आगरकर आणि स्त्री

गोपाळ गणेश आगरकरांचे निधन झाले त्याला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.या विलक्षण ताकदीच्या माणसाला अवघे एकोणचाळीस वर्षांचे आयुष्य मिळाले आणि त्यातही जेमतेम पंधरा वर्षांचा काळाचा तुकडा आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्या हाती लागला. या अवधीमध्ये त्यांनी कितीतरी विषयांची, सखोल विचार आणि अभ्यास करून, मांडणी केली. त्यापैकी स्त्रियांच्या संदर्भात किंवा स्त्रीपुरुप-समतेच्या संदर्भात त्यांनी मांडलेल्या काही विचारांपुरताच माझा लेख मी मर्यादित करून घेतला आहे.
१ ऑगस्ट १८८८ या दिवशी सुधारक या त्यांच्या साप्ताहिकांसंबंधीचे एक जाहीर पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सुधारक सुरू करण्याचा उद्देश काय आणि त्यामध्ये प्रसिद्ध होणार्‍या साहित्याचे स्वरूप कसे असेल यासंबंधीची माहिती या पत्रकात आहे. जनमानसात वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी वृत्तपत्र हे एक प्रभावी माध्यम आहे या विश्वासाने सुधारकाचा जन्म झाला. अशा प्रकारे पत्रकारितेच्यामुख्य प्रवाहात गंभीरपणाने उतरणाच्या सुधारकासंबंधीच्या पहिल्याच जाहीर आवाहनात श्री आगरकर जाहीर करतात ‘सुशिक्षित स्त्रियांना स्त्रीशिक्षणादी विपयांवर आपले मत प्रकट करिता यावे व वाचकांसही ते वाचण्यास मिळावे, म्हणून स्त्रीलिखित लेखांकरिता स्वतंत्र स्थल राखून ठेवण्याची आम्ही योजना केली आहे’. आजच्या नामवंत वृत्तपत्रांमध्येही स्त्रिया आणि मुले यांना एकाच पानावर एकाच पंक्तीत, आठवड्यातून एकदा वाढले जाते! या वस्तुस्थितीच्या तुलनेत आगरकरांच्या सुधारकामध्ये शंभर वर्षांपूर्वीसुद्धा स्त्रियांना अधिक गंभीरपणे आणि समतेच्या तत्त्वानुसार जागा आणि दर्जा देण्यात आला याची मला सुरवातीलाच नोंद करावीशी वाटते.
टिळक-आगरकरांच्या जमान्यात कर्ते सुधारक आणि बोलते सुधारक अशी एक वर्गवारी केली जात होती. त्यापैकी इष्ट असेल ते बोलत शक्य असेल ते करीत जगणार्‍यांपैकी आगरकर हे एक होते. शिवाय विचारांची इष्टता आणि प्रत्यक्ष शक्यता यांच्यामध्ये कमीत कमी अंतर राहील यावर त्यांचा कटाक्ष होता. समतेचा विचार क्षमता आणि संमती यांच्याशी जोडून घेऊन त्यांनी मांडला. यालाच स्वातंत्र्य याही मूल्याची जोड देऊन ते मांडणी करीत राहिले. या संदर्भात त्यांच्या सहजीवनातील त्यांचा काटेकोरपणा मला फार मोलाचा वाटतो. बुद्धिवादाचा आगरकरांनी प्राणपणाने पुरस्कार केला, पण बुद्धीच्या निकषावर घासून स्वीकारलेली स्वतःच्या जगण्याची पद्धत त्यांनी आपल्या पत्नीवर कधीही लादली नाही. नेहमीप्रमाणेच, कुणी जेव्हा याबाबत आगरकरांना डिवचून विचारीत, तेव्हा आगरकर स्वातंत्र्याच्या सन्मानाचे मूल्य बोलून दाखवीत आणि सांगत की, त्यांचे विचार त्यांच्या पत्नीला पटतील तेव्हाच ती ते आचरणात आणील. तोपर्यंत त्या चांगल्या हितकरविचारानुसार जगण्या-वागण्याची जबरदस्ती पत्नीवर करण्याचा विचारही त्यांना शिवली नाही. याला अपवाद म्हणता येईल कदाचित, असा एकच घडला असावा.
श्री आगरकरांचे परममित्र श्री. वा. शि. आपटे मरण पावले त्यावेळी त्यांच्या पत्नीचे केशवपन झाले नव्हते. पण वर्षाभरानंतर श्री. आगरकर एकदा त्यांना भेटायला गेले असता या विधवा बाई दारातून पुढे न येता दाराच्या आडून बोलल्या! आगरकर समजले आणि चरकलेही. वर्षभरानंतर या विधवा मित्रपत्नीचे केशवपन झाले होते! ते अस्वस्थ मनाने घरी आले. त्यांनी आपल्या पत्नीकडून एकच वचन घेतले – आपल्या मृत्यूनंतर केशवपन न करण्याचे! यशोदाबाई आगरकरही हिंमतीच्या म्हणायला हव्या. शंभर वर्षांपूर्वीच्या काळातही आपल्या दिराच्या बोलण्याला, टोमण्याला, अप्रत्यक्ष सांगण्याला न जुमानता त्या सकेशाच राहिल्या! त्यासाठी संसारातल्या भांड्याकुंड्यांचे किंवा दिरांच्या मर्जीचे आमिपही नाकारून त्या आपल्या मुलांसह, आगरकरांना दिलेले वचन पाळून जगल्या!
अगदी सुरवातीपासूनच आपल्या सहजीवनात स्वतः आगरकर अतिशय सजगपणे आणि जवाबदारीने वागले. यशोदाबाई लग्नात वयाने लहान. शिवाय स्वभावाने थोड्या धांदरट, कामाची सवय कमी असावी. कडक सासूचा धाक. यामुळे त्यांच्याकडून कामात चुका होत असत. सुरुवातीच्या या काळात आगरकरांच्या आत्याबाई, लहानग्या नवविवाहित यशोदेबद्दल तक्रार करीत आणि आगरकरांना दुसर्‍या विवाहाबद्दल सतत सुचवीत. आगरकरांच्या समजावणीला आत्याबाई दाद देईनात. आगरकरांना स्वतःला या गोप्टी किरकोळ; आणि दुसरी बायको करावी एवढ्या गंभीर वाटत नसाव्या. अशा वेळी सारखी भुणभुण करणार्‍या आत्याबाईंना एकदा आगरकर म्हणाले, ‘हे बघ, दुसरे लग्न करायचे तर मी विधवेशी पुनर्विवाह करीन.’ या धमकीला आत्याबाई घावरल्या आणि पुन्हा म्हणून त्यांनी दुसन्या लग्नाचा विषय काढला नाही! इतक्या जुन्या जमान्यात आपल्या वायकोला समजून घेण्याची, तिच्या पाठीशी उभे राहण्याची आणि तिला बदलण्यासाठी अवधी देण्यासाठी धीर धरण्याची सुजाणता आगरकरांनी दाखवली! आगरकरांच्या कर्त्या सुधारकपणाच्या या मोलाच्या खुणा मानायला हव्या.
आगरकर ज्या व्यापक परिवर्तनाचा विचार डोळ्यांसमोर ठेवून लिहीत होते, त्याचा कुटुंब हा ते पायाभूत प्रारंभ मानत होते. कुटुंबाची स्थिरता स्त्रीपुरुप-नात्यावर अवलंबून असल्यामुळे या नात्यातील समता, संमती, स्वातंत्र्य या मूल्यांवर त्यांचा कटाक्ष होता. म्हणूनच बालविवाह, केशवपन, गर्भाधान विधी, स्त्रियांसाठी शिक्षण, कुटुंबांतर्गत कामाची प्रतिष्ठा अशा कितीतरी विविध अंगांनी त्यांनी स्त्रियावरील अन्यायाचा, अत्याचाराचा आणि त्यांच्या कुचंबणेचा विचार केला. विशेषतः राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने जनमताच्या विरोधात लोकमान्य टिळकांसारख्या मातब्बर नेत्याच्या मतांशी टक्कर देत सुधारकातून विचारपूर्वक परिवर्तनाचा विचार मांडला गेला हे महत्त्वाचे आहे. आमचे काय होणार?’ या लेखात आगरकर म्हणतात, ‘समाजाचे मुख्य घटक कुटुंबे होत व कुटुंबांचे मुख्य घटक स्त्री-पुरुष होत. तेव्हा कुटुंबाचा विचार करताना प्रथम स्त्रीपुरुषसंबंधाचा विचार केला पाहिजे. याच संदर्भात स्त्री-शिक्षणासंबंधीचा मूलभूत विचार मांडताना आगरकर लिहितात, ‘स्त्रीपुरुषांना एकत्र (आणि एकच) शिक्षण दिल्यामुळे कित्येक पुरुषांना घरी बसून मुले खेळविण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे, दळणकांडण करण्याचे काम करावे लागले तर त्यालाआम्ही काय करणार? असली कामे स्त्रियांनीच करावी हा ईश्वरी नियम नाही!’
ज्याला जे काम साधेल त्याने ते करावे अशी मोकळीक देण्यात ते करणाराचा अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे यावर आगरकरांचा विश्वास होता. स्त्रियांचा मेंदू लहान म्हणून त्यांची अक्कल कमी असा दावा करणार्‍यांच्या संदर्भात ते लिहितात, ‘सत्ता वापरण्याची अक्कल अंगी असो अथवा नसो, ज्याला ती प्राप्त झाली आहे त्यास ती सोडू नये असे वाटते. यामुळेच स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध होतो याचे आकलन तर आगरकरांना होतेच, पण पाहिजे त्या पुरुषाला पाहिजे ते शिक्षण मिळावे हासुद्धा विचार समाजाला पचलेला नाही आणि स्त्रियांच्या प्राथमिक शिक्षणाला मान्यता मिळवण्यात कितीकांना केवढे रण खेळावे लागले या वास्तवाचे त्यांना पूर्ण भान होते.
स्त्रीशिक्षणाचा असा मूलभूत विचार मांडणाच्या आगरकरांचे विचार वाचताना अल्वा मिर्दाल आणि व्हायोला क्लेन या जगप्रसिद्ध स्त्रीसमाजशास्त्रज्ञांची आठवण येते. Montent’s Two Roles : Honne and Work या पुस्तकात बदललेल्या सामाजिक परिस्थितीची निरीक्षणे दाखवत त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला. प्रत्येक राष्ट्रात जशी पाणी, सूर्यप्रकाश, खनिजे इ. सारखी नैसर्गिक संपत्ती असते तशीच मनुष्यसंपत्ती असते. या मानवी संपत्तीपैकी सामान्यतः निम्मी शक्ती स्त्रियांची असते. या मानवी संपत्तीचा उपयोग न करणे म्हणजे अपुरा विकास आणि कमी समृद्धी. यासाठी विज्ञानाच्या शोधामुळे माणसाला दीर्घायुष्य मिळण्याच्या शक्यता वाढल्या असताना अर्धी मानवीसंपत्ती दुर्लक्षित, उपेक्षित राहील तर त्यात राष्ट्रविकासालाच खीळ पडेल. हे विचार या शतकात मांडले जात असताना स्त्रीशिक्षणाचे महत्त्व ओळखून त्याचा सखोलपणे विचार करणाच्या
आगरकरांच्या द्रष्टेपणाचा पल्ला लक्षात यायला हवा!
भवतीचे विदारक वास्तव आणि समाजपरिवर्तनाचा ध्यास, यापायी स्त्रियांच्या जिण्याचे जीवघेणे वास्तवच आगरकरांना हलवून गेले असावे. म्हणूनच बालविवाह, केशवपन, सती यासारख्या स्त्रीअन्यायांचा ते पोटतिडकेने विचार करतात. ‘प्रणयाराधन’ या एका लेखात गर्भाधानाच्या विधीच्या निमित्ताने त्यांनी एवढा जबरदस्त हल्ला या रूढीवर केला आहे! आज घडीलाही स्त्रीपुरुषामधील शरीरसंबंधाचा गंभीरपणाने विचार व्हावा यासाठीही या विषयाच्या वाटेला जाण्याचे धाडस फार थोडे लोक करतात! पण आगरकरांचे वेगळेपण यातच आहे. ‘प्रणयाराधन’ हा लेख खरा मुळातूनच वाचायला हवा. कामवासनेची झुळूकही ज्यांच्या अंगावरून गेली नसेल अशा दोन पोरांना रत्युपभोगासाठी विशेष काळजीने व खर्चाने शंगारलेल्या अशा खोलीत जबरीने ढकलून देऊन तिची दारे लावून घ्यावयाची आणि जन्माला येऊन पाहायचे ते पाहिले आणि करायचे ते केले अशा समाधानकारक विचारात आपल्या स्थळी जावयाचे! आणि मन्मथकारागृहात कोंडलेल्या त्या पोरांची कशी स्थिती होईल याच्या चिंतनात अंथरुणावर लोळत राहावयाचे!’ असे अतिशय बोचरे वर्णनवाटते.या निर्घण रूढीच्या संबंधात या लेखात केले आहे. तसेच बालाजरठ विवाहाच्या संदर्भात एके ठिकाणी ते लिहितात-‘कामाच्या झपाट्यात निराश्रित कुमारिकांची अंगे विदारण्याचा हक्क आमच्या धर्माने आम्हाला दिला आहे, तर आणखी एके ठिकाणी ते लिहितात, ‘दुसन्यास कुरूप करण्याचा हक्क! पोटच्या पोरीचे कुंकू पुसण्याचा अधिकारमुलाच्या बायकोस नापितासमोर बसविण्याचे स्वातंत्र्य! असले हक्क, असले अधिकार, असले स्वातंत्र्य राखण्याबद्दल आकांडतांडव करणार्‍यास हक्क, अधिकार आणि स्वातंत्र्य यांचा अर्थ व उपयोग मुळीच समजत नाही. स्त्रियांवरील या अत्याचारग्रस्त वस्तुस्थितीविषयी लिहिताना त्यांच्या मनाला येणारी विपण्णता आणि लेखणीला चढणारी धार आपल्यापर्यंत थेट पोचते.
विशेषतः आजच्या आपल्या कायद्यात नवव्याने बायकोच्या इच्छेविरुद्ध केलेल्या संभोगाला बलात्कार ठरवले जात नाही. याला अपवाद फक्त अल्पवयीन – सोळापेक्षा वयाने लहान असणार्‍या मुलीचा. स्त्रीला आपल्या शरीरापासून ते अन्य कोणत्याही निर्णयात नकाराचा अधिकार तर नाहीच, पण त्याबाबतची अपेक्षा करणेही जवळपास गुन्हाच ठरतो. या ताज्या पाश्र्वभूमीवर इतक्या जुन्या जमान्यात, हा विषय पुढ्यात घेण्यापासून ते त्याची परखड मांडणी करण्यापर्यंत आगरकरांनी दाखवलेली जबाबदारीची जाणीव खूपच महत्त्वाची वाटते.
सुधारणा आणि परिवर्तन यांचा अर्थ सम्यक पद्धतीने लक्षात घेऊन बुद्धिवादाची कास धरत, लोकमताच्या परंपरागत मतप्रवाहाविरुद्ध आगरकर आयुष्यभर झगडत राहिले. विचार करण्याची कुवत हे सर्वाधिक समर्थ बनवणारे साधन आहे यावर आगरकरांचा विश्वास होता. विचार ही कृतीची अलिकडची पायरी आहे. विचार न करता आंधळेपणाने प्रेम किंवा परंपरा या नावाखाली समता आणि स्वातंत्र्य यांचाच बळी देणार्‍या समाजाला रोकण्याची आणि विचार करायला लावण्याची झुंजार पराकाष्ठा त्यांनी केली. वाईट असे वाटते की तेव्हाही आणि शंभर वर्षानंतर आजही विचारापेक्षा, विचाराची बैठक नसलेल्यालाही, कृतीचेच महत्त्व वाटते. म्हणूनच कृतीचा जन्म विचारातून व्हायला हवा. आधी परिस्थितीचे निरीक्षण, मग आकलन, मग कारणांचा शोध आणि सर्वात शेवटी व्यक्तीवर टीका न करता, व्यक्तीच्या विचारामधले अधिकउणे त्याला समजावून देणे हीभूमिका परिवर्तनाचा ध्यास घेणान्याच्या मनात असायला हवी. व्यक्तिशः मला माणसामधला वदल दहशतीने, धाकाने, भीतीपोटी घडवून आणणे योग्य वाटत नाही. या प्रकारच्या बदलातले वागणे सवयीतून होते, समजेतून होत नाही. म्हणूनच ते टिकाऊ नसते, जिवंत नसते आणि म्हणूनच विवेकी बदलाचे सातत्य टिकवणारे नसते.
आगरकरांनी पत्रकारितेतून सदैव हीच भूमिका घेतलेली दिसते.
‘बहुविध ऐहिक सुख जास्तीत जास्त प्रमाणात जास्तीत जास्त व्यक्तींच्या वाट्यास येणे हे आपल्या नैतिक जीवनाचे अंतिम ध्येय आहे आणि म्हणून आपल्या समाजाची रचना, त्याच्या संस्था, त्यातील चालीरीती, त्याचे कायदे इ.च्या मूल्यांचा निकपही तोचआहे. … हिंदुस्थानात एकूण एक प्रौढ स्त्रीपुरुपास लिहिता वाचता आले पाहिजे; तसेच प्रत्येक व्यक्तीस आपला चरितार्थ चालवण्यासारखा एखादा तरी धंदा येत असला पाहिजे. … या प्रकारचा समाज हे त्यांच्या परिवर्तनाचे उद्दिष्ट होते. जातिभेदाच्या, लिंगभेदाच्या भिंती भुईसपाट करणारा खराखुरा समतेचा आणि समाजहिताचा विचार त्यांनी मांडला. त्यातच स्त्रीपुरुषसमतेचा विचार त्यांनी एक मुळातला विचार म्हणून मांडला आणि आपल्या सहजीवनात तो आचरणात आणला हे त्यांचे मोठेपण मला खूप आपले, जवळचे वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.