात्री झाली आणि ते (म्हणजे मनुष्यवर्तन) मुख्यतः त्याच्या मनावरील संस्कारांमुळे (conditioning मुळे) घडतेअसे माझ्या लक्षात आले.
माझ्या लेखांमधून मला माझी विद्वत्ता दाखवावयाची नव्हती – कारण ती मजजवळ नाहीच-तर मला स्त्रियांची आजची लाचारी दूर करण्यासाठी काय करता येईल तेसुक्वावयाचे होते. उपाय शोधावयाचे होते. माझे उपाय जर काही मंडळींना पटले तर अत्यन्त मन्दगतीने समाजवर्तनात काही इष्ट बदल घडेल अशी मला आशा होती.
मी जो विषय मांडत आहे तो किती नाजुक आहे. लोक त्याच्याविषयी किती संवेदनशील आहेत ह्याची मला कल्पना आहे. म्हणून तो अगदी मोजक्या लोकांपुढे, ज्यांच्या प्रगल्भतेविषयी, परिपक्वतेविषयी व तटस्थतेविषयी मला खात्री आहे अशांच्याचपुढे नम्रपणे वे गंभीरपणे मांडावयाचा असा माझा पहिल्यापासून प्रयत्न होता. तेवढ्यासाठीच कोणत्याही देनिकाकडे किंवा मोठ्या खपाच्या साप्ताहिकाकडे मी तो दिला नाही, आणि आजचा सुधारक मधूनच मी तो मांडत आलो आहे. त्याची पूर्ण छाननी व्हावी व ती अगदी सावकाश व्हावी असे मी पूर्वीपासून ठरविले होते व त्यासाठी ह्या माध्यमाची मी निवड केली. (लोक ह्या विषयाविषयी संवेदनशील असले तरी स्त्रियांच्या परिहार्य दुःखाविषयी संवेदनशून्य आहेत की काय अशी शंका मात्र आता मला येऊ लागली आहे.)
समस्त स्त्रीजातीवरचे विभिन्न अन्याय दूर कसे होतील ह्याविषयी रचनात्मक विधायक टीका (constructive criticism) मला हवी आहे. स्त्रियांना सर्व बाबतींत स्वयंनिर्णयाचे स्वातन्त्र्य दिल्याखेरीज त्यांच्या स्थितीत मौलिक बदल घडून येऊ शकणार नाही हे माझे मत अद्याप बदललेले नाही. आज मी मुख्यतः डॉ. के. रा. जोशी ह्यांच्या पत्राचा परामर्श घेणार आहे.
कुटुंब बळकट ठेवून स्त्रियांना स्वयंनिर्णयाचा हक्क उपभोगता येतो असे मला वाटते कारण बहुपतिक कुटुंबांच्या रचनेचे मी थोडेफार अध्ययन केले आहे. डॉ. के. रा. जोशी म्हणतात तसे त्यांचे अग्नी आणि पाणी ह्यांच्यासारखे एकमेकांशी वैर नाही. एका पुरुषाचा एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक स्त्रियांशी संबंध राहिल्याने कुटुंब विस्कटले नाही तसेच एक स्त्री व अनेक पुरुष एकत्र राहिल्यामुळे कुटुंब विस्कळित होणार नाही. एकदा त्यासाठी मन पक्के केले की झाले. येथेच मी वर म्हटल्याप्रमाणे संस्कारांचा संबंध येतो. आणि मानवी मनावर संस्कार करता येतात, ते बदलता येतात ही आता सिद्ध झालेली गोष्ट आहे.
आम्हा सर्वांना मिळून आपल्या कृतीचे बरे वाईट परिणाम जिला कळतात अशी स्त्री घडवावयाची आहे, तिच्या शिक्षणाला हातभार लावावयाचा आहे ह्यात संशय नाही. पण त्याचबरोबर आज समाजाला जे चुकीचे वाटते ते खरोखरच चुकीचे आहे काय हेही आम्हाला तपासून पाहावयाचे आहे. माझे स्वतःचे मत असे आहे की आमच्या आजच्या स्त्रीचारित्र्याविषयीच्या व योनीच्या पवित्र्याविषयीच्या कल्पना पूर्णपणे चुकीच्या आणि त्यामुळे त्याज्य आहेत. कारण ह्याविषयी आपल्यापेक्षा वेगळे शिथिल संस्कार असणार्या समाजांमध्ये स्त्रियांचे दुःख कमी आहे ही सिद्ध गोष्ट आहे.
डॉ. के. रा. जोशी म्हणतात की स्त्रियांना त्यांचे हित समजू शकत नाही. पण मला ते पटत नाही. वयाने मोठे झालेल्यांना, मतदानाचा हक्क प्राप्त असलेल्यांना आपले हिताहित कळत नाही असे आपण कसे म्हणावयाचे? जिला आपले हिताहित कळते तिला तो अधिकार द्यावयाला त्यांची ना नाही. ते सर्वांनाच देऊन टाकले तर काय होईल? ज्यांना आपल्या कृतीचे वाईट परिणाम कळणार नाहीत त्यांना चटके खावे लागतील. पण त्यांचेवर्तन गैर नाही असे जर समाजाला वाटू लागले तर त्यांना ते चटके लागणार नालेत. आणि तेच मला हवे आहे.
‘भावनावेगात वाहून जाणार्यान सामान्य स्त्रीवर्गात अशा व्यक्तींचे प्रमाण अत्यन्त विरळ, यच्चयावत् स्त्रियांच्या बाबतीत ही शक्यता केवळ असंभव अशी आहे असे त्यांचे वाक्य आहे. हा त्यांचा स्त्रियांच्या बुद्धिमत्तेविषयीचा, सुजाणपणाविषयीचा समज चुकीचा आहे. स्त्रिया ते समजतात त्यापेक्षा पुष्कळ जास्त समजूत असलेल्या, सुजाण अशा आहेत. एवढेच मी सध्या म्हणतो, आणि त्यांनी समस्त स्त्रीजातीवर अन्याय करणारे हे निन्दाव्यंजक वाक्य परत घ्यावे अशी त्यांना नम्र विनंती करतो. ‘अल्पवयीन मुली’ अशा वागू लागल्या म्हणजे काय होते याची साक्ष अमेरिकेतील आईबापांकडे विचारून पाहावी’ असेही ते पुढे म्हणतात. अमेरिकन मुलींच्या वागण्यामुळे डॉ. जोशी जितके अस्वस्थ आणि चिन्ताग्रस्त झाले आहेत तितके प्रत्यक्ष त्या मुलींचे आईबाप अस्वस्थ झालेले नाहीत, कारण अमेरिकेतील आईबापांच्या मनावरचे संस्कार डॉ. जोशींच्या संस्कारांपेक्षा भिन्न आहेत. तेव्हा ह्या प्रश्नाकडे तटस्थपणे, आपल्या डोळ्यांवरचा पूर्वग्रहांचा व संस्कारांचा चश्मा काढून ठेवून त्यांनी बघावे आणि त्या संदर्भात श्रीमती ललिता गंडभीर ह्यांचीसुद्धा साक्ष घ्यावी असे मला त्यांना विनम्रपणे सुचवावेसे वाटते.
पुढे ते कुटुंब आणि स्वातन्त्र्य ह्या दोन गोष्टी एकत्र नांदणे संभवनीय नाही असे म्हणतात. त्याविषयी आमचे मूलचे मित्र श्री. मोरेश्वर वड्लकोंडावार ह्यांचा अनुभव वेगळा
आहे. त्यांचे पत्र आल्यानंतर ते मला प्रत्यक्ष भेटून गेले आणि त्यांनी त्यांच्या पत्रात केलेल्या विधानांबद्दल थोडी अधिक माहिती दिली. त्यांच्या अनुभवजन्य माहितीप्रमाणे कामसुखार्थ इतरांचा शोध घेणारी स्त्री (आणि अशांची संख्या फार लहान, नगण्य, नाही) बहुधा आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक असते. ती आपली कौटुंबिक कर्तव्ये प्रेमाने पार पाडते. गडबोरीचे डॉ. शिरपूरवार हे नवरगावला वैद्यकीय व्यवसाय करीत असत. तेथे मेषपालांची वस्ती बरीच मोठी आहे. मेषपालांच्या कुटुंबातील पुरुष त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने नेहमीच रानोमाळ भटकत असतात. त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या तरुण स्त्रिया ‘अन्य’ पुरुषांना जवळ करतात. ही गोष्ट त्यांच्या कुटुंबीयांपासून लपलेली नसते. नवरा परत आल्यानंतर त्या प्रेमाने त्याचे स्वागत करतात. त्यांचे कुटुंबजीवन त्यांच्या अश्या वर्तणुकीमुळे अजिबाते बिघडत नाही, पुष्कळ स्त्रिया एकापेक्षा अधिक पुरुषांवर एकाचवेळी समान प्रेम करू शकतात असा त्यांचा अनुभव त्यांनी मजजवळ नोंदविला आहे. सर्व स्त्रियांनी नवरगावच्या मेषपालांच्या स्त्रियांप्रमाणे वागावे असे मला म्हणावयाचे नाही, पण माझ्या गाठीला काही अध्ययन-वाचन आणि काही साक्षीपुरावे आहेत असे मला आता सांगावे लागत आहे. माझ्या वाचकांच्या ठिकाणी असलेल्या स्त्रियांविषयीच्या सहानुभूतीला आवाहन करताना आपले स्वतःचे वाचन किती आहे हे सांगण्याची गरज पडावी ही घटना खेदकारक नाही का? आज नाइलाजाने मी ह्या वादात.ओढला गेलो आहे.
स्वातंत्र्य म्हणजे निरंकुशता, उच्छृखलता किंवा स्वैराचार नव्हे हेही पूर्वी कितीतरी वेळा सांगून झालेले आहे. तरीपण डॉ. जोशींना स्वातन्त्र्य ह्या संज्ञेला निरंकुशतेचा वास येतअसल्यामुळे किंवा त्याचा तोच अर्थ त्यांच्या लक्षात येत असल्यामुळे आणि त्यांच्यासारख्यांना शब्दच्छल करून व्यर्थ कालक्षेप करण्यातच रस असल्यामुळे ह्यापुढे लैंगिक स्वातंत्र्य हा शब्द वापरण्याऐवजी स्त्रियांची स्वायत्तता, त्यांचा स्वयंनिर्णयाचा अधिकार, असे शब्द वापरावयाचे असे माझे ठरले आहे. तर ही स्वायत्तता म्हणजे कोणालाही – स्वतःच्या पतीलाही – नाही म्हणण्याचा अधिकार, समस्त स्त्रीवर्गाला आजन्म ब्रह्मचारिणी राहण्याचा अधिकार! अशी स्वायत्तता स्त्रीपुरुषांना मिळाल्यानंतर म्हणजेच परस्परांचे नाही म्हणण्याचे अधिकार मान्य केल्यानंतर आपली स्वायत्तता सिद्ध करण्यासाठी परव्यक्तीशी लैंगिक संबंध स्वेच्छेने स्वीकारण्याची गरज राहत नाही; त्याचप्रमाणे स्त्रीपुरुषांमध्ये सुंदोपसुंदी होण्याचीही शक्यता नाही हे डॉ. के. रा. जोशींच्या ध्यानात आणून देण्याची गरज पडावी ह्याचा मला मनस्वी खेद होतो. माझे वरील विधान तर्कदुष्ट नाही, माझ्या प्रतिपादनामध्ये आत्मविरोध नाही. (हा खटला कोणत्याही तटस्थनिष्पक्षलवादाकडे नेण्यास माझी तयारी आहे.)
डॉ. जोशी ज्याला नवनीतगोमयमिश्रण म्हणतात ती परिस्थिती आज जगभर जरी नांदत नसली तरी अनेक कुटुंबांत, जातीजमातींमध्ये प्रत्यक्षात आहे ही बाब समाजशास्त्र व मानवशास्त्र (sociology, anthropology, social anthropology) ह्यांचे अध्ययन करणार्यांसना ज्ञात आहे. ह्या शास्त्रांचा अनुप्रयोग (application) करण्याचे धैर्य आमच्या देशातील विद्वानांच्या ठिकाणी नसावे म्हणून ते माझ्या लेखांवर अनुकूल प्रतिक्रिया देत नसतील. सावत्र मुलांवर, दत्तक मुलांवर निरपेक्ष प्रेम करणारे लोकच नाहीत असे म्हणणे त्यांच्यावर अन्यायकारक आहे.
‘काम ह्या सहजप्रेरणेच्या उपशमाची समाजहितकारक सोय असावी म्हणून उचितकाळी विवाहसंस्था विकसित झाली’ हे डॉ. के. रा. जोशी ह्यांचे वाक्य वाचून असे वाटले की ‘पुरुष-मृतात्म्यांच्या काम ह्या सहजप्रेरणेच्या उपशमाची परलोकी सोय व्हावी म्हणून उचितकाळी सतीची चाल विकसित झाली. उच्चवर्णीय पुरुषांच्या मानसिक समाधानासाठी प्रतिलोमविवाहनिषेध उचितकाळी विकसित झाला. त्याच कारणासाठी उचितकाळी तथाकथित उच्चवर्णीयांमध्ये विधवाविवाहनिषेध विकसित झाला. (ह्या साच्या संस्था ‘समाज हितकर आहेत असा दावा कोठेकोठे आजपर्यंत केला जात आहे. तसे संस्कार मुख्यतः स्त्रियांच्या मनावर घडावे म्हणून किती कल्पित कथा पुराणांतून रचल्या गेल्या आहेत! त्या कथांनाही पावित्र्य चिकटविण्यात आले आहे.) पण त्या संस्था नेहमीच पुरुषहितकर राहिल्या आहेत.
गुलामगिरीची प्रथासुद्धा समाजहितकरच मानली गेली होती. देवदासींची प्रथा समाजहितकारक मानली जात नव्हती? ह्या साच्या प्रथा-संस्था समाजहितकर नाहीत असे त्या त्या काळी वाटले नसते तर त्या स्थिरावल्या नसत्याच. त्या समाजहिताच्या आहेत ह्या विश्वासामुळेच त्या दृढमूल झाल्या. आमच्या दुर्दैवाने केवळ पुरुषहितकर असलेली विवाहसंस्थासुद्धा आजपर्यंत समाजहितकर मानली जात आहे. पण ह्या सान्याचे संस्था जश्या आज कालबाह्य झाल्या आहेत तशी विवाहसंस्थासुद्धा झाली आहे काय हे तपासूनपाहण्याचा उचितकाळ आता येऊन ठेपला आहे. आजवरचा इतिहास पाहिला तर असे दिसते की प्रत्येक वेळी दुर्बल घटकावर पराकोटीचा अन्याय करून समाजहिताचा सांभाळ केला गेला आहे. एका पक्षावर अन्याय केल्याशिवाय समाजहित सांभाळलेच जात नाही काय?
उच्चवर्णीय मध्यमवर्गीयांपेक्षा वेगळ्या संस्कारांनी प्रभावित असलेले, स्त्रियांच्या स्वयंनिर्णयाचा आदर करणारे जीवन हे केवळ नर आणि मादी असा संबंध असलेले पशुजीवन आहे असे डॉ. जोशींनी सूचित केले आहे. परंतु डॉ. जोशींनी तसे म्हटल्यामुळे ते तसे ठरत नाही. २८ व्या पृष्ठावर तिसर्याज परिच्छेदात एकपत्नीकत्वाचा प्रचलित नियम सैल करणे हा उपाय विचारणीय ठरू शकतो’ असे ते विवाहजुळणी, हुंडापद्धती, सुनांचा छळे, विधवांचा प्रश्न इत्यादींच्या संदर्भात म्हणतात. हे त्यांचे विधान फारच मनोरंजक आहे. ते पुरुषांसाठी जे नियम लावतात ते स्त्रियांसाठी लावत नाहीत. एकावेळी एकापेक्षा अधिक स्त्रियांशी, (विवाहबाह्य असोत की विवाहान्तर्गत असोत ) संबंध ठेवल्याने ते पुरुषांचे पशुवत् आचरण होत नाही. मात्र स्त्रियांच्या वतीने ती सूचना मी केल्याबरोबर ते त्यांना पशुसमान जीवन वाटते ह्यामध्ये त्यांच्या मनावर संस्कारांचा पगडा किती जबरदस्त आहे ते दिसून येते. मी ते संस्कार बदलण्याचाच आग्रह धरतो आहे. ते संस्कार बदलले किंवा निदान तटस्थतेने ह्या प्रश्नाकडे पाहिले, आपल्या समाजापुरते व आपल्या काळापुरते न
पाहता, त्याकडे साकल्याने पाहिले तर त्यांना माझ्या निष्कर्षाप्रत यावे लागेल असे मला । वाटते. मला वाईट ह्याचे वाटते की त्यांच्या मनाला स्त्रियांचे दुःख कोठे शिवतच नाही. जुनी घडी मोडेल व त्यामुळे आकाश कोसळून पडेल अशी टिट्टिभ पक्ष्यासारखी भीती त्यांनाच वाटत आहे.
पुरुषांना एकीपेक्षा अधिक स्त्रियांशी विधिपूर्वक आणि विधिमान्य विवाह करता येणे हे त्यांना उपलब्ध असलेले लैंगिक स्वातंत्र्यच होय हे डॉ. जोशी ह्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य नको असे म्हणता म्हणता ते स्वतःच त्याचा पुरस्कार करू लागले आहेत. आपल्या समाजात पुरुष जर खरोखरच जास्त असतील तर (जे आहेत असे पुण्याच्या श्री. शान्तिलाल मुथा ह्यांनी केलेल्या अध्ययनावरून सिद्ध झाले आहे असे मी मानतो) समाजस्वास्थ्य कायम राहावे एवढ्यासाठी स्त्रियांनाही ती मोकळीक द्यावी लागेल असे माझे जर-तर’ चे विधान आहे, आणि तसे करण्यात काहीही गैर नाही. आपल्या विवाहविषयक समजुतींमुळे स्त्रीपुरुषांच्या सामाजिक दर्जामध्ये फरक पडतात ते पडू नयेत असे जे मला वाटते ते माझे मत मला बदलावे लागेल असा एकही युक्तिवाद अजून पुढे आलेला नाही.