संपादकीय

आगरकरांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा जून-जुलै अंक आगरकरविशेषांक म्हणून वाचकांच्या हातांत देताना आम्हाला स्वाभाविकच आनंद होत आहे. ह्या अंकाचे संपादन डॉ. भा. ल. भोळे ह्यांनी केले असून त्यांचे संपादकीय निवेदन पुढे दिलेआहे. डॉ. भोळे ह्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल आम्ही त्यांचे अत्यन्त आभारी आहोत. ते आमच्यापैकीच असले व त्यांचे औपचारिक आभार मानण्याची तशी गरज नसली तरी ते मानल्याशिवाय आम्हाला राहवत नाही.
हा आगरकर विशेषांक प्रसिद्ध करीत असताना गेल्या वर्षी वर्षारंभी दिलेले एक आश्वासन मात्र आम्ही पाळू शकलो नाही ह्याबद्दल वाचकांची क्षमा मागणे आम्ही आपले कर्तव्य समजतो. हे आश्वासन म्हणजे काही महत्त्वाच्या ज्वलन्त विषयांवरील परिसंवादरूपी विशेषांक प्रसिद्ध करण्याचे. बरीच धडपड करूनही आम्हाला त्यात अजून यश आलेले नाही. परंतु म्हणून आम्ही तो विषय टाकून दिला आहे असे मात्र नव्हे. एकाहून अधिक विपयांच्या तयारीची सुरुवात झाली होती, आणि जरी ती पुढे रखडली तरी त्याचा पाठपुरावा करण्याचे आम्ही ठरविले आहे. चालू वर्षांच्या अवधीत निदान दोन विशेषांक प्रकाशित करू शकू अशी आम्हाला उमेद आहे.
महाराष्ट्र फौंडेशनच्या पुरस्कारामुळे आमची सांपत्तिक स्थिती बरीच सावरली आहे; परंतु तरी वर्गणीदारांच्या संख्येत वाढ करण्याची गरज अजून आहेच, पण त्याहीपेक्षा त्यांचा वैचारिक प्रतिसाद अधिक महत्त्वाचा आहे. त्याकरिता मासिक अधिकाधिक व्यक्तींच्या हाती जाणे अवश्य आहे. म्हणून विद्यमान वर्गणीदारांनी नवे वर्गणीदार मिळवून द्यावेत अशी विनन्ती आम्ही त्यांना करतो. त्याकरिता आमच्या एका मित्रांनी भेटवर्गणीची कल्पना सुचविली आहे. आपल्याला विवाह, वाढदिवस, परीक्षेत यश यांनिमित्त भेटी देण्याचे प्रसंगी वारंवार येतात आणि भेट काय द्यावी असा प्रश्न पडतो. त्याकरिता आजचा सुधारक एक वर्षाकरिता भेट म्हणून देता येण्याजोगा आहे. हा प्रयोग वाचकांनी अवश्य करून पाहावा अशी त्यांना विनन्ती आहे.
यंदा महागाईमुळे आम्ही आमच्या वर्गणीत नाईलाजाने वाढ केली. वार्षिक वर्गणीबरोबर आजीव वर्गणीची रकमही आम्हाला वाढवावी लागली. पूर्वीपासून आजीव वर्गणीदार असलेल्यांना अर्थातच ही वाढ लागू नाही. तरीसुद्धा आमच्या एका मित्रांनी, नेरळचे श्री. केशवराव जोशी ह्यांनी आजीव वर्गणीची वाढलेली रकम रुपये शंभर आपणहून आमच्याकडे पाठवून दिली. आम्ही त्याबद्दल त्यांचे अत्यन्त कृतज्ञ आहोत. अशी आमच्याविपयीची आपुलकीजर आमच्या सगळ्याच वर्गणीदारांनी दाखविली तर भविष्यात आम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकू असा विचार ह्याप्रसंगी आमच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. श्री केशवराव जोशी ह्यांचे पुनश्च एकवार आभार.

संपादकीय : अभ्यागत संपादकांचे
सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर यांच्या निधनाला शंभर वर्षे यंदा पूर्ण होत असताना त्यांच्या स्मृतीला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन करणे हे आजचा सुधारकआपले कर्तव्य समजतो. आगरकरांशी प्रस्तुत मासिकाचे बहुपदरी ऋणानुबंध आहेत हे आमच्या वाचकांना आम्ही सांगायला हवे असे नाही. स्मृतिशताब्दीचे निमित्त साधून आम्ही या विशेषांकाची योजना केली. मान्यवरांना आगरकरविचाराच्या विविध पैलूंवर लेख लिहून देण्याची विनंती केली. तिला जो प्रतिसाद मिळाला लो या अंकाच्या स्वरूपात आम्ही वाचकांच्या हाती देत आहोत.
शतकभराच्या वाटचालीनंतरही आमच्या आजच्या समाजाची प्रकृती ठणठणीत म्हणता येण्याइतपत चांगली नाही. ज्या कौटुंबिक सुधारणांचा पुरस्कार आगरकरांनी केला होता त्यातील बर्यापच आज आधुनिकीकरणाच्या व विकासाच्या क्रमात निदान वरकरणी तरी साध्य झाल्या आहेत. बालविवाहांचे प्रमाण महाराष्ट्रात कमी झाले आहे, स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, त्यांच्या दर्जात आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या सहभागात प्रमाणात्मक व गुणात्मक वाढ झालेली आहे, व्यापार-उद्योगधंद्यात वाढ झाली आहे अशा आणखी बर्या च गोष्टी येथे सांगता येतील. पण स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी सामाजिक तत्त्वत्रयी या सर्व सुधारणांच्या मुळाशी होती तिची रुजुवात आमच्या व्यक्तिगत, कौटुंबिक व सार्वजनिक जीवनात पर्याप्त प्रमाणावर झाली आहे असे म्हणता येणार नाही. प्रमाण कमी झाले असले तरी स्त्रियांचे दास्य, गौणत्व, परावलंबन, असुरक्षितता, निरक्षरता अजूनही समाजात बरकरार आहे. धर्मांधता, अंधश्रद्धा, धार्मिक पुनरुज्जीवनवाद व कर्मकांडे यांचे प्रस्थ कमी होण्याऐवजी वाढत चाललेले आपण प्रत्यही पाहतो. समाजातील श्रेष्ठींचे समर्थन लाभल्यामुळे तर त्यांना नवी प्रतिष्ठा मिळू लागली आहे. राजकीय जीवनात गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि संघटनाविभंजन या प्रवृत्ती अभूतपूर्व प्रमाणात बोकाळलेल्या असून लोकशाही मूल्ये नाममात्र शिल्लक राहिली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वज्ञानाचे विडंबन अनिबंध स्पर्धेच्या बाजार संस्कृतीत झाले असून सामाजिक न्याय आणि समता यांचे येथील अस्तित्वच धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत आगरकरांच्या विचारांचे परिशीलन व मूल्यमापन उपयुक्त ठरू शकेल असे आम्हाला वाटते. विशेषतः “राजकीय की सामाजिक?” या वादात त्याकाळी जी “सामाजिक’ची पीछेहाट झाली ती ज्यांना चिंताजनक वाटते आणि व्यापक अर्थाने “सामाजिक ध्येयवादाला समर्पित होऊन जे नवसमाजनिर्मितीचे स्वप्न साकार करू इच्छितात त्यांच्यासाठी हे विचारमंथन उपयुक्त ठरावे अशीआमची अपेक्षा आहे.
या अंकात डॉ. य. दि. फडके यांनी आपल्या लेखात टिळक-आगरकर यांच्यात पं. रमाबाईच्या शारदासदनावरून जो वाद झाला होता त्यासंबंधीचे काही नवे तपशील सांगितले आहेत. श्रीमती विद्या बाळ यांनी आगरकरांच्या स्त्रीविषयक विचारांची चर्चा केली आहे.आगरकरप्रणीत धर्मचिकित्सेचा आशय” या शीर्षकाचा डॉ. यशवंत सुमंत यांचा लेख वाचकांना विचारप्रवृत्त करील असा आहे. डॉ. चौसाळकरांनी आगरकरांच्या समाजशास्त्रीय विचारांचा परामर्श घेतला आहे. प्रा. दि. य. देशपांडे यांनी “विवेकवाद आणि आगरकरया विषयावर काही मार्मिक निरीक्षणे नोंदवली आहेत. प्रा. बेन्नूर यांनी हिंदू-मुस्लिम दंग्यांच्या संदर्भात शंभर वर्षापूर्वी आगरकरांनी लिहिलेल्या लेखांची केलेली चर्चा ते लेख आजच्या परिस्थितीतही किती उद्बोधक व मार्गदर्शक आहेत हे लक्षात आणून देणारी आहे. या सर्व लेखकांनी वेळात वेळ काढून लेखनसहकार्य केल्यामुळेच अंकाला दर्जेदार स्वरूप लाभले आहे. आम्ही या सर्व लेखकांचे अत्यंत आभारी आहोत.
आगरकरांच्या विचारांतील सर्वच महत्त्वाच्या विषयांना येथे स्पर्श झाला आहे असा अर्थातच आमचा दावा नाही. ते शक्यही नव्हते. पण वरील विषयाखेरीज आणखी काही लेख अंकात समाविष्ट करण्याचा आमचा इरादा होता. इतिहास विषयावर लेख मिळवण्याचा प्रयत्न आम्ही केला. उदारमतवादी विचारप्रवाहात आगरकरांचे स्थान आणि योगदान या विषयावरही लेख मिळवण्याची आमची खटपट होती. समकालीन कोणत्याही पत्रकाराच्या तुलनेत आर्थिक विषयांवर अधिक विस्ताराने आगरकरांनी लिहिले होते, त्यादृष्टीने
आगरकरांचे आर्थिक विचार” असा लेख मिळाला असता तर तो आम्हाला हवा होता. त्यांच्या शिक्षणविपयक तसेच वाङ्मयीन कतृत्वासंबंधीही लेख अंकात देण्याची आमची इच्छा होती. पण आमचे प्रयत्न कमी पडले याची आम्हाला खंत आहे.
सर्व मर्यादा सांभाळीत जे आम्ही या अंकात देऊ शकलो ते वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.